Tuesday, July 31, 2018

चन्ना मेरेया ..

घाईघाईत सॉक्स चढवून , कपाटातुन शूज घ्यायला वळताना एकदम आठवले की कालच्या पावसात शूज चिंब भिजले आहेत. आजिबात सुकले नसतील. तरीही एकदा  खात्री करावी म्हणून त्याने कपाट उघडलं. ओले चिंब शूज पाहुन फारसं आश्चर्य नाही वाटलं त्याला. मनात स्वतःशीच पावसाला शिव्या घालत त्याने सॉक्स काढून कपाटात फेकले. ती न आवडणारी तपकिरी चप्पल घातल्याशिवाय दुसरा काही पर्यायच नव्हता. चडफडत तशीच चप्पल चढवून तो निघाला.

आज कधी नव्हे ते चप्पल घालून बाहेर चालल्यामुळे त्याला चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते.

एक चा टोल पडला घड्याळात.


"चल रे,  आज जेवायचे नाही का ?" तिचा आवाज ऐकून तो एकदम भानावर आला.

"हो, चला. कुठे जायचे आज?" उगीच काहीतरी विचारायचे म्हणून तो उत्तरला.

तसे नेहमीचे ठिकाण ठरलेलं होतं . दोघंही पटकन निघाली. इकडच्या , तिकडच्या गप्पा सुरु असताना, तिचे लक्ष त्याच्या पायांकडे गेले.

"हे काय ? आज चप्पल अचानक ?"

"अगं , कालच्या पावसात शूज चिंब भिजले. म्हणून .... "

"आणि हे काय, पायाची नखं केवढी वाढवलीयस ? हाहाहा .." ती एकदम हसायला लागली.

"आं .. अं .. ते काय आहे ना, शूज घालतो ना नेहमी, त्यामुळे नखं काढली काय, आणि नाही काय... फरकच पडत नाही... " त्याने कारण सांगितले .. पण एकदम ओशाळून गेला तो.


त्याला तसे पाहून ती आणखी जोरात हसायला लागली. या क्षणी जमीन दुभंगून सीतेसारखे लपून जावं , असा वाटलं त्याला. तिचा हसण्याचा बहर ओसरला, आणि त्याने काहीतरी विषय बदलला.

उसनं अवसान आणून तो उगीच म्हणाला "हसून घे पाहिजे तेवढं , मला काहीही फरक पडत नाही. असाच आहे मी."

पण राहिलेला दिवसभर पाय लपवून बसला तो....

---------------------------------------------------------------------------------------------------------------

दुसऱ्या दिवशी सॉक्स चढवले, आणि शूज घेताच हात थबकला त्याचा. आज शूज एकदम क्रिस्प वाळले होते. पण काय वाटले काय ठाऊक, शूज परत तसेच ठेवले, सॉक्स काढून टाकून दिले.  उशीर झाला होता. तरीही काहीतरी आठवले आणि बाथरूम कडे  पळाला....

"चला महाराज , भूक लागली नाही का ? कि आजच सगळं काम संपवायचंय ?" ती मजेत म्हणाली.
त्याने घड्याळाकडे पाहिले. १ वाजले होते.

"चला !" म्हणत घाईघाईत तो निघाला .

कालच्या सारखंच , इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु असताना, तिचं लक्ष परत त्याच्या पायाकडं गेलं .
ती जोरजोरात हसायला लागली. कालच्यापेक्षा कितीतरी जास्त. थांबायलाच तयार नव्हती.
"अरे तू चप्पल घातलीस आज पण. आणि हे काय तू नखं काढलीस पायाची. ? हाहाहा ... "

तो  जाम ओशाळून गेला होता.
"अगं , त्यात काय एवढं ? काढली अशीच..  आणि प्लिज गैरसमज करून घेऊ नको हां ! .. तू म्हणाली म्हणून वगैरे काही नाही काढली मी ... "

तो उगीच सावरासावर करू लागला. तशी ती आणखीच जास्त हसायला लागली. डोळ्यात पाणी येई पर्यंत हसली
ती अगदी. त्याला काय बोलावे तेच कळेना.  गप्प बसून राहिला तो...

" हो रे , मला माहितीय .. मी काल म्हणाले म्हणून काही नाही काढली तू नखं . तसाही
तुला काही फरक पडत नाही , तू म्हणालास ना काल ? " ती उगीच त्याची समजूत काढत मिष्कीलपणाने म्हणाली.

तसा अजून उखडला तो. खरे तर स्वतःवरच जास्त चिडला होता तो ...

---------------------------------------------------------------------------------------------------------------
मेहफील में  तेरी ... हम ना रहें जो..  गम तो नहीं हैं .. 
क़िस्से हमारे .. नज़दीकियों के..  कम तो नहीं हैं .. 
कितनी दफ़ा .. सुबह को मेरी तेरे आँगन में बैठें मैंने .. शाम किया  .. 


Saturday, April 8, 2017

एका लायसन्सची गोष्ट

"थांबव रे , हेच आहे आर टी ओ ऑफिस!" रव्या म्हणाला.  मी करकचून ब्रेक दाबून मोटारसायकल हळूच रस्त्याच्या बाजूला थांबवली. 

"तो बघ , तो शिंदे तिकडे टपरीवर थांबलाय. चल लवकर." म्हणत रव्या भराभरा चालू लागला. मीही पाठोपाठ पळालो. 

नीलम पान स्टॉल ! हजारोचा गल्ला होत असेल रोजचा ह्या पानवाल्याचा. आर टी ओ ऑफिस मध्ये काम असणारा प्रत्येकजण ह्या पानवाल्याचं गिऱ्हाईक. कुणी पान , सुपारी, सिगारेट; तर कुणी लायसन्स चे फॉर्म  वगैरे  घ्यायला इकडे चक्कर मारणारच! आणि, वर झाडून सगळे ऑफिसर्स , एजन्टस ह्याच्या ओळखीचे. 

माझे आणि रव्याचे इथे येण्याचे प्रयोजन म्हणजे मला माझे टू व्हिलरचे लायसन्स काढायचे होते.  लर्निंग लायसन्स घेऊन सहा महिने झालेले. आणि फुल्ल लायसन्स असलेलं कधी पण बरे. रव्याच्या ओळखीचा एक एजन्ट होता शिंदे म्हणून. त्याने रव्याचे लायसन्स गेल्या वर्षीच काढून दिलेले.  म्हटलं , चला आपणपण त्याच्याकडूनच काम करून घेऊ. 

"नमस्कार शिंदे साहेब. हा माझा मित्र महेश. यालाच लायसन्स काढायचे आहे. "  रव्या हात जोडून म्हणाला. 
"ललनिन का पम्मम ?" तोंडातलं पान सांभाळत शिंदे म्हणाला. 
"काय?" मी वैतागून विचारले. मला त्याची सांकेतिक भाषा काही समजली नाही. 
मनातल्या मनात मला शिव्या घालत , मस्त जमलेले पान थुंकावं लागल्याचा वैताग कसाबसा लपवत , पच्चकन थुंकून शिंदे म्हणाला  "लर्निंग का पर्मनंट हो ? कुठलं लायसन्स काढायचंय ?" कुठून आणलंय हे येडं काय माहित अश्या अविर्भावात, त्याने रव्याकडे उगीच एक कटाक्ष टाकला. 
"पर्मनंट !" मी उत्तरलो. 
"कागदपत्रं आणलीत का सगळी ?
"होय. हि काय , सगळी आणलीयत." मी माझ्या हातातली फाईल त्याच्यासमोर धरली.  
"बरं , एक गोष्ट लक्षात ठेवायची. नवीन आर टी ओ आलाय सोमवारीच बदली होवून. तेंव्हा जास्त बडबड करू नका त्याच्यासमोर! आणि दुसरी गोष्ट , टेस्ट मध्ये आपली गाडी जरा हळू चालवा. बाकी मी घेतो ऍड्जष्ट करून.
"ओ के. गाडी चालवायची चिंता करू नका हो, मी मस्त गाडी शिकवलंय त्याला. " रव्या उगीच स्वतःकडे भाव घेत म्हणाला. 
"चला निघू मग् . " मी म्हणालो.  इकडे शिंदे आपला , थोड्या वेळापुर्वी टपरी समोर टाकलेल्या पानाच्या पिचकारीने जे काही डिजाइन तयार झाले होते, त्याचं कौतुकाने निरीक्षण करण्यात मग्न होता. अचानक बाजूच्याने मारलेली फ्रेश पिचकारी त्या डिजाइन वर दिमाखाने पसरली, आणि शिंदेची तंद्री भंगली. 
"चला!" म्हणत शिंदे निघाला . मागे मी मी आणि रव्या पण चालू लागलो. 
"काम होईल ना ?" रव्या म्हणाला. 
"पंधरा वर्षं गेली आपली हितं मित्रा , कामाची चिंता नाही करायची. फक्त तेवढं नवीन आर टी ओ आलाय , जरा सेट व्हायला वेळ लागंल. बाकी काही नाही. निवांत राव्हा तुमी." शिंदे बढाई मारत म्हणाला. 

लायसन्स डिपार्टमेंट समोर ही...  लांबलचक लाईन. शिंदेने लायसन्स फॉर्म काढून भराभरा भरला. घाईघाईत मला दोन चार जागी सह्या करायला लावल्या , कागदपत्रं जोडून सरळ आर टी ओ च्या केबिन मध्ये जाऊन फॉर्म देऊन आला.     
 "अरे, शिंदे साहेब, तो फॉर्म एकदा पाहून घेतला असता मी, सगळी माहिती बरोबर आहे का वगैरे! इंग्लिश मध्ये आहे तो फॉर्म. " मी म्हणालो.
शिंदेनी परत माझ्याकडे  'कुठून आलंय हे येडं' वाला कटाक्ष टाकला. म्हणाला "घाबरू नका हो तुमी , पंधरा वर्षांपासून हेच काम करतोय . फॉर्म तोंडपाठ आहे माझ्या.  डोळे झाकून सुद्धा भरीन वेळ आली तर. " एवढं बोलून,  तो त्याच्या पुढच्या गिऱ्हाईकाकडे वळला. 

"बरं बरं , दोन वाजता ग्राउंड मध्ये भेटू टेस्ट साठी." म्हणत मी आणि रव्या टपरी कडे सिगारेट फुंकायला वळलो. 

********************************************

दोन वाजता टेस्ट वगैरे सुखरूप पार पडली.  आता फक्त आर टी ओ समोर जाऊन एक सही केली की मी घरी जायला मोकळा! शिंदेनी ऑफिस समोरच्या लाईन मध्ये सगळ्यात पुढे नेऊन उभे केले मला. मागची लोक तक्रार करायला लागली तर त्यांनाच दरडावून चुप्प केले त्याने. शिंदेबद्दलचा आदर माझ्या मनात अजून दुणावला. 

"काय नाही. आत जाऊन नाव विचारतील साहेब, आणि एक सही ठोकायची. टेन्शन नाही लाईफ मध्ये." शिंदेनी मला निर्धास्त केले. 
"नेक्स्ट !" आतून आवाज आला. 
मी मोठ्या आत्मविश्वासाने आत एन्ट्री मारली. 
"नाव?"
मी नाव सांगितले. 
"पत्ता ?"
पिनकोड सहीत पत्ता सांगितला मी.  आणि सही ठोकण्यासाठी खिशातल्या पेन काढायच्या तयारीत उभा राहिलो.
"काय डोळ्याचा नक्की प्रॉब्लेम काय आहे?" समोरून काळजीच्या सुरात प्रश्न आला .  
अगदी अनपेक्षित प्रश्न होता.  मला काहीच कळायला तयार नाही. 
"मला कळले नाही साहेब . माझ्या डोळ्यांबद्दल विचारताय का?"
"फॉर्म कोण तुम्हीच भरलाय ना ?"
मी गप्प . 
"इथे Does the applicant suffer from any defect of vision? पुढे yes लिहिलं आहे तुम्ही."
माझी वाचाच  बंद. 
"अहो तुम्हीच भरलाय ना फॉर्म ? तुमचीच सही आहे ना ही ?"
"हो साहेब, पण फॉर्म एजन्ट नि भरलाय." मी अपराधी सुरात म्हणालो. 
"अहो पण तुमच्यासारखी शिकली सावरलेली लोकं पण ना बघता असे फॉर्म साईन करायला लागली तर काय होईल ह्या देशाचं ?"
मी गप्पंच. 
"माझ्याकडे पेन फेकत साहेब म्हणाले. " ते करेक्ट करा !"
मी गप्पकन पेन पकडला  आणि करेक्शन केले.  अजून एकदा सगळा फॉर्म वाचून चुका नसल्याची खात्री केली. 
"सॉरी साहेब . खरंच चूक झाली . थँक यु"  - इति मी .
"सगळा सावळा गोंधळ चाललाय इथे. मी बघतोय जॉईन झाल्यापासून. मी सगळ्यांना सरळ करणार आहे. " स्वतःशीच बोलत मला सही करण्यासाठी त्यांनी खुणावले. 
पट्कन सही करून मी बाहेर धूम ठोकली.  शिंदे आणि रव्या बाहेर थांबले होतेच. 
"झाली का सही? येईल एखाद्या महिन्यात लायसन्स तुमचं.  जावा आता घरी. " शिंदेनी ग्वाही दिली. 

मी काही बोलणार तेवढयात शिंदेंना आतून बोलावणं आलं. पाच मिनिटांनी अगदी पडीक चेहरा करून शिंदे केबिन बाहेर आला. 
"घोळ झाला राव. साहेबांनी एकदम पाचर ठोकली." शिंदे आमच्याकडे येत म्हणाला. 
"ह्याच फॉर्म वर पंधरा वर्षे लायसन्स दिले सगळ्यांनी. पहिला आर टी ओ आहे ज्याने चूक पकडली." कौतुकवजा सुरात तो म्हणाला. 
"म्हणजे? तुम्हाला फॉर्म वर काय प्रश्न आहेत हे पण माहित नाही?" चकीत होऊन मी विचारलं. 
"नाही हो . एवढं इंग्रजी येत असतं तर हितं झक मारली असती का? असंच कुणीतरी कधीतरी भरलेला स्टॅण्डर्ड फॉर्म . तोच सगळ्यांना वापरतो आमी. आता हे असं काय होईल आम्हाला कधी माहितीच नव्हतं." शिंदे बोलला. 
"धन्य आहे! बरं,  नाव तरी बदलता अर्जदाराचे !" म्हणत मी शिंदेसमोर हात जोडले. शिंदेचा चेहरा पाहण्याजोगा झाला होता.  
"निघतो आम्ही आता!" म्हणून मी आणि रव्याने शिंदेचा निरोप घेतला. आमचे पाय परत नीलम पण स्टॉल कडे वळले.  सिगारेटची तल्लफ़ आणि मगाशीच्या केबिन मधल्या घटनेबद्दल रव्याची उत्सुकता , दोन्ही  उतावीळ झाले होते. 

*********************************************

सिगारेट संपवून आम्ही गाडीवर स्वार होणारच तेवढ्यात शिंदे आणि चार पाचजणं धावतच आमच्या दिशेनी आली. 
"एक मिनिट , जरा थांबा!" शिंदे दुरूनच ओरडला. 
माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. म्हटलं  आता अजून काय प्रॉब्लेम झाला च्यायला!
"ते जरा फॉर्म मधल्या सगळ्या प्रश्नाचे बरोबर उत्तरं लिहून द्या कि जरा. लई मदत होईल." शिंदे म्हणाला. त्यांच्यासोबतच्या चार पाच माना पण शिंदेच्या समर्थनात होकारार्थी डोलल्या. 
"अहो ती काय प्रश्नपत्रिका आहे का , कि स्टॅंडर्ड उत्तरं असतील?" मी डोक्यावर हात मारत म्हणालो. 
"अहो ,  तुमी चिंता नका करू त्याची. सगळी इंग्रजी प्रश्न वाचा आणि आम्हाला अर्थ सांगा. आम्ही लिहितो उत्तरं त्याची. " शिंदे त्याची नवीन स्टॅंडर्ड उत्तरपत्रिका बनवणार होता. 
मी त्यांना घेऊन टपरीसमोरच्या कट्टयावर बसलो , आणि एक एक प्रश्न मराठीत समजावून सांगायला लागलो.  आणि सगळीजण मराठी भाषांतर लिहून घ्यायला लागली.  निघताना सगळयांनी आग्रहाने आम्हाला परत एकेक सिगारेट पाजली. ती सगळी मंडळी , आम्ही दिसेनासे होईपर्यंत कृतज्ञ नजरेने आमच्याकडे पाहत होती.

आज या घटनेला झाली असतील २० वर्षं ! आज लायसन्स काढून पहिले आणि सगळी कथा आठवली.  दुर्दैवाने लायसन्स एक्स्पायर झाले आहे . नूतनीकरण करण्यासाठी बहुतेक परत आर टी ओ ऑफिस मध्ये चक्कर मारावी लागेलच.  शिंदेला शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. आता पस्तीस वर्षाचा अनुभव झाला असेल त्याला. आशा आहे कि लायसन्स फॉर्म वर नवीन प्रश्न आले नसावेत. किंबहुना , फॉर्मच सगळा मराठी मध्ये आला असेल , जेणेकरून इंग्लिश ना येणाऱ्या लोकांची अडचण होणार नाही .  सगळं बदललं असेल... अब कि बार ... 

Wednesday, February 18, 2015

एकमेव!

इंटरनेट वर ब्राउजिंग करून कंटाळा आला होता. बाराला पाच कमी होते. लाईट ऑफ केली, आयपॅड चार्जिंगला लावला आणि बेडरूम कडे वळलो. तेवढ्यात फोन वर मेसेज टोन वाजला.  रव्याचा परत एखादा Valentine day बद्दल रटाळ जोक असेल, उद्या वाचू असा विचार करतानाच, दोन चार नवीन मेसेजची रिंग वाजली. न राहवून मी फोन हातात घेतला. पाहतो तर मनोज ने नवीन ग्रुप तयार केलेला "WeWontGiveItBack". त्याच्यावर बरेच मेसेज आलेले.  निमित्त होतं, इन्डिया-पाकिस्तान वर्ल्ड कप मैचचं.  उद्या मनोजच्या घरी मैच पाहायला यायचं आमंत्रण होतं.  चार पाच मित्रं, सोबत अनलिमिटेड बीअर,  चिकन , छोले असा मस्त बेत. बराच विचार करून मी एक मेसेज टाकला " हो , मी येईन" असा.

झोपताना विचार करत होतो. जवळपास तीन वर्षं झाली क्रिकेट बघुन. आताच्या टीममध्ये कोण कोण आहे त्याचीही काही कल्पना नव्हती.  साला, एक वेळ अशी होती जीवनात की जेंव्हा वर्ल्ड कपचं शेड्युल सुद्धा तोंडपाठ असायचं. काळ सगळं कसं बदलून टाकतो, नाही का ? असो, बऱ्याच दिवसांनी मैच बघायची, ते पण इन्डिया-पाकिस्तान वर्ल्ड कप! मजा येईल बहुतेक असा विचार केला. आणि तसंही फेसाळत्या बीअरचं मन आपल्याच्याने नाही मोडवत बुवा !

बरोबर साडे अकराला मनोज कडे पोचलो. मैच वेळेवर सुरु झाली. काही इंटरेस्ट, मजा मात्र येईना. वाटले पॉवर प्ले वगैरे मध्ये थोडे एन्टरटेनिंग असेल.  पण नाही हो! पन्नास ओवर संपल्या. फ्रीज मधल्या बीअर, कढईतले चिकन पण संपत आले होते. पाकिस्तानची इनिंग पण सुरु झाली. तिसाव्या ओवर पर्यंत तर इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब पण झाले.  बाकीचे सगळेजण फार एक्सायटेड होते.  प्रत्येक बॉलला टाळ्या /शिट्ट्या पडत होत्या. मला मात्र एखादा रटाळ आर्ट पिक्चर पाहिल्यासारखे वाटत होते. मग मात्र मी तिथून निघायचे ठरवले. मित्रांनीही थांबायचा जास्त आग्रह केला नाही. त्यांनाही जाणवले असेल बहुतेक कि मी जाम बोअर होतोय.

घरी येताना, एका मित्राचा मेसेज आला , इंडियानं मैच जिंकली म्हणून. मेसेजेसचा अविरत वर्षाव सुरु झाला. ईंडीयन टीमचं अभिनंदन पासून ते आफ्रिदीला घातलेल्या इथे लिहिता न याव्यात अशा शिव्या! मग फोन थोडा वेळ बंद करून विचार करायला लागलो, च्यायला झालंय तरी काय आपल्याला?  असं का होतंय ? आधी, भारताने झिम्बाब्वेला हरवले, तरी धिंगाणा घालायचो, सेलीब्रेट करून. एक ना एक बॉल भक्तीभावाने पाहायचो टीवीवर.  आणि आज अजिबात आनंद होत नाहीये. खरं तर काही फरकच पडत नाहीये आपल्याला. काय बदललं आहे बरं, तेव्हा आणि आत्ताच्या परिस्थिती मध्ये? 

आणि अचानक एका क्षणात मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडली. म्हणजे एकंच उत्तर होतं - "सचिन तेंडूलकर!". मैदानात त्याला फलंदाजीला उतरताना पाहिलं की, देवदर्शन झाल्याचं फिलिंग यायचं. उगीच अंगावर मुठभर मास चढायचं. आपसूक तोंडातनं शीळ आणि हातांमधनं टाळ्या बाहेर पडायच्या.  त्याला प्रत्येक बॉल खेळताना छातीत उगाच धडधड वाढायची. एखादा खराब शॉट खेळला तर जीव घशात यायचा. चौकार-षटकार मारताना पाहून डोळ्याचे पारणं फिटायचं! गांगुली कितीही फॉर्म मध्ये असला आणि कितीही फटकेबाजी करत असला तरी त्याला शिव्या घालायचो सचिनला स्ट्राईक देत नाही म्हणून. मग सचिनने बाकीचे सगळे बॉल रन्स न काढता घालवले तरी. माझ्यासाठी खरं म्हणजे एकंच सत्य होतं - "क्रिकेट म्हणजे सचिन, आणि सचिन म्हणजे क्रिकेट". आणि ते वेड सचिन सोबतच संपलं कदाचित.  त्या देवाचे कोटी कोटी आभार, की त्याने या कालखंडात मला जन्माला घातलं, जेव्हा सचिन क्रिकेट खेळत होता. जीवनातले जादुई दिवस दिले सचिनने खरंच. दुसऱ्या कशालाच त्याची सर नाही येणार. असो, याला कोणी शुद्ध वेडेपणा म्हणू कि काही म्हणो. आपल्यासाठी तेच खरं आहे बाबा. आणि नो रिग्रेट्स!

क्रिकेटच काय, तर जीवनात प्रत्येक बाबतीत/गोष्टीत आपला असाच एखादा एकमेव सचिन असतो. त्या गोष्टीचं अस्तित्व फक्त आणि फक्त त्या व्यक्तीच्या असण्यामुळे असतं, नाही का?  पण आपल्याला उमजत नाही. त्या व्यक्तींच्या नसण्यामुळे थिंग्ज आर नॉट जस्ट द सेम.  पण कधी कधी ते समजेपर्यंत फार उशीर झालेला असतो.  खरंच एकमेव असतात काही जण !

असो , क्रिकेट माझ्यासाठी तर दोन भागात विभागलेलं आहे. सचिन खेळत असताना आणि सचिन रिटायर झाल्यानंतर. दुसरा भाग खरच मैटर नाही करत. मग फेसाळणाऱ्या बिअरचं मन तुटलं तरी चालेल! आजच मनोजचा मेसेज आला , संडेला इंडिया - साउथ आफ्रिका मैच. नवीन मेन्यु वगैरे.  शांतपणे वोट्स-एप च्या त्या ग्रुप मधनं बाहेर पडलो आणि आय पॅड हातात घेऊन यु ट्यूब वर पॉज केलेला शारजाच्या थंडरस्टोर्म मैचच्या हाय लाईट्सचा विडीओ  रीज्युम केला. आणि काय आश्चर्य बघा , संडेला कुठेतरी आत दडून बसलेली ती शीळ आत्ता तोंडातून आपसूक बाहेर पडली. अगदी आधीसारखी!!!    

Tuesday, January 27, 2015

वक्त ने किया...

"सहाला पाच कमी आहेत, आणि अजून इथेच आपण. शार्प साडे सातला सगळे येतील. आपण काय पार्टी संपल्यावर पोचायचे का? आटप तुझी रंग रंगोटी लवकर." शौमिकचा पारा थोडा चढला होता.

"का रे असं घालून पाडून बोलतोस नेहमी. नेहमी बघावं तेंव्हा वैतागलेला! पाच दहा मिनिटं इकडे तिकडे झाली तर काय जातं तुझं? अंघोळीला गेला होतास आत्ता , अर्धा तास बाहेर नाही आलास. भसाड्या आवाजात जोरजोरात गाणी म्हणत बसला होतास. तेंव्हा नाही झालं का वेळेचं भान? " ओठ दुमडून लिपस्टिक नीट करत , आरशात बघत नताशा करड्या स्वरात उत्तरली.

"भसाडा आवाज ? लग्नाआधी , ह्याच आवाजात तासंतास गाणी ऐकायचीस माझ्याकडून.  जाऊ दे, आणि पावणे पाचला निघायचं ठरलं होतं ना आपलं?  मी शूज घालून तयार होतो पावणे पाचला.  गेली दहा मिनिटं ताटकळत ठेवलंयस तू. "

"तुझं काय रे , स्वतःच आटपलं कि झालं.  परीचं कोण आवरणार? मलाच करावं लागत ना सगळं? म्हणे पावणे पाचला तयार होतो. आणि ठीक आहे, दहा मिनिटं वाट पहिली कधीतरी तर एवढं काय आकाश कोसळलं म्हणते मी? कॉलेज मध्ये असताना , तासंतास माझी घराबाहेर निघण्याची वाट बघत असायचा ना तू , खालच्या दुकानासमोर बसून ?"

"आता जुन्या गोष्टी उगाळत बसू नकोस उगीच. चूक कबूल करायची सोडून नेहमी आपलं काहीतरी विषयांतर करायचं, झालं!"

"हे बघ मलाही फारसा इंटरेस्ट नाहीये जुन्या गोष्टींमध्ये, पण सुरुवात तू केलीस म्हणून मीही आठवण करून दिली." लालचुटुक साडीवर मैचींग पर्स शोधत नताशा म्हणाली.

"परी, बेटा तो मिकी माऊसचा मास्क काढ पाहू! आपण पार्टी ला जातोय ना? मम्मानी एवढं छान सजवलंय तुला.  आणि तुझी ती स्टारवाली टिकली कशी दिसणार सगळ्यांना, तू मास्क घातला तर?"
परीने मोठ्या समजूतदारीने मास्क काढून टेबलावर ठेवला. बाबांचं बोट धरून ती घराबाहेर पडली.
गाडीत बसल्यावर शौमिकने जगजीत सिंघ चं "मरासिम" लावलं.  गाडीने वेग पकडला आणि हायवे ला लागली.

"नेहमी काय हि रडकी गाणी! सदा  न कदा ही एकच सीडी लावलेली असते.  एक तरी बंद कर , नाही तर रेडीओ ऑन कर. "

शौमिक काहीच बोलला नाही.  फक्त गाडीचा वेग वाढवला आणि उगीच समोरच्या कारवर खेकसला. " साले, ईंडीकेटर क्यो ऑन रखा है , अगर टर्न नही लेना है तो? बाप का रोड है ना ? करो जो मर्जी है!"

"शेवटचा टोला माझ्यासाठी होता वाटतं ! " पुटपुटत नताशाने  रेडीओ मिर्ची लावले.

"हे बघ , उगाच भांडणं उकरून काढू नकोस.  तुला काही बोललो का मी? मग काय प्रोब्लेम आहे?"

"तोच तर प्रोब्लेम आहे रे शौमिक, मला काही बोलतच नाहीस तू!"

"तुझ्यापर्यंत पोचत असेल तर बोलू ना ! नुसतं कानांनी ऐकणे म्हणजे ऐकणे नसते, नताशा. हृदयापर्यंत झिरपले पाहिजे. "


दोघंही शांत झाली.
"ट्राफिक से परेशान! टेन्शन मत लिजिये दोस्तो, आप सबका चहेता आर जे मोहित आपके लिये लाया है एक सदाबहार नगमा. " रेडीओ मिर्ची वरचा आर जे किंचाळत होता.
"वक्त ने किया क्या हसीन सितम, तुम रहे ना तुम , हम रहे ना हम… " गीता दत्त गायला लागली.
डोळ्यातले अश्रू लपवत नताशा खिडकीबाहेर पाहू लागली. शौमिकने सिगारेट बाहेर काढली. गाडीतले परीचे अस्तित्व जाणवून परत ठेवून टाकली.
थोड्या वेळाने , काहीतरी बोलायचं म्हणून नताशा म्हणाली 

"रणजीत जाम खुश होता. पार्टीचे आमंत्रण देताना म्हणाला, हीनाला आज काहीतरी सरप्राईज गिफ्ट देणार आहे.  मैकबुक ओर्डर केलंय म्हणे ते मागच्या आठवड्यात रिलीज झालेलं.  भारी आहे तो एकदम , सरप्राइज गिफ्ट वगैरे!"

"हीना पण काही कमी नाहीये.  ती पण अशाच भेटींचा वर्षाव करते त्याच्यावर." शौमिक म्हणाला.

"शौमिक, माझ्या भेटींचे काहीच महत्व नाहीये न तुला? दोन महिने वेळ काढून स्वेटर विणला रे तुझ्यासाठी.  कोरडेपणाने नुसता म्हणालास हो चांगला आहे, थैक्स! एकदा सुद्धा बाहेर पडताना नाही घातलास रे."

"हे बघ मला नाही तो रंग आवडत.  आणि ऑफिस मध्ये थोडा भडक वाटेल. "

"मग आज घालायचास ना? मला किती बरं वाटलं असतं. "

"It's always about you ! मला शेवटचं कधी बरं वाटू दिलंस तू , लक्षात आहे का तुझ्या? गेल्या आठवड्यात तुला सरप्राईज म्हणून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन घरी आलो.  आणि तू काय म्हणालीस? आज माझी पार्टी आहे मैत्रिणीसोबत, तू जेवून घे , आणि ग्रोसरिज घेऊन ये, संध्याकाळी! मला वाटलं होतं आपण दोघे कुठेतरी फिरायला जावं , थोडा वेळ घालवावा एकमेकांसोबत. "

"अरे पण त्या पार्टी ला परी च्या टीचर पण येणार होत्या. आपल्या परीबद्द्ल त्यांच्याशी बोलायचं पण होतं. म्हणूनच तर मी गेले ना? आणि तू कधी करतोस का रे कॅन्सिल एखादी पार्टी माझ्यासाठी?"

"हे बघ तुझी आणि माझी गोष्ट वेगळी आहे. माझं प्रमोशन ड्यू आहे तीन महिन्यांनी. गेल्या वर्षभर केलेल्या कामावर पाणी फेरू का? माझी नोकरीच तशी आहे, पार्टीज वगैरे ला जाणं भाग आहे. आणि परीचा विचार तू एकटीच नाही करत. पुढच्या वर्षी त्या इंटरनेशनल स्कूल ची फी किती असेल माहितेय न तुला?"


परत गाडीत ती अवघडलेली , निरव शांतता पसरली. गाडी थोड्या वेळातच मैरिओट च्या पोर्च मध्ये पोचली.

"सात पंचवीस झालेत म्हटलं. पाच मिनिटं आधीच पोचलो ठरवल्यापेक्षा."

"मी वाटच बघत होतो ह्या वाक्याची."

"सॉरी तर तू म्हणणार नाहीयेस , मीच समजून घेते कि तू म्हणाला असशी…. "

"चल, फंक्शन रूम मध्ये जाऊया आपण. नाहीतर असं करा तुम्ही दोघी व्हा पुढं. मी येतोच मागनं" नताशा ला अर्धवट तोडत शौमिक म्हणाला.

"सिगारेट फुंकायची असेल, दुसरं काय?" म्हणत परीचा हात धरून नताशा लिफ्ट कडे वळली.

*******************************************************************

"कसलं सॉलिड कपल आहे ना शौमिक आणि नताशा.  धम्माल लोकं आहेत एकदम! फुल्ल ऑफ लाईफ !" रणजीत कारला वेग देत म्हणाला.

"हो ना, पार्टी मध्ये जान आली त्यांच्यामुळे.  शौमिक चा सेन्स ऑफ ह्युमर भन्नाट आहे. आणि नताशा त्याचा वरचढ.  एकमेकांना कोम्प्लीमेंट करतात दोघे.  एक दुजे के लिये आहेत एकदम." हीनाने होकार दिला.

"गळ्यात गळा घालून होती पार्टी मध्ये पूर्ण वेळ. नताशा म्हणत होती की आजीबात करमत नाही शौमिक ला तिच्याशिवाय. महिन्यातून चारदा तरी सुट्टी घेऊन घरी बसतो. भरपूर फिरतात म्हणे दोघेही. "

"शौमिक पण बोलला मला, म्हणे नताशा नेहमी फुलासारखं जपते त्याच्या मनाला. वाईट वाटेल त्याला असं कधीही बोलत नाही. म्हणाला फक्त बायकोच नाही तर त्याआधी एकदम चांगली मैत्रीण आहे ती."

"आणि काय रे रणजीत, एक रोजेस चा बुके आणायला सांगितला होता मी तुला साधा, विसरलास ना ?"

"अगं पण एवढी कामं होती मला, मित्रांना बोलावणे, पार्टी एरेंज करणे.  विसरून गेलो असेल. तू कटकट नकोस सुरु करू"

"कटकट ? अरे आजच्या दिवस तरी नीट बोल ! जाउदे  मला सगळं माहितीय, पण तुला माहितीय न मला रोजेस किती आवडतात. प्रत्येक एनीवर्सरीला तू आणतोस ना फुलं माझ्यासाठी.  आजकाल काय झालंय काय माहिती तुला. सगळा वेळ ती पार्टी एरेंज करणे, मित्र आणि दारू !"

"काय म्हणतेस हीना, हे काय माझ्या एकट्यासाठी केले का मी ? तुला ना मी काहीही करो , महत्त्वच नाही कशाचं"

"पैसे उडवणे म्हणजेच सगळं सुख आनंद असतो का रे?"

"हे बघ तू फिल्मी होवू नकोस. तू एकदम मला विलन वगैरे असल्यासारखे फिलिंग द्यायला लागली आहेस. तुझ्याकडे सुद्धा आजिबात वेळ नसतो माझ्यासाठी. एखादा बुके विसरलो तर एवढं ओवररीएक्ट करायची गरज नाहीये. आणि मैक बुक कडे ढुंकून सुद्धा नाही पाहिलंस तू!"

"मला नकोयत रे त्या सगळ्या एलेकट्रोनिक गोष्टी. जीवनाला जळू सारख्या चिकटून बसल्या आहेत त्या. सगळा मोकळा वेळ कसा अधाशासारख्या शोषून घेत आहेत. शुष्क बनवून टाकलंय त्यांनी जीवन"

"याच साठी केला अट्टाहास ! धन्यवाद हीना , खूप बरं वाटलं हे ऐकून. तुला काही कल्पना आहे किती वेळ , एनर्जी  खर्ची घातलीय मी त्या मैकबुक साठी. गेला महिना भर झालं झटतोय तुला आज ते गिफ्ट करता यावं म्हणून.  एका वाक्यात तू त्या सगळ्याची बेकिंमत केलीस. "


गाडी रस्त्यावर दौडतच होती.  दोघेही मौन व्रत असल्यासारखी गप्प झाली होती. कुणालाही माघार घ्यायची नव्हती.  स्वतः होऊन पुढच्याची समजूत काढायची नव्हती.

"कॉम्प्लेक्स येतो मला त्या शौमिक ला आणि नताशा ला बघून. आपण का नाही राहिलो आहेत तसे ? सगळं एवढं का बदललं आहे ? What really went wrong ? आधी सारखं काहीच नाही राहिलंय. "  

"सगळं आधीसारखंच आहे रणजीत , बदलला फक्त तू आहेस………. आणि कदाचित मी पण !" हीना ने डोळे मिटून घेतले.   
*******************************************************************

घरी पोचेपर्यंत परी कार मध्येच झोपी गेली होती.  तिला बेडवर टाकून शौमिकने तिच्या अंगावर चादर टाकली.  फ्रेश होऊन एक स्कॉचचा पेग बनवून बाल्कनीत जाऊन बसला.  थोड्या वेळाने नताशा पण ग्लासात थोडीशी वाइन घेऊन त्याच्या शेजारी येवून बसली.  बराच वेळ निशब्दपणे दोघेही तसेच बसून होते.

"खरंच सगळं किती बदललं आहे ना शोमु? आधी बोलायला लागलो कि थांबायचो नाही आपण.  आणि आता विषयच सापडत नाही बोलायला. "

"भांडायला सापडतात भरपूर." स्कॉचचा जळजळीत घोट घशाखाली ढकलत शौमिक म्हणाला.

"माहित नाही काय झालंय. आणि कशाची कमी आहे. सगळं आहे आपल्याकडे.  फक्त माझ्याकडे तू आणि तुझ्याकडे मी नाही राहिलेय."

"मी कधीच स्वतः हून नाही निघून गेलो तुझ्यापासून , तूच दूर केलंस मला नताशा."

"तू काहीही म्हण रे , परिणाम एकच ना शेवटी त्याचा. "

"परत सगळं आधीसारखे नाही होऊ शकणार का रे?"


गप्प बसून तो स्कॉच रिचवित राहिला.   बऱ्याच वेळानी त्याने तोंड उघडले
"हे बघ … मला असं वाटत…. "

"अर्रे सॉरी शौमिक. मी विसरलेच.  उद्या पाच वाजता उठायचं आहे मला. परी ची ट्रीप चाललीय न उद्या ! सॉरी , पण उद्या नक्की बोलू." म्हणून नताशा आत पळाली.

बदलले काहीच नव्हते. सगळं जशास तसे आहे.  बदलली आहेत ती फक्त माणसं. त्यांची स्वप्नं. स्वतःकडे जे नाहीये ते मिळवण्याची धडपड. ते मिळवण्यासाठी सुरु झालेला पैशांचा अनंत, न थांबणारा पाठलाग.  त्यातून येणारे ताण , त्या ताण तणावानी बोथट केलेल्या सगळ्या भावना.  नाती टिकवण्यासाठी सगळ्यात जास्त ज्या गोष्टीची गरज आहे ते म्हणजे एकमेकांसाठी दिलेला वेळ. या सगळ्या गोंधळात , वेळ शोधायचा कुठून?

दोन पेग संपवून शौमिक बेडरूम मध्ये पोचला.  नताशा आणि परी गाढ झोपल्या होत्या. तोही आडवा झाला.
पाहिलं तर , बाजूच्या टेबलवर परी चा मिकी माऊस चा मास्क पडला होता. मनात विचार केला त्याने , आज पार्टी ला जाताना परीला तिचा मास्क सोबत नाही घेऊ दिला आपण.  पण आपण दोघे मात्र आपापले मास्क्स घालून गेलो. असो, जपून ठेवले पाहिजेत, पुढच्या पार्टी मध्ये परत गरज पडेल त्यांची कदाचित !
******************************************************************



                 

Tuesday, December 23, 2014

असंच सुचलं म्हणून !

बरसणाऱ्या पावसाला पाहुन तुम्ही मनातनं भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका, हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत. पण अजूनही वेळ गेली नाहीये. बाहेर धो धो पाऊस बरसतोय, तो नेहमीसाठी असणार नाहीये. भिरकावून द्या ती छत्री आणि रेनकोट! आणि भिजून चिंब व्हा. ताण तणावाने काळवंडलेल्या, अदृश्य सुरकुतत्यांमागे लपत चाललेल्या चेहऱ्यावर झेला ते चमकते तुषार. गात्रागात्रामध्ये भिनू द्या तो थंडावा. निराशेची, असमाधानाची , काळजीची आवरणे वाहवून जाऊ द्या त्या ठिबकत्या अमृतात. चाखून पहा ती अवीट गोडी निर्मळ पाण्याची. पायातले ते पाश तोडून टाका. खोटे मुखवटे फाडून फेकून द्या. बेधुंद होऊन निरागस लहान मुलांसारखे नाचा. नाचताना तुमच्याकडे रोखलेल्या, कुत्सित हसणाऱ्या त्या नजरांची कीव करा. आयुष्याचा हा महोत्सव बेभानपणे साजरा करा.
ढगांकडून गडगडाटी हसणं शिका. विजेकडून तिचं लखलखणं शिकून घ्या. डोळे दिपून जातील सगळ्यांचे ,असं जगा. वाहत्या खळखळत्या पाण्याचा झरा व्हा, डबक्यासारखे साचून राहू नका. मनातलं साचलेलं सगळं वाहू द्या त्या झऱ्यासारखं. भन्नाट वाऱ्यावर मनाला डुलू द्या. त्याच्यासारखं गतिमान व्हा, आणि वेळ आली तर हळुवार फुंकर बनायला हि मागे पुढे बघू नका. ओल्या मातीचा गंध भरभरून लुटा. श्वासांमध्ये साठवून ठेवा त्याला. आयुष्यभर पुरणार तर नाहीचये तो गंध. पण हा क्षण सुद्धा परत नाही येणार आहे. हा पाउस पण नेहमीसाठी असाच मेहेरबान नसणार आहे. भिजणं रोज उद्यावर टाकत राहिलात तर एक दिवस तो उद्याचा दिवस पण नसणार आहे.
चिंब व्हा !!!

Sunday, December 7, 2014

देवाघरची फुलं !

आपल्या चमकत्या निळ्या शर्टाची झोळी करून त्यात एवढी मोठी हिरवी-नारंगी काशिबोरं कशीबशी सांभाळत तो माझ्याकडे आला.

"भैय्या , हे बगा काशिबोरं आणल्यायात तुमच्यासाठी.  आवडतेत का तुमाला?"
"अरे व्वा ! का नाही? खूप आवडतात मला. धन्यवाद. " म्हणून मी हातातली कॅरीबैग त्याच्यासमोर धरली. मोठ्या उत्साहाने शर्टातली सगळी बोरं त्यात उपडी केली.
"तुमच्या देशात मिळत्यात का हो बोरं ? नसतील तर हिकडून घेऊन जावा. पायजेल तेवढी हायत आमच्या बागेत."
"नाही रे आमच्याकडे कुठली मिळायला एवढी छान बोरं. पण आत्तापुरती एवढी बास झाली. "


ते निरागस , मधाळ स्मित परत त्याच्या चेहऱ्यावर चमकले. फारच गोड पोरगा होता तो.  फार झालं तर ७-८ वर्षाचा असेल.

"हातात काय घातलंयस रे ते. चमकतंय कसलं बघ ना !" मी विचारलं.
"हे व्हय ? सलमान खान ची फ़ैशन हाय. तेनं पण असलंच घालतोय कि हातात. वौन्टएड म्हणून एक पिक्चर हाय बगा त्याचा. "
"बरं बरं, एकदम सही! मी तरीच आल्यापासून विचार करतोय तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतेय. आत्ता आले लक्षात , सलमान खान सारखा दिसतोस एकदम तू."

मी त्याला उगाच म्हणालो. तसं पाहायला गेलं तर सलमान खान नावाचा मनुष्य काय घालतो आणि काय करतो त्याच्याशी माझं काही एक देणं घेणं नाही. पण एवढ्या गोड पोराला दुखावणं मला जमलं नसतं. अगदी लाजून गेला तो. काय बोलावे ते कळेना त्याला. उगीच इकडे तिकडे बघायला लागला. त्याचा अवघडलेपणा कमी करावा म्हणून मी उगीच विषयांतर केले.

"इकडे कधी आला तू?"
"म्हागल्या वर्षी. मी आन माझी बहिण, ती तिकडं थांबल्याय बगा ." बाजूला एका गोठ्यात गाईला गोंजारत असलेल्या एका ५-६ वर्षाच्या मुलीकडे बोट दाखवून म्हणाला तो.
"कुठून आलात तुम्ही दोघं ?"
"परभणीला एक होस्टेल होतं. बंद पडलं गेल्या वर्षी, तवा तिकडचे सगळेजण हिकडं आलो."
"आणि परभणीच्या होस्टेल मध्ये कोण आणून सोडलं तुम्हा दोघांना ?"
"पोलिसांनी!"
"काय , ते कसे काय ?"
"नदीत सोडलं होतं म्हनं आमच्या आई बापानी लहान असताना आमाला.  पोलिसांना सापडलो, आणि तेनी परभणी ला आणून सोडलं आमाला."
खाड्कन कुणीतरी थोबाडात मारल्यासारखं वाटलं मला. क्षणभरासाठी आजूबाजूचं सगळं गर्रकन फिरल्यासारखं झालं. काहीच बोलवेना. पोटात ढवळून आलं एकदम. 

"चल , क्रिकेट खेळू , ती बघ दुसरी सगळी पोरं टीम पाडतायत!" म्हणून मी त्याला तिथनं घेऊन चालू लागलो.
तेवढ्यात तिकडून गाईच्या गोठ्यातून ती गोड पोरगी -त्याची बहिण पळत आली आणि माझ्या हाताचे बोट धरून चालायला लागली.
"ओ , एक फोटू काडा कि माजा. " माझ्या गळ्यातल्या कॅमेरा कडे पाहत विनवणी केली तिने.
"का नाही ? कुठे काढू सांग? त्या बागेजवळ काढायचा?"
"न्हाई, हितंच काडा. मी एक कविता म्हणते , नाचता बी येतं मला."
तिचं ते बोलणं ऐकून खुद्दकन हसू आलं मला.
"एक काय पाहिजे तेवढे फोटो काढू. तू म्हण पाहिजे तेवढी गाणी आणि मस्त डान्स कर!"
पडत्या फळाची आज्ञा मिळाल्यासारखी धुंदीत पळत गेली आणि आपल्या गोड आवाजात एक कविता म्हणून नाचू लागली. एवढे निखळ , निरागस दृश्य चुकवणे शक्यच नव्हते. गळ्यातला कॅमेरा काढून मी कामाला लागलो.

"भैय्या , मी हात लावू का ओ तुमच्या कॅमेराला?" त्याने हळूच, बिचकत अपराधी सुरात विचारले.
"हो , घे ना. तुला फोटो काढायचे का तुझ्या बहिणेचे? हे बघ घे हा कॅमेरा."

 मी त्याला फोटो कसा काढायचा समजावून सांगितले. खूप मजा वाटली त्याला. तो मन लावून फोटो काढायला लागला, त्याची बहिण पण अजून जोर जोरात नाचू लागली. हळू हळू ते पाहून बाकीची सगळी मुलं जमा झाली. सगळीजण कॅमेरा हाताळू लागली, एकेमेकांचे फोटो काढू लागली. मनमोकळ्या हसण्याच्या आवाजांनी ती जागा भारून गेली.

सकाळी आलो तेव्हा हि सगळी पोरं अगदी बुजल्यासारखी होती. दुरूनच कुतुहुलाने पाहत होती. थोड्या गप्पा मारल्या , आणि एकदम मोकळी झाली सगळी.  छान बोलू लागली , धीटपणे प्रश्न विचारू लागली. स्वतःबद्दल सांगू लागली. आज दिवाळीचा दिवस, सगळ्यांनी नवीन कपडे वगैरे घातले होते.  हातात फटाक्यांचे पुडे वगैरे होते. जाम आनंदात होती सगळी पोरं. हासेगावच्या त्या गावापासून दूर निवांत जागी बांधलेल्या नंदनवनात आज चैतन्याचे वातावरण होते.

लातूर जवळ थोड्याच अंतरावर रवि बापटले नावाच्या एका मित्राने अतिशय कष्टाने , श्रमाने फुलविली आहे हि जागा. नाव पण साजेसं "सेवालय"! एचआयवी ( एड्स ) ची लागण झालेल्या पोरक्या मुलांचा सांभाळ करतात. सरकार ची एका पैशाचीही मदत न घेता. अपवाद फक्त मुलांची औषधं , जे सरकारी हॉस्पिटल नित्य नेमाने पुरविते.

घरदार, सुख , आराम सगळ्यांचा त्याग करून एकाच ध्येय डोळ्यासमोर ठेवून रवीने हे काम सुरु केले. एचआयवी बाधित जोडप्यांची मुलं पण बहुतेक संक्रमण झालेली असतात. आई वडील अर्थातच जास्त दिवस तग नाही धरू शकत. त्यानंतर हि मुलं अक्षरशः रस्त्यावर येतात. अशिक्षित जनता, रोगाबद्दलाचे गैरसमज यातून जवळच्या नातेवाईकांकडूनसुद्धा या मुलांना वाळीत टाकलं जातं. औषधोपचारांचा अभाव, हेळसांड, दुर्लक्षामुळे झालेला मनावरचा आघात या सगळ्यांशी सामना करायला तेवढी ताकत नसते त्या कोवळ्या जीवांमध्ये. आणि परिणामी नको तो शेवट होतो त्यांचा. एका मुलीबद्दल रवीने सांगितले कि तिला जीवनाबद्दल एवढी निराशा आली कि तिने तंबाखू खाल्ली एक दिवस खूप.  रागावून विचारल्यावर रडत म्हणाली कि "मला जगायचं नाहीये.  तंबाखू खाल्ल्यावर माणूस मरतो म्हणतात , म्हणून खाल्ली. "

"यांचं राहिलेले जीवन , जेवढे ही असो , सन्मानाने, हसत खेळत व्यतीत व्हावं. एवढीच एक इच्छा आहे माझी. योग्य औषधोपचार याचं जीवन मान बरंच लांबवू शकतात. आरोग्य तंत्रज्ञानात बरीच प्रगती झालीय. समाजाने यांचा स्वीकार करावा. सामावून घ्यावं यांना. लोकांच्या मनातून या रोगबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत. हाच हेतू आहे माझा" रवी बोलत होता.
"यांचं कॉलेज वगैरे झालं कि स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, म्हणून पण प्रयत्न करतोय मी. कारण आत्ता तरी यांची वय कमी आहेत. पण मोठी झाल्यावर यांच्यासाठी काहीतरी उद्योग मिळावा, म्हणून अजून थोडी जागा विकत घ्यावी म्हणतोय.  म्हणजे यांची लग्न वगैरे होतील, संसार थाटतील, आणि उपजीविकेसाठी काहीतरी उद्योगही असेल. "
खूप खुजं आणि लहान झाल्यासारखं वाटतं मला रविसोबत बोलताना. कसलं मतलबी आणि स्वार्थी जीवन जगतो न खरं तर आपण.  आपलं छोटंसं विश्व, तेवढ्यातच आपण केंद्रित असतो. अशा मुलांसाठी/ गरजू लोकांसाठी  "खरंच कुणीतरी काहीतरी केलं पाहिजे." असं म्हणून थोडं वाईट वाटून घेऊन आपापल्या कामाला लागतो. म्हणूनच रविला त्रिवार सलाम.

आर्थिक गरज तर आहेच मुलांना. महिना १५००-२००० रुपये प्रत्येकाचा महिना खर्च आहे. ६०-७० मुलं आहेत सेवालायात.  बऱ्याच मुलांचं पालकत्व काही चांगल्या लोकांनी घेतलं आहे ( महिना १५०० रुपये मदत एका मुलासाठी). पण राहिलेल्यांसाठी अजूनही झगडावं लागतं. आणि हो आर्थिक गरजेसोबतच मला जाणवलं कि मुलांना त्याही पेक्षा जास्त गरज आहे जवळीकीची. त्यांच्याशी जावून गप्पा माराव्यात , त्यांच्यासोबत वेळ घालवावा, त्यांच्या गप्पा ऐकाव्यात. खूप आनंदी आणि समाधानी होतात हि मुलं त्यामुळं.

दिवाळी सारखा सण म्हणून बरेच नातेवाईक , मुलांना ४ दिवसांसाठी घरी घेऊन गेले होते. तरीही १०-१२ जण होते ज्यांना कुणीच नव्हतं.  तीच सगळी मुलं भेटली मला त्या दिवशी.
"काय होणार रे मग मोठ्ठा होऊन ?" मी सगळ्यांना प्रश्न विचारला.
"नर्स !"
"डॉक्टर!"
"सिस्टर!"
सगळ्यांची हीच उत्तरं. हि मुलं बाहरेच्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त डॉक्टर आणि नर्सेस लाच भेटतात. त्यामुळे स्वाभाविकपणेच त्यांना तेच बनायचेय मोठे होऊन.  तरीही, एवढ्या सगळ्या गोष्टीशी झगडत, एवढी आनंदी आहेत हि मुलं की काय सांगू? काय अधिकार आहे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचे दुखः मानत बसण्याचा. नको त्या फालतू गोष्टींचे टेन्शन्स घेऊन त्यांना गोंजारत बसण्याचा.  खरंच, खूप काही शिकण्यासारखं आहे या मुलांकडून.

काही फोटोज टाकले आहेत इथे. यातले बहुतेक(बरेच) फोटोज मुलांनी स्वतः काढलेले आहेत.

सेवालय 
                                     
रवी बापटले ! ध्येयवेडा माणूस …  
रवीने नंदनवन फुलवले आहे हासेगाव मध्ये. फुलं आणि बागा मन लावून वाढवल्या आहेत. 

मराठवाड्या सारख्या भागात पाण्याची समस्या नेहमीची. एक छोटासा तलाव बांधला आहे पावसाचे पाणी साचवण्यासाठी…  

मुलांना राहण्यासाठी, अभ्यासासाठी अशी साधीच पण छान कुटी बांधली आहे … 

(रविला बरीच गरज आहे. मोठा व्याप आहे, दिवसेंदिवस मुलांची संख्या वाढत आहे. मदतीची इच्छा असेल तर कळवा मला नक्की! )

Friday, December 5, 2014

कॉफी विथ करन !

"ड्रेस कसला सुंदर आहे गं तुझा ! इंडियाहून घेतलास का?"
"थैन्कस !  हो, मागच्या वेळी मुंबई ला गेले होते, तेंव्हा घेतला. ते पानेरी नावाचं एक छान दुकान आहे बघ अंधेरीला."
"अगदी कुछ कुछ होता है मधल्या काजोल सारखा आहे बघ ! आठवला ना ? "
"ओह, हो का ? नाही आठवत बुवा !"  सौ मनातून स्वतःच्या खरेदीवर खुश होत म्हणाली.

बायका, आणि त्यांचे निरीक्षण ! फक्त हिरोईन चे कपडे , दागिने , नवीन डिजाईन्स  इकडेच लक्ष असते. पिक्चर मरो तिकडे. असो…  लुसलुशीत पनीर कबाब वर मी अजूनच जास्त लक्ष केंद्रित केले आणि मन लावून खायला लागलो. तसंही चार बायका एकत्र आल्या कि त्यांच्या शॉपिंगच्या गप्पा ऐकणे यासारखी निरस गोष्ट कुठली नसेल. बीअर पण संपत आली होती. ती रिपीट करण्यासाठी वेटरला माझे डोळे चातकाप्रमाणे शोधत होते.  बायकांच्या गप्पा सुरूच होत्या.

"काय मस्त पिक्चर होता ना केकेएचएच ?"

जोरात ठसका लागला मला. माझ्या अभिप्रायाप्रित्यर्थ माझ्याकडे बघणाऱ्या चेहऱ्याकडे कसनुसे हसत बीअरचा एक घोट रिचवला. नाही म्हणावं तर रूड दिसेल, हो म्हणावं तर मन नाही मानणार. अशा वेळी ठसके कसे देवासारखे धावून येतात.

"करन जोहर किती छान सिनेमे बनवायचा ना आधी. पण काय झाले काय माहिती त्याला ? तो फालतू कभी अलविदा ना कहना बनवला. तेव्हापासून मी त्याचे पिक्चर बघायचं सोडून दिलं., नाहीतर काय ?"

गरमागरम कबाबला तोंडापर्यंत पोचवणारा माझा हात तिथेच थबकला. सहन करावं हो माणसानी , पण किती? चक्क कभी अलविदा ना केहना ला फालतू म्हणावं कुणीतरी? अंगात बाजीप्रभूंनी संचार करावा तसं वाटून संभाषणात आवेशाने उडी घेतली मी.

"का………य?, फालतू चक्क ? मला वाटते करन जोहर ने एकच चांगला आणि सेन्सिबल पिक्चर बनवलाय आणि तो म्हणजे कभी अलविदा न कहना!" मी तावातावाने म्हणालो .
"काही काय म्हणतोस. काहीही दाखवलंय त्यात. तो अभिषेक बच्चन एवढा चांगला असतो, आणि राणी मुखर्जी तरीही शाहरुखच्या प्रेमात पडते. असं कधी होत असते का ?
"हो ना, काय संदेश जातो असल्या पिक्चर मधनं. समाजावर काय परिणाम होतील."
"मूर्खपणा दाखवलाय सगळा !" 
"तसाच आहे तो शाहरुख, नेहमी दुसऱ्याची बायको नाहीतर प्रेयसी पळवतो. अगदी कुठलाही पिक्चर घ्या त्याचा!"

बघता बघता शत्रुपक्षाने चढाई केली. अगदी एकाकी पाडला मला सगळ्यांनी. मी काही बोलायच्या आतच एकजण   अस्मिताला  म्हणाली -
"सांभाळ गं बाई नवऱ्याला. नको तसले पिक्चर आवडायला लागलेयत त्याला !"
हास्याच्या फवाऱ्यात माझे शब्द हवेतच विरून गेले. त्यामुळे मी अजून काही बोलण्याचा नाद सोडून दिला आणि वेटरला पुढच्या बीअरसाठी इशारा केला.

पार्टी संपवून घरी आलो. पण ते संभाषण काही माझ्या डोक्यातून जायला तयार नव्हते. आता करन जोहर तसा बऱ्यापैकी सिनेमे बनवतो (म्हणजे तसा एकच). कुछ कुछ होता है एक बरा सिनेमा होता. मी इंजीनीअरिंग च्या शेवटच्या वर्षी असताना आलेला. तेव्हा ते वयच तसं होतं कि आवडावा सिनेमा.  नंतर थोडी समज यायला लागली तेव्हा त्या पिक्चर मधला फोलपणा अधिकाधिक ठळक व्हायला लागला. सगळी स्वप्नाची दुनिया. श्रीमंत बापांची श्रीमंत पोरं. पैसे कमवायचे/अभ्यासाचे टेन्शन नाही. 'प्यार दोस्ती है'  वगैरे डायलॉग मारत, हातावर टाळ्या आणि नाकावर टिचक्या देत , कोपरापर्यंत फ्रेंडशीप बैन्ड बांधून प्रेम करतात. डोकं फिरल्यासारखं ती काजोल लग्न न करता थांबते शाहरुखसाठी. जणू राणी मुखर्जी मरायचीच वाट बघत होती. राणी पण अगदी कन्विनिअन्टली टाईम वर देहत्याग करते. वर ती अति शहाणी ८ वर्षाची पोर, अकाली प्रौढत्व आलेली. आज्जीबाई सारखी बडबड करते. सलमानची एन वेळी फजिती करून शेवटी यांचं लग्न वगैरे. आकाशातले तारे वगैरे पण एकदम टाइम वर तटातटा तुटतात. अरे काय पांचट पणा लावलाय? असले पिक्चर पब्लिक ला जाम आवडतात. माझ्या एका मित्राने पिक्चर संपल्यावर अगदी मार्मिक विश्लेषण केलं होतं. म्हणाला

"एकदम अन एक्सपेक्टेड स्टोरी निघाली यार!"
"का रे ?"
"नाहीतर काय, हॉरर पिक्चर होता राव. राणी मुखर्जीचं भूत दाखवलंय त्यात !"

लोकांना असे पिक्चर आवडतात कारण लोकांना स्वप्नाची दुनिया आवडते. असं काही नसतं हे माहित असूनसुद्धा , माणसं स्वतःला त्या पिक्चर मध्ये कुठेतरी हुडकण्याचा प्रयत्न करतात.  स्वतःला सुखावून घेतात.  ताण तणावाच्या जीवनात तेवढेच थोडे विरंगुळ्याचे क्षण! खोट्या स्वप्नांमध्ये रमून जातात. हिरो हिरोइन चं सुखकर आयुष्य बघून,
हैप्पी एंडिंग्ज बघून समाधानी होतात.  सत्य परिस्थितीचा काही एक संबंध नसतो अशा पिक्चरचा.  संस्कार , समाजाला संदेश वगैरे म्हणाल तर त्या नावानं शंख आहे सगळा.  कसला संदेश देतो हो हा पिक्चर सांगा बरं मला. कुणाचेतरी लग्न सुरु आहे आणि तिथे जाऊन ते मोडून त्याच्या होणाऱ्या बायकोशी लग्न करा? आणि ते का तर , हिच्यापेक्षा जास्त कुणीतरी आवडत होती म्हणून आठ वर्षापूर्वी हिला नाकारली होती. आणि आता बायको मेल्यावर, लगेच चान्स मारून घ्यायचा.  कि ८ वर्षांच्या मुलांनी बापाचे हरवलेले प्रेम हुडकायचे, हा संदेश? की इकडे एखाद्याला लग्नाचे वचन देऊन , समर कॅम्प मध्ये जुन्या मित्राला भेटून पावसात नाचायचे वगैरे, ते पण नको तेवढे जवळ येउन.  कम ऑन , स्टौप फूलींग योरसेल्वज!

ढोंगी झालो आहेत आपण. स्वतःला फसवून फसवून एवढे एक्स्पर्ट झालोयत की , आता तसं काही करतोय ,त्याची जाणीव हि नाही राहिली. सत्य परिस्थिती चा सामना नाही करू शकत आपण. त्यापासून लांब पळतो. कारण सत्य आपल्याला आपण काय आहोत याची जाणीव करून देते.  आणि मग कारण नसताना अपराधाची भावना मनात येते. कोण सांगितलीय ती उठाठेव? म्हणून बरं का, आम्हाला ना कुछ कुछ होता है जाम आवडतो, पण कभी अलविदा न कहना … रीडीक्युलस, अगदी नो नो !

उलट , कभी अलविदा न कहना चे वेगळेपण ह्या अशाच सगळ्या पिक्चर्स मुळे उठून दिसतं. मी असं म्हणत नाही की अगदीच सुंदर चित्रपट आहे तो. पण दमदार कथा आहे. विचार करायला लावणारी. वास्तवातली.  सत्य परिस्थितीशी समझोता ना करणारी. आणि संदेश वगैरे म्हणाल तर ते काही पिक्चरच काम नाहीये हो. पिक्चर म्हणजे मनोरंजनाचे एक साधन आहे. त्यात कसला संदेश आलाय , डोंबल ! संदेश हवाय , चांगले विचार हवेयत तर चांगली पुस्तकं वाचा , देवभक्ती करा. भक्तीपर चैनल्स लावून बसा दिवसभर. संदेश कसला घेताय पिक्चर मधनं. त्यापेक्षा कॅमेरा वर्क एप्रिशियेट करा, लेखकाची ताकदवान स्क्रिप्ट पहा. तेवढ्याच कौशल्याने दिग्दर्शक ती कथा कशी मांडतो आपल्यासमोर ते बघा. कुठेतरी ह्रदयाला एखादा प्रसंग हलवून सोडतो की नाही ते बघा. मोजक्याच शब्दात बरंच काही सांगून जाणारे डायलॉग, त्याचं कौतुक करा. 

खूप बोलायचंय कभी अलविदा ना कहना वर. पण जास्त मोठे मोठे ब्लॉग नाही लिहायचे असं ठरवलेय. काहीजणांनी सुचवले की फारच लांबलचक होतात. म्हणून भाग-२ मध्ये "के ए एन के " बद्दलची माझी मतं ! लवकरच भेटीन !
(क्रमशः)
marathiblogs