Tuesday, December 23, 2014

असंच सुचलं म्हणून !

बरसणाऱ्या पावसाला पाहुन तुम्ही मनातनं भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका, हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत. पण अजूनही वेळ गेली नाहीये. बाहेर धो धो पाऊस बरसतोय, तो नेहमीसाठी असणार नाहीये. भिरकावून द्या ती छत्री आणि रेनकोट! आणि भिजून चिंब व्हा. ताण तणावाने काळवंडलेल्या, अदृश्य सुरकुतत्यांमागे लपत चाललेल्या चेहऱ्यावर झेला ते चमकते तुषार. गात्रागात्रामध्ये भिनू द्या तो थंडावा. निराशेची, असमाधानाची , काळजीची आवरणे वाहवून जाऊ द्या त्या ठिबकत्या अमृतात. चाखून पहा ती अवीट गोडी निर्मळ पाण्याची. पायातले ते पाश तोडून टाका. खोटे मुखवटे फाडून फेकून द्या. बेधुंद होऊन निरागस लहान मुलांसारखे नाचा. नाचताना तुमच्याकडे रोखलेल्या, कुत्सित हसणाऱ्या त्या नजरांची कीव करा. आयुष्याचा हा महोत्सव बेभानपणे साजरा करा.
ढगांकडून गडगडाटी हसणं शिका. विजेकडून तिचं लखलखणं शिकून घ्या. डोळे दिपून जातील सगळ्यांचे ,असं जगा. वाहत्या खळखळत्या पाण्याचा झरा व्हा, डबक्यासारखे साचून राहू नका. मनातलं साचलेलं सगळं वाहू द्या त्या झऱ्यासारखं. भन्नाट वाऱ्यावर मनाला डुलू द्या. त्याच्यासारखं गतिमान व्हा, आणि वेळ आली तर हळुवार फुंकर बनायला हि मागे पुढे बघू नका. ओल्या मातीचा गंध भरभरून लुटा. श्वासांमध्ये साठवून ठेवा त्याला. आयुष्यभर पुरणार तर नाहीचये तो गंध. पण हा क्षण सुद्धा परत नाही येणार आहे. हा पाउस पण नेहमीसाठी असाच मेहेरबान नसणार आहे. भिजणं रोज उद्यावर टाकत राहिलात तर एक दिवस तो उद्याचा दिवस पण नसणार आहे.
चिंब व्हा !!!

Sunday, December 7, 2014

देवाघरची फुलं !

आपल्या चमकत्या निळ्या शर्टाची झोळी करून त्यात एवढी मोठी हिरवी-नारंगी काशिबोरं कशीबशी सांभाळत तो माझ्याकडे आला.

"भैय्या , हे बगा काशिबोरं आणल्यायात तुमच्यासाठी.  आवडतेत का तुमाला?"
"अरे व्वा ! का नाही? खूप आवडतात मला. धन्यवाद. " म्हणून मी हातातली कॅरीबैग त्याच्यासमोर धरली. मोठ्या उत्साहाने शर्टातली सगळी बोरं त्यात उपडी केली.
"तुमच्या देशात मिळत्यात का हो बोरं ? नसतील तर हिकडून घेऊन जावा. पायजेल तेवढी हायत आमच्या बागेत."
"नाही रे आमच्याकडे कुठली मिळायला एवढी छान बोरं. पण आत्तापुरती एवढी बास झाली. "


ते निरागस , मधाळ स्मित परत त्याच्या चेहऱ्यावर चमकले. फारच गोड पोरगा होता तो.  फार झालं तर ७-८ वर्षाचा असेल.

"हातात काय घातलंयस रे ते. चमकतंय कसलं बघ ना !" मी विचारलं.
"हे व्हय ? सलमान खान ची फ़ैशन हाय. तेनं पण असलंच घालतोय कि हातात. वौन्टएड म्हणून एक पिक्चर हाय बगा त्याचा. "
"बरं बरं, एकदम सही! मी तरीच आल्यापासून विचार करतोय तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतेय. आत्ता आले लक्षात , सलमान खान सारखा दिसतोस एकदम तू."

मी त्याला उगाच म्हणालो. तसं पाहायला गेलं तर सलमान खान नावाचा मनुष्य काय घालतो आणि काय करतो त्याच्याशी माझं काही एक देणं घेणं नाही. पण एवढ्या गोड पोराला दुखावणं मला जमलं नसतं. अगदी लाजून गेला तो. काय बोलावे ते कळेना त्याला. उगीच इकडे तिकडे बघायला लागला. त्याचा अवघडलेपणा कमी करावा म्हणून मी उगीच विषयांतर केले.

"इकडे कधी आला तू?"
"म्हागल्या वर्षी. मी आन माझी बहिण, ती तिकडं थांबल्याय बगा ." बाजूला एका गोठ्यात गाईला गोंजारत असलेल्या एका ५-६ वर्षाच्या मुलीकडे बोट दाखवून म्हणाला तो.
"कुठून आलात तुम्ही दोघं ?"
"परभणीला एक होस्टेल होतं. बंद पडलं गेल्या वर्षी, तवा तिकडचे सगळेजण हिकडं आलो."
"आणि परभणीच्या होस्टेल मध्ये कोण आणून सोडलं तुम्हा दोघांना ?"
"पोलिसांनी!"
"काय , ते कसे काय ?"
"नदीत सोडलं होतं म्हनं आमच्या आई बापानी लहान असताना आमाला.  पोलिसांना सापडलो, आणि तेनी परभणी ला आणून सोडलं आमाला."
खाड्कन कुणीतरी थोबाडात मारल्यासारखं वाटलं मला. क्षणभरासाठी आजूबाजूचं सगळं गर्रकन फिरल्यासारखं झालं. काहीच बोलवेना. पोटात ढवळून आलं एकदम. 

"चल , क्रिकेट खेळू , ती बघ दुसरी सगळी पोरं टीम पाडतायत!" म्हणून मी त्याला तिथनं घेऊन चालू लागलो.
तेवढ्यात तिकडून गाईच्या गोठ्यातून ती गोड पोरगी -त्याची बहिण पळत आली आणि माझ्या हाताचे बोट धरून चालायला लागली.
"ओ , एक फोटू काडा कि माजा. " माझ्या गळ्यातल्या कॅमेरा कडे पाहत विनवणी केली तिने.
"का नाही ? कुठे काढू सांग? त्या बागेजवळ काढायचा?"
"न्हाई, हितंच काडा. मी एक कविता म्हणते , नाचता बी येतं मला."
तिचं ते बोलणं ऐकून खुद्दकन हसू आलं मला.
"एक काय पाहिजे तेवढे फोटो काढू. तू म्हण पाहिजे तेवढी गाणी आणि मस्त डान्स कर!"
पडत्या फळाची आज्ञा मिळाल्यासारखी धुंदीत पळत गेली आणि आपल्या गोड आवाजात एक कविता म्हणून नाचू लागली. एवढे निखळ , निरागस दृश्य चुकवणे शक्यच नव्हते. गळ्यातला कॅमेरा काढून मी कामाला लागलो.

"भैय्या , मी हात लावू का ओ तुमच्या कॅमेराला?" त्याने हळूच, बिचकत अपराधी सुरात विचारले.
"हो , घे ना. तुला फोटो काढायचे का तुझ्या बहिणेचे? हे बघ घे हा कॅमेरा."

 मी त्याला फोटो कसा काढायचा समजावून सांगितले. खूप मजा वाटली त्याला. तो मन लावून फोटो काढायला लागला, त्याची बहिण पण अजून जोर जोरात नाचू लागली. हळू हळू ते पाहून बाकीची सगळी मुलं जमा झाली. सगळीजण कॅमेरा हाताळू लागली, एकेमेकांचे फोटो काढू लागली. मनमोकळ्या हसण्याच्या आवाजांनी ती जागा भारून गेली.

सकाळी आलो तेव्हा हि सगळी पोरं अगदी बुजल्यासारखी होती. दुरूनच कुतुहुलाने पाहत होती. थोड्या गप्पा मारल्या , आणि एकदम मोकळी झाली सगळी.  छान बोलू लागली , धीटपणे प्रश्न विचारू लागली. स्वतःबद्दल सांगू लागली. आज दिवाळीचा दिवस, सगळ्यांनी नवीन कपडे वगैरे घातले होते.  हातात फटाक्यांचे पुडे वगैरे होते. जाम आनंदात होती सगळी पोरं. हासेगावच्या त्या गावापासून दूर निवांत जागी बांधलेल्या नंदनवनात आज चैतन्याचे वातावरण होते.

लातूर जवळ थोड्याच अंतरावर रवि बापटले नावाच्या एका मित्राने अतिशय कष्टाने , श्रमाने फुलविली आहे हि जागा. नाव पण साजेसं "सेवालय"! एचआयवी ( एड्स ) ची लागण झालेल्या पोरक्या मुलांचा सांभाळ करतात. सरकार ची एका पैशाचीही मदत न घेता. अपवाद फक्त मुलांची औषधं , जे सरकारी हॉस्पिटल नित्य नेमाने पुरविते.

घरदार, सुख , आराम सगळ्यांचा त्याग करून एकाच ध्येय डोळ्यासमोर ठेवून रवीने हे काम सुरु केले. एचआयवी बाधित जोडप्यांची मुलं पण बहुतेक संक्रमण झालेली असतात. आई वडील अर्थातच जास्त दिवस तग नाही धरू शकत. त्यानंतर हि मुलं अक्षरशः रस्त्यावर येतात. अशिक्षित जनता, रोगाबद्दलाचे गैरसमज यातून जवळच्या नातेवाईकांकडूनसुद्धा या मुलांना वाळीत टाकलं जातं. औषधोपचारांचा अभाव, हेळसांड, दुर्लक्षामुळे झालेला मनावरचा आघात या सगळ्यांशी सामना करायला तेवढी ताकत नसते त्या कोवळ्या जीवांमध्ये. आणि परिणामी नको तो शेवट होतो त्यांचा. एका मुलीबद्दल रवीने सांगितले कि तिला जीवनाबद्दल एवढी निराशा आली कि तिने तंबाखू खाल्ली एक दिवस खूप.  रागावून विचारल्यावर रडत म्हणाली कि "मला जगायचं नाहीये.  तंबाखू खाल्ल्यावर माणूस मरतो म्हणतात , म्हणून खाल्ली. "

"यांचं राहिलेले जीवन , जेवढे ही असो , सन्मानाने, हसत खेळत व्यतीत व्हावं. एवढीच एक इच्छा आहे माझी. योग्य औषधोपचार याचं जीवन मान बरंच लांबवू शकतात. आरोग्य तंत्रज्ञानात बरीच प्रगती झालीय. समाजाने यांचा स्वीकार करावा. सामावून घ्यावं यांना. लोकांच्या मनातून या रोगबद्दलचे गैरसमज दूर व्हावेत. हाच हेतू आहे माझा" रवी बोलत होता.
"यांचं कॉलेज वगैरे झालं कि स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, म्हणून पण प्रयत्न करतोय मी. कारण आत्ता तरी यांची वय कमी आहेत. पण मोठी झाल्यावर यांच्यासाठी काहीतरी उद्योग मिळावा, म्हणून अजून थोडी जागा विकत घ्यावी म्हणतोय.  म्हणजे यांची लग्न वगैरे होतील, संसार थाटतील, आणि उपजीविकेसाठी काहीतरी उद्योगही असेल. "
खूप खुजं आणि लहान झाल्यासारखं वाटतं मला रविसोबत बोलताना. कसलं मतलबी आणि स्वार्थी जीवन जगतो न खरं तर आपण.  आपलं छोटंसं विश्व, तेवढ्यातच आपण केंद्रित असतो. अशा मुलांसाठी/ गरजू लोकांसाठी  "खरंच कुणीतरी काहीतरी केलं पाहिजे." असं म्हणून थोडं वाईट वाटून घेऊन आपापल्या कामाला लागतो. म्हणूनच रविला त्रिवार सलाम.

आर्थिक गरज तर आहेच मुलांना. महिना १५००-२००० रुपये प्रत्येकाचा महिना खर्च आहे. ६०-७० मुलं आहेत सेवालायात.  बऱ्याच मुलांचं पालकत्व काही चांगल्या लोकांनी घेतलं आहे ( महिना १५०० रुपये मदत एका मुलासाठी). पण राहिलेल्यांसाठी अजूनही झगडावं लागतं. आणि हो आर्थिक गरजेसोबतच मला जाणवलं कि मुलांना त्याही पेक्षा जास्त गरज आहे जवळीकीची. त्यांच्याशी जावून गप्पा माराव्यात , त्यांच्यासोबत वेळ घालवावा, त्यांच्या गप्पा ऐकाव्यात. खूप आनंदी आणि समाधानी होतात हि मुलं त्यामुळं.

दिवाळी सारखा सण म्हणून बरेच नातेवाईक , मुलांना ४ दिवसांसाठी घरी घेऊन गेले होते. तरीही १०-१२ जण होते ज्यांना कुणीच नव्हतं.  तीच सगळी मुलं भेटली मला त्या दिवशी.
"काय होणार रे मग मोठ्ठा होऊन ?" मी सगळ्यांना प्रश्न विचारला.
"नर्स !"
"डॉक्टर!"
"सिस्टर!"
सगळ्यांची हीच उत्तरं. हि मुलं बाहरेच्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त डॉक्टर आणि नर्सेस लाच भेटतात. त्यामुळे स्वाभाविकपणेच त्यांना तेच बनायचेय मोठे होऊन.  तरीही, एवढ्या सगळ्या गोष्टीशी झगडत, एवढी आनंदी आहेत हि मुलं की काय सांगू? काय अधिकार आहे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचे दुखः मानत बसण्याचा. नको त्या फालतू गोष्टींचे टेन्शन्स घेऊन त्यांना गोंजारत बसण्याचा.  खरंच, खूप काही शिकण्यासारखं आहे या मुलांकडून.

काही फोटोज टाकले आहेत इथे. यातले बहुतेक(बरेच) फोटोज मुलांनी स्वतः काढलेले आहेत.

सेवालय 
                                     
रवी बापटले ! ध्येयवेडा माणूस …  
रवीने नंदनवन फुलवले आहे हासेगाव मध्ये. फुलं आणि बागा मन लावून वाढवल्या आहेत. 

मराठवाड्या सारख्या भागात पाण्याची समस्या नेहमीची. एक छोटासा तलाव बांधला आहे पावसाचे पाणी साचवण्यासाठी…  

मुलांना राहण्यासाठी, अभ्यासासाठी अशी साधीच पण छान कुटी बांधली आहे … 

(रविला बरीच गरज आहे. मोठा व्याप आहे, दिवसेंदिवस मुलांची संख्या वाढत आहे. मदतीची इच्छा असेल तर कळवा मला नक्की! )

Friday, December 5, 2014

कॉफी विथ करन !

"ड्रेस कसला सुंदर आहे गं तुझा ! इंडियाहून घेतलास का?"
"थैन्कस !  हो, मागच्या वेळी मुंबई ला गेले होते, तेंव्हा घेतला. ते पानेरी नावाचं एक छान दुकान आहे बघ अंधेरीला."
"अगदी कुछ कुछ होता है मधल्या काजोल सारखा आहे बघ ! आठवला ना ? "
"ओह, हो का ? नाही आठवत बुवा !"  सौ मनातून स्वतःच्या खरेदीवर खुश होत म्हणाली.

बायका, आणि त्यांचे निरीक्षण ! फक्त हिरोईन चे कपडे , दागिने , नवीन डिजाईन्स  इकडेच लक्ष असते. पिक्चर मरो तिकडे. असो…  लुसलुशीत पनीर कबाब वर मी अजूनच जास्त लक्ष केंद्रित केले आणि मन लावून खायला लागलो. तसंही चार बायका एकत्र आल्या कि त्यांच्या शॉपिंगच्या गप्पा ऐकणे यासारखी निरस गोष्ट कुठली नसेल. बीअर पण संपत आली होती. ती रिपीट करण्यासाठी वेटरला माझे डोळे चातकाप्रमाणे शोधत होते.  बायकांच्या गप्पा सुरूच होत्या.

"काय मस्त पिक्चर होता ना केकेएचएच ?"

जोरात ठसका लागला मला. माझ्या अभिप्रायाप्रित्यर्थ माझ्याकडे बघणाऱ्या चेहऱ्याकडे कसनुसे हसत बीअरचा एक घोट रिचवला. नाही म्हणावं तर रूड दिसेल, हो म्हणावं तर मन नाही मानणार. अशा वेळी ठसके कसे देवासारखे धावून येतात.

"करन जोहर किती छान सिनेमे बनवायचा ना आधी. पण काय झाले काय माहिती त्याला ? तो फालतू कभी अलविदा ना कहना बनवला. तेव्हापासून मी त्याचे पिक्चर बघायचं सोडून दिलं., नाहीतर काय ?"

गरमागरम कबाबला तोंडापर्यंत पोचवणारा माझा हात तिथेच थबकला. सहन करावं हो माणसानी , पण किती? चक्क कभी अलविदा ना केहना ला फालतू म्हणावं कुणीतरी? अंगात बाजीप्रभूंनी संचार करावा तसं वाटून संभाषणात आवेशाने उडी घेतली मी.

"का………य?, फालतू चक्क ? मला वाटते करन जोहर ने एकच चांगला आणि सेन्सिबल पिक्चर बनवलाय आणि तो म्हणजे कभी अलविदा न कहना!" मी तावातावाने म्हणालो .
"काही काय म्हणतोस. काहीही दाखवलंय त्यात. तो अभिषेक बच्चन एवढा चांगला असतो, आणि राणी मुखर्जी तरीही शाहरुखच्या प्रेमात पडते. असं कधी होत असते का ?
"हो ना, काय संदेश जातो असल्या पिक्चर मधनं. समाजावर काय परिणाम होतील."
"मूर्खपणा दाखवलाय सगळा !" 
"तसाच आहे तो शाहरुख, नेहमी दुसऱ्याची बायको नाहीतर प्रेयसी पळवतो. अगदी कुठलाही पिक्चर घ्या त्याचा!"

बघता बघता शत्रुपक्षाने चढाई केली. अगदी एकाकी पाडला मला सगळ्यांनी. मी काही बोलायच्या आतच एकजण   अस्मिताला  म्हणाली -
"सांभाळ गं बाई नवऱ्याला. नको तसले पिक्चर आवडायला लागलेयत त्याला !"
हास्याच्या फवाऱ्यात माझे शब्द हवेतच विरून गेले. त्यामुळे मी अजून काही बोलण्याचा नाद सोडून दिला आणि वेटरला पुढच्या बीअरसाठी इशारा केला.

पार्टी संपवून घरी आलो. पण ते संभाषण काही माझ्या डोक्यातून जायला तयार नव्हते. आता करन जोहर तसा बऱ्यापैकी सिनेमे बनवतो (म्हणजे तसा एकच). कुछ कुछ होता है एक बरा सिनेमा होता. मी इंजीनीअरिंग च्या शेवटच्या वर्षी असताना आलेला. तेव्हा ते वयच तसं होतं कि आवडावा सिनेमा.  नंतर थोडी समज यायला लागली तेव्हा त्या पिक्चर मधला फोलपणा अधिकाधिक ठळक व्हायला लागला. सगळी स्वप्नाची दुनिया. श्रीमंत बापांची श्रीमंत पोरं. पैसे कमवायचे/अभ्यासाचे टेन्शन नाही. 'प्यार दोस्ती है'  वगैरे डायलॉग मारत, हातावर टाळ्या आणि नाकावर टिचक्या देत , कोपरापर्यंत फ्रेंडशीप बैन्ड बांधून प्रेम करतात. डोकं फिरल्यासारखं ती काजोल लग्न न करता थांबते शाहरुखसाठी. जणू राणी मुखर्जी मरायचीच वाट बघत होती. राणी पण अगदी कन्विनिअन्टली टाईम वर देहत्याग करते. वर ती अति शहाणी ८ वर्षाची पोर, अकाली प्रौढत्व आलेली. आज्जीबाई सारखी बडबड करते. सलमानची एन वेळी फजिती करून शेवटी यांचं लग्न वगैरे. आकाशातले तारे वगैरे पण एकदम टाइम वर तटातटा तुटतात. अरे काय पांचट पणा लावलाय? असले पिक्चर पब्लिक ला जाम आवडतात. माझ्या एका मित्राने पिक्चर संपल्यावर अगदी मार्मिक विश्लेषण केलं होतं. म्हणाला

"एकदम अन एक्सपेक्टेड स्टोरी निघाली यार!"
"का रे ?"
"नाहीतर काय, हॉरर पिक्चर होता राव. राणी मुखर्जीचं भूत दाखवलंय त्यात !"

लोकांना असे पिक्चर आवडतात कारण लोकांना स्वप्नाची दुनिया आवडते. असं काही नसतं हे माहित असूनसुद्धा , माणसं स्वतःला त्या पिक्चर मध्ये कुठेतरी हुडकण्याचा प्रयत्न करतात.  स्वतःला सुखावून घेतात.  ताण तणावाच्या जीवनात तेवढेच थोडे विरंगुळ्याचे क्षण! खोट्या स्वप्नांमध्ये रमून जातात. हिरो हिरोइन चं सुखकर आयुष्य बघून,
हैप्पी एंडिंग्ज बघून समाधानी होतात.  सत्य परिस्थितीचा काही एक संबंध नसतो अशा पिक्चरचा.  संस्कार , समाजाला संदेश वगैरे म्हणाल तर त्या नावानं शंख आहे सगळा.  कसला संदेश देतो हो हा पिक्चर सांगा बरं मला. कुणाचेतरी लग्न सुरु आहे आणि तिथे जाऊन ते मोडून त्याच्या होणाऱ्या बायकोशी लग्न करा? आणि ते का तर , हिच्यापेक्षा जास्त कुणीतरी आवडत होती म्हणून आठ वर्षापूर्वी हिला नाकारली होती. आणि आता बायको मेल्यावर, लगेच चान्स मारून घ्यायचा.  कि ८ वर्षांच्या मुलांनी बापाचे हरवलेले प्रेम हुडकायचे, हा संदेश? की इकडे एखाद्याला लग्नाचे वचन देऊन , समर कॅम्प मध्ये जुन्या मित्राला भेटून पावसात नाचायचे वगैरे, ते पण नको तेवढे जवळ येउन.  कम ऑन , स्टौप फूलींग योरसेल्वज!

ढोंगी झालो आहेत आपण. स्वतःला फसवून फसवून एवढे एक्स्पर्ट झालोयत की , आता तसं काही करतोय ,त्याची जाणीव हि नाही राहिली. सत्य परिस्थिती चा सामना नाही करू शकत आपण. त्यापासून लांब पळतो. कारण सत्य आपल्याला आपण काय आहोत याची जाणीव करून देते.  आणि मग कारण नसताना अपराधाची भावना मनात येते. कोण सांगितलीय ती उठाठेव? म्हणून बरं का, आम्हाला ना कुछ कुछ होता है जाम आवडतो, पण कभी अलविदा न कहना … रीडीक्युलस, अगदी नो नो !

उलट , कभी अलविदा न कहना चे वेगळेपण ह्या अशाच सगळ्या पिक्चर्स मुळे उठून दिसतं. मी असं म्हणत नाही की अगदीच सुंदर चित्रपट आहे तो. पण दमदार कथा आहे. विचार करायला लावणारी. वास्तवातली.  सत्य परिस्थितीशी समझोता ना करणारी. आणि संदेश वगैरे म्हणाल तर ते काही पिक्चरच काम नाहीये हो. पिक्चर म्हणजे मनोरंजनाचे एक साधन आहे. त्यात कसला संदेश आलाय , डोंबल ! संदेश हवाय , चांगले विचार हवेयत तर चांगली पुस्तकं वाचा , देवभक्ती करा. भक्तीपर चैनल्स लावून बसा दिवसभर. संदेश कसला घेताय पिक्चर मधनं. त्यापेक्षा कॅमेरा वर्क एप्रिशियेट करा, लेखकाची ताकदवान स्क्रिप्ट पहा. तेवढ्याच कौशल्याने दिग्दर्शक ती कथा कशी मांडतो आपल्यासमोर ते बघा. कुठेतरी ह्रदयाला एखादा प्रसंग हलवून सोडतो की नाही ते बघा. मोजक्याच शब्दात बरंच काही सांगून जाणारे डायलॉग, त्याचं कौतुक करा. 

खूप बोलायचंय कभी अलविदा ना कहना वर. पण जास्त मोठे मोठे ब्लॉग नाही लिहायचे असं ठरवलेय. काहीजणांनी सुचवले की फारच लांबलचक होतात. म्हणून भाग-२ मध्ये "के ए एन के " बद्दलची माझी मतं ! लवकरच भेटीन !
(क्रमशः)

Wednesday, December 3, 2014

सावधान !

बऱ्याच दिवसांत काही लिहिणे झाले नाही. महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले नाही का? कारणं दोन त्याची. एक म्हणजे काही सुचतच नव्हतं. डोकं दुसऱ्याच गोष्टींनी व्यापलं होतं (म्हणजे अजून पण आहे) . दुसरं म्हणजे इंटरनेट कनेक्शन नव्हतं घरी. आता हॉंगकॉंग सारख्या ठिकाणी इंटरनेट शिवाय पंधरा दिवस म्हणजे थोडं विचित्र वाटेल ऐकायला! पण झालं तसंच. मोठी कहाणी आहे , परत कधीतरी.

अर्धशिशी (बरं राहिलं , शब्दार्थ: मायग्रेन) ने परत डोकं वर काढलं, आणि दोन दिवसांची सक्तीची विश्रांती पदरी पडली. सवय होऊन गेलीय आता त्याची. सुरुवातीला वैताग यायचा मायग्रेनचा, पण हळू हळू समजलं कसं डील करायचं त्याच्याशी ते. फार विचित्र नातं आहे माझं त्याच्याशी. पहिल्यांदा त्याची ओळख झाली माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी. हो! हळदीचा कार्यक्रम वगैरे उरकला आणि लग्नगावी जायची वेळ आली, आणि अचानक व्हिस्कीचे ४-५ नीट पेग मारल्यासारखं डोकं गरगरायला लागलं जाम. उमजेनाच की काय होतंय ते.

"पित्त हो , अजून काय ? मला पण होतं असंच अधून मधून. "
"करणी /भानामती तर नाही न गं केली कुणी?. चांगलं बघवत नाही लोकांना आजकाल. "
"दुपार पर्यंत चांगला होता हो. उन्हात अनवाणी जावं लागलं हळदी नंतर बाजूच्या मंदिरात. सहन नसेल झालं.  शहरात राहून नाजूक झालीत आजकालची पोरं. नाहीतर, आमच्या वेळी …. "
"अगं दुपारी एक फकीर आला होता दाराशी. काहीतरी पेटी वगैरे देऊन गेला ह्याच्या हातात, मेल्यानी काहीतरी जंतर मंतर तर नाही केले ना ? हा महेश पण पिडत होता त्याला किती वेळ!"
"नाही गं मावशी. मी होते न तिथे? तो फकीर आला न त्याने एक रुपयाचे नाणे मागितले त्याने महेशकडे. त्याच्या हातात दिल्यावर काहीतरी हातचलाखी करून त्याची गळ्यात घालायची पेटी बनवून महेशच्या हातात दिली त्याने. दक्षिणा म्हणून १० रुपये मागायला लागला.  महेश म्हणाला १० काय १०० रुपये देतो , पण जादू कशी केली ते शिकव मला. वैतागून निघून गेला बिचारा फकीर. "
"कुठंय ती पेटी , बघू इकडे." म्हणत मावशीने लांब कुठेतरी झुडपात भिरकावून दिली ती. भरभर देवघरातून थोडा अंगारा आणून माझ्या डोक्याला लावला.
"नजर काढ गं पोराची. बिना आईचं लेकरू. कुणी नजर पण काढत नाही. "
"हो , हो" म्हणत कुणीतरी मीठ मिरची घेवून आलं. भराभरा नजर काढली.
"शांत रहा! मी औषधं देते त्याला. स्ट्रेसनी होतं कधी कधी असं थोडी विश्रांती घेऊ द्या त्याला." कांचन सुटकेला धावून आली.

डोळे उघडून किलकिल्या डोळ्यांनी मी आजूबाजूला पाहिलं. ही गर्दी लोकांची! माझ्या डोकं गरगरन्याची कारणमीमांसा  आणि उपायांना ऊत आला होता नुसता. कुणी दिसतंच नव्हतं. आजूबाजूचं सगळं गोल गोल फिरत होतं. एकमेकांत मिसळून गेलं होतं. हातानीच खुण केली सगळ्यांना गप्प रहायची आणि परत डोळे मिटून शांत पडून राहिलो.

बघता बघता संध्याकाळ झाली. लग्न गावी निघायची वेळ झाली. उद्या दुपारचा मुहूर्त होता. निघणे गरजेचे होते.  कसाबसा उठलो, सतीश मामाच्या आधाराने बाथरूम मध्ये जाऊन तोंडावर पाण्याचा हात फिरवला. आणि कार मध्ये जावून बसलो. काहीच भान नव्हतं आजूबाजूचं. अस्मिता काळजीने परेशान झाली होती. तिच्याकडे पाहून कसेबसे हसून खोटा धीर देत होतो. ड्रायवर ने उदबत्ती वगैरे लावून गाडी स्टार्ट केली. आपली फेवरेट गाण्यांची सीडी ऐटीत लावून , गाडीला वेग दिला.

"ये दुनिया , ये मेहफील , मेरे काम कि नही !" रफी विव्हळायला लागला.
"बंद कर रे ते गाणे. काय सिच्युएशन आणि काय गाणी लावलियस ?" मामा ड्रायवर वर खेकसले.  हिरमुसून बिचाऱ्यानी गाणी बंद केली. मामावरचा राग एक्सलरेटर वर काढून भन्नाट वेगात गाडी पळवायला लागला.
   
दोन तीन तासांनी लग्नगावी पोचलो. गाडीच्या खिडकीतून बाहेर बघितलं.  सासूबाई हातात आरतीचे ताट वगैरे घेऊन उभ्या. सगळं लग्नघर स्वागतासाठी घराबाहेर जमलेलं. त्याचक्षणी मायग्रेनला भन्नाट ऊत आला. डोकं गरगरणे एकदम तीव्र झाले. कसाबसा मामाच्या खांद्यावर हात ठेवून मी बाहेर पडलो. 

अनपेक्षित होतं हो सगळ्यांना असं काही. नटून थटून थांबलेल्या लग्नघरातल्या मुली, स्वतःला ,हम आपके है कौन मधला सलमान समजणारी पोरं, अशाच काहीतरी सनसनीखेज गोष्टीची वाट पाहणारे शेजारी पाजारी, नातेवाईक सगळेजण आश्चर्यचकित होवून माझ्याकडे पाहत होते.

"जावई बापूंनी येताना रस्त्यातच घेतली काय थोडीशी ?" कुणीतरी कुजबुजले.
"अग्गं बाई, काय तब्येतीचा प्रॉब्लेम वगैरे आहे काय, लग्नाच्या आधी लपवून ठेवले होते वाटते."
"तरीच, हुंडा वगैरे नाही घेतला वाटतं"
"ही आय टी मधली जनरेशन असलीच बघा. मरमर कामं करायची आणि दारू ढोसायची. लग्नाच्या दिवशी तर कंट्रोल करावा कि नाही ?"
लोकांची कुजबुज सुरु झाली होती. मला मजा वाटत होती ऐकून. जाउन सरळ बेडवर लवंडलो. लागलीच डॉक्टर वगैरे आले, चेकअप वगैरे करून गेले. सगळ्यांची रीघ लागली माझी विचारपूस करायला. सासऱ्यांनी सगळ्यांना थोडे जोरातच बजावून सांगितले. "विश्रांती घेऊ द्या प्लीज त्यांना."

तेवढ्यात एका मित्राचा फोन आला.
"काय रे काय झालं ?"
"अरे काही नाही थोडीशी चक्कर येतेय आणि डोकं पण दुखतेय"
"च्यायला काय झाले? काय थोडीशी घेतली कि काय तू आज ?"
"वेडा आहेस का ? लग्नाच्या आधी महिनाभरापासून सोडून दिलीय मी."
"हम्म , आय नो वोट्स रॉंग, अरे काट्यानी काटा काढायचा.  एक काम कर तू २ पेग मार, चक्कर बंद होऊन जाइल."
काही न बोलता मी फोन ठेवून टाकला. मनाशी विचार केला की लग्न पोस्टपोन होणार आपले. अस्मिताची आणि तिच्या पालकांची जास्त काळजी वाटू लागली, कि एवढी तयारी केलेली, वाया जाणार सगळी. पर्याय नव्हता ना पण काहीच. विचार करता करता झोप लागली. गरगरणे अजूनही थांबले नव्हते.

सुदैवाने सकाळी जाग आली आणि मायग्रेन बराच कमी झाला होता. अस्मिता गरमा गरम कॉफी घेऊन आली. पिउन ताजेतवाने वाटले. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे टेन्शन पण थोडे दूर झाले. आणि फायनली मी बोहल्यावर चढलो. 

रामदास स्वामी बोहल्यावर चढले आणि "सावधान" म्हणताच त्यांना ईशारा मिळाला असं म्हणतात. त्यांनी त्याच क्षणी तिथनं धूम ठोकली होती. देव सगळ्यांना तसाच वेगवेगळ्या प्रकारे इशारा तर देत नसेल?

ओके, ओके अस्मिता ! जोक होता हा ! आई गं , …. लाटणं लाकडी असलं तरी लागतं जोरात अगं !

Wednesday, October 22, 2014

परवाना !

लाईट जाणं वगैरे प्रकार परदेशात राहून विसरायला झाले होते. भारतात आलो आणि थोड्या वेळातच विजेने सायोनारा केले आणि धूम ठोकली. दिवेलागणीची वेळ, आणि वर बेभरवशाचा कारभार आपल्याकडे सगळा, वीज कधी परत येणार माहित नाही. इनवर्टर पण एन वेळी खराब झालेला. सणासुदीच्या दिवसांमध्ये त्याची डागडुजी करायला पण कुणी येत नव्हतं. बाहेर रिमझिम सुरु झाली होती नुकतीच पावसाची. जीव वैतागून गेला , पण करणार काय ? पर्याय नव्हता. वीज परत येण्याची वाट बघायचं  नुसतं!

काडेपेटी शोधून मेणबत्ती पेटविली. त्या प्रकाशात घर कसं अगदीच वेगळं भासायला लागलं. निरनिराळ्या वस्तूंच्या लंबुळक्या सावल्या भिंतीवर कशा दिमाखानं डौलू लागल्या. ज्योतीच्या फरफरण्याने हातात हात गुंफून नाचायला लागल्या . सावल्यांचे ते खेळ पाहण्यात रंगून गेलो असताच, अचानक त्याचं आगमन झालं. पावसात ज्योतीच्या प्रकाशाने आकर्षित होऊन एक पतंग (फ़ुलपाखरू) आलं होतं. कुठून कसा सुगावा लागला कोण जाणे त्याला? पण आला! एखाद्या बेभान , वेड्या प्रेमवीराप्रमाणे सुसाट आला आणि मेणबत्तीच्या ज्योतीकडे झेपावला. तिच्या अगदी जवळ जाउन एक शानदार घिरकी घेतली , आणि जसे काही तिच्या मनाचे रंजन करतोय त्याप्रमाणे वेडीवाकडी वळणे घेत तिच्याभोवती फिरू लागला.

"जपून रे जरा! फार जवळ नकोस जाऊ तिच्या. " मी काळजीने म्हणालो. जसं काही त्याला समजणारच होतं.

"तुला काय कळणार रे यातली नशा? तुला नाही समजणार." म्हणून आपल्या घिरट्या तशाच सुरु ठेवल्या त्याने. काय आश्चर्य !!! पतंग चक्क बोलायला लागला होता. बरं झालं , कुणीतरी बोलायला भेटलं. एकाकीपणानं मी ही वैतागून गेलो होतो. पुढे बोलायला लागला तो.

"दोन तीन महिने झाले असतील , पहिल्यांदा भेटलो हिला तेंव्हापासून. सगळं कसं कालच घडल्यासारखं वाटतंय बघ. पाहता क्षणी प्रेमात पडलो हिच्या. तिचं ते तेजाळलेलं रूप , वेडं  करून टाकलं त्याने मला. वाऱ्याच्या झुळकीसरशी तिचं ते ग्रेसफूल लवलवणे, हळूच मान खाली घालून , अचानक माझ्या डोळ्यात डोळे घालून आवाहनात्मक पाहणं, सगळं कसं स्वप्नवत वाटतं. असं वाटतं कि आयुष्यभर असंच हिच्यासोबत राहावं, हिच्याभोवती फिरत , हिचं मन रिझवीतच माझं जीवन व्यतीत व्हावं. "

"एवढं प्रेम करतोस तिच्यावर ?" मी विचारलं.

"हो ना , आणि ही वीज सुद्धा माझ्याच बाजूने आहे. सगळं समजत असल्यासारखी रोज बरोबर याच वेळी दबक्या पावलांनी निघून जाते. जाताना हळूच डोळे मिचकावते माझ्याकडे पाहून. म्हणते , भेटून घे मनाजोगतं. थोडा एकांत मिळूदे तुम्हा दोघांना. पण लवकर आटपा. येते परत  अर्ध्या तासात. या अर्ध्या तासात दिवसभराचं सगळं जगून घेतो मी. एक एक क्षण मनापासून उपभोगतो अगदी,"

"अरे, ते सगळं ठीक आहे, पण तिचं काय ? तिलाही तेवढाच आवडतोस का तू ?"

"कदाचित ……असावं तसंच " हे  म्हणताना त्याच्या आवाजातला कंप जाणवला मला. एक प्रकारचा गोंधळलेपणा होता  त्याच्या बोलण्यात.

"काय रे काय झालं ?" . मी विचारलं.

"पहिल्यांदा भेटलो तिला , तेंव्हा खरंच प्रेमात पडलो होतो रे आम्ही एकमेकांच्या. करमायचं नाही एक दुसरयाशिवाय एक क्षण ही. असंच रोज दिवेलागणीच्या वेळी भेटतो आम्ही. खूप गप्पा मारायचो. बिचारी फार एकटी असते रे. म्हणून बाहेरच्या जगाचं सौंदर्य सांगून तिच्या चेहऱ्यावर हसू आणायचा प्रयत्न करायचो . पहिल्या पावसाचा तो शरीरासोबत मन ही चिंब करणारा अनुभव ,मोगरा आणि जाईचा तो मंद वेडावणारा सुगंध, उगवत्या सूर्याची ती लाली , पौर्णिमेच्या चंद्राचा तो शीतल गारवा, आकाशाचे ते  जादुई निळे निळे रंग , वनराईचा तो हिरवागार गालीचा, पहाटेच्या वाऱ्याचा तो सुखावणारा सहवास. सगळं कसं भरभरून सांगायचो तिला. तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहून जीवन सार्थकी लागल्यासारखे वाटायचे मला. फडफडून तीही आनंदानं शहारून जायची. रोज माझी चातकासारखी वाट बघायची. म्हणायची मलाही घेऊन चल रे तुझ्यासोबत.  फारशी बोलायची नाही , पण कधी कधी प्रकाशाच्या गमती जमती सांगायची.  त्या मेणाची तक्रार करायची , फार चिकट आहे म्हणे तो. वीजेवरही नाराज असायची कधी कधी. म्हणायची , परत यायची फार घाई असते तिला ! अस्तित्वच संपायचं ना  रे तिचं त्या दिवसापुरतं , एकदा वीज परत आल्यावर. "

"अरे , पण त्या मेणाला काढलं तर अस्तित्वच काय उरतं तिचं? त्याचं समर्पण बघ ना! रोज झुरतो , वितळतो तिच्यासाठी. तिला तेवत ठेवण्यासाठी , रोज थोडं थोडं वितळून मरतोच ना तो ?" मी म्हटलं 
.
"नाही रे मन रमत तिचं त्याच्या सोबत. दोघांच्या संमतीने नाही  काही  ते नातं  जुडलेले. दुसरा काही पर्याय नव्हता म्हणून  जवळीक झालेली त्यांच्यात . दुसऱ्या कुणीतरी विणले म्हणून काही नात्यांच्या रेशीमगाठी घट्ट नसतात होत. नुसताच एक अलिखित करार बनतो ते नातं. एक पर्यायहीन , शुष्क , लादलेलं नातं . मी नव्हतो तेंव्हा त्या मेणानं जीवन व्यापलं होतं तिचं.  कंटाळवाणी , चिकट , रंगहीन सोबत त्याची आयुष्यभराची. त्यात कसलं आलंय समर्पण, डोंबल ! एकच आयुष्य मिळतं , कसं भन्नाट , बेभान जगलं पाहिजे. बाहेरचं रसरसलेलं, खळखळून वाहणारं जीवन , त्याचा परिचय मीच करून दिला तिला.  एकदा बोलून गेली ती, कि खऱ्या अर्थानं  जीवन काय असते ते कळाले माझ्यासोबत राहून. आणि मेणाचं काय रॆ , वितळल्या सारखं दाखवतो नुसता . वितळून परत पूर्व रुपाला येतो , ती ज्योत नाहीशी झाली की. त्याचं अस्तित्व कधीच मिटत नाही . हि ज्योत संपली , तर कदाचित काही दिवसांनी दुसऱ्या ज्योतीसोबत दिसेल तो. "

मंद हसून मान डोलावली मी .
"पण  काहीतरी बिनसलंय तुझं हे नक्की! आवाज थरथरतोय बोलताना तुझा. ती ज्योतही फारशी डोलत नाहीये तू आल्यापासून. " मी विचारलं.

"बरोबर ओळखलंस तू . गेल्या काही दिवसांपासून पूर्वीसारखं बोलत  नाही ती माझ्याशी. असं जाणवतंय की , ह्या नात्यामध्ये मी एकटाच आहे. आहे.ती कुठे नाहीचये त्यात. मी एकटाच धडपडतोय हे एकतर्फी नातं जपण्यासाठी . हे असं तोडण्यासाठीच का जोडतो आपण ? फारसं लक्ष नाही देत ती . मला जाणवेल असं दुर्लक्ष करते. मी  बोललो तरच बोलते. ते हि कामापुरतं . तिला नाही कळत  का , तिचं हे वागणं  कसं काळीज चिरतं माझं . कदाचित तिला जाणवले असेल कि माझे जीवन अगदी वेगळे आहे, ती कधीच माझ्यासोबत मुक्त बागडू नाही शकणार. मुद्दामहून करीत असेल बहुतेक . कसल्यातरी निर्विकार , निर्जीव, निरसपणे कशीबशी तेवत असते."

"दुसरा  एखादा पतंग तर नाहीये न आवडला तिला?" माझ्या मनातली शंका बोलावून दाखविली मी .

"माहिती नाही , तशी शक्यता फार  मला तसं काही असण्याची. पण हे मात्र अगदी खरा आहे कि माझ्या प्रेमातला तो आवेग , ती काळजी , ओलावा तिच्यात कुठे दिसताच नाहीये . आतून जळतोय रे मी !  माझ्या ह्या सुंदर पंखाचं ओझे वाटायला लागलेय मला. जीव गुंतलाय तिच्यात माझा. कधी वाटतं , ह्या  मेणा साठीच असं वागतेय माझ्याशी ती असं . एवढी वर्ष सोबत घालवलेली त्याच्यासोबत, तिला पण सोडवत नसेल. बोचत असेल कुठेतरी !कळत नाही कुणाचं आणि काय चुकतंय ." हताश स्वरात तो बोलत होता .

"मग आता ? काय करायचं ठरवलंय ? एवढे सुंदर पतंग असतात रे, एका  पेक्षा  एक. निवड त्यातलीच एक. विसर हे सगळं . नव्याने आयुष्य सुरु कर. हे आगीशी  खेळणं  सोडून  दे. " असाच एक अनाहूत  सल्ला दिला मी .
माझ्याकडे पाहून वेड्यात काढल्यासारखं हसला नुसतंच तो . निशब्दपणे आपले पंख पसरून मेणबत्तीच्या त्या ज्योतीकडे झेपावला तो. अगदी जवळ पोचला तिच्या . त्याच्या त्या लगटीमुळे, अचानक अंधाराने झाकोळून गेलं घर  सगळं , अगदी क्षणभरासाठी ! पुढच्याच क्षणी तिच्या पायाशी राख होऊन पडलेला होता तो! समर्पणाचा अर्थ उमगला मला त्या क्षणी .
मेणबत्ती त्याच निर्विकारपणे तेवत होती. मेणाचा एक ओघळ वितळून कसनुसा होत खाली सरकला. खिडकीतून बाहेर पाहिलं मी, मगाशीचा पाउस आता धाय मोकलून  बरसत होता ….

Tuesday, October 14, 2014

गीत प्रेमायण… प्रेमात पडल्यावर ( पार्ट २ )

प्रेमात पडल्यावर तशी फारशी स्पेशल गाणी नाहीयेत. प्रेमात पडलेला माणूस बहकलेला असतो. काहीही गायलं तर त्याला छान वाटतं. तो काळंच तसा असतो. सातव्या आस्मानावर असतो माणूस. घरासमोरची ती बाभळ ही गुलमोहरासारखी वगैरे भासायला लागते.  आपली प्रेयसी, दीपिका (चीखलीया नव्हे , पदुकोन ) पेक्षा सुंदर, आणि आपला हिरो ह्रिथिक पेक्षा वरचढ भासायला लागतो.  प्रेम म्हणजे एक नशा आहे. मदिरा फिकी पडते त्यासमोर. एकेमेकांसाठी काय करू आणि काय नाही असं  झालेलं असतं. पुढच्याशिवाय जगण्याचा विचार हि करवत नाही. रस्त्यावरून जाणारी एकदम सुंदर पोरगीही तुमचं चित्त विचलीत करू शकत नाही. प्रेमात सर्वस्व वाहून टाकलेले असतं तुम्ही.

१) पेहेला नशा… 


प्रेमात पडलेला प्रत्येकजण या गाण्याच्या पण प्रेमात पडला नसेल, तर नवलंच! नवीन नवीन प्रेम. पाय जमिनीवर टिकत नाहीत. दिवसा जागेपणी सुद्धा तिची स्वप्नं पडत असतात. प्रत्येक भेट अपुरी वाटायला लागते. कितीतरी बोलावसं वाटतं. चुकून स्पर्श जरी झाला तर अंगात विजेचा करन्ट दौडतो. पुढच्या जीवनाची स्वप्नं रचली जातात.  रोज आठवणीने एखाद फुल, चोकलेट , ग्रीटिंग कार्ड यात पैसे उडवले जाऊ लागतात. पुढच्याच्या आवडी निवडी जाणून घेऊन, कटाक्षाने पाळल्या जातात. कधीपासून मनात आकर्षण निर्माण झालं, आवडायला लागलं वगैरे गोष्टींच्या कबुली दिल्या जाऊ लागतात. व्यसनं वगैरे (तात्पुरती का होईना!) सोडली जातात.  रात्री झोप लागत नाही. फोनचं बिल भस्मासुरासारखं वाढायला लागतं. प्रेमाचा थाटच निराळा असतो ह्या काळात.

२) दिल मे कुछ हो रहा है



फ्रिकी चक्र नावाचा एक चित्रपट. बहूतेक २००१-२००२ च्या काळात कधीतरी आला होता. मल्टीप्लेक्स त्या काळी हळूहळू मशरूम उगवावेत तसे उभारले जात होते पुण्यात. मल्टीप्लेक्स मध्ये पाहिलेला पहिला पिक्चर असावा माझा हा. पस्तीस रुपयाचे पॉप कॉर्न विकत घेऊन पाहिलेला! तसा पिक्चर ओकेच होता. एक हे गाणे सोडले तर लक्षात ठेवण्यासारखे काहीच नव्हते त्यात. अत्यंत एकलकोंडी दीप्ती नवल एकटे राहून राहून विक्षिप्त झालेली असते. सगळ्या जगाला दुष्मन समजत जगत असते. आणि एके दिवशी एक मुलगा तिच्या जीवनात येतो. प्रेम माणसाला कसं बदलून टाकतं ते या गाण्यात दाखवले आहे. बाकी, दीप्ती नवल तरुणपणी जेवढी होती तेवढीच रसहीन आणि अनाकर्षक दिसते अजून पण!
पण ,माझं अत्यंत आवडते गाणे आहे हे. बहुतेक सगळ्यापेक्षा जास्त …आणि तसंच राहील पण….

३) आंखो की गुस्ताखीयां माफ हो 

जसे जसे दिवस पुढे सरकतात , तसा तसा थोडा अवघडलेपणा कमी होतो. जाणीवपूर्वक एकमेंकांचे स्पर्श होऊ लागतात. लपून छपून ,लडिवाळ खेळ सुरु होतात. दोघांना वाटत असतं कि आजूबाजूच्या जगाला काही माहितीच नाहीये. पण तसं नसतं. सगळ्यांना कळत असतं काहीतरी चाललंय ते ! असो,  लव्हबर्डस ना त्याची काय फ़िकर. चोरून भेटणे, हळूच हात पकडणे. टेबलाच्या खाली पायांचे खेळ ( निशब्द मध्ये अमिताभ चा एक सीन होता, मजेशीर होता एकदम).
हम दिल दे चुके सनम "वो सात दिन" ची कॉपी आहे, हे मला बऱ्याच दिवसांनी , किंबहुंना अलीकडे २-३ वर्षांपूर्वी माहित झाले.  चांगला सिनेमा होता. ऐश्वर्या तशी मला आवडत नाही, पण या गाण्यात अगदी सुंदर दिसलीय.  सलमान नेहमीप्रमाणे बावळट ध्यान आहे.  पण गाण्यात सूट होतो. इस्माईल दरबारनी (द वन फिल्म वंडर) अगदी अप्रतिम संगीत दिलंय. बहुतेक जेवढं येत होते तेवढे सगळं या पिक्चरलाच देऊन टाकलं वाटतं. नंतर गायबच झाला तो. बऱ्याच दिवसांनी बिग बॉस मध्ये वगैरे दिसलेला.
संजय लीला भन्साळी ने चित्रीकरण पण लाजवाब केलंय गाण्याचं. लग्नाच्या ठिकाणी असे प्रकार बरेच बघायला मिळतात.  ऐश्वर्या डोळ्यांची उघडझाप करून खुणेने सलमानला बोलावते तो क्षण … जेवढ्या वेळी मी तो सीन बघतो , तेवढ्या वेळी माझं ह्र्दय दोन क्षणांसाठी गप्पकन बंद पडतं.  अजूनही.   

४) और हो … 

रॉकस्टार हे रेहमानचं आत्तापर्यंतच सर्वोत्कृष्ट काम आहे असं मला वाटतं. मोहित चौहान चा मंत्रमुग्ध करून टाकणारा आवाज. आणि वर रणबीर कपूरचा जीव तोडून केलेला अभिनय. प्रेमातली उत्कटता, बेभानपणा, असहायता सगळं काही हे गाणं सांगून जातं. एक ओळ आहे या गाण्यात  " तुझी पेहेली बार मै मिलता हुं , हर दफ़ा!" काय अर्थपूर्ण गाणं आहे! तो ब्रिज वरचा सीन जेव्हा ती पळत सुटते , आणि मागे फिरून परत रणबीर च्या कवेत येते. प्रेमातली विवशता , असहायता खरंच एवढ्या परिणामकारक रीतीने दाखविलेली मी तरी पहिली नाही.  खूप खूप लिहायचं आहे या गाण्याबद्दल , पण शब्दच नाहीयेत माझ्याकडे.  कधी सापडलेच, तर एक स्वतंत्र पोस्ट लिहीन.…
मला मनापासून आवडलेला चित्रपट… इम्तियाझ अलीज् बेस्ट वर्क!

५) रौन्धे है मुझको तेरा प्यार

प्यार तुने क्या किया नावाचा एक रटाळ पिक्चर! अंजाम , डर वगैरे सारखे रोल करत होता शाहरुख, तेव्हा कुणाला तरी वाटले कि एक फिमेल वर्जन काढूया तशीच स्टोरी ठेवून.  उर्मिला मार्तोंडकरला अशा सायकौटिक भूमिका खूप चांगल्या वटवता येतात. उदाहरणार्थ कौन, भूत वगैरे सिनेमे. फरदीन खान, त्याच्याबद्दल तर न बोललेच बरे.
असो , तर हे बरंच अनयुज्वल गाणं आहे या यादीमधलं , हो ना ?  थोडी डार्क साईड आहे या गाण्याला. आणि अलिशा चिनॉय शिवाय दुसऱ्या कुणाचाच आवाज मी इमैजीन नाही करू शकत या गाण्यासाठी.
प्रेम जसं गोड गोड वाटू देतं , तसंच तळमळवतंही. अस्वस्थ करून टाकतं.  तो किंवा ती आपल्यासोबत नसेल , तर सगळं कसं अर्थहीन होऊन जातं. मंद वाऱ्याची झुळूक पण त्रासवून सोडते. क्षणाचाही विरह सहन होत नाही. अतिशय सुंदर गाणं. अर्थपूर्ण लिरिक्स, शोभणारं संगीत.  दुर्दैवाने डब्बा सिनेमा असल्यामुळे , गाणं पण डब्ब्यात गेलं.

असो, जसं मी सुरुवातीला म्हणालो, की फारशी गाणी नसणार या यादीमध्ये , कारण प्रेमात असताना कुठलंही गाणं छानच वाटतं.  त्यामुळे लवकर आटपत घेतोय.  (डोकेदुखीमुळे पण फारसं लिहायची इच्छा होत नाहीये).  पुढच्या पार्ट मध्ये … प्रेमानंतर… त्यात मात्र बरीच गाणी आहेत लिहिण्यासारखी. शोर्ट लिस्ट करायला वेळ लागेल थोडा …
तोपर्यंत… अलविदा !        

Sunday, October 12, 2014

गीत प्रेमायण… प्रेमात पडताना ( पार्ट १)

प्रेम म्हणजे प्रेम असतं .
तुमचं , आमचं सेम असतं …

प्रेम आणि गाणी, यांचा तसा बघायला गेलं तर खूप जवळचा संबंध. प्रेमात पडलेला माणूस काही विशेष गाणी खूप ऐकतो. वर अजून, आपल्या हिंदी पिक्चरचा परिणाम.  एकापेक्षा एक गाणी आहेत प्रेमाबद्दल . प्रत्येक प्रसंगासाठी एखादं गाणं हमखास सापडेलंच. अशीच काही गाणी नेहमीसाठी लक्षात राहतात.  असं, बऱ्याच दिवसांनी कधी एखादं गाणं ऐकण्यात येतं आणि मग रेशमाच्या लडी उलगडत जाव्यात तसा एखादा कालखंड किंवा प्रसंग डोळ्यासमोर परत उलगडत जातो. असं एखादं गाणं , वाऱ्याच्या हळुवार झुळूकीसारख्या मनावर कशा अलगद फुंकर मारून जातं. माझ्या आवडीची अशीच काही गाणी आणि त्या गाण्याबद्दलचं  माझं मत किंवा एखादी आठवण कुठेतरी नोंदून ठेवावी अशी बऱ्याच दिवसांपासूनची इच्छा आज पूर्ण करतोय.

माझ्या मते प्रेमाचा काळ ढोबळ मानाने तीन भागात विभागता येइल. प्रेमात पडताना, प्रेमात पडल्यावर आणि प्रेमानंतर ( म्हणजे एक तर लग्न किंवा दुसरं/पुढचं प्रेम !). हि गाणी एकदम जनरल आहेत. म्हणजे बरेच मित्र , मैत्रिणी, जवळची लोक , यांना वरच्या तिन्ही फेज मधून जाताना मी पाहिलेलं आहे.  ज्या प्रकारचं संगीत ऐकण्यात येत असायचं ते किंबहुंना सारखंच असायचं. कोण जाणे , इथलं एखादं गाणं तुमच्याही आठवणीतली एखादी नाजूक तार छेडेल.

१) ना जाने मेरे दिल को क्या हो गया … 

डीडीएलजे  मधलं हे गाणं ! पडद्यावर कुणी प्रेम करावं तर ते शाहरुख खाननंच. तसा मी अमिताभचा भक्त आहे, पण रोमांटिक सीन्स मध्ये शाहरुख खरंच अनभिषिक्त बादशाह आहे. त्यातल्या त्यात हा पिक्चर आणि हे गाणं तर एकदम भन्नाट! पृथ्वीच्या पाठीवरची बहुतेक प्रत्येक प्रेम कहाणी कदाचित अशीच सुरु होत असेल. तो आणि ती. बऱ्याचदा, भिन्न स्वभाव.  आणि काही कारणांनी एकमेकांसोबत बराच वेळ व्यतीत होतो. एकमेंकाशी बोलायला , सोबत वेळ घालवायला मन आतुर होतं. थोडावेळ ही तो किंवा ती नजरेआड झाली तर मनाला हुरुहूर लागून राहते. आरशात उगीच स्वतःला न्याहाळून बघण्यात तास न तास जातात. मनाला कळत नाही कि काय होतंय. मुखवट्या आडचे स्वभावाचे पैलू कळायला लागतात. आजुबाजूचं सगळं विसरायला होवू लागतं. हळूच नजरेच्या कटाक्षांची देवाण घेवाण सुरु होते. मनाला गुदुगुल्या होवू लागतात. सगळं जग कसं प्रसन्न वाटायला लागतं. आणि शेवटी तो दिवस उजाडतो वेगळं होण्याचा. पोटात गोळा येतो. मन भक्क उदास होऊन जातं. वाटतं कि वेळेनी इथेच थांबून जावं. पण आपण हतबल असतो.
आणि नंतर अगदी ह्या गाण्यासारखं सगळं होऊन जातं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतं. उदित नारायण आणि लताने अगदी जीव टाकून गायलंय हे गाणं. गाण्याचे बोल, संगीत , गाण्याचं चित्रीकरण, शाहरुख , काजोल सगळं कसं अगदी छान जमून आलंय. काहीच त्रुटी नाहीयेत ह्या सगळ्यात.

२) यु सैंग टू मी … 


मार्क एन्थनी, एक असाच साधारण गायक. काही फारसा यशस्वी वगैरे नाही झाला तो. पण एक गाणं आहे त्याचं. प्रेमात पडणं म्हणजे काय ते अगदी सुंदरपणे उलगडून दाखवतो. बराचसा वेळ सोबत घालवलेला, पण पुढच्याला अगदी "फॉर ग्रांटएड" घेतलेलं. आणि एका दिवशी अचानक साक्षात्कार होतो की अरे आपण तर प्रेमात पडलोय. कळालं कसं नाही आपल्याला? त्याची किंवा तिची किंमत ती नसताना कळते. जाणीव होते की तिच्याशिवाय बाकी कशातच अर्थ नाहीये. सगळं कसं अर्थहीन वाटायला लागतं . मन बंड करून उठतं. आणि निर्धार पक्का होऊन जातो की मनातलं प्रेम बोलून दाखवायचंच.  सुंदर गाणं आहे अगदी.

३) व्हेन यु आर गॉन … 


ब्रायन एडम्स राजा माणूस आहे. देवाने संगीताची देणगी भरभरून वाहिलीय पदरात. बरीच चांगली चांगली गाणी गायली आहेत त्याने. एकापेक्षा एक. पण हे गाणं मला अगदी वेगळं वाटत. जाम आवडतं. स्वतःच्या मनाला फसवत असतो आपण कि प्रेम वगैरे सगळं झूट आहे. पण दुसरीकडे मन अस्वस्थ होऊन गेलेलं. रेडीओ वर एखादं गाणं लागतं , तिची आठवण ताजी करून टाकतं. वैतागून आपण रेडीओ बंद करतो. तिच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट राहून न राहवून मनाला छेडायला लागते. आपण त्या विचारांपासून जेवढं दूर पळू तेवढ्याच तीव्रतेने बूमरयांग सारखे परत येउन आदळायला लागतात. मन हतबल होऊन जातं. वेड्यासारखं आपण त्याच नेहमीच्या रस्त्यांवर ती भेटेल या आशेनी उगीच चकरा मारायला लागतो. सगळ्या जवळच्या लोकांमध्ये असूनपण एकटेपण कुरतडायला लागतं. शेवटी मन हार मानतं. आणि परिस्थितीला सामोरं जातं. ती /तो परत येण्याची वाट बघत बसतं. प्रेमाने जग व्यापून टाकलेलं असतं. मनानी स्वतःला पुढच्याच्या स्वाधीन करून टाकलेलं असतं. सगळं नियंत्रण सुटलेलं असतं. प्रेमाची गाडी भन्नाट वेगाने दौडू लागलेली असते.

४) ये दिल … दिवाना … 

सोनू निगमचं एक मास्टरपीस! बेताल झालेलं ह्र्दय. चुकतंय चुकतंय सांगून पण लहान मुलाप्रमाणे तिकडेच दुडूदुडू धावणारे मन. हजार वेळा समजावून पण न ऐकणारं हट्टी मन. स्वतःच्या पोराच्या सगळ्या चुका शेवटी पोटात घालतो त्याप्रमाणे अशा न ऐकणाऱ्या , हट्टी , जिद्दी मनाचं वर अजून कौतुक किती ते ! वर म्हणे काय करू , काही पाप थोडीच केलंय ह्या मनाने ! सांगतोय एवढं जीव तोडून , आता ऐकतच नाही तर काय करू? टेरिफिक आणि अगदी ठेका धरायला लावतं हे गाणं. माझा एक मित्र , क्यासेटच्या जमान्यात , दोन्ही साईड ला हेच गाणं रेकॉर्ड करून आला होता. आणि ती क्यासेट अविरत वाजत असायची टेपरेकोर्ड वर . सगळ्यांना अगदी तोंडपाठ झालेलं हे गाणं.

५) अब मुझे रात दिन … 

प्रेमात पडलेल्यांची कहाणी आहे हे गाणं. सोनू निगम चा मधाळ आवाज.  ह्रदयाच्या आतून गायलंय गाणं हे पठ्ठ्यानी. कुणीतरी माझ्या माहितीतलं. प्रेमात पडलं होतं आणि हेच गाणं परत परत ऐकायचं. पुढच्याला मनातलं सांगता तर येत नव्हतं. खोदून खोदून विचारल्यावर बऱ्याच दिवसांनी सांगितलं आम्हाला काय झालंय ते. पुढच्याला बघितल्या / भेटल्या खेरीज मनाला चैन पडत नाही. ह्रदयावर कसलंच नियंत्रण राहत नाही. प्रियकर /प्रेयसी म्हणजे सर्वस्व होऊन जातं. सगळ्या कक्षा, बांध पार पाडून वेडेपण शिगेला पोचतं. मनाच्या वीणेच्या तारा मधुर ध्वनी करायला लागतात.  प्रेमात वाहवून गेलेला असतो माणूस! सोनू निगम , टेक ए बो !

६) प्यार तो होना ही था … 


प्यार तो होना हि था. एक तद्दन भिकार चित्रपट. वर्षानुवर्षे अंघोळ न केल्यासारखा दिसणारा अजय देवगण आणि झोपाळलेली  काजोल. ए फ्रेंच किस ची भिकारडी कॉपी.  पण हे गाणं लाजवाब.  हो हो , माहितीय मला गाण्याची सुरुवातीची ट्यून ब्रायन एडम्सच्या "हैव यु रिअली लव्हड अ वुमन" वरून उचललेली आहे. पण त्याच्यामुळे गाण्याचं महत्व कमी होत नाही. गाणं ऐकून कुणी प्रेमात नाही पडलं तर नवलंच. अतिशय इंटेन्स कि काय म्हणतात तसं आहे हे गाणं.  नीट लक्ष देऊन ऐकाल तर गाण्यात जे सिम्पट्म्स आहेत ते कधीतरी तुम्हाला पण झाले असतील.  कुणीतरी मला म्हणालं होतं कि प्रेमात पडल्यावर पुढच्याची अगदी चुकीची गोष्टसुद्धा एकदम छान वाटायला लागते. काहीही केलं त्याने /तिने , अगदी कसं गोड वाटायला लागतं. कदाचित म्हणूनच प्रेम आंधळं असतं असे म्हणत असावेत.पुढच्याचे  सगळे प्रॉब्लेम्स आपले स्वतःचे वाटायला लागतात. स्वतःची प्रत्येक गोष्ट बैकफुट वर जाते, आणि पुढ्च्याचे साधे साधे प्रॉब्लेम्स कसे सोडवावेत ह्याचा विचार करण्यात सगळी एनर्जी खर्ची पडते.  पुढच्याच्या चेहऱ्यावर एक साधे हसू बघून जग जिंकल्याची , आत्यंतिक समाधानाची फिलिंग येते.  प्रेम एकदा तरी करावं बघून!

७) क्या करे क्या ना करे … 


प्रेमात पडलेल्या सगळ्यांची म्हणजे अगदी शंभर टक्के लोकांची हि स्थिती कधी न कधी तरी झाली असेल. आता किती जणांचं मनातच राहिलं आणि किती जणानी बोलून दाखवलं तो हिशेब वेगळा. सगळं ठीक आहे हो प्रेम झालं वगैरे , पण सांगायचं कसं ? सगळ्यात अवघड पार्ट कुठला असेल तर हाच. रेहमाननी सोनं केलंय ह्या गाण्याचं. प्रेमवीराच्या मनातली उलथापालथ ह्या गाण्यापेक्षा जास्त परिणामकारक रीतीने व्यक्त नसेल करता येणार. रोज मन ठरवत असतं आज बास झालं काही झालं तरी सांगून टाकायचं , आणि तो/ती समोर आला की शब्दच फुटेनासे होतात. गिळलेल्या आवंढयासोबत शब्दही गिळले जातात. तोंडाला कोरड पडते. हातपाय थरथरायला लागतात. आणि प्रेम व्यक्त करायचं उद्यावर पोस्टपोन होवून जातं. दिवसांमागून दिवस जातात आणि मन पिळवटून निघायला लागतं. सैर भैर होऊन जातो जीव.  राम गोपाल वर्मा , जागे व्हा! प्लीज असे काहीतरी सिनेमे बनव. काय करून घेतलयंस स्वतचं ?

असो , असा प्रवास पूर्ण होत , कधीतरी प्रेम व्यक्त केलं जातं. पुढ्च्यानी स्वीकार केला तर फेज टू मध्ये जातं. नाहीतर मनातंच राहून जातं. नकार दिला तर कुणी देवदास बनतं. तर कुणी रिपीट अटेम्पट करत फेज १चाच परत !

गाडी दुसऱ्या टप्प्यावर जेव्हा जाउन पोचते , तेव्हा वेगळीच गाणी ऐकली , गुणगुनली जातात. पुढचा पार्ट त्याच्यावरच लिहीन. तोपर्यंत … अलविदा !
एखादं तुमच्यापण ह्रदयाच्या अगदी जवळचं गाणं असेल तर कॉमेंट मध्ये टाकायला विसरू नका , नक्की!

Wednesday, October 1, 2014

बरसात कि एक रात !

फ़र्रकन्न काडी पेटवून शिंदे काकांनी मेणबत्ती पेटवली, आणि परत पानाला चुना लावायला सुरुवात केली.
"पावसानं वाट लावलीय राव, आणि वर ह्या लाईटचा लपंडाव! धंद्याची वाट लागलीय." शिंदे काका म्हणाले.

समीर, दया, संदीप आणि मकरंद हे चौघं रूममेट्स. इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकत होते. आजही रोजच्या प्रमाणं, जेवण करून टपरीवर पोचलेले. गल्लीत, स्पेशली त्या एरियामधलं, एकुलत एक पानाचं दुकान होतं शिंदे काकाचं. रोज, मेसवर जेवण झाले कि एक मस्त पान आणि सिगारेट ठरलेली पोरांची. इथेच थांबून इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या. आणि मग रूमवर परत.
"धंदा कसला बुडतोय ह्याचा, आपल्याशिवाय कुणी गिऱ्हाईक तरी येतंय का ह्याच्या टपरीवर." दया पुटपुटला. 
"ओ काका, अहो सुपारी टाका ना जरा हात मोकळे सोडून, रोज काय कंजुषी करता?" समीर म्हणाला. पानात सुपारी जास्त लागायची त्याला. 
"अरे समीर, सुपारी महाग झाल्याय खूप, नाही परवडत. "
"असली चिन्धिगिरी करतो हा ह्रिथिक, म्हणून तर टपरी चालत नाही याची." समीर वैतागून हळूच म्हणाला. 
शिंदे काकांच्या उजव्या हाताला सहा बोटं होती. म्हणून तो ह्रिथिक …. 

असो… पावसानी आता उग्र रूप धारण केले होते. पत्र्यावरच्या थेंबांच्या आवाजामुळे एकमेकांचा आवाजही ऐकू येत नव्हता.  सिगारेट पाण्यामुळे चुकून उगीच वाया गेली असती, म्हणून लगेच रूमवर जायचा प्लान ठरला. तोंडात पान टाकून चौघही रूमकडे वळले. लाईट गेली होती, चाचपडत, अंदाज घेतच रुममध्ये वावरत होते सगळे . मेणबत्ती, टोर्च, काही सापडत नव्हतं. सिगारेटी फुंकून झाल्या, तोवर दयाने बाजूच्या रूममधल्या विशाल कडून एक बारीक मेणबत्तीचा तुकडा मिळवला. त्या मिणमिणत्या प्रकाशाने, रुममध्ये जरा बरे वाटायला लागले. समीरने वौकमन मध्ये 'किशोर के दर्दभरे नग्मे'  लावले आणि त्या छोट्याश्या स्पीकरमधनं किशोर आपल्या मुलायम आवाजात गायला लागला. लाईट गेलेली, त्यामुळे अभ्यास तर अशक्यच होता, आता काय करावे हा प्रश्न सगळ्यांसमोर आ वासून पडला होता. 
"चला, पत्ते खेळू यार!"  
"कंटाळा आला रे पत्त्यांचा. आणि त्यावर तो चौकट गुलामचा पत्ता पण गायब आहे."
"आणि अंधारात हळूच दुसऱ्याची पानं पण चोरून बघता नाही येणार. ही ही!"
"चौकट गुलाम ,खालच्या मजल्यावर चौकट राणी कडे गेला असेल."
"चौकट राणी ? कोण, ती खालची ब्रम्हे काकू ?"
"हो ना . अरे तिचा चेहरा एकदम त्या चौकट राणी सारखा दिसतो. कोईरालांची मनीषाच एकदम! आणि भरीस भर म्हणून ब्रम्हे काका एकदम त्या चौकट राजा मधला दिलीप प्रभावळकर सारखा आहे. म्हणूनच म्हटलं, कि चौकट गुलाम गेला असेल तिकडे…. गुलामी करायला! "
"सभ्य व्हा पोरांनो. काकूंना ऐकू आलं खालच्या मजल्यावरून, तर अवघड आहे आपलं."
"हो ना यार, लेडी अमिताभ आहे ती. आणि उंची पण त्या लंबू अमिताभ सारखीच आहे. खाली थांबली तरी वरच्या मजल्यावरचं दिसत असेल तिला. "
"बहुतेक, आईच्या पोटात असताना सुद्धा आईच्या बरगड्यांना पकडून लोंबकळायची वाटतं. कसली ताडमाड आहे बघ ना!"

"असो … काय रे , संद्याचं पोट खराब झालाय दिसतं. सारखं पळतोय संडासाकडे. "
"पावसाळ्यात पाणी पुरी खाऊन दुसरं काय होणार. मानसं कमी आणि डुक्कर जास्त असतात त्या भेळच्या गाडीभोवती. "
"अरे अंदर कि बात ये है की, त्या सवितासाठी झुरतंय रे ते येडं , दिवसभर तिच्या झेरोक्सच्या दुकानांसमोर थांबलेलं असतंय . मेक्यनिक्स च्या सेम नोट्स च्या रोज झेरोक्स काढून घेतो तिच्याकडून. येडं झालंय पार तिच्या प्रेमात. दुकानासमोरच्या त्या भेळपुरीवाल्याकडे दिवसभर चरत असतंय."
"अरे, संद्या जेवढा चुत्या, तेवढीच ती स्मार्ट पोरगी आहे. सगळ्या पोरांना तसंच भुलवते ती. तूच विचार कर,बाजूच्या सुयोग झेरोक्स मध्ये काळं कुत्रं नसतं. आणि ह्या सविताकडे मोठ्ठी रांग. गेलं की, अशी मुरकुन हसते यार, कोऱ्या पानाची पण झेरोक्स काढून घेतील लोकं. "
तेवढ्यात संद्या परत आला. पार गलितगात्र झाला होता जाऊन जाऊन.

"एक भन्नाट आयडिया आहे माझ्याकडे! प्लांचेट करूया आपण. मागच्या वर्षी, अहमदाबादला माझ्या मामाने केले होते. माझ्या आज्जीच्या आत्म्याला बोलालावलेले. खूप धम्माल आली होती." समीर बोलला.
"काय? आपला विश्वास नाही भूताखेतावर , नुसता टाईमपास असतो!. आपल्याला नाही करायचे" मकरंद म्हणाला.
"अरे, खरंच सिरियस असतं सगळं , आज्जीने आम्ही विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची खरी खरी उत्तर सांगितली. जाताना म्हणाली आजोबांशिवाय करमत नाही. लवकर या! आजोबांनी नंतर लय शिव्या घातल्या मामाला, प्लांचेटच्या भानगडीसाठी. पण, गेले खरंच दोन महिन्यात, ते पण!"
"होय रे, मी पण ऐकलंय. पण फाटली आहे माझी. आधीच अंधार, लाईट गेलेली, मुसळधार पाऊस पडतोय. वर भूतांना बोलावयाचे म्हणजे …. जाऊदे, यार दुसरं काहीतरी प्लान करू. पोटात कळ येतेय नुसता विचार करूनसुद्धा." इति संदीप .
"चला बे, खरंच करू समऱ्या म्हणतोय तसं. माझी पण बऱ्याच दिवसांपासून इच्छा आहे प्लांचेट करायची." दयाने पण संमती दर्शविली.

हो-नाही म्हणता म्हणता सगळेजण तयार झाले. सगळी सूत्रं समीरकडे होती. अनुभव होता ना त्याच्याकडे! भराभरा एका पांढऱ्या कागदावर A टू  Z बाराखडी , चार शब्दं  मोठ्या अक्षरात -  "येस", नो","हाय","गुड बाय" आणि १ ते १० आकडे काढले.
"अरे, ते सगळं खरं , पण बोलवायचं कोणाला ?" समीर म्हणाला.
"हं , नातेवाईक वगैरे नको यार. असंच कुणीतरी सेलिब्रिटी बोलावू. "
"आयडिया चांगली आहे, संजीव कुमार, अमजद खान, नर्गिस?"
"ए बाबा, तो अमजद खान वगैरे नको. काही आत्मे म्हणे एकदा आले कि जात नाहीत परत लवकर.  काहीतरी मागतात म्हणे परत जाण्यासाठी. एक वाटी रक्त , एखादा दात वगैरे असलं काही"
"हो ना तिच्यायला, जर जाताना म्हणाला, ये हाथ मुझे दे दे दया, तर काय करायचं ?"
"हो ना चड्डी पिवळी होईल तसं काही मागितलं तर!"
"बघ ना , आणि बदलता पण नाही येणार कारण तो खवीस गब्बर हात पण घेऊन गेला असेल,  ! ही ही "
"एक सुचलंय, किशोर कुमार…, कसं वाटतंय ? बोलवायचं का त्याला. हे बघा, आपल्या सगळ्यांचा फेवरेट तर आहेच. आणि, कसं जरा, प्रेमळ मवाळ व्यक्तिमत्व आहे. मस्त गमती जमती सांगेल. बोला पटतं का ?" - समीर. 
"ये हुई ना बात !! हो हो त्यालाच बोलावू."
एकमताने, सगळ्यांचा निर्णय झाला कि किशोरच्या आत्म्याला येण्याचे आवाहन करायचे. एक-दोन तास गप्पा मारू, प्रश्न विचारू आणि मग जायला सांगू.
"आता सिरियस व्हा रे सगळ्या जणांनी. डोळे मिटा , ह्या कॉईन वर आपलं एक बोट अलगद ठेवा आणि मनापासून किशोर कुमारचा धावा करा." समीर म्हणाला.
त्या अल्फाबेटस आणि नंबर्स लिहिलेल्या कागदावर दोन रुपयाचे नाणे ठेवले होते. सगळ्यांनी एक एक बोट त्या नाण्यावर ठेवले.  एकदा का आत्मा आला, आणि बोलायला लागला, कि ती कॉईन आपोआप फिरेल म्हणे. जाम उत्सुकता लागली होती प्रत्येकाला, की आता पुढं काय होइल? संदीपच्या पोटातली कळ जाऊन आता मोठ्ठा गोळा आला होता.
"एक सांग, किशोरला हिंदीत बोलवायचं कि मराठीत? तसं किशोरनी मराठीत पण गाणी गायलीत म्हणा, पण मराठी कळतं की नाही काय माहिती?" मकरंदची एक उगीच आपली शंका.
"अबे आत्मा आहे तो. सगळ्या भाषा येत असणार" दयाने ज्ञान पाजळले.
"तुला काय माहिती रे? कुठला आत्मा ओळखीचा आहे तुझा ?"
"आहे ना, तो….  मेस मध्ये जेवण वाढणारा आत्माराम , ख्या ख्या ख्या !"
"मनातून धावा करा की रे. जी भाषा येते त्यातनं. काय येडझवेपणा लावलाय? सिरियस व्हा म्हणून सांगतोय कधीपासनं!" समीर डाफरला.

सगळे मनापासून धावा करायला लागले किशोरचा. ते भेसूर वातावरण, बाहेरचा मुसळधार पाऊस , नाही म्हटलं तरी प्रत्येकाची थोडी टरकली होतीच. भीती , उत्सुकता , कुतुहूल, काहीतरी नवीन करण्याची हौस , अशा सगळ्या भावनांचे ढग प्रत्येकाच्या मनात दाटून आले होते. २-३ मिनिटं गेली असतील, आणि अचानक कॉईन हलली. सगळ्यांची कॉईनवरची बोटंपण हळूहळू सरकायला लागली. प्रत्येकाने, आश्चर्याने खाली पहिले. कॉईन हळू हळू "हाय" कडे सरकत होती. सगळ्यांचा मूड चेंज झाला होता. "हाय" वर येउन थांबली कॉईन. किशोरनी आगमनाची वर्दी दिली होती.  काहीतरी अतर्क्य , थरारक घडत होतं.

"आता रे समऱ्या, काय करायचं?" घशातला आवंढा गिळत मकरंदनी विचारलं.
"मला पण कळेनासं झालंय राव. बघू खरंच किशोरच आहे का. "
 "किशोरदा, स्वागत है आपका. अगर आप ये सून रहे है, तो क्या आप हमे आपका असली नाम बता सकते है?"
"A….B….H….A…A….S"  कॉईन फिरली.
"धन्यवाद , और शादीया कितनी की थी आपने कुल मिलाकर?"
कॉईन "४" वर जाऊन थांबली.
किशोर कुमार आल्याची खात्री पटली होती सर्वांना.
"वो तुम्हारी सही मे रफी के साथ दुष्मनी थी क्या?" कुणीतरी भोचक प्रश्न विचारला.
"NO" - कॉईन.
"दुष्मनी कसली, रफी एनी टाईम बेटर होता राव किशोरपेक्षा!", संद्या - आमच्यातला एकुलता एक रफी फैन कुजबुजला.
"किशोरदा, चारो बिबियोमे ,सबसे ज्यादा किसको प्यार करते थे आप?"
२ मिनिट गेले, कॉईन हलेचना. प्रश्न दोन-तीनदा विचारून झाला पण कॉईन हलायला तयार नाही.
"एवढ्या रात्री कशाला बोलावलं , झोपले कि काय किशोरदा?"
"गप्प ए, बहुतेक लय पर्सनल प्रश्न विचारला काय आपण ?"
"नाही रे, जनरली आत्मे त्यांची थट्टा उडवली, अपमान केला, की नाराज होतात. बहुतेक मगाशी संद्या म्हणाला कि रफी चांगला होता तुझ्यापेक्षा, त्याचा राग आलाय वाटते किशोरदांना!" समीरने माहिती पुरविली.
"थांब , त्यांनाच विचारून बघु. किशोरदा, क्या आप संदीप से नाराज है?"
"YES" - कॉईन.
"क्या आप उसे पनिशमेंट देना चाहेंगे?" समीरची अतिहुशारी.
"YES" - परत कॉईन.
"बोलिये दा! जो बोलोगे वोह मंजूर है , काय हो कि नाही रे संद्या"
संद्याची मान नुसतीच डोलली. अचानक खोलीतल्या पसरलेल्या दुर्गंधीने सगळ्यांनी नाक आक्रसून घेतली. संदीपचा पराक्रम असावा तो.
"जाऊदे रे घाबरू नको, ऐकून तर घेऊ किशोरदा काय म्हणतायत ते."
"K…O…M…B….A….D…..A" - कॉईन.
"बहुतेक, कोंबडा व्हायला सांगतायत. चला संदीपराव, पक्क पक्क पक्काक!"
"अरे पण किती वेळासाठी. कितनी देर के लिये जी?"
"१…०…. M… I … N"- कॉईन.
संद्या बसला कोंबडा होऊन. दुर्गंधीला सरावून जाणार होती सगळ्यांची नाकं बहुतेक. कारण ,आधीच संद्याचं पोट खराब आणि वर तो कोंबडा बनलेला. आता कोंबडा तर आरवनारच ना? त्याला कोण थांबवू शकणार.

किशोरला बरीच प्रश्न विचारली जावू लागली. सगळी बहुतेक त्याच्या फिल्म्स आणि खाजगी जीवनाबद्दल होती .  सगळ्यात आवडीचं गाणं कुठलं, ड्यूएट कुणासोबत गायला आवडायचं, आवडीचं सुट्टीचे ठिकाण कुठले, लता-आशा मध्ये नक्की खरंच सगळं आलबेल आहे का बिनसलेलं आहे. सगळ्यांनी अगदी भंडावून सोडलं किशोरला. सगळेजण जाम खुश झाले होते. प्लांचेट खरंच असतं राव. किशोर सगळी उत्तर अचूक देत होता. समीर होताच ना पडताळणी करायला. किशोरभक्त होता अगदी तो.   
"झाली का रे दहा मिनिटं ? आता कंट्रोल नाही होत!" संद्या कण्हत ओरडला.
"हो हो अरे विसरलोच आम्ही तुला, सोड आता कोंबडा.  ये बस इकडे"
"बसायचं , पण कमोडवर आधी… " म्हणत संद्याने धूम ठोकली.
वौकमन मधली कैसेट संपली तेवढ्यात 'किशोर के दर्दभरे नगमे' ची . समीर बदलायला उठला, तेवढ्यात मकरंद म्हणाला,
"समऱ्या, यार आलीशा चिनॉयचं मेड इन इंडिया लाव रे. बोर झाले ते नग्मे ऐकून. "
आपण काय बोललो ते कळाले आणि जीभ दाताखाली चावली मकरंदने. पण फार उशीर झाला होता. सजा तो बराबर मिलनेवाली थी. पुढच्या दोन तीन प्रश्नांना किशोर परत रुसून बसलेला. पुन्हा किशोर के नग्मे लावले तरी कळी खुलेना.
हताश होऊन समीर म्हणाला "किशोरजी , लगता है, मक्याकी उस बात पे नाराज हो गये आप, लेकिन प्लीज बात किजिये हमसे आप. चाहे जो सजा दे दिजीये मक्या को !"
संद्या आपली चौथी फेरी आटपून आला होता. जाम उत्सुकतेने ऐकायला लागला.
"C …A….B…R….E" - कॉईन.
"म्हणजे काय रे ?"
"अरे कैब्रे डान्स म्हणायचं असेल बहुतेक. "
"अरे पण स्पेलिंग cabaret आहे."
"जाउदे रे इंग्लिश चांगलं नसेल त्यांचं एवढं. भावनाओं को समझ मेरी जान. " 
"कैब्रे डान्स, नाही नाही शक्य नाही ते" - मकरंद म्हणाला.
"आपलं काय चालणार बाबा , जे सांगितलं ते तर करायलाच पाह्यजे. आत्म्याची नाराजी नको ओढवून घेऊ ना. साडेसाती लागलं उगीच मागं!" दयाने सुज्ञ सल्ला दिला.
"मी टौर्च मारतो अंगावर तुझ्या बंद चालू बंद चालू. म्हणजे इफेक्ट येईल कैब्रेचा. "
"आणि हो गाणं! ते रात बाकी लाव रे दया. नमक हलालची कैसेट पडलीय तिथंच बघ"
"अर्रे , पण कपडे ? कैब्रेची खरी स्पेशालिटी आहे कपडे. किशोरदा नाराज होऊन अजून अवघड पनिशमेंट द्यायचे नाहीतर." समीर ने सुचवले. 

मकरंदची पार फाटली होती, किशोरला खुश करायला काहीही करण्याची तयारी झाली होती. मगाचा तो भूताखेतांवरचा अविश्वास वगैरे, कुठल्या कुठे पळून गेलं होतं. जाम भीती वाटायला लागली होती.
"टू पीस पाहिजे. त्याशिवाय मज्जा नाही. कैब्रे कसा कैब्रे सारखा वाटला पाहिजे."
"आता खालचा एक पीस तरी आहे VIP माझी, पण वरचा पीस कुठून आणायचा?"
"कंचुकी ? हात तिच्या , खाली दोरीवर वाळू घातली असेल. ब्रम्हे काकूंनी. घेऊन ये"
"गप्प ए, काही काय!"
"हो अरे दोन तर आहेत त्यांच्याकडे. एक लाल आणि निळा ब्लाउज. एक तरी नक्की सापडेल."
"मी आणतो , मी आणतो" , म्हणत दया पळत सुटला खाली. मोठ्या शिताफीने, कामगिरी फत्ते करून, एका हातात लाल ब्लाउज घेऊन हजर झाला.
"दोन्ही होते दोरीवर, पण म्हटलं कैब्रे ला लाल जास्त सूट होईल."
"दोन्ही ? मग आज काय घातलं… "
"गप्प बसा रे" वाक्य कापत , विषय तिसरीकडेच चाललेला पाहून समीर खेकसला. 
"चला चढवा टू पीस मकरंद उर्फ परवीन बाबी , आणि करा सुरु"
खट्टकन, टेप चे बटन दाबले गेले. आशा आपल्या मादक आवाजात गायला लागली.
"रात बाकी …. बात बाकी … होना है जो … हो जाने दो. "
कैब्रे येतोय कुणाला? चित्रविचित्र अंगविक्षेप करत, त्या टू पीस वर मकरंद नाचायला लागला. समीर शिताफीनं टोर्च चमकवत होता. घुसळनारी कंबर, कसनुशी खाली वर होणारी ती लाल ब्लाउज मधली छाती, चेहऱ्यावरचे मादक(?) हावभाव, अगदी बरोबर जागा हुडकून टोर्च मारत होता समीर. परवीन बाबीच्या भुताने जर तो डान्स पहिला असता तर परत आत्महत्या केली असती. हसून हसून मुरकुंडी वळली होती सगळ्यांची. डोळ्यात पाणी आलं होतं. पोटात दुखायला लागलं होतं. पाचवी फेरी मारावी लागणार होती संदीपला बहुतेक.

गाणं संपल्या संपल्या अंगावरची पाल झटकावी तसं ते ब्लाउज काढून फेकून दिलं मकरंदने. लगबगीने कपडे चढवले अंगावर. पण घाई घाईत काढताना टर्रकन फाटलं ते ब्लाउज.
"जाउदे, एक काम करू, इथेच कचऱ्यात फेकून दे. घेईल नवीन शिवून ती. "
"अरे पण दोनच आहेत न त्यांच्याकडे?"
"तुला काय एवढी चिंता, बघतील काय करायचं त्या."
असं म्हणून त्या ब्लाउज ची रवानगी कचरापेटीत झाली.
"निळू फुले असणार काकू आता आठवडभर!"
"म्हणजे?"
"म्हणजे एकाच ब्लाउज वर …. निळ्या फुला फुलांच्या! ही ही"
ओशाळलेल्या चेहऱ्याने येउन बसला मकरंद कॉईन वर बोट ठेवून. मात्र ,किशोर कुमार जाम फिदा झाले होते वाटत डान्स बघुन. प्रश्नांची भराभरा उत्तर देत होते. सगळेजण भारावून गेले होते.

"किशोरजी, अब आपसे क्या छुपाना, वो सविता झेरॉक्स वाली सवितापे दिल आ गया है अपना. लेकिन उसके मन मे क्या है कुछ समझ नही आ रहा. आपही बोलिये क्या किया जाये? क्या मुझसे भी उतनाही प्यार करती ही वो?" संदीपने विचारले.
"YES" - कॉईन.
"तो क्या करू मै आगे? आप ही कुछ सुझाइये" संद्या सातव्या आस्मानावर होता. हुरळून गेला होता अगदी. 
"H….O….L….D….H….E….R…..H….A….N….D" - कॉईन 
"धन्यवाद किशोरदा! लाईफ बन गयी अपनी तो. कल ही जाकर उसका हात पकडता हुं, और बोल देता हुं उसे. और एक बात…  आजसे रफी गया तेल लगाने. आप हि मेरे भगवान हो. मेरे फेवरेट सिंगर हो. "
"अच्छा, किशोरदा आप ये बताइये , हम मे से सबसे छोटा दिल किसका है?"
"D….A….Y….A" - कॉईन तत्परतेने उत्तरली. 
"काय रे काय विचारलंस? क्या छोटा है? ऐकू नाही आलं मला. " दया वैतागून म्हणाला. बाकी सगळे वेड्यासारखे हसत होते. 
"अरे, आपलं ते हे… दिल विचारलं मी" 
"खरंच ना समऱ्या?"
"अरे हो रे बाबा , तुला काय वाटलं"
"काही नाही , कुठं काय , जाउदे".  
"सगळेजण माझ्याकडून पैसे उसने घेतात, आणि किशोर म्हणतो, माझं मन छोटं आहे. साठी बुद्धी नाठी झाली काय किशोरदा?" जाम वैतागून गेला होता दया.

बास…… !  वयाच्या उल्लेखाने किशोरदांचा मूड परत घालवला. काही केल्या दाद देईनात. परत जा म्हटलं तर परत जायला तयार नाहीत. 
दयाकडे पाहून स्वतःचे कान पकडत मकरंदनी विचारले. "दया से नाराज हो आप किशोरदा?"
"YES" - कॉईन.
"कुछ पनिशमेंट देना चाहेंगे ?"
"H….I….T…Y…O….U…R…S….E….L…..F" -  कॉईन.
"कितनी देर के लिये ,किशोरदा?"
"५…. M… I … N"- कॉईन उत्तरली.
खाडखाड आपल्या गालात वाजवून घ्यायला लागला दया. भीतीने गाळण उडाली होती त्याची. हसून हसून बाकीच्यांचा जीव कासावीस झाला होता. तिरमिरीत दयाला काय झाले काय माहिती, आणि धाड्कन त्याने लोखंडी कपाटावर डोके आपटून घेतले. जोरात लागले बहुतेक. निपचित होऊन पडला.
मकरंदने पळत जाऊन एका मगात पाणी आणले आणि त्याच्या तोंडावर शिंपडले. दया खडबडून उठून बसला.
"झाली का रे पाच मिनिट ?"
"हो हो झाली. डोंट वरी" समीर म्हणाला.
"यार, बास झाले , परत पाठवू किशोरदान्ना!" संदीप म्हणाला. सगळ्यांचा माना होकारार्थी डोलल्या.
"हो यार, बास झाले. पटले आपल्याला प्लांचेट खरे असते ते. पण जायला सांगू त्यांना आपण."
"ओके.  किशोरदा आप से बाते करके हमे बहोत अच्छा लगा. अब हम आपको जादा तकलीफ नाही देना चाहते.  आप जा सकते ही अभी. प्लीज चले जाइये." समीर ने विनवणी केली.
सगळेजण मनातून धावा करू लागले. किशोरदांची विनवणी करू लागले कि त्यांनी परत जावे. पण कॉईन काही "गुड बाय" वर जायला तयार नाही. च्यायला आता रक्त बिक्त मागतो काय हा परत जाण्यासाठी , असा विचार करून सगळ्यांची टरकली.
"क्या चाहिये किशोरदा आपको? जाने से पेहले क्या कुछ सेवा कर सकते ही आपकी?"
हळू हळू कॉईन फिरू लागली.
"M… I….L…K".
"अरे पण दुध कुठून आणायचे आत्ता?"
"च्यायला, ११:३० वाजता कात्रज डेअरी च्या बाजूच्या त्या टपरी वर जावे लागणार. बाकी तरी कुठे दुध मिळायचा चान्स नाही".
"एक काम करू, दया आणि मकरंद, तुम्ही दोघं जाऊन या दुध घेउन. संद्याची तर काही परिस्थिती नाहीये. मी सांभाळतो किशोरदान्ना तोवर. गाणे वगैरे ऐकवतो."
"ओके", म्हणून गाडी काढून दया आणि मकरंद निघाले. तशा मुसळधार पावसात कात्रज डेअरीला जाणे म्हणजे दिव्य होतं एक. अर्ध्या तासांनी दुधाची बाटली घेऊन परत रूम वर पोचले.  थोडं दुध एका वाटीत काढलं समीरने आणि त्या प्लांचेटच्या कागदाजवळ ठेवलं.
"आपकी इच्छा के मुताबिक दुध हाजीर है किशोरदा!"
२ मिनिटांनी कॉईन परत हालली "गुड बाय !". शेवटचं हलली ह्या वेळी.
धाड्कन सगळ्यांनी बेडवर अंग टाकून दिलं. एका फारच अवघड प्रसंगातून सुटका झाल्यासारखे वाटत होते. किशोर कुमारने वाट लावली होती सगळ्यांची. एकमेकांशी एक अक्षरही  न बोलता शांत पडून होते चौघंही. प्रत्येकाच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं.

"भुतं खेतं असतात म्हणजे तर. आज विश्वास बसला आपला. परवीन बाबी केली आपली आज किशोरनी.अरे हो आणि ब्रम्हे काकू बाजूच्या "डीलक्स टेलर" कडे जाणार उद्या. उद्या, ब्लाउज  गायब आहे हे कळल्यावर काय चिडतील ना त्या?" मकरंद विचार करत होता.

"सविता मेरी जान! आज किशोर कुमारांनी सिग्नल दिलाय. उद्या येउन हळूच तेरा हाथ थामुंगा मै.  बहोत इंतेजार करवाया जालीम तुने. इतना चाहती थी मुझे, कभी इकरार किया होता. जाउदे येतोय उद्या मी. च्यामारी, पण भीती खूप वाटतेय भूतांची. पोटात एवढ्या कळा येतायत पण एकट्याला संडासकडे जायची भीती वाटतेय. असं वाटतंय कि दार उघडलं तर समोर कमोडवर किशोरदांचं भूत बसलेले असेल असं माईक वगैरे हातात घेउन. नकोच च्यायला, जातील कळा आपोआप थोड्या वेळानी. असू देत." संदीप च्या डोक्यात चक्र चालू होते.

"लय मार लागलाय राव. येड्यासारखं हाणून घेतलं आपण पण गालात फाड फाड. डोक्याचं टेन्गुळ कसलं विनोदी दिसतंय. बरं झालं थोडक्यात निभावलं. अजून काही करायला नाही सांगितलं किशोरच्या भूतानी. पण एक प्रश्न जीव खातोय राव, ते सगळ्यात छोटं , नक्की 'दिल'बद्दलंच विचारलं होतं न समऱ्यानी? नीट ऐकू नाही आलं." दयाला झोप येत नव्हती.

समीर उठला, ग्लास मध्ये दुध ओतलं.
"कुणी पिणार का रे दुध?" सगळे गप्प. हुं नाही कि चू.
गटागटा दुध पिऊन घेतले. जाऊन वौक्मन वर किशोर के दर्दभरे नगमे परत लावले. दया,संदीप आणि मकरंद एकदाच ओरडले "बंद कर यार समऱ्या त्या किशोरची गाणी. झोपूदे आता निवान्त… प्लीज."समीर तसाच बेडवर जाउन पडला.
"च्यायला, जाम घाबरलेत तिघंही. येडचाप आहेत तिघं. कसं कळलं नसेल ह्यांना कि मीच कॉईन सरकवत होतो.  किशोरची हिस्टरी तर कोळून प्यायलो आहे मी. मग किशोरचा आत्मा बरोबर उत्तरंच देणार ना रे बाबांनो! संद्या कुत्र्यासारखा मार खाणार आहे सविताचा उद्या. ते येडं मक्या लई उड्या मारत होतं भूत नसतं , भूत नसतं म्हणून! आता काय बिशाद आहे यापुढं त्याची तसं म्हणायची. कसं नाचवलं ब्लाउज घालून! तसं ,दयानं जरा जोरातच मारून घेतलं राव. असू दे. आणि दुध प्यायची इच्छा पण पूर्ण झाली आपली. और क्या चाहिये लाइफमे .
त्या बाजूच्या विशालने, आपली बरीच उधारी थकवलीय , व्याजासहित परत हवी असेल तर 'प्लांचेट की एक रात विशाल के साथ !' केलीच पाहिजे."

थोड्या वेळाने सगळ्यांना कशीबशी झोप लागली. 'किशोर के दर्दभरे नग्मे' च्या कव्हर वरचा किशोर मात्र नेहमीप्रमाणेच गालातल्या गालात मंद हसत होता.….

Saturday, September 27, 2014

एकवीस वर्षांपूर्वी...

२९ सप्टेंबर १९९३ 

-----------------------------------------१----------------------------------

"गोदावरी जगताप !", नर्सने नाव पुकारताच एकदम भानावर आली ती. अगदी हायसं वाटलं तिला. वाट बघून बघून कंटाळा आला होता. सकाळी नऊ वाजल्यापासनं वाट बघत होती ती. २ तासांनी आत्ता कुठे नम्बर आला होता तिचा. देशपांडे बाईंकडे नेहमी अशीच पेशंटची रीघ असायची.  आत घाबरत घाबरतच गेली , देशपांडेबाई मान वर न करताच म्हणाल्या
"बस गं , गोदावरी!"
"म्याडम, जाउद्या मी उभीच बरी हाय. काय रिझल्ट आला ओ त्या टेष्टचा?"
"पेढे दे गोदे ! पेढे ! पोटुशी आहेस तू ! मुल होणार आहे तुला !"
आनंद गगनात मावेना गोदावरीचा ते ऐकून. गप्पकन पाय पकडले तिने देशपांडे बाईंचे.
"देवादुतावानी बातमी सांगितलीत म्याडम! पाय्हजेल तेव्हढे पेढे देते बघा !"
"अगं , पाय सोड आधी. आणि , असं एकदम हालचाली करणं बंद कर आता. नीट काळजी घे स्वतःची"
दवाखान्यातून बाहेर पडताना जणू अस्मानात तरंगत होती गोदावरी.  बारा वर्ष ! जवळपास एक तप झालं म्हणजे! एवढ्या दिवसांनी पाळणा हलणार होता तिच्या घरात. सगळी आशा सोडून दिली होती गजाननरावांनी आणि तिने. डॉक्टर झाले , वैद्य झाले , देवं झाली, नवस झाले. पण काही फायदा नाही. 'देवा, लई वाट बघायला लावलीस रं, पण पावलास रं बाबा शेवटी !' मनात म्हणाली ती.
गजाननराव तर तालुक्याच्या गावी गेले होते. कधी एकदा त्यांना भेटून हि बातमी सांगावीशी वाटत होती. पण उद्यापर्यंत वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. औषधं घरी ठेवताना एकदम घड्याळाकडं लक्ष गेलं तिचं, 'अगं बया, साडे अकरा झाले, पाहुणे येणारच असतील. लाडू बांधायला बोलावलंय सोनावणे बाइंनी, घाई करायला पाह्यजे.'  असा विचार करत लागाबगा ती सोनावणे बाईंच्या घराकडे पळाली.

गावातल्या बसस्टेंड ला अगदी लागून तो वाडा होता. मोजून सहा घरं होती वाड्यात. डावीकडून सुरु केलं तर जगतापांचं पहिलं घर. गजाननराव जगताप आणि गोदावरी जगताप , दोघंच रहायची तिथे. बारा वर्षं झाली लग्नाला, मुल बाळ नाही अजून , म्हणून परेशान असायची. पण यापुढे नाही.

-------------------------------------२---------------------------------------

दुसरं घर सोनावणे बाईंचं .  नवरा मास्तर होता, बाजूच्या गावात. दिवसभर पोरांना संस्काराचे धडे शिकवून रात्री जाम पिउन यायचा. पाच मुलं. सगळ्यात मोठी संतोषी, बावीस वर्षाची झाली होती. तिचं अजून लग्न जमत नाही म्हणून अस्वस्थ वातावरण होतं घरात. दिसायला अगदी नक्षत्रासारखी, पण कुंडलीतला मंगळ आडवा येत होता. सगळ्यात छोटा , शेंडेफळ म्हणजे शंभू, सहा वर्षाचा. फार म्हणजे फारच जीव या जोडप्याचा शंभूवर. चार मुलीनंतर झालेला एकुलता एक पोरगा म्हणून.
 'माझ्या संतोषीनं नशीब काढलं!', सोनावणे बाई विचार करत होत्या.  'पोराचं किराणा दुकान हाय म्हनं, ते पण अगदी गावात. दीड-दोनशेचा तर कमीत कमी धंदा होतोय रोज म्हनं.  सासूचा तरास नाही, घरात फक्त सासरा आन नवरा. कामाचा ताण भी नाय पडणार संतोषीवर. काय बी असू, तशी कामाला वाघ हाय माझी पोर. आज जर पसंद केली पावण्यानी तिला , तर ११ नारळाचं तोरण बांधीन रे नीलकंठेश्वरा !' सोनावणे बाई मनाशी म्हणाल्या. 
"वैषे, बघ गं संतोषीचं आवरून झालं कि न्हाय ते?" त्या म्हणाल्या.

गेला अर्धा तास स्वतःकडे न्याहाळून बघत होती संतोषी.  'काय कमी आहे माझ्यात , म्हणून एवढी वाट बघायला लावतोय रे देवा ? वर्गातली एक तरी पोरगी एवढी चांगली दिसते का सांग बरं. मग मलाच का कुणी पसंद करत नाही मग ? ह्या वेळी पसंती येवू दे तिकडून.  खरं सांगते, मायनं सांगीताल्यावानी तिचा शालुच नेसते लग्नामध्ये. नको नवीन साडीचा हट्ट मला. जाउदे, चला अण्णांच्या पाया पडून घेते'  म्हणून ती वडिलांच्या खोलीकडे निघाली.

'देवा, लई चुकतंय रे माझं, पण काय करू हि दारू सुधारु देत नाही. ' सोनावणे गुरुजी विचार करत होते. 'काल रात्री म्हणे मी शम्भूच्या कानफटात वाजवली! आठवत पण नाही मला. हात का नाही तुटले माझे ते करण्याआधी ? आजकाल काही ताळतंत्रचं नाही राहिला स्वतःवर. शंभू व्हावा म्हणून काय देव देव आणि नवस नाही केले , आणि त्याच्यावरच हात उचलला आपण? रुसून बसलंय पोर बिचारं कालपासनं. आज सकाळी जाउन त्याच्या आवडीचे काळे बूट आणले , पण ढुंकूनही नाही बघितले त्यानी त्याकडे.  उद्यापासून दारू सोडायची.  बास झालं आता. '  तेवढ्यात संतोषी आशीर्वाद घ्यायला खोलीत आली.
"शंभू , जा रे , जरा राणीताई ला बोलावून आन. म्हणावं, ती तोहफा मधल्या जयाप्रदा सारखी वेणी घालायाचीय संतोषीताईला!" संतोषीने शंभू ला फर्मान सोडलं. 'लहान आहे , म्हणून सगळेजण मलाच पळवतात.' शंभू विचार करत होता. 'आबांनी काल का मारलं तेच कळत न्हाई! चुकून आपला बॉल त्यांच्या वरणाच्या वाटीत पडला, म्हणून काय एवढं जोरात हाणायचं ? अजूनपण कानानी नीट ऐकू येईना गेलंय. बाकी, ते काळे बूट लय भारी आणलेत आबांनी.  पण लय राग आलाय त्यांचा, म्हणून बघितलं बी नाही तिकडे . पण हळूच त्यांची नजर चुकवून घालून बघणार आहे एकदा. जमलं तर उद्या शाळेतबी घालून जातो. संज्याची लय जळणार हाय माझे बूट बघून, एवढं मात्र नक्की' विचार करत करत राणीच्या घरी पोचला तो.

---------------------------------३-----------------------------------------

ते तिसरं घर होतं,कांबळे काकांचं. काका आणि त्यांची एकुलती एक मुलगी राणी दोघंच राहायची तिथे.  राणीची आई दोन वर्षापूर्वीच कॅन्सरने वारली होती. फार जीव बापलेकीचा एकमेकांवर. पण वयाप्रमाणे , राणी गेल्या दोन महिन्यांपासून बाजूच्या भोसलेंच्या बंडूच्या प्रेमात पडली होती. खूप आवडायचा तिला तो. पण लहान गावात प्रेम प्रकरण वगैरे जरा अवघडच असतं.  लगेच लोकांना कळतं, चर्चा होते.  'काल तर मीनाच्या आईनी बघितलं त्या गोठ्यामागं , आपल्याला नि बंडूला! चिठ्ठ्या देऊनच बोलावं लागतं तसं बी आम्हाला.  उघडं बोलायची सोय नाही. आणि वर ह्या मीनाच्या आईला सकाळी सकाळी शेण लागतं गोवऱ्या थापायला.  जाउदे, शेवटचा दिवस आजचा, उद्या सगळ्यांची तन्तरुन जाइल मी आन बंडू पळून गेल्यावर. आमचं लगीन होत आसंल तुळजापुरात आणि हिथं बसली असतील सगळी तर्क वितर्क करत. एक अण्णांचंच तेव्हड वाईट वाटतंय. काय वाटेल त्यांना मी पळून गेलेय असं कळाल्यावर ? जावूदे, पुढच्या आठवड्यात येणारच हाय परत  महाबळेश्वरहून. समजूत काढली तर ऐकतील, राग पळून जाइल लगेच.  ते हनिमून कि कशाला महाबळेश्वरला घेऊन जाणाराय म्हनं बंडू.  जितेंद्र हाय माझा तो.  एका साईडनं अगदी त्या मवाली मधल्या जितेंद्र सारखा दिसतो.  मज्जा येणार हाय त्याच्यासोबत.  आई भवानी , नीट पार पडू दे गं सगळं! खणा नारळानं वटी भरीन तुझी!'
'राणी ताई , संतोषी ताई बोलावायलीय तुला , ती कसली तरी वेणी घालाय्चीय म्हनं तिला. "
शंभूचा आवाज येताच राणी तयार व्हायला लागली. 'संते , तुझ्यासारखं छान लगीन थोडीच नशिबात असतंय बाई सगळ्यांच्या !' असं म्हणून आरशात पाहून गंध लावायला लागली. 'जाउदे,  तुझ्या मागनं माझा नंबर आधी लागतोय बघ. चट मंगनी न पट शादी ! माझ्या जितूला ला लई आवडते मी असा शिरीदेवीसारखा गंध लावते तवा. ' ती आरशात पाहून विचार करत होती.

--------------------------------------४--------------------------------------

चौथं घर भोसल्यांचं .  जेवढा शांत भोसले काका, तेवढीच कजाग भोसले काकू.  बंड्या एकुलता एक पोरगा त्यांचा. 
"श्यान्नव कुळी हाओत आपण! लाज नाय वाटत म्हाराच्या पोरीसोबत लगीन लावून द्या मनायला ?" भोसले काकू तळमळीने बंड्याला बोलत होत्या. बंड्याला एकदम जितेंद्र वगैरे झाल्यासारखे वाटत होते.
"जात पात मानत न्हाई मी. सच्चा इश्क किया है राणी के साथ. तुला काय कळणार म्हातारे.  परवानगी न्हाय मागत , सांगतोय तुला. परवानगी दिलीस तर हिथं वाड्यात मंडप लागंल न्हाईतर तुळजापुरात, सांगून ठेवतोय !. ठरीव आता काय करायचं"

भोसले काका आजीबात लक्ष न देता शिवाजी महाराजांच्या फोटो खाली बसून प्लेट मधला शिरा संपवत होते. भोसले काकांचा हिरो होता बंड्या. आयुष्यभर काकुंना जे बोलू शकले नाही ते बंड्या बोलायचा. अजिबात घाबरायचा नाही. काकांची बंड्याच्या प्रत्येक गोष्टीला मूक संमती असायची.  राणी त्यांना मनापासून आवडायची. बंड्याला राणीपेक्षा चांगली मुलगी नाही मिळणार हे त्यांना अगदी पटले होते.  सकाळीच जाउन तुळजापूरची दोन रिजर्वेशन चांगली दोन तास लायनीत थांबून काढून आणली होती त्यांनी बसस्टेंडवरून . आज रात्री काकू झोपल्या, कि बंड्याच्या हातात ते तिकिट ठेवणार होते ते. "आयुष्यभर हिने वैताग दिला मला फक्त. मनाचं काहीच नाही करू शकलो मी. हि घे तिकीट, आणि जा निघून. राणीसारखी पोरगी नको घालवू हाताची. जात पात महत्वाची नाही , तर मनं , स्वभाव महत्वाचा असतो", असं सांगून बंड्याला घरातनं रवाना करणार होते.
महाराजांच्या फोटो समोर हात जोडून काका म्हणाले " शक्ती द्या महाराज. यश द्या माझ्या बंड्याला. "
"बंड्या , चल रे, मंडळाचा गणपती निघालाय विसर्जनाला." बाहेरून मित्रांची हाक येताच बंड्या शर्टाच्या गुंड्या लावत बाहेर पडला. आज एकच मागणं होतं बप्पांकडे त्याचं , 'राणीशी संसार थाटायला मदत कर रे बाबा मोरया!'
रागारागानी भोसले काकू पण पोतदार बाईंकडे निघाल्या. त्यांनीच तर सांगितलं होतं बंड्या आणि राणी बद्दल सगळं . 
----------------------------------------५------------------------------------

"आहेत का मीनाच्या आई घरात?" भोसले काकूंचा आवाज ऐकून पोतदार बाईंनी दार उघडले.

 पाचव्या घरात राहायचे पोतदार कुटुंब. पोतदार गुरुजी तालुक्याच्या गावी शिक्षक, एकदम अबोल स्वभाव. चार मुली अन दोन मुलं. सगळ्यात मोठी मुलगी तिचं नाव मीना. म्हणून पोतदार बाईंना सगळ्या वाड्यात "मीनाची आई" म्हणूनच ओळखलं जायचं. नवऱ्यावर फार जीव त्यांचा.  गेल्या वर्षी नवऱ्याचं डायबेटीसचं निदान झाल्यापासून, एकही  गोष्ट गोड नव्हती लागत पोतदार बाईंना.  कारण म्हणजे पोतदार गुरुजींना गोड पदार्थ खूप आवडायचे.  बाई त्यांना रोज काही न काही गोड करून द्यायच्या. पेढे , बासुंदी , शेवयाची खीर अगदी काहीच नसेल तर कमीत कमी सुधारस तरी असायचाच.  गेले एक वर्ष झालं घरात काही गोड धोड बनलं नव्हतं. आज अगदी एवढी अनंत चतुर्दशी असून साधे मोदक सुद्धा नव्हते केले. खूप जीव तुटायचा पोतदार बाईंचा. वाटायचं, नवऱ्याला काय काय गोड धोड बनवून खाऊ घालावं! पण हाय रे डायबेटीस. 
पण कालच गुरुजींच्या पगार वाढीची गोड बातमी मिळाली होती. महिना चक्क २०० रुपये वाढले होते.आणि गेल्या एका वर्षाची थकबाकी म्हणीन २४०० रुपये पण मिळणार होते. आनंद गगनात मावत नव्हता त्यांचा. म्हणून पोतदार बाईंनी सरळ सांगून टाकले. 
"हे बघा , मी उद्या तुमच्या आवडीचे गुलाबजाम करायचं ठरवलंय. आज किती दिवसांनी अशी छान बातमी ऐकायला मिळालीय. आज रात्री तयारी करते मी. उद्या शाळेतून आलात कि गरम गरम गुलाबजाम खायला घालते. जीव आसुसला असेल न हो तुमचा काही तरी गोड खायला? मी मेलीने मात्र काल चक्क २ जिलेबी खाल्ल्या हळदी कुंकाला गेले होते जगतापांकडे तर!" असं म्हणून डोळ्याला पदर लावला त्यांनी.
पोतदार गुरुजी मात्र जाम खुश होते. उद्याचे गुलाबजामचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. गेल्या एक वर्षाचा गोडधोडाचा उपवास सुटणार होता उद्या. मनातल्या मनात गणपती बाप्पाला नमस्कार केला त्यांनी. 
"अगं , त्या बाजूच्या पिंकी द्यायला विसरू नको बरं का गुलाब जाम . तिलाही फार आवडतात." ते म्हणाले.

-------------------------------------६------------------------------------

सहावं आणि शेवटचं घर घोडकेंच. घोडके काका लोहाराचं काम करायचे. बैलाची नाल , बैलगाडीच्या चाकाची आरी वगैरे असल्या गोष्टींसाठी सगळं गाव त्यांच्याकडे यायचं. पण बायकोच्या आजारपणात सगळी कमाई जायची. बायको अंथरुणाला खिळून, दम्याने त्रस्त.  एकुलती एक पोरगी पिंकी , तिची मात्र खूप हेळसांड व्हायची. वेळेवर खायला नाही मिळायचं, पैशांची चणचण तिला अगदी लहान वयातच कळाली होती. अकाली वयातच प्रौढत्व आलं होतं तिला. तशी , फारच समजूतदार मुलगी होती.  
तिच्या शाळेची सहल जाणार होती पुढच्या आठवड्यात सोलापूरला. उद्यापर्यंत शाळेत पैसे जमा करायचे होते. पस्तीस रुपये ! तिला तर अप्पांचा चेहरा बघूनच कळले कि नाही जमणार हे. तरीही अप्पा म्हणाले , " बघतो, मी काही जमतेय का". तिला माहिती होतं कि नाही जमणार.  फक्त गोड हसून ती म्हणाली
" नाही अप्पा,माझाही खूप अभ्यास राहिलाय, मलाच जायचे नाही सहलीला. तुम्ही नका विचार करू त्याचा. " 

सकाळपासनं हातोडीचे घाव ऐरणीवर नाही तर स्वतःच्या काळजावर बसल्यासारखे वाटत होते घोडके काकांना. ' पिंकीचं लय वाईट वाटतंय. तिचं वय काय, करावं काय लागतंय तिला. बाराव्या वर्षी तीन लोकांचा सगळा स्वयंपाक करते. आजारी आईला काय हवं नको ते बघते. एवढं करून शाळेत पयला नंबर दर वर्षी. कदी नाही ते पोरीनं कायतरी मागितलं आणि आपल्याला नाही जमत. थु हाय आपल्या जिंदगीवर! ते काय नाही , काही करून पिंकी ला सहलीला पाठवायचं. आजच भोसले साहेबांना विनवणी करून एक पन्नास रुपये उधार घेतो. पण पिंकीला सहलीला पाठवणारच!"
तो विचार करून घोडके काकांना बरे वाटले. 
"पिंके , जा ग सहलीला , उद्या सकाळी शाळेत जायच्या आधी देतो पैशे तुझ्याकड"
अप्पांचे बोल ऐकून पिंकीच्या मनात आनंदाचे कारंजे उडाले. मन थुइथुइ नाचायला लागलं. कधी एकदा मैत्रिणींना ही गोष्ट सांगतेय असं झालं. देव्हारातल्या साईबाबा च्या मूर्तीला हात जोडून नमस्कार केला आणि कणिक तिम्बायाला घेतली तिनं.  

---------------------------------------------------------------------------

३० सप्टेंबर १९९३ 

गाडीला करकचून ब्रेक लागला , आणि मला जाग आली. डोळे उघडून पाहतो तो तर वाहनांची लांबच लांब लाईन लागलेली. पोलिस, चेकिंग केल्याशिवाय एकही गाडी पुढे सोडत नव्हते.
"पर्मिशन हाय का ? नसंल तर ट्रक वळवायचा हिथनंच म्हागं!" हवालदार म्हणाला. 
उत्तरासाठी ड्रायव्हरने माझ्याकडे बोट दाखविले.  खिशातला कागद काढून हवालदाराकडे दिला मी. 
"कलेक्टरची परमिशन आहे.  जाउद्या लवकर प्लीज"
कागद न्याहाळून बघत हवालदार म्हणाला.  
"कुटले , किल्लारीचे का तुमी? लय वंगाळ झालं बगा. होत्याचं नवतं केलं या भुकंपानं!"
"हो, किल्लारीचे आम्ही"
"घरचे सगळे बरे तर हायत नव्हं ? कुणालाबी इचारा , २-४ मानसं तर गेलेलीच हायत घरातली"
"नाही, देवाच्या कृपेने सगळे बरे आहेत, आज सकाळीच माझे आई वडील लातूरला पोचले. पण घाई घाईत घराला कुलूप सुद्धा लावायचं राहिलं. महत्वाची कागदपत्रं , आणि थोडं सोनं नाणं तसेच आहे कपाटात. राहिलं असेल आत्तापर्यंत , तर शोधून घेऊन जावे म्हणून चाललोय किल्लारीला. "
"असं व्हय , चला जावा बिगीबिगी", असं म्हणून हवालदाराने आमची सुटका केली.       
सकाळचा प्रसंग काही केल्या डोळ्यासमोरून जात नव्हता माझ्या. सकाळी चारच्या सुमारास भूकंपाने घर हादरले तेव्हापासून जागाच होतो. लातूरला एवढा धक्का बसला तर किल्लारीला काय झाले असेल म्हणून माझी बहिण तेव्हापासून रडतच होती. टेन्शन तर मला पण जाम आले होते. आई वडील किल्लारीलाच असायचे. काय झाले असेल त्यांचे, हा विचार पोटात गोळा आणत होता. शेवटी सात वाजता एका सायकल रिक्षामधनं दोघेही घरी आले तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला. अंगावरच्या कपड्यावर तसेच आले होते ते. काही सामान सोबत न घेता , जीव मुठीत घेऊन, पहिले वाहन मिळेल ते घेऊन लातूरला आले होते. आम्हाला पाहताच, ताईला जवळ घेऊन खूप रडले वडील. त्यांना माझ्या जीवनात पहिल्यांदाच रडताना पाहत होतो मी. भूकंपाचे त्यांनी सांगितलेलं वर्णन ऐकून अंगावर काटा आला आमच्या. थोड्या वेळानी , माझे काका आणि मी किल्लारीला जायचं ठरलं. सगळं सामान , स्पेशलि कागदपत्रं आणि, सोनं-नाणंतरी परत घेऊन येवू असा विचार होता.
गावात पोचल्यावर बघवत नव्हतं काहीच. आक्रोश, ती झालेली पडझड, मदतकार्याचा गोंधळ खरंच काही बघवत नव्हतं.  गाव ओळखूच येत नव्हतं मला. घरातलं समान गोळा करून झालं . ट्रक मध्ये चढवलं. सुदैवानं आमचं घर सिमेंटचं असल्यामुळे माझे आई वडील सुखरूप राहिले होते. अगदी गेल्याच वर्षी जुन्या वाड्यातून नवीन घरी शिफ्ट झाले होते.  परत निघताना विचार केला, जरा जुन्या वाड्यात तर जाऊन येवू. आपले जुने शेजारी वगैरे , त्यांचे काय हाल आहेत विचारून येवु. ड्रायवरला थोडा वेळ थांबायला सांगून काका व मी वाड्याकडे निघालो. दगड मातीच्या चा खचातून कसाबसा रस्ता काढत तिथे पोचलो.

वाडाच नव्हता तिथे! सगळा जमीनदोस्त झाला होता. फक्त दगड मातीचा डोंगर राहिला होता. बाजूला १०-१२ प्रेतं पांढऱ्या कपड्याखाली झाकून ठेवली होती.  जगताप काका डोक्याला हात लावून बसले होते.
"एक माणूस आहे हो आमच्या घरचा अजून मातीखाली, माझी बायको. काढा हो तिला!"  मदतकार्या साठी आलेल्या जवानांना विनंती करत होते. बिचाऱ्या जगताप काकांना माहितीच नव्हतं की , एक नाही तर दोन जीव अडकलेत मातीखाली. आज जगताप काकू त्याचीच गोड बातमी सांगणार होत्या.
सोनावणेच्या घरी फक्त सोनावणे काका वाचले होते. ते पण डोक्याला हात लावून सुन्न बसले होते. "शंभू शंभू" एवढंच पुटपुटत होते. एवढा मोठा धक्का! दारू सुटणार नाही त्यांची आता आयुष्यभर.  कसं पचवायचं हे सगळं ? कांबळे , भोसले दोन्ही कुटुंब गायब होती ,  जात काय न पात , शेवटी एकाच मातीत मिसळली होती दोन्ही कुटुंब ! आणि त्यांचं न जोडलं गेलेलं नातंही. पोतदारांच्या घरी फक्त पोतदार काका गेले होते, गोड खायची इच्छा अपुरी ठेवूनच.  पोतदार काकू भोवळ येउन पडल्या होत्या. मुलं आक्रोश करत होती.  घोडकेंच्या घरी, काका एकटेच बचावले होते . आजिबात रडत नव्हते ते. पाणी आटलं होतं डोळ्यातलं त्यांच्या बहुतेक. राहून राहून खिशातली पन्नासची नोट चाचपत होते , तेवढाच एक त्यांच्या जिवंत असण्याचा पुरावा होता.

बाजूला, सगळ्यांच्या संसारातल्या सापडतील त्या गोष्टींचा ढीग रचून ठेवला होता. त्यात जगताप काकूंनी नुकतेच विणायला घेतलेलं स्वेटर होतं.  संतोषीचा शालू होता. मातीचा थर चढून कसनुसा दिसत होता अगदी. शंभूचे काळे बूट मातीने पांढरे पडले होते. बंडूने अगदी प्रेमानी घरी लावलेल्या "हिम्मतवाला" च्या पोस्टरला काहीच झालं नव्हतं. जितेंद्र आणि श्रीदेवी अगदी प्रेमानी एकमेकांच्या डोळ्यात बघत होते.  राणीचा मेक अपच्या सामानाचा डब्बा विखरून पडला होता. पोतदार काकूंनी गुलाबजामसाठी आणलेला खवा एका कागदात पडून होता. पिंकीने उत्साहाने भरायला सुरु केलेली सहलीची बैग फाटून चिंध्या झाल्या होती. 

मन बधीर झालं.  दुःखाची परिसीमा वगैरे म्हणतात ते यापेक्षा वेगळ काही नसावं. देवाने आणि दैवाने केलेली क्रूर थट्टा होती ही. अंत्यदर्शन, वगैरे भानगडीत न पडता सरळ लातूरला निघालो. त्यात विश्वास नाही माझा. माणसांचे निष्प्राण चेहरे बघून अंत्यदर्शन घेण्याचा कसला हा शिष्टाचार? मला नाही पटत. आयुष्यभर मग तोच चेहरा समोर येईल ना  त्या माणसाची आठवण झाल्यावर ? कशाला ते अंत्यदर्शन? त्यापेक्षा ते हसरे खेळते सजीव चेहरेच लक्षात ठेवायला आवडतं मला. लोकं नाव ठेवतात , म्हणतात कमकुवत आहे मी किंवा  काहीजण म्हणतात की , अत्यंत दगडी ह्रदयाचा आहे मी इत्यादी इत्यादी. जे पण असेल, पण मी नाही घेत आणि नाही घेणार कधी ते अंत्यदर्शन ! पण त्या स्वप्नांचे काय ? त्यांचे अंत्यदर्शन मी चुकवू शकलो नव्हतो. त्यांची ती राखरांगोळी कशी विसरू शकणार होतो मी ?

हळूहळू , दहा/वीस हजार मानसं गेली भूकंपात अश्या बातम्या यायला सुरु झाल्या. एक गोष्ट सांगायचे विसरले बातमीदार , माणसांपेक्षाही जास्त स्वप्नं मेली होती त्या दिवशी….




marathiblogs