Friday, September 12, 2014

झूठा ही सही !!!

ब्लॉग लिहायला सुरु केल्यापासून एक गोष्ट मला जाणवली कि मी लोकांना खूपच मागे लागून ब्लॉग वाचायला सांगायला लागलो होतो. लोकांची काय प्रतिक्रिया असेल ते जाणून घेतल्याशिवाय चैन पडत नव्हती. मला पण कळत नव्हते की मी असं का करतोय. बराच विचार केला, डोक्याला थोडा ताण देऊन विश्लेषण केलं , आणि अशी एक गोष्ट आठवली जी कदाचित याला कारणीभूत असू शकेल.
                         मी दहावीत होतो तेंव्हाची गोष्ट. आई वडिलांनी पुढच्या शिक्षणाचा विचार करून लातूरला शाळेत घातले होते मला. ती दोघेही किल्लारीलाच नोकरी करत. मी आणि माझी बहिण माझ्या एका मावशीकडे राहत असू. सर्वसामान्य पालकांच्या असतात, अगदी तशाच माझ्या पालकांच्या पण माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. त्यांना वाटायचे कि शहरात शिकतोय मुलगा, सगळ्या चांगल्या गोष्टी,सोयी, शाळा आहेत.  खूप अभ्यास करेल, चांगले मार्क्स पडतील. जेणेकरून पुढच्या जीवनाची घडीही नीट बसेल. मी पण पूर्ण प्रयत्न घेतच होतो, पण ते वयच थोडं पोरकट असतं , फारसं कळत नाही.
                       दोघेही, दर शनिवारी, दुपारी शाळा संपली की बस मध्ये बसून लातूरला यायचे. दोन्ही मुलं दूर असल्यामुळे जीव रमायचा नाही त्यांचा किल्लारीमध्ये. सोमवारी परत जायचे सकाळी. हळू हळू, आम्ही मावशीकडे सेटल झाल्यावर त्यांचं लातूरला येणं कमी झाले. मग महिन्या-दोन महिन्यातून आम्ही तरी किल्लारीला जायचो किंवा ते तरी लातूरला यायचे. अशाच एका रविवारी मी किल्लारीला निघालो. आठवडाभर सुट्टी होती शाळेला कसलीतरी. जाताना बस मध्ये काहीतरी वाचायला घ्यावे म्हणून सोबत एक पुस्तक घेतलं. "अक्षरशिल्पे" नाव त्याचे. कूणीतरी हातवळणे नावाच्या भावंडांनी दहावीच्या मराठी निबंधाच्या तयारीसाठी लिहिलेले पुस्तक होते. बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर निबंध लिहिले होते. पुस्तक वाचून मंत्रमुग्ध झालो. फारच सुंदर भाषेत लिहिलेले होते ते निबंध. मनात म्हटलं "देवा , मला का नाही अशी कला दिलीस? का नाही अशी गोड भाषा येत मला ?" तासाभराच्या प्रवासात सगळं पुस्तक अधाशासारखं वाचून काढलं.
                          घरी पोचलो, तेव्हा आईने नेहमीप्रमाणे सगळे आवडीचे जेवण करून ठेवले होते. पोट भरून जेवण केले आणि झोपी गेलो. झोपेतनं उठलो तेव्हा पप्पा बाहेर गेले होते. आईही म्हणाली की हळदी-कुंकासाठी शेजारच्या पाटील काकूंकडे जाऊन येते. तिला परत यायला एक तासतरी लागणार होता. थोडावेळ टिव्ही बघून झाल्यावर बोअर झाले. एकदम "अक्षरशिल्पे" ची आठवण आली. आणि माहित नाही का , पण मनात एक लबाड विचार आला. आपण असे करू , त्यातला एक पावसाबद्दल अतिशय सुंदर निबंध होता. तो एका कागदावर उतरवून काढू. आणि आई-पप्पा घरी आले की  त्यांना दाखवू आणि सांगू की मीच लिहिलाय. मला खरंच नाही समजत मी तेव्हा तसं का केलं असावं. फुशारकी मारावी म्हणून ? की त्यांना बरे वाटावे की मला शहरात शिकायला ठेवल्याचं चीज झालं म्हणून ? की अजून काही? पण मी केलं तसं . दिवेलागणीच्या वेळी दोघेही एकदाच घरी आले. आल्यावर मी त्यांच्या हाती तो कागद ठेवला आणि म्हणालो "मी लिहिलाय बघा पावसावर निबंध , बघा कसा वाटतो तुम्हाला."  त्यांनी सोबतच वाचायला सुरु केला. जसे जसे ते वाचत होते तसा त्यांच्या चेहरयावरचा आनंद , कौतुक, अभिमान ओसंडून वाहत होतं. मी ते सगळे भाव टिपत होतो, आणि मला पण अगदी छान वाटत होते. निबंध वाचून झाल्यावर, अक्षरशः डोळे भरून आले त्यांचे. म्हणाले "काय हे? किती छान लिहिलयस. अभिमान वाटतो आम्हाला तुझा !". रात्री झोपताना सुद्धा त्यांच्या त्या निबंधावरच गप्पा सुरु होत्या. का माहित नाही, पण त्यांची फसवणूक केल्याचं आजिबात वाईट वाटत नव्हतं मला. कदाचित फारच स्वार्थी आणि आत्मकेंद्रित झालो होतो मी तेव्हा.
                              सोमवारी सकाळी जाग आली तेव्हा दोघेही शाळेत गेलेली. आरामात उठून आवरले आणि मित्रांना भेटायला बाहेर पडलो.  गावात ३-४ तास उंडारून झाल्यावर घरी परतलो. श्रावण सोमवार असल्यामुळे शाळा दुपारी लवकर सुटायची . घरी गेल्यावर आईने सांगितले " अरे तुझे पप्पा तुझा निबंध घेऊन शाळेत गेले होते.  वेळ काढून शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना वाचून दाखवला. अभिमानाने ऊर फुगला होता त्यांचा. सगळ्यांनी खूप कौतुक केले तुझे". माझे वडील फारसे बोलायचे नाहीत. कौतुक वगैरे तर फारच क्वचित. असे नाही कि त्यांना वाटायचे नाही पण बोलून दाखवायचे नाहीत कधी. आईने हे सांगितल्यावर मात्र माझ्या पायाखालची जामीन सरकली. वाटले, काय केले आपण हे. कुठपर्यंत  गेले हे प्रकरण? लाज वाटली पाहिजे आपल्याला असं काही करायला. पण आता चूक कबूल कशी करायची? कुठल्या तोंडानी सांगायचं त्यांना कि नालायक आहे मी . फसवले मी तुम्हाला. काय अवस्था होईल त्यांची हे ऐकून? अवघड जागेचं दुखणं होऊन बसलं हे तर. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. विचार केला, जाउदे आता हा विषय जास्त चघळण्यात अर्थ नाही. गप्प बसलेलेच बरे.
                     थोड्या वेळानी पप्पा पण घरी आले. आज फार खुशीत दिसत होते. बघवेना मला म्हणून परत बाहेर गेलो. मनात कुठेतरी काटा सलत होता आपण केलेल्या चुकीचा.  एक क्रिकेटची मैच खेळून घरी परतलो. दारात येताच छातीत धस्सं  झालं.  खुर्चीत बसून वडील पुस्तक चाळत होते …. "अक्षरशिल्पे " !!! घाबरून गेला जीव. ते चुल्लूभर पाणी कि काय म्हणतात त्यात बुडून जावं असं वाटलं. आई उदास होऊन भाजी निवडत होती. क्षणात माझ्या ध्यानात आला सगळा प्रकार , माझा पराक्रम त्यांना समजला होता.पप्पांनी फक्त एकदा माझ्याकडे पाहिले. थंड आवाजात म्हणाले "फार वाईट वाटले महेश आज मला. एवढी घोर फसवणूक ? काय गरज होती हे सगळं करण्याची. तुझी शैक्षणिक प्रगती , मार्क्स ह्या सगळ्यांपेक्षा तुझी वर्तणूक, विचार, वागणूक चांगली असावी हे महत्वाचे आहे.  एक चांगला माणूस नसशील तर बाकी गोष्टींना शुन्य किंमत आहे आमच्यासाठी. फार दुखावलंस आज, बेटा. " एवढे म्हणून ते शांत बसले. आईने एक चक्कर शब्दही काढला नाही.पप्पांना वाईट वाटल्याचं खूप दुखः झालं होतं तिला.  मला तर माझीच किळस वाटायला लागली होती. काय करून बसलो आपण हे?
                        रात्रभर झोप नाही आली. स्वतःच्या वर्तणुकी बद्दल तिरस्कार वाटायला लागला. पहाटे कशीबशी झोप लागली. सकाळी उठलो तर नेहमीप्रमाणे दोघेही शाळेत गेलेले.  घर खायला उठलं होतं मला. कालचा प्रसंग अस्वस्थ करून सोडत होता. काय करून आई-पप्पांना समजावू , कशी त्यांची माफी मागू हे प्रश्न भंडावून सोडत होते. पाच वाजता घराची कडी वाजली म्हणून दर उघडलं , आई होती. माझ्याकडे न पाहताच म्हणाली "पप्पा शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना घेऊन येत आहेत मागून. थोड्या खुर्च्या वगैरे बाहेर काढ. मी चहा ठेवते तोपर्यंत". मला समजेना कि सगळेजण का येतायत. नाना विचार मनात येवू लागले.  पाच मिनिटांनी सगळेजण घरी पोचले. चहा पाणी झाल्यावर, आलेल्या शिक्षकांनी मला बोलावले. "अरे काय तो निबंध लिही……" ; तेवढ्यात पप्पांनी त्यांचे वाक्य अर्धवट तोडले आणि म्हणाले , "एक मिनिट सर, एक गोष्ट सांगायची आहे त्या निबंधाबद्दल". माझी हवा टाईट!  मनात म्हटलं, लागला निकाल आपला आता.  एवढ्या सगळ्यांसमोर पाणउतारा होणार. अंगावर हजार झुरळे पळावी तसं काहीतरी फिलिंग यायला लागला. एकीकडे पप्पांचा राग पण यायला लागला कि एवढ्याश्या चुकीची एवढी मोठी शिक्षा काय.  एवढे कठोर होण्याची काय गरज आहे.
                     पप्पा पुढे म्हणाले "अहो माझं चुकलंच. महेशला त्याच्या  मित्रांनी एक खूप छान पुस्तक दिलंय वाचायला , त्याला आवडलं म्हणून त्याने एका कागदावर एक निबंध कॉपी करून घेतला . तो झोपला होता सकाळी तेव्हा मी सहज पहिला आणि मला वाटले कि त्यानेच लिहिलाय तो, आणि मी त्याच्याशी खातरजमा न करता उगाच शाळेत घेऊन आलो आणि  तुम्हाला दाखवला. "
"अर्रे  हो का , जाऊद्या , आपला महेश पण कमी नाही, त्याहीपेक्षा चांगले लिहील तो" असं काहीतरी म्हणत बाकीच्या शिक्षकांनी पण वातावरण हलके फुलके केले.  सगळेजण गेल्यावर मी पाय पकडले पप्पांचे , म्हटलं "माझे खरच चुकले. खूप मुर्ख आहे मी. " पप्पा नेहमीच्या अबोल स्वभावाप्रमाणे एवढेच बोलले "जाउदे, फार मनाला लावून घेवू नकोस. पण चूक कबुल करणे महत्वाचे.".
               पप्पांचा मोठेपणा कळला त्या दिवशी मला.  सगळ्या शिक्षकांसमोर चूक कबूल केली.  मुलाला वाईट वाटू नये , म्हणून चूक स्वतःवर घेतली. आणि, त्या गोष्टीचा उगाच बाऊ न बनवता माफ पण करून टाकले मला. एक गोष्ट कायमची शिकलो त्या दिवशी , फसवायचे नाही कुणाला. आणि अजाणतेपणे तसे झालेच, तर चूक कबूल करायला मागे पुढे नाही पाहायचे.
             कदाचित, म्हणूनच आज मी जेव्हा माझा ब्लॉग लिहितो , तेव्हा कुठेतरी मला वाटत असेल की आज मी हे खरंच मनाने  लिहितोय आणि लोकांनी वाचावे आणि त्यांना खरेच आवडावे मी लिहिलेलं. कदाचित तेव्हा केलेली चूक निस्तरण्याचा निष्फळ, व्यर्थ प्रयत्न करतोय मी.  तरीही , आई आणि पप्पा आज जिथेपण असाल तुम्ही , जमलं तर वाचा एकदा मी लिहिलेलं … या वेळी मनानी लिहिलंय सगळं ….

4 comments:

  1. Mast lai bhari
    Mi 9th madhe astana ''abhinandan''asa swatahach lihala hota pragati pustakawar. Phule pan kadhali hoti abhinandan lihlya nantar

    ReplyDelete
    Replies
    1. Hahaha.. lai bhari. Phule kay kadhalis are tu.... haha.. khup hasu aal yaar..

      Delete

marathiblogs