Sunday, December 7, 2014

देवाघरची फुलं !

आपल्या चमकत्या निळ्या शर्टाची झोळी करून त्यात एवढी मोठी हिरवी-नारंगी काशिबोरं कशीबशी सांभाळत तो माझ्याकडे आला.

"भैय्या , हे बगा काशिबोरं आणल्यायात तुमच्यासाठी.  आवडतेत का तुमाला?"
"अरे व्वा ! का नाही? खूप आवडतात मला. धन्यवाद. " म्हणून मी हातातली कॅरीबैग त्याच्यासमोर धरली. मोठ्या उत्साहाने शर्टातली सगळी बोरं त्यात उपडी केली.
"तुमच्या देशात मिळत्यात का हो बोरं ? नसतील तर हिकडून घेऊन जावा. पायजेल तेवढी हायत आमच्या बागेत."
"नाही रे आमच्याकडे कुठली मिळायला एवढी छान बोरं. पण आत्तापुरती एवढी बास झाली. "


ते निरागस , मधाळ स्मित परत त्याच्या चेहऱ्यावर चमकले. फारच गोड पोरगा होता तो.  फार झालं तर ७-८ वर्षाचा असेल.

"हातात काय घातलंयस रे ते. चमकतंय कसलं बघ ना !" मी विचारलं.
"हे व्हय ? सलमान खान ची फ़ैशन हाय. तेनं पण असलंच घालतोय कि हातात. वौन्टएड म्हणून एक पिक्चर हाय बगा त्याचा. "
"बरं बरं, एकदम सही! मी तरीच आल्यापासून विचार करतोय तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतेय. आत्ता आले लक्षात , सलमान खान सारखा दिसतोस एकदम तू."

मी त्याला उगाच म्हणालो. तसं पाहायला गेलं तर सलमान खान नावाचा मनुष्य काय घालतो आणि काय करतो त्याच्याशी माझं काही एक देणं घेणं नाही. पण एवढ्या गोड पोराला दुखावणं मला जमलं नसतं. अगदी लाजून गेला तो. काय बोलावे ते कळेना त्याला. उगीच इकडे तिकडे बघायला लागला. त्याचा अवघडलेपणा कमी करावा म्हणून मी उगीच विषयांतर केले.

"इकडे कधी आला तू?"
"म्हागल्या वर्षी. मी आन माझी बहिण, ती तिकडं थांबल्याय बगा ." बाजूला एका गोठ्यात गाईला गोंजारत असलेल्या एका ५-६ वर्षाच्या मुलीकडे बोट दाखवून म्हणाला तो.
"कुठून आलात तुम्ही दोघं ?"
"परभणीला एक होस्टेल होतं. बंद पडलं गेल्या वर्षी, तवा तिकडचे सगळेजण हिकडं आलो."
"आणि परभणीच्या होस्टेल मध्ये कोण आणून सोडलं तुम्हा दोघांना ?"
"पोलिसांनी!"
"काय , ते कसे काय ?"
"नदीत सोडलं होतं म्हनं आमच्या आई बापानी लहान असताना आमाला.  पोलिसांना सापडलो, आणि तेनी परभणी ला आणून सोडलं आमाला."
खाड्कन कुणीतरी थोबाडात मारल्यासारखं वाटलं मला. क्षणभरासाठी आजूबाजूचं सगळं गर्रकन फिरल्यासारखं झालं. काहीच बोलवेना. पोटात ढवळून आलं एकदम. 

"चल , क्रिकेट खेळू , ती बघ दुसरी सगळी पोरं टीम पाडतायत!" म्हणून मी त्याला तिथनं घेऊन चालू लागलो.
तेवढ्यात तिकडून गाईच्या गोठ्यातून ती गोड पोरगी -त्याची बहिण पळत आली आणि माझ्या हाताचे बोट धरून चालायला लागली.
"ओ , एक फोटू काडा कि माजा. " माझ्या गळ्यातल्या कॅमेरा कडे पाहत विनवणी केली तिने.
"का नाही ? कुठे काढू सांग? त्या बागेजवळ काढायचा?"
"न्हाई, हितंच काडा. मी एक कविता म्हणते , नाचता बी येतं मला."
तिचं ते बोलणं ऐकून खुद्दकन हसू आलं मला.
"एक काय पाहिजे तेवढे फोटो काढू. तू म्हण पाहिजे तेवढी गाणी आणि मस्त डान्स कर!"
पडत्या फळाची आज्ञा मिळाल्यासारखी धुंदीत पळत गेली आणि आपल्या गोड आवाजात एक कविता म्हणून नाचू लागली. एवढे निखळ , निरागस दृश्य चुकवणे शक्यच नव्हते. गळ्यातला कॅमेरा काढून मी कामाला लागलो.

"भैय्या , मी हात लावू का ओ तुमच्या कॅमेराला?" त्याने हळूच, बिचकत अपराधी सुरात विचारले.
"हो , घे ना. तुला फोटो काढायचे का तुझ्या बहिणेचे? हे बघ घे हा कॅमेरा."

 मी त्याला फोटो कसा काढायचा समजावून सांगितले. खूप मजा वाटली त्याला. तो मन लावून फोटो काढायला लागला, त्याची बहिण पण अजून जोर जोरात नाचू लागली. हळू हळू ते पाहून बाकीची सगळी मुलं जमा झाली. सगळीजण कॅमेरा हाताळू लागली, एकेमेकांचे फोटो काढू लागली. मनमोकळ्या हसण्याच्या आवाजांनी ती जागा भारून गेली.

सकाळी आलो तेव्हा हि सगळी पोरं अगदी बुजल्यासारखी होती. दुरूनच कुतुहुलाने पाहत होती. थोड्या गप्पा मारल्या , आणि एकदम मोकळी झाली सगळी.  छान बोलू लागली , धीटपणे प्रश्न विचारू लागली. स्वतःबद्दल सांगू लागली. आज दिवाळीचा दिवस, सगळ्यांनी नवीन कपडे वगैरे घातले होते.  हातात फटाक्यांचे पुडे वगैरे होते. जाम आनंदात होती सगळी पोरं. हासेगावच्या त्या गावापासून दूर निवांत जागी बांधलेल्या नंदनवनात आज चैतन्याचे वातावरण होते.

लातूर जवळ थोड्याच अंतरावर रवि बापटले नावाच्या एका मित्राने अतिशय कष्टाने , श्रमाने फुलविली आहे हि जागा. नाव पण साजेसं "सेवालय"! एचआयवी ( एड्स ) ची लागण झालेल्या पोरक्या मुलांचा सांभाळ करतात. सरकार ची एका पैशाचीही मदत न घेता. अपवाद फक्त मुलांची औषधं , जे सरकारी हॉस्पिटल नित्य नेमाने पुरविते.

घरदार, सुख , आराम सगळ्यांचा त्याग करून एकाच ध्येय डोळ्यासमोर ठेवून रवीने हे काम सुरु केले. एचआयवी बाधित जोडप्यांची मुलं पण बहुतेक संक्रमण झालेली असतात. आई वडील अर्थातच जास्त दिवस तग नाही धरू शकत. त्यानंतर हि मुलं अक्षरशः रस्त्यावर येतात. अशिक्षित जनता, रोगाबद्दलाचे गैरसमज यातून जवळच्या नातेवाईकांकडूनसुद्धा या मुलांना वाळीत टाकलं जातं. औषधोपचारांचा अभाव, हेळसांड, दुर्लक्षामुळे झालेला मनावरचा आघात या सगळ्यांशी सामना करायला तेवढी ताकत नसते त्या कोवळ्या जीवांमध्ये. आणि परिणामी नको तो शेवट होतो त्यांचा. एका मुलीबद्दल रवीने सांगितले कि तिला जीवनाबद्दल एवढी निराशा आली कि तिने तंबाखू खाल्ली एक दिवस खूप.  रागावून विचारल्यावर रडत म्हणाली कि "मला जगायचं नाहीये.  तंबाखू खाल्ल्यावर माणूस मरतो म्हणतात , म्हणून खाल्ली. "

"यांचं राहिलेले जीवन , जेवढे ही असो , सन्मानाने, हसत खेळत व्यतीत व्हावं. एवढीच एक इच्छा आहे माझी. योग्य औषधोपचार याचं जीवन मान बरंच लांबवू शकतात. आरोग्य तंत्रज्ञानात बरीच प्रगती झालीय. समाजाने यांचा स्वीकार करावा. सामावून घ्यावं यांना. लोकांच्या मनातून या रोगबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत. हाच हेतू आहे माझा" रवी बोलत होता.
"यांचं कॉलेज वगैरे झालं कि स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, म्हणून पण प्रयत्न करतोय मी. कारण आत्ता तरी यांची वय कमी आहेत. पण मोठी झाल्यावर यांच्यासाठी काहीतरी उद्योग मिळावा, म्हणून अजून थोडी जागा विकत घ्यावी म्हणतोय.  म्हणजे यांची लग्न वगैरे होतील, संसार थाटतील, आणि उपजीविकेसाठी काहीतरी उद्योगही असेल. "
खूप खुजं आणि लहान झाल्यासारखं वाटतं मला रविसोबत बोलताना. कसलं मतलबी आणि स्वार्थी जीवन जगतो न खरं तर आपण.  आपलं छोटंसं विश्व, तेवढ्यातच आपण केंद्रित असतो. अशा मुलांसाठी/ गरजू लोकांसाठी  "खरंच कुणीतरी काहीतरी केलं पाहिजे." असं म्हणून थोडं वाईट वाटून घेऊन आपापल्या कामाला लागतो. म्हणूनच रविला त्रिवार सलाम.

आर्थिक गरज तर आहेच मुलांना. महिना १५००-२००० रुपये प्रत्येकाचा महिना खर्च आहे. ६०-७० मुलं आहेत सेवालायात.  बऱ्याच मुलांचं पालकत्व काही चांगल्या लोकांनी घेतलं आहे ( महिना १५०० रुपये मदत एका मुलासाठी). पण राहिलेल्यांसाठी अजूनही झगडावं लागतं. आणि हो आर्थिक गरजेसोबतच मला जाणवलं कि मुलांना त्याही पेक्षा जास्त गरज आहे जवळीकीची. त्यांच्याशी जावून गप्पा माराव्यात , त्यांच्यासोबत वेळ घालवावा, त्यांच्या गप्पा ऐकाव्यात. खूप आनंदी आणि समाधानी होतात हि मुलं त्यामुळं.

दिवाळी सारखा सण म्हणून बरेच नातेवाईक , मुलांना ४ दिवसांसाठी घरी घेऊन गेले होते. तरीही १०-१२ जण होते ज्यांना कुणीच नव्हतं.  तीच सगळी मुलं भेटली मला त्या दिवशी.
"काय होणार रे मग मोठ्ठा होऊन ?" मी सगळ्यांना प्रश्न विचारला.
"नर्स !"
"डॉक्टर!"
"सिस्टर!"
सगळ्यांची हीच उत्तरं. हि मुलं बाहरेच्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त डॉक्टर आणि नर्सेस लाच भेटतात. त्यामुळे स्वाभाविकपणेच त्यांना तेच बनायचेय मोठे होऊन.  तरीही, एवढ्या सगळ्या गोष्टीशी झगडत, एवढी आनंदी आहेत हि मुलं की काय सांगू? काय अधिकार आहे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचे दुखः मानत बसण्याचा. नको त्या फालतू गोष्टींचे टेन्शन्स घेऊन त्यांना गोंजारत बसण्याचा.  खरंच, खूप काही शिकण्यासारखं आहे या मुलांकडून.

काही फोटोज टाकले आहेत इथे. यातले बहुतेक(बरेच) फोटोज मुलांनी स्वतः काढलेले आहेत.

सेवालय 
                                     
रवी बापटले ! ध्येयवेडा माणूस …  
रवीने नंदनवन फुलवले आहे हासेगाव मध्ये. फुलं आणि बागा मन लावून वाढवल्या आहेत. 

मराठवाड्या सारख्या भागात पाण्याची समस्या नेहमीची. एक छोटासा तलाव बांधला आहे पावसाचे पाणी साचवण्यासाठी…  

मुलांना राहण्यासाठी, अभ्यासासाठी अशी साधीच पण छान कुटी बांधली आहे … 

(रविला बरीच गरज आहे. मोठा व्याप आहे, दिवसेंदिवस मुलांची संख्या वाढत आहे. मदतीची इच्छा असेल तर कळवा मला नक्की! )

No comments:

Post a Comment

marathiblogs