Wednesday, December 3, 2014

सावधान !

बऱ्याच दिवसांत काही लिहिणे झाले नाही. महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले नाही का? कारणं दोन त्याची. एक म्हणजे काही सुचतच नव्हतं. डोकं दुसऱ्याच गोष्टींनी व्यापलं होतं (म्हणजे अजून पण आहे) . दुसरं म्हणजे इंटरनेट कनेक्शन नव्हतं घरी. आता हॉंगकॉंग सारख्या ठिकाणी इंटरनेट शिवाय पंधरा दिवस म्हणजे थोडं विचित्र वाटेल ऐकायला! पण झालं तसंच. मोठी कहाणी आहे , परत कधीतरी.

अर्धशिशी (बरं राहिलं , शब्दार्थ: मायग्रेन) ने परत डोकं वर काढलं, आणि दोन दिवसांची सक्तीची विश्रांती पदरी पडली. सवय होऊन गेलीय आता त्याची. सुरुवातीला वैताग यायचा मायग्रेनचा, पण हळू हळू समजलं कसं डील करायचं त्याच्याशी ते. फार विचित्र नातं आहे माझं त्याच्याशी. पहिल्यांदा त्याची ओळख झाली माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी. हो! हळदीचा कार्यक्रम वगैरे उरकला आणि लग्नगावी जायची वेळ आली, आणि अचानक व्हिस्कीचे ४-५ नीट पेग मारल्यासारखं डोकं गरगरायला लागलं जाम. उमजेनाच की काय होतंय ते.

"पित्त हो , अजून काय ? मला पण होतं असंच अधून मधून. "
"करणी /भानामती तर नाही न गं केली कुणी?. चांगलं बघवत नाही लोकांना आजकाल. "
"दुपार पर्यंत चांगला होता हो. उन्हात अनवाणी जावं लागलं हळदी नंतर बाजूच्या मंदिरात. सहन नसेल झालं.  शहरात राहून नाजूक झालीत आजकालची पोरं. नाहीतर, आमच्या वेळी …. "
"अगं दुपारी एक फकीर आला होता दाराशी. काहीतरी पेटी वगैरे देऊन गेला ह्याच्या हातात, मेल्यानी काहीतरी जंतर मंतर तर नाही केले ना ? हा महेश पण पिडत होता त्याला किती वेळ!"
"नाही गं मावशी. मी होते न तिथे? तो फकीर आला न त्याने एक रुपयाचे नाणे मागितले त्याने महेशकडे. त्याच्या हातात दिल्यावर काहीतरी हातचलाखी करून त्याची गळ्यात घालायची पेटी बनवून महेशच्या हातात दिली त्याने. दक्षिणा म्हणून १० रुपये मागायला लागला.  महेश म्हणाला १० काय १०० रुपये देतो , पण जादू कशी केली ते शिकव मला. वैतागून निघून गेला बिचारा फकीर. "
"कुठंय ती पेटी , बघू इकडे." म्हणत मावशीने लांब कुठेतरी झुडपात भिरकावून दिली ती. भरभर देवघरातून थोडा अंगारा आणून माझ्या डोक्याला लावला.
"नजर काढ गं पोराची. बिना आईचं लेकरू. कुणी नजर पण काढत नाही. "
"हो , हो" म्हणत कुणीतरी मीठ मिरची घेवून आलं. भराभरा नजर काढली.
"शांत रहा! मी औषधं देते त्याला. स्ट्रेसनी होतं कधी कधी असं थोडी विश्रांती घेऊ द्या त्याला." कांचन सुटकेला धावून आली.

डोळे उघडून किलकिल्या डोळ्यांनी मी आजूबाजूला पाहिलं. ही गर्दी लोकांची! माझ्या डोकं गरगरन्याची कारणमीमांसा  आणि उपायांना ऊत आला होता नुसता. कुणी दिसतंच नव्हतं. आजूबाजूचं सगळं गोल गोल फिरत होतं. एकमेकांत मिसळून गेलं होतं. हातानीच खुण केली सगळ्यांना गप्प रहायची आणि परत डोळे मिटून शांत पडून राहिलो.

बघता बघता संध्याकाळ झाली. लग्न गावी निघायची वेळ झाली. उद्या दुपारचा मुहूर्त होता. निघणे गरजेचे होते.  कसाबसा उठलो, सतीश मामाच्या आधाराने बाथरूम मध्ये जाऊन तोंडावर पाण्याचा हात फिरवला. आणि कार मध्ये जावून बसलो. काहीच भान नव्हतं आजूबाजूचं. अस्मिता काळजीने परेशान झाली होती. तिच्याकडे पाहून कसेबसे हसून खोटा धीर देत होतो. ड्रायवर ने उदबत्ती वगैरे लावून गाडी स्टार्ट केली. आपली फेवरेट गाण्यांची सीडी ऐटीत लावून , गाडीला वेग दिला.

"ये दुनिया , ये मेहफील , मेरे काम कि नही !" रफी विव्हळायला लागला.
"बंद कर रे ते गाणे. काय सिच्युएशन आणि काय गाणी लावलियस ?" मामा ड्रायवर वर खेकसले.  हिरमुसून बिचाऱ्यानी गाणी बंद केली. मामावरचा राग एक्सलरेटर वर काढून भन्नाट वेगात गाडी पळवायला लागला.
   
दोन तीन तासांनी लग्नगावी पोचलो. गाडीच्या खिडकीतून बाहेर बघितलं.  सासूबाई हातात आरतीचे ताट वगैरे घेऊन उभ्या. सगळं लग्नघर स्वागतासाठी घराबाहेर जमलेलं. त्याचक्षणी मायग्रेनला भन्नाट ऊत आला. डोकं गरगरणे एकदम तीव्र झाले. कसाबसा मामाच्या खांद्यावर हात ठेवून मी बाहेर पडलो. 

अनपेक्षित होतं हो सगळ्यांना असं काही. नटून थटून थांबलेल्या लग्नघरातल्या मुली, स्वतःला ,हम आपके है कौन मधला सलमान समजणारी पोरं, अशाच काहीतरी सनसनीखेज गोष्टीची वाट पाहणारे शेजारी पाजारी, नातेवाईक सगळेजण आश्चर्यचकित होवून माझ्याकडे पाहत होते.

"जावई बापूंनी येताना रस्त्यातच घेतली काय थोडीशी ?" कुणीतरी कुजबुजले.
"अग्गं बाई, काय तब्येतीचा प्रॉब्लेम वगैरे आहे काय, लग्नाच्या आधी लपवून ठेवले होते वाटते."
"तरीच, हुंडा वगैरे नाही घेतला वाटतं"
"ही आय टी मधली जनरेशन असलीच बघा. मरमर कामं करायची आणि दारू ढोसायची. लग्नाच्या दिवशी तर कंट्रोल करावा कि नाही ?"
लोकांची कुजबुज सुरु झाली होती. मला मजा वाटत होती ऐकून. जाउन सरळ बेडवर लवंडलो. लागलीच डॉक्टर वगैरे आले, चेकअप वगैरे करून गेले. सगळ्यांची रीघ लागली माझी विचारपूस करायला. सासऱ्यांनी सगळ्यांना थोडे जोरातच बजावून सांगितले. "विश्रांती घेऊ द्या प्लीज त्यांना."

तेवढ्यात एका मित्राचा फोन आला.
"काय रे काय झालं ?"
"अरे काही नाही थोडीशी चक्कर येतेय आणि डोकं पण दुखतेय"
"च्यायला काय झाले? काय थोडीशी घेतली कि काय तू आज ?"
"वेडा आहेस का ? लग्नाच्या आधी महिनाभरापासून सोडून दिलीय मी."
"हम्म , आय नो वोट्स रॉंग, अरे काट्यानी काटा काढायचा.  एक काम कर तू २ पेग मार, चक्कर बंद होऊन जाइल."
काही न बोलता मी फोन ठेवून टाकला. मनाशी विचार केला की लग्न पोस्टपोन होणार आपले. अस्मिताची आणि तिच्या पालकांची जास्त काळजी वाटू लागली, कि एवढी तयारी केलेली, वाया जाणार सगळी. पर्याय नव्हता ना पण काहीच. विचार करता करता झोप लागली. गरगरणे अजूनही थांबले नव्हते.

सुदैवाने सकाळी जाग आली आणि मायग्रेन बराच कमी झाला होता. अस्मिता गरमा गरम कॉफी घेऊन आली. पिउन ताजेतवाने वाटले. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे टेन्शन पण थोडे दूर झाले. आणि फायनली मी बोहल्यावर चढलो. 

रामदास स्वामी बोहल्यावर चढले आणि "सावधान" म्हणताच त्यांना ईशारा मिळाला असं म्हणतात. त्यांनी त्याच क्षणी तिथनं धूम ठोकली होती. देव सगळ्यांना तसाच वेगवेगळ्या प्रकारे इशारा तर देत नसेल?

ओके, ओके अस्मिता ! जोक होता हा ! आई गं , …. लाटणं लाकडी असलं तरी लागतं जोरात अगं !

1 comment:

marathiblogs