Wednesday, October 22, 2014

परवाना !

लाईट जाणं वगैरे प्रकार परदेशात राहून विसरायला झाले होते. भारतात आलो आणि थोड्या वेळातच विजेने सायोनारा केले आणि धूम ठोकली. दिवेलागणीची वेळ, आणि वर बेभरवशाचा कारभार आपल्याकडे सगळा, वीज कधी परत येणार माहित नाही. इनवर्टर पण एन वेळी खराब झालेला. सणासुदीच्या दिवसांमध्ये त्याची डागडुजी करायला पण कुणी येत नव्हतं. बाहेर रिमझिम सुरु झाली होती नुकतीच पावसाची. जीव वैतागून गेला , पण करणार काय ? पर्याय नव्हता. वीज परत येण्याची वाट बघायचं  नुसतं!

काडेपेटी शोधून मेणबत्ती पेटविली. त्या प्रकाशात घर कसं अगदीच वेगळं भासायला लागलं. निरनिराळ्या वस्तूंच्या लंबुळक्या सावल्या भिंतीवर कशा दिमाखानं डौलू लागल्या. ज्योतीच्या फरफरण्याने हातात हात गुंफून नाचायला लागल्या . सावल्यांचे ते खेळ पाहण्यात रंगून गेलो असताच, अचानक त्याचं आगमन झालं. पावसात ज्योतीच्या प्रकाशाने आकर्षित होऊन एक पतंग (फ़ुलपाखरू) आलं होतं. कुठून कसा सुगावा लागला कोण जाणे त्याला? पण आला! एखाद्या बेभान , वेड्या प्रेमवीराप्रमाणे सुसाट आला आणि मेणबत्तीच्या ज्योतीकडे झेपावला. तिच्या अगदी जवळ जाउन एक शानदार घिरकी घेतली , आणि जसे काही तिच्या मनाचे रंजन करतोय त्याप्रमाणे वेडीवाकडी वळणे घेत तिच्याभोवती फिरू लागला.

"जपून रे जरा! फार जवळ नकोस जाऊ तिच्या. " मी काळजीने म्हणालो. जसं काही त्याला समजणारच होतं.

"तुला काय कळणार रे यातली नशा? तुला नाही समजणार." म्हणून आपल्या घिरट्या तशाच सुरु ठेवल्या त्याने. काय आश्चर्य !!! पतंग चक्क बोलायला लागला होता. बरं झालं , कुणीतरी बोलायला भेटलं. एकाकीपणानं मी ही वैतागून गेलो होतो. पुढे बोलायला लागला तो.

"दोन तीन महिने झाले असतील , पहिल्यांदा भेटलो हिला तेंव्हापासून. सगळं कसं कालच घडल्यासारखं वाटतंय बघ. पाहता क्षणी प्रेमात पडलो हिच्या. तिचं ते तेजाळलेलं रूप , वेडं  करून टाकलं त्याने मला. वाऱ्याच्या झुळकीसरशी तिचं ते ग्रेसफूल लवलवणे, हळूच मान खाली घालून , अचानक माझ्या डोळ्यात डोळे घालून आवाहनात्मक पाहणं, सगळं कसं स्वप्नवत वाटतं. असं वाटतं कि आयुष्यभर असंच हिच्यासोबत राहावं, हिच्याभोवती फिरत , हिचं मन रिझवीतच माझं जीवन व्यतीत व्हावं. "

"एवढं प्रेम करतोस तिच्यावर ?" मी विचारलं.

"हो ना , आणि ही वीज सुद्धा माझ्याच बाजूने आहे. सगळं समजत असल्यासारखी रोज बरोबर याच वेळी दबक्या पावलांनी निघून जाते. जाताना हळूच डोळे मिचकावते माझ्याकडे पाहून. म्हणते , भेटून घे मनाजोगतं. थोडा एकांत मिळूदे तुम्हा दोघांना. पण लवकर आटपा. येते परत  अर्ध्या तासात. या अर्ध्या तासात दिवसभराचं सगळं जगून घेतो मी. एक एक क्षण मनापासून उपभोगतो अगदी,"

"अरे, ते सगळं ठीक आहे, पण तिचं काय ? तिलाही तेवढाच आवडतोस का तू ?"

"कदाचित ……असावं तसंच " हे  म्हणताना त्याच्या आवाजातला कंप जाणवला मला. एक प्रकारचा गोंधळलेपणा होता  त्याच्या बोलण्यात.

"काय रे काय झालं ?" . मी विचारलं.

"पहिल्यांदा भेटलो तिला , तेंव्हा खरंच प्रेमात पडलो होतो रे आम्ही एकमेकांच्या. करमायचं नाही एक दुसरयाशिवाय एक क्षण ही. असंच रोज दिवेलागणीच्या वेळी भेटतो आम्ही. खूप गप्पा मारायचो. बिचारी फार एकटी असते रे. म्हणून बाहेरच्या जगाचं सौंदर्य सांगून तिच्या चेहऱ्यावर हसू आणायचा प्रयत्न करायचो . पहिल्या पावसाचा तो शरीरासोबत मन ही चिंब करणारा अनुभव ,मोगरा आणि जाईचा तो मंद वेडावणारा सुगंध, उगवत्या सूर्याची ती लाली , पौर्णिमेच्या चंद्राचा तो शीतल गारवा, आकाशाचे ते  जादुई निळे निळे रंग , वनराईचा तो हिरवागार गालीचा, पहाटेच्या वाऱ्याचा तो सुखावणारा सहवास. सगळं कसं भरभरून सांगायचो तिला. तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहून जीवन सार्थकी लागल्यासारखे वाटायचे मला. फडफडून तीही आनंदानं शहारून जायची. रोज माझी चातकासारखी वाट बघायची. म्हणायची मलाही घेऊन चल रे तुझ्यासोबत.  फारशी बोलायची नाही , पण कधी कधी प्रकाशाच्या गमती जमती सांगायची.  त्या मेणाची तक्रार करायची , फार चिकट आहे म्हणे तो. वीजेवरही नाराज असायची कधी कधी. म्हणायची , परत यायची फार घाई असते तिला ! अस्तित्वच संपायचं ना  रे तिचं त्या दिवसापुरतं , एकदा वीज परत आल्यावर. "

"अरे , पण त्या मेणाला काढलं तर अस्तित्वच काय उरतं तिचं? त्याचं समर्पण बघ ना! रोज झुरतो , वितळतो तिच्यासाठी. तिला तेवत ठेवण्यासाठी , रोज थोडं थोडं वितळून मरतोच ना तो ?" मी म्हटलं 
.
"नाही रे मन रमत तिचं त्याच्या सोबत. दोघांच्या संमतीने नाही  काही  ते नातं  जुडलेले. दुसरा काही पर्याय नव्हता म्हणून  जवळीक झालेली त्यांच्यात . दुसऱ्या कुणीतरी विणले म्हणून काही नात्यांच्या रेशीमगाठी घट्ट नसतात होत. नुसताच एक अलिखित करार बनतो ते नातं. एक पर्यायहीन , शुष्क , लादलेलं नातं . मी नव्हतो तेंव्हा त्या मेणानं जीवन व्यापलं होतं तिचं.  कंटाळवाणी , चिकट , रंगहीन सोबत त्याची आयुष्यभराची. त्यात कसलं आलंय समर्पण, डोंबल ! एकच आयुष्य मिळतं , कसं भन्नाट , बेभान जगलं पाहिजे. बाहेरचं रसरसलेलं, खळखळून वाहणारं जीवन , त्याचा परिचय मीच करून दिला तिला.  एकदा बोलून गेली ती, कि खऱ्या अर्थानं  जीवन काय असते ते कळाले माझ्यासोबत राहून. आणि मेणाचं काय रॆ , वितळल्या सारखं दाखवतो नुसता . वितळून परत पूर्व रुपाला येतो , ती ज्योत नाहीशी झाली की. त्याचं अस्तित्व कधीच मिटत नाही . हि ज्योत संपली , तर कदाचित काही दिवसांनी दुसऱ्या ज्योतीसोबत दिसेल तो. "

मंद हसून मान डोलावली मी .
"पण  काहीतरी बिनसलंय तुझं हे नक्की! आवाज थरथरतोय बोलताना तुझा. ती ज्योतही फारशी डोलत नाहीये तू आल्यापासून. " मी विचारलं.

"बरोबर ओळखलंस तू . गेल्या काही दिवसांपासून पूर्वीसारखं बोलत  नाही ती माझ्याशी. असं जाणवतंय की , ह्या नात्यामध्ये मी एकटाच आहे. आहे.ती कुठे नाहीचये त्यात. मी एकटाच धडपडतोय हे एकतर्फी नातं जपण्यासाठी . हे असं तोडण्यासाठीच का जोडतो आपण ? फारसं लक्ष नाही देत ती . मला जाणवेल असं दुर्लक्ष करते. मी  बोललो तरच बोलते. ते हि कामापुरतं . तिला नाही कळत  का , तिचं हे वागणं  कसं काळीज चिरतं माझं . कदाचित तिला जाणवले असेल कि माझे जीवन अगदी वेगळे आहे, ती कधीच माझ्यासोबत मुक्त बागडू नाही शकणार. मुद्दामहून करीत असेल बहुतेक . कसल्यातरी निर्विकार , निर्जीव, निरसपणे कशीबशी तेवत असते."

"दुसरा  एखादा पतंग तर नाहीये न आवडला तिला?" माझ्या मनातली शंका बोलावून दाखविली मी .

"माहिती नाही , तशी शक्यता फार  मला तसं काही असण्याची. पण हे मात्र अगदी खरा आहे कि माझ्या प्रेमातला तो आवेग , ती काळजी , ओलावा तिच्यात कुठे दिसताच नाहीये . आतून जळतोय रे मी !  माझ्या ह्या सुंदर पंखाचं ओझे वाटायला लागलेय मला. जीव गुंतलाय तिच्यात माझा. कधी वाटतं , ह्या  मेणा साठीच असं वागतेय माझ्याशी ती असं . एवढी वर्ष सोबत घालवलेली त्याच्यासोबत, तिला पण सोडवत नसेल. बोचत असेल कुठेतरी !कळत नाही कुणाचं आणि काय चुकतंय ." हताश स्वरात तो बोलत होता .

"मग आता ? काय करायचं ठरवलंय ? एवढे सुंदर पतंग असतात रे, एका  पेक्षा  एक. निवड त्यातलीच एक. विसर हे सगळं . नव्याने आयुष्य सुरु कर. हे आगीशी  खेळणं  सोडून  दे. " असाच एक अनाहूत  सल्ला दिला मी .
माझ्याकडे पाहून वेड्यात काढल्यासारखं हसला नुसतंच तो . निशब्दपणे आपले पंख पसरून मेणबत्तीच्या त्या ज्योतीकडे झेपावला तो. अगदी जवळ पोचला तिच्या . त्याच्या त्या लगटीमुळे, अचानक अंधाराने झाकोळून गेलं घर  सगळं , अगदी क्षणभरासाठी ! पुढच्याच क्षणी तिच्या पायाशी राख होऊन पडलेला होता तो! समर्पणाचा अर्थ उमगला मला त्या क्षणी .
मेणबत्ती त्याच निर्विकारपणे तेवत होती. मेणाचा एक ओघळ वितळून कसनुसा होत खाली सरकला. खिडकीतून बाहेर पाहिलं मी, मगाशीचा पाउस आता धाय मोकलून  बरसत होता ….

1 comment:

marathiblogs