Saturday, April 8, 2017

एका लायसन्सची गोष्ट

"थांबव रे , हेच आहे आर टी ओ ऑफिस!" रव्या म्हणाला.  मी करकचून ब्रेक दाबून मोटारसायकल हळूच रस्त्याच्या बाजूला थांबवली. 

"तो बघ , तो शिंदे तिकडे टपरीवर थांबलाय. चल लवकर." म्हणत रव्या भराभरा चालू लागला. मीही पाठोपाठ पळालो. 

नीलम पान स्टॉल ! हजारोचा गल्ला होत असेल रोजचा ह्या पानवाल्याचा. आर टी ओ ऑफिस मध्ये काम असणारा प्रत्येकजण ह्या पानवाल्याचं गिऱ्हाईक. कुणी पान , सुपारी, सिगारेट; तर कुणी लायसन्स चे फॉर्म  वगैरे  घ्यायला इकडे चक्कर मारणारच! आणि, वर झाडून सगळे ऑफिसर्स , एजन्टस ह्याच्या ओळखीचे. 

माझे आणि रव्याचे इथे येण्याचे प्रयोजन म्हणजे मला माझे टू व्हिलरचे लायसन्स काढायचे होते.  लर्निंग लायसन्स घेऊन सहा महिने झालेले. आणि फुल्ल लायसन्स असलेलं कधी पण बरे. रव्याच्या ओळखीचा एक एजन्ट होता शिंदे म्हणून. त्याने रव्याचे लायसन्स गेल्या वर्षीच काढून दिलेले.  म्हटलं , चला आपणपण त्याच्याकडूनच काम करून घेऊ. 

"नमस्कार शिंदे साहेब. हा माझा मित्र महेश. यालाच लायसन्स काढायचे आहे. "  रव्या हात जोडून म्हणाला. 
"ललनिन का पम्मम ?" तोंडातलं पान सांभाळत शिंदे म्हणाला. 
"काय?" मी वैतागून विचारले. मला त्याची सांकेतिक भाषा काही समजली नाही. 
मनातल्या मनात मला शिव्या घालत , मस्त जमलेले पान थुंकावं लागल्याचा वैताग कसाबसा लपवत , पच्चकन थुंकून शिंदे म्हणाला  "लर्निंग का पर्मनंट हो ? कुठलं लायसन्स काढायचंय ?" कुठून आणलंय हे येडं काय माहित अश्या अविर्भावात, त्याने रव्याकडे उगीच एक कटाक्ष टाकला. 
"पर्मनंट !" मी उत्तरलो. 
"कागदपत्रं आणलीत का सगळी ?
"होय. हि काय , सगळी आणलीयत." मी माझ्या हातातली फाईल त्याच्यासमोर धरली.  
"बरं , एक गोष्ट लक्षात ठेवायची. नवीन आर टी ओ आलाय सोमवारीच बदली होवून. तेंव्हा जास्त बडबड करू नका त्याच्यासमोर! आणि दुसरी गोष्ट , टेस्ट मध्ये आपली गाडी जरा हळू चालवा. बाकी मी घेतो ऍड्जष्ट करून.
"ओ के. गाडी चालवायची चिंता करू नका हो, मी मस्त गाडी शिकवलंय त्याला. " रव्या उगीच स्वतःकडे भाव घेत म्हणाला. 
"चला निघू मग् . " मी म्हणालो.  इकडे शिंदे आपला , थोड्या वेळापुर्वी टपरी समोर टाकलेल्या पानाच्या पिचकारीने जे काही डिजाइन तयार झाले होते, त्याचं कौतुकाने निरीक्षण करण्यात मग्न होता. अचानक बाजूच्याने मारलेली फ्रेश पिचकारी त्या डिजाइन वर दिमाखाने पसरली, आणि शिंदेची तंद्री भंगली. 
"चला!" म्हणत शिंदे निघाला . मागे मी मी आणि रव्या पण चालू लागलो. 
"काम होईल ना ?" रव्या म्हणाला. 
"पंधरा वर्षं गेली आपली हितं मित्रा , कामाची चिंता नाही करायची. फक्त तेवढं नवीन आर टी ओ आलाय , जरा सेट व्हायला वेळ लागंल. बाकी काही नाही. निवांत राव्हा तुमी." शिंदे बढाई मारत म्हणाला. 

लायसन्स डिपार्टमेंट समोर ही...  लांबलचक लाईन. शिंदेने लायसन्स फॉर्म काढून भराभरा भरला. घाईघाईत मला दोन चार जागी सह्या करायला लावल्या , कागदपत्रं जोडून सरळ आर टी ओ च्या केबिन मध्ये जाऊन फॉर्म देऊन आला.     
 "अरे, शिंदे साहेब, तो फॉर्म एकदा पाहून घेतला असता मी, सगळी माहिती बरोबर आहे का वगैरे! इंग्लिश मध्ये आहे तो फॉर्म. " मी म्हणालो.
शिंदेनी परत माझ्याकडे  'कुठून आलंय हे येडं' वाला कटाक्ष टाकला. म्हणाला "घाबरू नका हो तुमी , पंधरा वर्षांपासून हेच काम करतोय . फॉर्म तोंडपाठ आहे माझ्या.  डोळे झाकून सुद्धा भरीन वेळ आली तर. " एवढं बोलून,  तो त्याच्या पुढच्या गिऱ्हाईकाकडे वळला. 

"बरं बरं , दोन वाजता ग्राउंड मध्ये भेटू टेस्ट साठी." म्हणत मी आणि रव्या टपरी कडे सिगारेट फुंकायला वळलो. 

********************************************

दोन वाजता टेस्ट वगैरे सुखरूप पार पडली.  आता फक्त आर टी ओ समोर जाऊन एक सही केली की मी घरी जायला मोकळा! शिंदेनी ऑफिस समोरच्या लाईन मध्ये सगळ्यात पुढे नेऊन उभे केले मला. मागची लोक तक्रार करायला लागली तर त्यांनाच दरडावून चुप्प केले त्याने. शिंदेबद्दलचा आदर माझ्या मनात अजून दुणावला. 

"काय नाही. आत जाऊन नाव विचारतील साहेब, आणि एक सही ठोकायची. टेन्शन नाही लाईफ मध्ये." शिंदेनी मला निर्धास्त केले. 
"नेक्स्ट !" आतून आवाज आला. 
मी मोठ्या आत्मविश्वासाने आत एन्ट्री मारली. 
"नाव?"
मी नाव सांगितले. 
"पत्ता ?"
पिनकोड सहीत पत्ता सांगितला मी.  आणि सही ठोकण्यासाठी खिशातल्या पेन काढायच्या तयारीत उभा राहिलो.
"काय डोळ्याचा नक्की प्रॉब्लेम काय आहे?" समोरून काळजीच्या सुरात प्रश्न आला .  
अगदी अनपेक्षित प्रश्न होता.  मला काहीच कळायला तयार नाही. 
"मला कळले नाही साहेब . माझ्या डोळ्यांबद्दल विचारताय का?"
"फॉर्म कोण तुम्हीच भरलाय ना ?"
मी गप्प . 
"इथे Does the applicant suffer from any defect of vision? पुढे yes लिहिलं आहे तुम्ही."
माझी वाचाच  बंद. 
"अहो तुम्हीच भरलाय ना फॉर्म ? तुमचीच सही आहे ना ही ?"
"हो साहेब, पण फॉर्म एजन्ट नि भरलाय." मी अपराधी सुरात म्हणालो. 
"अहो पण तुमच्यासारखी शिकली सावरलेली लोकं पण ना बघता असे फॉर्म साईन करायला लागली तर काय होईल ह्या देशाचं ?"
मी गप्पंच. 
"माझ्याकडे पेन फेकत साहेब म्हणाले. " ते करेक्ट करा !"
मी गप्पकन पेन पकडला  आणि करेक्शन केले.  अजून एकदा सगळा फॉर्म वाचून चुका नसल्याची खात्री केली. 
"सॉरी साहेब . खरंच चूक झाली . थँक यु"  - इति मी .
"सगळा सावळा गोंधळ चाललाय इथे. मी बघतोय जॉईन झाल्यापासून. मी सगळ्यांना सरळ करणार आहे. " स्वतःशीच बोलत मला सही करण्यासाठी त्यांनी खुणावले. 
पट्कन सही करून मी बाहेर धूम ठोकली.  शिंदे आणि रव्या बाहेर थांबले होतेच. 
"झाली का सही? येईल एखाद्या महिन्यात लायसन्स तुमचं.  जावा आता घरी. " शिंदेनी ग्वाही दिली. 

मी काही बोलणार तेवढयात शिंदेंना आतून बोलावणं आलं. पाच मिनिटांनी अगदी पडीक चेहरा करून शिंदे केबिन बाहेर आला. 
"घोळ झाला राव. साहेबांनी एकदम पाचर ठोकली." शिंदे आमच्याकडे येत म्हणाला. 
"ह्याच फॉर्म वर पंधरा वर्षे लायसन्स दिले सगळ्यांनी. पहिला आर टी ओ आहे ज्याने चूक पकडली." कौतुकवजा सुरात तो म्हणाला. 
"म्हणजे? तुम्हाला फॉर्म वर काय प्रश्न आहेत हे पण माहित नाही?" चकीत होऊन मी विचारलं. 
"नाही हो . एवढं इंग्रजी येत असतं तर हितं झक मारली असती का? असंच कुणीतरी कधीतरी भरलेला स्टॅण्डर्ड फॉर्म . तोच सगळ्यांना वापरतो आमी. आता हे असं काय होईल आम्हाला कधी माहितीच नव्हतं." शिंदे बोलला. 
"धन्य आहे! बरं,  नाव तरी बदलता अर्जदाराचे !" म्हणत मी शिंदेसमोर हात जोडले. शिंदेचा चेहरा पाहण्याजोगा झाला होता.  
"निघतो आम्ही आता!" म्हणून मी आणि रव्याने शिंदेचा निरोप घेतला. आमचे पाय परत नीलम पण स्टॉल कडे वळले.  सिगारेटची तल्लफ़ आणि मगाशीच्या केबिन मधल्या घटनेबद्दल रव्याची उत्सुकता , दोन्ही  उतावीळ झाले होते. 

*********************************************

सिगारेट संपवून आम्ही गाडीवर स्वार होणारच तेवढ्यात शिंदे आणि चार पाचजणं धावतच आमच्या दिशेनी आली. 
"एक मिनिट , जरा थांबा!" शिंदे दुरूनच ओरडला. 
माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. म्हटलं  आता अजून काय प्रॉब्लेम झाला च्यायला!
"ते जरा फॉर्म मधल्या सगळ्या प्रश्नाचे बरोबर उत्तरं लिहून द्या कि जरा. लई मदत होईल." शिंदे म्हणाला. त्यांच्यासोबतच्या चार पाच माना पण शिंदेच्या समर्थनात होकारार्थी डोलल्या. 
"अहो ती काय प्रश्नपत्रिका आहे का , कि स्टॅंडर्ड उत्तरं असतील?" मी डोक्यावर हात मारत म्हणालो. 
"अहो ,  तुमी चिंता नका करू त्याची. सगळी इंग्रजी प्रश्न वाचा आणि आम्हाला अर्थ सांगा. आम्ही लिहितो उत्तरं त्याची. " शिंदे त्याची नवीन स्टॅंडर्ड उत्तरपत्रिका बनवणार होता. 
मी त्यांना घेऊन टपरीसमोरच्या कट्टयावर बसलो , आणि एक एक प्रश्न मराठीत समजावून सांगायला लागलो.  आणि सगळीजण मराठी भाषांतर लिहून घ्यायला लागली.  निघताना सगळयांनी आग्रहाने आम्हाला परत एकेक सिगारेट पाजली. ती सगळी मंडळी , आम्ही दिसेनासे होईपर्यंत कृतज्ञ नजरेने आमच्याकडे पाहत होती.

आज या घटनेला झाली असतील २० वर्षं ! आज लायसन्स काढून पहिले आणि सगळी कथा आठवली.  दुर्दैवाने लायसन्स एक्स्पायर झाले आहे . नूतनीकरण करण्यासाठी बहुतेक परत आर टी ओ ऑफिस मध्ये चक्कर मारावी लागेलच.  शिंदेला शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. आता पस्तीस वर्षाचा अनुभव झाला असेल त्याला. आशा आहे कि लायसन्स फॉर्म वर नवीन प्रश्न आले नसावेत. किंबहुना , फॉर्मच सगळा मराठी मध्ये आला असेल , जेणेकरून इंग्लिश ना येणाऱ्या लोकांची अडचण होणार नाही .  सगळं बदललं असेल... अब कि बार ... 
marathiblogs