Tuesday, October 14, 2014

गीत प्रेमायण… प्रेमात पडल्यावर ( पार्ट २ )

प्रेमात पडल्यावर तशी फारशी स्पेशल गाणी नाहीयेत. प्रेमात पडलेला माणूस बहकलेला असतो. काहीही गायलं तर त्याला छान वाटतं. तो काळंच तसा असतो. सातव्या आस्मानावर असतो माणूस. घरासमोरची ती बाभळ ही गुलमोहरासारखी वगैरे भासायला लागते.  आपली प्रेयसी, दीपिका (चीखलीया नव्हे , पदुकोन ) पेक्षा सुंदर, आणि आपला हिरो ह्रिथिक पेक्षा वरचढ भासायला लागतो.  प्रेम म्हणजे एक नशा आहे. मदिरा फिकी पडते त्यासमोर. एकेमेकांसाठी काय करू आणि काय नाही असं  झालेलं असतं. पुढच्याशिवाय जगण्याचा विचार हि करवत नाही. रस्त्यावरून जाणारी एकदम सुंदर पोरगीही तुमचं चित्त विचलीत करू शकत नाही. प्रेमात सर्वस्व वाहून टाकलेले असतं तुम्ही.

१) पेहेला नशा… 


प्रेमात पडलेला प्रत्येकजण या गाण्याच्या पण प्रेमात पडला नसेल, तर नवलंच! नवीन नवीन प्रेम. पाय जमिनीवर टिकत नाहीत. दिवसा जागेपणी सुद्धा तिची स्वप्नं पडत असतात. प्रत्येक भेट अपुरी वाटायला लागते. कितीतरी बोलावसं वाटतं. चुकून स्पर्श जरी झाला तर अंगात विजेचा करन्ट दौडतो. पुढच्या जीवनाची स्वप्नं रचली जातात.  रोज आठवणीने एखाद फुल, चोकलेट , ग्रीटिंग कार्ड यात पैसे उडवले जाऊ लागतात. पुढच्याच्या आवडी निवडी जाणून घेऊन, कटाक्षाने पाळल्या जातात. कधीपासून मनात आकर्षण निर्माण झालं, आवडायला लागलं वगैरे गोष्टींच्या कबुली दिल्या जाऊ लागतात. व्यसनं वगैरे (तात्पुरती का होईना!) सोडली जातात.  रात्री झोप लागत नाही. फोनचं बिल भस्मासुरासारखं वाढायला लागतं. प्रेमाचा थाटच निराळा असतो ह्या काळात.

२) दिल मे कुछ हो रहा हैफ्रिकी चक्र नावाचा एक चित्रपट. बहूतेक २००१-२००२ च्या काळात कधीतरी आला होता. मल्टीप्लेक्स त्या काळी हळूहळू मशरूम उगवावेत तसे उभारले जात होते पुण्यात. मल्टीप्लेक्स मध्ये पाहिलेला पहिला पिक्चर असावा माझा हा. पस्तीस रुपयाचे पॉप कॉर्न विकत घेऊन पाहिलेला! तसा पिक्चर ओकेच होता. एक हे गाणे सोडले तर लक्षात ठेवण्यासारखे काहीच नव्हते त्यात. अत्यंत एकलकोंडी दीप्ती नवल एकटे राहून राहून विक्षिप्त झालेली असते. सगळ्या जगाला दुष्मन समजत जगत असते. आणि एके दिवशी एक मुलगा तिच्या जीवनात येतो. प्रेम माणसाला कसं बदलून टाकतं ते या गाण्यात दाखवले आहे. बाकी, दीप्ती नवल तरुणपणी जेवढी होती तेवढीच रसहीन आणि अनाकर्षक दिसते अजून पण!
पण ,माझं अत्यंत आवडते गाणे आहे हे. बहुतेक सगळ्यापेक्षा जास्त …आणि तसंच राहील पण….

३) आंखो की गुस्ताखीयां माफ हो 

जसे जसे दिवस पुढे सरकतात , तसा तसा थोडा अवघडलेपणा कमी होतो. जाणीवपूर्वक एकमेंकांचे स्पर्श होऊ लागतात. लपून छपून ,लडिवाळ खेळ सुरु होतात. दोघांना वाटत असतं कि आजूबाजूच्या जगाला काही माहितीच नाहीये. पण तसं नसतं. सगळ्यांना कळत असतं काहीतरी चाललंय ते ! असो,  लव्हबर्डस ना त्याची काय फ़िकर. चोरून भेटणे, हळूच हात पकडणे. टेबलाच्या खाली पायांचे खेळ ( निशब्द मध्ये अमिताभ चा एक सीन होता, मजेशीर होता एकदम).
हम दिल दे चुके सनम "वो सात दिन" ची कॉपी आहे, हे मला बऱ्याच दिवसांनी , किंबहुंना अलीकडे २-३ वर्षांपूर्वी माहित झाले.  चांगला सिनेमा होता. ऐश्वर्या तशी मला आवडत नाही, पण या गाण्यात अगदी सुंदर दिसलीय.  सलमान नेहमीप्रमाणे बावळट ध्यान आहे.  पण गाण्यात सूट होतो. इस्माईल दरबारनी (द वन फिल्म वंडर) अगदी अप्रतिम संगीत दिलंय. बहुतेक जेवढं येत होते तेवढे सगळं या पिक्चरलाच देऊन टाकलं वाटतं. नंतर गायबच झाला तो. बऱ्याच दिवसांनी बिग बॉस मध्ये वगैरे दिसलेला.
संजय लीला भन्साळी ने चित्रीकरण पण लाजवाब केलंय गाण्याचं. लग्नाच्या ठिकाणी असे प्रकार बरेच बघायला मिळतात.  ऐश्वर्या डोळ्यांची उघडझाप करून खुणेने सलमानला बोलावते तो क्षण … जेवढ्या वेळी मी तो सीन बघतो , तेवढ्या वेळी माझं ह्र्दय दोन क्षणांसाठी गप्पकन बंद पडतं.  अजूनही.   

४) और हो … 

रॉकस्टार हे रेहमानचं आत्तापर्यंतच सर्वोत्कृष्ट काम आहे असं मला वाटतं. मोहित चौहान चा मंत्रमुग्ध करून टाकणारा आवाज. आणि वर रणबीर कपूरचा जीव तोडून केलेला अभिनय. प्रेमातली उत्कटता, बेभानपणा, असहायता सगळं काही हे गाणं सांगून जातं. एक ओळ आहे या गाण्यात  " तुझी पेहेली बार मै मिलता हुं , हर दफ़ा!" काय अर्थपूर्ण गाणं आहे! तो ब्रिज वरचा सीन जेव्हा ती पळत सुटते , आणि मागे फिरून परत रणबीर च्या कवेत येते. प्रेमातली विवशता , असहायता खरंच एवढ्या परिणामकारक रीतीने दाखविलेली मी तरी पहिली नाही.  खूप खूप लिहायचं आहे या गाण्याबद्दल , पण शब्दच नाहीयेत माझ्याकडे.  कधी सापडलेच, तर एक स्वतंत्र पोस्ट लिहीन.…
मला मनापासून आवडलेला चित्रपट… इम्तियाझ अलीज् बेस्ट वर्क!

५) रौन्धे है मुझको तेरा प्यार

प्यार तुने क्या किया नावाचा एक रटाळ पिक्चर! अंजाम , डर वगैरे सारखे रोल करत होता शाहरुख, तेव्हा कुणाला तरी वाटले कि एक फिमेल वर्जन काढूया तशीच स्टोरी ठेवून.  उर्मिला मार्तोंडकरला अशा सायकौटिक भूमिका खूप चांगल्या वटवता येतात. उदाहरणार्थ कौन, भूत वगैरे सिनेमे. फरदीन खान, त्याच्याबद्दल तर न बोललेच बरे.
असो , तर हे बरंच अनयुज्वल गाणं आहे या यादीमधलं , हो ना ?  थोडी डार्क साईड आहे या गाण्याला. आणि अलिशा चिनॉय शिवाय दुसऱ्या कुणाचाच आवाज मी इमैजीन नाही करू शकत या गाण्यासाठी.
प्रेम जसं गोड गोड वाटू देतं , तसंच तळमळवतंही. अस्वस्थ करून टाकतं.  तो किंवा ती आपल्यासोबत नसेल , तर सगळं कसं अर्थहीन होऊन जातं. मंद वाऱ्याची झुळूक पण त्रासवून सोडते. क्षणाचाही विरह सहन होत नाही. अतिशय सुंदर गाणं. अर्थपूर्ण लिरिक्स, शोभणारं संगीत.  दुर्दैवाने डब्बा सिनेमा असल्यामुळे , गाणं पण डब्ब्यात गेलं.

असो, जसं मी सुरुवातीला म्हणालो, की फारशी गाणी नसणार या यादीमध्ये , कारण प्रेमात असताना कुठलंही गाणं छानच वाटतं.  त्यामुळे लवकर आटपत घेतोय.  (डोकेदुखीमुळे पण फारसं लिहायची इच्छा होत नाहीये).  पुढच्या पार्ट मध्ये … प्रेमानंतर… त्यात मात्र बरीच गाणी आहेत लिहिण्यासारखी. शोर्ट लिस्ट करायला वेळ लागेल थोडा …
तोपर्यंत… अलविदा !        

No comments:

Post a Comment

marathiblogs