Wednesday, August 27, 2014

ये लाल रंग , कब मुझे छोडेगा ?


पहाटेच्या त्या शांत वातावरणात , फारशी वाहतूक , वर्दळ नसलेल्या , पावसानी न्हावून निघालेल्या चकाकत्या रस्त्यावरून त्याची मोटारसायकल भन्नाट वेगात धावत होती . "मुंबई एकदम वेगळी दिसते न पहाटेच्या वेळी . फार कमी वेळी मुंबई ला दिवसातल्या ह्या वेळेस बघायचा योग येतो. दिवसभराच्या दगदगीनंतर कशी शांत, समाधानी दिसते. " तो विचार करत होता . मोबाईल ची रिंग वाजायला लागली , संतोष चा असावा फोन . आजीबात उशीर चालत नाही त्याला कुठेच . फोन न उचलता तशीच गाडी दामटत तो रेल्वे स्टेशन मध्ये घुसला . घाई घाईत, दिवसभराच्या पार्किंगचे पन्नास रुपये पार्किंग वाल्याच्या हातात कोंबत तो प्लाटफॉर्म कडे पळत सुटला . ग्रुप मधले सगळे मेम्बर्स आधीच पोचले होते.त्यांनी शिव्या द्यायला सुरु करण्याआधीच माफी मागत तो त्यांना सामील झाला . गप्पा गोष्टी, विनोद यांना उधाण आले होते. बऱ्याच दिवसांनी ग्रुप एकत्र जमला होता . प्रसंगच तसा होता . अक्षराचे लग्न होते आज पुण्याला . अक्षरा ग्रुप मधलीच एक . सगळ्यात पहिले लग्न होते ग्रुप मधल्या कुणाचे तरी . फ्रांस मध्ये काम करणारा एक देखणा मुलगा निवडला होता तिने . भारी एक्साईटमेंट होती प्रत्येकाला .

"हाय गाईज , वोटस अप ?" असा एक मंजुळ निनाद किणानला. "ती", उभी होती मागे. परवाच परदेशातून परत आली होती वाटतं . ती पण येणार होती अक्षर च्या लग्नाला त्यांच्यासोबत .  ग्रुप मधल्या सगळ्यांच्या  तोंडातून आनंदाचे चित्कार उमटले . सगळ्यांनी तिच्याभोवती गलका केला . "कशी आहेस, सो गुड टू सी यु , काय म्हणतेय स्वित्झर्लंड ?" धाड धाड प्रश्नांच्या फैरी झडल्या तिच्यावर . त्यांच्या गप्पा रंगल्या असताना तो मात्र थोडं मागेच थांबला . नुसतं निरीक्षण करत होता तिचे . लालचुटुक रंगाचा तो ड्रेस , त्यावर खुलणारी ती चंदेरी किनाऱ्याची ओढणी . चेहऱ्याशी चाळा करणारे तिचे कुरळे केस . हल्कासा मेकअप . मंद दरवळणारे तिचे इम्पोर्टेड परफ्युम . "बदललीस गं अगदी तू . कसली छान दिसायला लागलीस . " कुणीतरी म्हणाले तिला . "खरंय "
तो मनाशी विचार करू लागला - "आधीपासूनच हि अशी जीवघेणी सुंदर , आणि त्यात परदेशातलं हवामान मानवलंय  हिला  खरं . अजूनही जास्त आकर्षक दिसतेय ही ".  मित्रांशी बोलता बोलता तिची नजर त्याच्या नजरेला भिडली , उधारीचं हसू चेहऱ्यावर आणत तिने त्याला "हाय!" केलं . त्यानेही चेहऱ्यावरची रेष हि हलु न देता मान हलवली. 

तेवढ्यात ट्रेन आली . "चला लवकर , नाहीतर अक्षराच्या मुलाच्या बारशाला पोचू अजून उशीर झाला तर!" असे पांचट विनोद वगैरे करत सगळेजण गाडीत चढले . ट्रेनमध्ये मुद्दामहूनच तो जेणेकरून ती दिसणार नाही अशा एका सीट वर बसला. गप्पाटप्पांना ओघ आला होता . तो मात्र आज अलिप्त होता . अजिबात मजा येत नव्हती. त्याचे ठेवणीतले sarcastic विनोद आज आटून गेले होते . सिगारेटचे झुरके घेत ट्रेन च्या दाराशी बराच वेळ बसून राहिला. तिच्यासोबत बसून तिच्याकडे दुर्लक्ष करणे त्याला जमणार नव्हते . एकदम ऑक्वर्ड  झाले असते. म्हणून उगीच झोपायचा वगैरे बहाणा करत थोडा दूरच बसून राहिला .   

एकदाच पुणे आलं . स्टेशन जवळचं मंगल कार्यालय होतं . वेळेवर पोचले सगळे . अक्षता पाच मिनिटात पडणार होत्या . बाकी अक्षरा अगदी अप्सरेसारखी दिसत होती नवरीच्या पोशाखात . थोडं स्थिरस्थावर झाल्यावर ते सगळे स्टेज वर अक्षरा आणि तिच्या नवऱ्याला शुभेच्छा द्यायला गेले. अक्षराने थोड्या वेळानी एकदम त्याचा आणि तिचा हात पकडला आणि लटक्या रागाने म्हणाली  "आता अजून किती दिवस वाट बघणार आहात ? करिअर होतच असते. आता वाजवून टाका बार तुमचा पण . मला खूप मिरवायचं आहे तुमच्या लग्नात ". बहुतेक, गेल्या एक वर्षात काय काय घडलं त्याची कल्पना नसावी अक्षराला . तो आणि ती , दोघेही क्षणभर स्तब्ध झाली . कुणीतरी बोलावतंय असा बहाणा करून हात सोडवत तो तिथून निघून गेल. तिनेही तेच केलं असावं .  

जेवणं वगैरे आटपल्यावर , सगळा ग्रुप अक्षरासाठी काहीतरी भेटवस्तू खरेदी करायला बाहेर पडला. खरेदी वगैरेसारख्या गोष्टींमध्ये त्याला फारसा इन्टरेस्ट नसल्यामुळे त्याने टाळले व तिथेच बसून राहिला. एका खुर्चीवर शांतपणे डोळे मिटून पडून राहिला. तेवढ्यात खांद्यावर एक थाप पडली . ओळखीचा स्पर्श जाणवला म्हणून मागे वळून पाहिले त्याने. "का रे , अगदीच बोलायचं नाही असं ठरवलंय कि काय ? एवढी अनोळखी झाले का मी ?" ती म्हणाली .  क्षणभर सुन्न झाला तो . खोटं हसून म्हणाला, "नाही गं , तसं आजिबात नाही . जरा डोकं दुखतंय म्हणून शांत आहे".  "मी ओळखते तुला चांगलं . प्लीज खोटं बोलू नकोस" ती म्हणाली . "बरेच दिवस झाले ना बोलून , कशी आहेस तू".  "अगदी मजेत आहे रे मी. ".  "बाकी एकदम वेगळी दिसायला लागलीय हं तू ".  "सुंदर म्हणायचय का तुला?" असं म्हणून ती नेहमीप्रमाणं जीवघेणं हसली. "बाकी तुझी नौकरी कशी सुरु आहे. काम कसे आहे ?" अशा बघता बघता गप्पा सुरु झाल्या . ५ मिनिटात सगळा अवघडलेपणा गळून पडला . खूप गप्पा मारल्या त्यांनी . किती बोलू नि किती नाही असं झालं होतं दोघांनाही.  एक तो अप्रिय प्रसंग (ब्रेकअप) चा सोडला तर बाकी सगळ्या गोष्टीवर गप्पा झाल्या . मन हलकं झाल्यासारखं वाटले त्याला . खंगून वाळणाऱ्या झाडाला नवी पालवी फुटावी तसं वाटू लागलं अचानक . तेवढ्यात तिच्या बाबांचा फोन आला . फोन झाल्यावर ती म्हणाली "बाबांची कार सर्विसिंग ला दिलीय आज , म्हणतायत कि, रात्री बस नि जाऊ स्टेशन वरून घरी ".  तो म्हणाला "कशाला, मी सोडीन तुला घरी . सांग त्यांना तसदी घेऊ नका म्हणून ". "ओके " ती म्हणाली . 

परतीच्या प्रवासात दोघं सोबत बसली . बऱ्याच अजून गप्पा मारल्या. परत सगळे आधीसारखे वाटत होते त्याला. त्याच अवघड क्षणात कमजोर पडला तो. म्हणाला "आपण पूर्वीसारखं नाही होवू शकणार ? सगळं विसरून". डोळ्यात पाणी तरळले तिच्या एकदम . "नाही रे , सॉरी . पण I have moved on . तू खूप स्पेशल आहेस माझ्यासाठी . पण तुझ्या शेवटच्या फोन वर आपली जी भांडणं झाली त्यात खूप काही बोलून गेलो रे आपण एकमेकांना . खूप खोलवर जखमा झाल्या आहेत मनाला . मला नाही सहन होणार आता परत काही तसे झाले तर . मी माझ्या जीवनात खुश आहे आणि तू तुझ्या . काही तक्रारी नाहीयेत जीवनाकडून आता".  बरोबर होतं तिचं . पण क्षणात ह्रदयाला भगदाड पडले त्याच्या . मन पिळवटून निघाले . खूप राग आला स्वतःचा . का आपण विचारले तिला . का स्वतः च्या स्वाभिमानाशी विश्वासघात केला?  विषादाने तो तिला म्हणाला " हाहा , तू काय सिरियस झालीस काय, अगं मी मजा करत होतो . मी पण प्रेम वगैरे गोष्टींपासून चार हात लांबच राहायचं ठरवलंय". ती काहीच बोलली नाही . मात्र , त्या क्षणापासून सगळे अवघडल्यासारखे होवून बसले.  संभाषण तिथेच खुंटले . 

मुंबईला पोचायला रात्रीचे १० वाजले . पावसाची रिप रिप सुरूच होती. सगळ्या ग्रुप चे निरोप घेऊन झाल्यावर त्याने पार्किंग मधून गाडी काढली आणि तिला म्हणाला  "बस ".  तिच्या घराकडे प्रवास सुरु झाला मोटार सायकल वर.  किती वेळा हा सीन आधी रिपीट झाला होता .  कॉलेज संपलं कि रोज तिला घरी सोडायचा तो.  आज मात्र सगळं वेगळं होतं . रात्रीचं शांत वातावरण . दोघंही अबोल होती . सकाळचा अवघडलेपणा पुन्हा डोकं काढून वर आला होता . नेहमीप्रमाणे ती त्याला बिलगून बसली नव्हती , तिचे केस त्याच्या मानेला गुदगुल्या करत नव्हते , तो मोठमोठ्यांनी जोक्स सांगत नव्हता आणि ती खदखदून हसत नव्हती . पावसांत भिजून चिंब झाले होते दोघेहि. 

शेवटी एकदाचे तिचे घर आले. खाली उतरून ती म्हणाली "Thanks . निघते आता मी . बघ जमलं तर अधून मधून फोन करत जा ". तो उगाच हो म्हणाला .  एक बॉक्स काढून तिने त्याच्या हातात ठेवला . "हे तुझ्यासाठी, माझ्या आवडीचे कफलिंक्स. " त्याने काही न बोलता ते आपल्या पांढऱ्या शुभ्र कुर्त्याच्या खिशात ठेवले. ती पाठमोरी झाली आणि चालायला लागली .  ती दिसेनाशी होईपर्यंत तो तिथेच थांबून राहिला . गाडीला कीक मारून परत निघाला . पावसाने चांगलाच जोर पकडला होता आता . जाता जाता रस्त्यात एक बार उघडा दिसला . दारू न पिण्याचा निर्धार विसरून तो बार मध्ये जावून बसला . व्हिस्की चे दोन नीट पेग रिचवले . आणि बाहेर टपरी वर येवून सिगरेटचा कश मारायला लागला . तिच्या आठवणी राहून न राहून लाटांसारख्या त्याच्या मनाच्या किनाऱ्यावर धडकत होत्या . मधमाशांचे मोहोळ उठावे तशा त्याला डसत होत्या . फार एकटे वाटायला लागले त्याला एकदम . टपरीवरच्या रेडियो वर किशोर गुणगुणायला लागला . " हम बेवफा हर्गीझ न थे , पर हम वफा कर न सके… ". आता मात्र त्याला बांध अनावर झाला . घळाघळा अश्रू वाहायला लागले. पानवाल्याच्या "अरे क्या हुवा साहब . . . सब ठीक तो है ?" कडे दुर्लक्ष करून गाडीवर सवार होऊन निघाला . बास , आता तिला विसरूनच जायचे असा निर्धार केला स्वतःशी .  गाडी मुद्दामहूनच कॉलेज जवळून घेतली .  त्या कट्ट्याजवळ येउन थांबला . इथेच तासंतास बसून पावसाची रिमझिम उपभोगली होती दोघांनी कधी काळी.  कफलिंक्स काढून ठेवले कट्ट्यावर आणि सुसाट घरी निघाला . 

घरी पोचून रेडियो ऑन केला .  आणि कच्चं भिजलेला कुर्ता काढला . पांढरा शुभ्र कुर्ता त्याचा मागून पूर्ण लालभडक झाला होता . तिचा तो लालचुटुक ड्रेस पावसात भिजून त्याच्या कुर्त्यावर आपली छाप सोडून गेला होता. तगमगत उठला तो . भरभरा बकेट मध्ये पाणी काढले , न मोजताच ४-५ चमचे सर्फ टाकलं आणि जीवाच्या आकांतानं डाग धुवून काढायाचा प्रयत्न करू लागला . पण रंग पक्का बेरकी , जायलाच तयार नाही .  अस्वस्थ झाला तो , आता घासून घासून , कुर्ता फाटायचाच बाकी राहिला होता . रंग काही निघायला तयार नव्हता . अगदी तिच्या आठवणीसारखाच… शेवटी कंटाळून, दमून , भागून मुळकुटं करून झोपून गेला बिचारा . रेडियो तसाच सुरु होता .  लता आपल्या जादुई आवाजात गातच होती….  

"तेरे बीना जिंदगी से कोई ,शिक्वा , तो नहीं, शिक्वा नहीं, शिक्वा नहीं, शिक्वा नहीं . 
 तेरे बीना जिंदगी भी लेकिन , जिंदगी, तो नही, जिंदगी नही ,  जिंदगी नही, जिंदगी नही"
   

Tuesday, August 26, 2014

अहो गोविंदशास्त्री!

रविवारची अशीच एक सुस्तावलेली दुपार. पोटास तड लागेपर्यंत जेवण झालेलं. एक छानशी वामकुक्षी झालेली . फावल्या वेळात काय करावं असा विचार करताना सुचले कि चला, आज सतीश मामाला फोन करावा. सातिशमामा माझा सख्खा मामा. एका खेडेगावी शिक्षकाची नौकरी करतो. बऱ्याच गमती-जमती सांगत असतो तिकडच्या . फोनवर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मामा म्हणाला "अरे एक सांगायचं विसरलो. तुझा एक बालमित्र भेटला मला २ दिवसांपूर्वी. कोण असेल सांग पाहू?". आता हे गेसिंग चे गेम मला फार बोर होतात , उगीच त्याचे मन राखण्यासाठी मी २ मिनिटांचा पॉज घेतला, आणि म्हणालो " नाही बाबा ओळखता येत, सांग तूच !". मामा म्हणाला "अरे , तो गोविंद!". माझी सुस्ती एकदम उडाली, उत्सुकता , कुतुहूल अनेक प्रश्नांनी मन भरून गेलं ग़ोविन्द्ला भेटून , त्याच्याबद्दल काही ऐकून जवळपास वीस वर्षं उलटली होती . टिपिकल हिंदी पिक्चर मध्ये दाखवतात तसं मी काही वेळासाठी flashback मध्ये गेलो.माझे शालेय शिक्षण झाले  एका अगदी छोट्या खेडेगावामध्ये . आई आणि वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे घरात थोडं शिक्षणाला पूरक वातावरण होतं . लहानपणापासूनच लिहिण्याची, वाचण्याची , अभ्यासाची गोडी होती . शाळेत एक बऱ्यापैकी हुशार विद्यार्थी होतो. पण एक प्रॉब्लेम होता , मी कितीही घासून अभ्यास केला तरी नेहमी दुसरा नंबर यायचा वर्गात. कारण माझा मित्र गोविंद म्हणजे पहिला नंबर असं समिकरण होतं . अत्यंत कुशाग्र , तल्लख बुद्धीचा हा पोरगा. गणित म्हणजे तर त्याचा जीव कि प्राण . जणू आईच्या पोटातून शिकून आलाय. मोठी अवघड गणितं चुटकीसरशी सोडावयाचा .  माझी एक मावशी गोविंद घरी आला कि त्याला मजेत "अहो गोविंदशास्त्री!" अशी हाक मारायची . तो बिचारा कावराबावरा होऊन जायचा . मला जाम हसू फुटायचं .
                                 गोविंद माझा अत्यंत चांगला मित्र. आमच्यात कधी कोम्पीटिशन नसायची  . ( एक कारण हे हि होते कि तो फारच हुशार होता). पण तरीही त्या वयात जसा वाटतो तसा त्याचा हेवा वाटायचा कधीकधी . वाटायचं ह्याच्यामुळेच आपला कधी पहिला नंबर येत नाही. ह्याचा वडिलांची कुठेतरी बदली झाली पाहिजे, ह्याने शाळा बदलली पाहिजे असे एक नाही हजार विचार यायचे . आता विचार करून हसू येते. आमची मैत्री बाकी एकदम गाढ . दिवसभर त्याच्या घरीच पडीक असायचो . अस्सा मोठ्ठा वाडा . शेणाने सारवलेली जमीन. गोठ्यात दोन काळ्या कुळकुळीत दुभत्या म्हशी . ढणढणत्या चुलीवर भाकऱ्या थापणारी त्याची आई . त्याचे पहिलवान आजोबा . अगदी छान वातावरण होतं ते. खूप खेळायचो . एकत्र अभ्यास करायचो. भांडायचो हि  भरपूर , आणि दुसऱ्या दिवशी परत खास मित्र होवून जायचो.
                          नववीला असताना मी ते  गाव  सोडलं आणि जिल्ह्याचा ठिकाणी शिकायला गेलो . गोविंद तेथेच राहिला . हळूहळू नवीन मित्र झाले .  गोविंद ला विसरायला होवू लागले . दहावीचा निकाल लागला , मला बऱ्या पैकी मार्क्स पडले , अपेक्षेप्रमाणे गोविंद ला खूपच चांगले मार्क्स पडले . योगायोगाने आमचे एडमिशन  एकाच कॉलेजमध्ये झाले . एडमिशन चे सोपस्कार पार पडल्यावर त्याचे वडील त्याला घेऊन माझ्या घरी आले. माझ्या वडिलांनी विचारले "कुठले विषय घेतले तू गोविंद ?". यावर त्याच्या डोळ्यात पाणी तरळले . काहीच नाही बोलला तो. त्याचे वडील म्हणाले "Crop Science ! डॉक्टर बनवायचेय ह्याला . म्हणून गणित वगैरे नाही घेतले विषय . " माझे वडील म्हणाले " अहो , पण त्याला गणित एवढे आवडते ना ?, त्याला विचारले का तुम्ही ?" ते म्हणाले "त्याला काय विचारायचे , अहो ते देशपांडे डॉक्टर बघा , एका पेशंट चे २० रुपये घेतात  तपासायला . दिवसभर पेशंट ची रीघ असते त्यांच्याकडे . काय मान आहे गावात त्यांना . पैशांच झाड आहे झाड त्यांच्याकडे ". माझे वडील निरुत्तर झाले .
                       अधून मधून कधीतरी कॉलेज मध्ये भेटायचा गोविंद . उदास असायचा . गप्प गप्प राहायचा, फारसं बोलायचा नाही . माझ्या आई ला हे सांगितल्यावर म्हणाली " अरे , पहिल्यांदाच घराच्या बाहेर राहिलंय तो. नवीन शहर , नवीन कॉलेज . घराची आठवण येत असेल तत्याला . असं कर तू त्याला घरी घेऊन ये रविवारी . राहू दे इथेच दिवसभर . मन रमेल त्याचे ". त्या रविवारी घरी आला तो, पण शून्यात नजर लावून बसला . फार बोलला नाही . लगेच निघून गेला जेवण करून .  हळू हळू मी माझ्या जीवनात गुंतून गेलो. भेटी गाठी कमी झाल्या आमच्या . अकरावीचा निकाल लागला , गोविन्द्ची आठवण आली . निकालाच्या यादीत मात्र त्याचे नाव कुठेच नव्हतं . तोही कॉलेज  मध्ये दिसेनासा झाला होता .  काही दिवसांनी त्याचे वडील भेटले आम्हाला . गोविंद ची विचारपूस केल्यावर त्यांचा चेहरा खर्रकन उतरला . म्हणाले "वाया गेला पोरगा .वाट्टोळ करून घेतलं !  अभ्यास, कॉलेज सगळं सोडून दिवसभर देव्हारया समोर बसून असतो. कोणाशी बोलत नाही, काही नाही ". गोविंद वर कसला तरी अनामिक ताण, दडपण आलं होतं . मानसिक रित्या अस्वस्थ झाला होता तो. स्वतःभोवती एक कोश विणून घेतला होता त्याने. ४-४ तास देवाची पूजा करायचा . शिक्षण तेथेच सोडले त्याने !
                               काळाच्या ओघात मीही विसरून गेलो त्याला, आणि आज अचानक त्याची आठवण ताजी झाली .मामाला विचारले "कुठे भेटला तुला तो ? काय करतो सध्या ? कसा दिसतोय? " त्यांनी  सांगितले कि  मामाला शाळेच्या कामानिमित्त एक पार्सल पोष्टात द्यायचे होते.  पोष्टात चिटपाखरू नव्हते.  एक मळक्या युनिफॉर्म मधला पोष्टमन जमिनीवर पेपर अंथरून झोपला होता . (आजकाल खेडेगावी पण पोष्ट रिकामं असतं . मोबाईल फोन ची क्रांती! ). मामानी त्याला उठवलं आणि पार्सल दिले . पोष्टमन ने तंबाखू वगैरे मळली आणि गप्पा सुरु केल्या . बोलण्याबोलण्यात समजले कि तोच गोविंद होता . माझा बालमित्र . अगदी आपुलकीनं माझी विचारपूस केली त्याने . लग्न झालेले त्याचे, २-३ मुलं पण आहेत . कसाबसा संसाराचा गाडा ढकलतोय . अजूनही तास न तास देवाची पूजा करतो .  बोलण्यातून हे पण समजले, कि त्याच्या मनावर परिणाम झाला असं समजून घरच्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले. मानसिक आजार बळावत गेला . कसेबसे लग्न उरकून टाकले, ह्या भ्रमात कि जबाबदारी पडल्यावर तर नीट वागेल. पण त्यात काही फारसा फरक नाही पडला .शेवटी कशीबशी , ओळखीने, त्याला एक पोष्टमन ची नौकरी लावली त्याच्या वडिलांनी . आणि संसार चा गाडा ढकलायला मदत केली .
                   त्याचा फोन नंबर घेतला मामाकडून आणि लगेच त्याला फोन केला . बायकोनी उचलला असावा . म्हणाली पूजा करत आहेत. नंतर करा २ तासांनी . परत  फोन केला . अगदी उत्साहात बोलला तो . शेवटी म्हणाला "फार पुढे गेलास महेश, तू मला मागे टाकून . मी बसलोय बघ इथे पत्रं वाटत, शिक्के मारत . " काय बोलावे समजेनासे झाले मला . उगीच  त्याला चांगले वाटावे म्हणून म्हणालो "काही म्हण यार, तुझ्यासारखा गणित तज्ञ नाही भेटला गोविंद".  एकदम उदासीन स्वरात तो उत्तरला "कशाचं काय राव, आयुष्याचं गणित चुकलं सगळं ".  गलबलून आलं आणि पुढे काही बोलावलं नाही . फोन ठेवून टाकला निरोप घेवुन.
              उगाच अस्वस्थ वाटायला लागले. विचार केला ह्या गोष्टीत चूक कोणाची? त्याच्या पालकांची, त्याच्या मनाविरुद्ध स्वप्नं पहिली त्यांनी म्हणून ? त्याला कधी समजून नाही घेतलं म्हणून .  कि गोविंदची चूक आहे, परिस्थिती समोर कमकुवत झाला म्हणून? कि त्या देव्हाऱ्यातल्या दगडाच्या देवाची, जो ढिम्म बसून सगळं पाहत बसला? गोविंद तासंतास हेच प्रश्न तर नसेल न विचारात त्या देवाला?
वाटले कि या वेळी भारतात गेलो कि वेळ काढून गोविंद ला नक्की भेटू . थोडा वेळ विचार केला आणि मग मात्र ठरवले कि नकोच. कधीच नको भेटायला त्याला. माझ्या आठवणींमध्ये असणारा गोविंदच बरा आहे. तो तसाच ठेवायचाय . मामाला केलेला फोन विसरून जायचा आहे . घराच्या छतावर हुंदडणारा , घातांक , अपूर्णांक , व्यास, क्षेत्रफळ यात रमणारा, (७५३ X ५६४ / ३६३) चे उत्तर क्षणात सांगणारा, तेजपुंज डोळ्याचा, "अहो गोविंदशास्त्री " म्हटलं कि लाजणारा गोविंद…  तो तसाच आठवणीत ठेवायचा आहे मला . तो पहिला नंबर अजूनही त्याच्याचसाठी राखून ठेवायचाय मला…!

[काही पात्रांची नाव बदलली आहेत. ]


    

Monday, August 25, 2014

ब्रम्हराक्षसाच्या पाठी …

भित्यापाठी ब्रम्हराक्षस ! ही म्हण शिष्यवृत्ति परीक्षेला ची तयारी करताना चौथी मधे बऱ्याच वेळा घोकुन घोकून पाठ केली होती. म्हणायला खुप मजेशीर वाटायची.  नजरेसमोर असा दंडुका घेतलेला राक्षस एका "फाटलेली हातात घेऊन" पळणाऱ्या माणसाचा पाठलाग करतोय अस दृश्य यायचं, पण म्हणी चा अर्थ बऱ्याच अनुभवानंतर उमगला.  


जीवनात, बऱ्याचदा काही गोष्टी , अडचणी अशा असतात की त्या पार पडल्याशिवाय , सोडवल्याशिवाय पर्याय नसतो. पण आपण काहीतरी कारण काढून त्यांच्याकडे दुर्लक्ष करात राहतो ,उद्यावर ढकलत रहतो. खरे कारण हे असते की एकतर ती गोष्ट करायला आपल्याला अजिबात आवडत नसते ( सुरु करण्याच्या आधीच आपण काहीतरी पूर्वाग्रह करून  घेतलेला असतो) , किंवा एखादी अनामिक भीती असते की ती गोष्ट आपल्याला करायला जमणार नाही.  हळुहळू ती  गोष्ट अंधाऱ्या खोलीमधला कधीच न पाहिलेला राक्षस बनून जाते. जसजसे दिवस जातात तसतसे आपण त्या खोलीसमोरून रोज जातो पण दुर्लक्ष करतो, घाबरतो. पण तो विचार, कि आपल्याला आज ना उद्या त्याचा सामना करावा लागणार आहे , आपल्याला अस्वस्थ करून सोडत राहतो. दिवसेंदिवस तो राक्षस आपल्या दुर्लाक्षावर , भीतीवर पोसत मोठा होत जातो. अस्वस्थपणाची पुट मनावर चढतच राहतात . दुसऱ्या चांगल्या गोष्टींवर पण तो हळू हळू आच्छदायला लाग्तो.

शहाणी लोकं शेवटी कधी न कधी त्याला सामोर जातात, त्या बंद खोलीचं दार उघडतात त्याचा सामना करण्यासाठी , आणि शंभरापैकी नव्याण्णव वेळी तो राक्षस नाही तर एक भित्रा मरतुकडा उंदीर निघतो. मग वाटते कि ह्याला आधीच चेचून टाकले पाहिजे होते, उगाच एवढ्या दिवस वाट पहिली, अस्वस्थ झालो. कितीतरी चांगले क्षण वाया घालवले ह्याच्या नादात. उलट कमकुवत लोकं आपलं सगळं जीवन अशा काल्पोकाल्पित राक्षसांना घाबरून वाया घालवतात. बरीच उदाहरणं पहिली आहेत मी.

हे सगळं सुचलं कारण ऑफिस मधलं एक काम बऱ्याच दिवसांपासून करायचे राहिले होते. रोज चालढकल करीत होतो. उद्यावर ढकलत होतो. खरं कारण होतं कि ते काम मला आजिबात आवडत नव्हते.  डेडलाईन तर जवळ जवळ येत होती.  दुसरी कामं करताना पण तो विचार नेहमी डोकं कुरतडत असायचा . आज ठरवले की बास ! आता काही झाले तरी हे काम हातात घ्यायचे. आणि आश्चर्य काय २-३ तासांत अर्धे काम संपले. पहिल्याच दिवशी याला सामोरं गेलो असतो तर किती बरं झालं असतं . असो. …

विक्रम जाचक म्हणून एक मित्र होता माझा बारावीत . तो नेहमी म्हणायचा कि मी कुठल्याही विषयाचा अभ्यास दोन वेळा सुरु करतो. म्हणजे पहिला चाप्टर वाचून सोडून देतो. का? कारण Well begun is half done. दोन वेळा सुरु केले कि  संपला पूर्ण अभ्यास. निकाल आल्यावर मात्रं त्याला साक्षात्कार झाला कि Aristotle ने त्याची घोर फसवणुक केली आहे.  विनोद बाजूला ठेवला तर विक्रम ची थेअरी बरयाच अंशी बरोबर आहे.  एखादे काम पहिल्यांदा करावेसे नाही वाटले तर परत करायला घेतले पाहिजे . काय माहिती , दुसर्या वेळी ते एवढे सोपे वाटेल की खरच संपून जाईल .

किती तरी गोष्टींचा मी पण ब्रम्हराक्षस बनवून ठेवला होता . मोठ्या शहरात शिकायला जाण्याचा, लहानपणी घरी एकटा झोपण्याचा , सकाळी हिंस्त्र कुत्री असलेल्या गल्ली मधून मार्ग काढत शिकवणी ला जाण्याचा , इंग्लिश बोलण्याचा , चार लोकांमध्ये आपली मतं मांडण्याचा , अनोळखी व्यक्ती सोबत संसार थाटण्याचा , न आवडणारी नोकरी सोडण्याचा , पहिला विमान प्रवास करण्याचा , पहिल्यांदा मुंबई ला एकटे जाण्याचा, जेवण बनवायला शिकण्याचा , अगदी जवळच्या मित्रांपासून, व्यक्तींपासून दूर होण्याचा … एक नव्हे हजार गोष्टी. जोपर्यंत त्यांना सामोरं नाही गेलो तोपर्यंत त्या प्रचंड अशक्य वाटायच्या .

भीती अजूनही बऱ्याच गोष्टींची वाटते . नाही असं नाही . पण अनुभूवांती हे माहिती झालाय कि फक्त त्यांना सामोर जाण्याचा अवकाश आहे . त्या आपोआप दूर होतात. घाबरून पळून जातात .  ती जाहिरात आहे न कुठली तरी…  "डर के आगे जीत है ". एकदम बरोबर !!!

चला मग उघडणार ना ते दार?

Saturday, August 23, 2014

यादोंकी बारात ….

आरंभ हो प्रचंड!!!! शेवटी एकदचा मुहूर्त लागला माझ्या ब्लॉग लिहीण्याचा...

सुरूवात कुठून करायची हा प्रश्न होताच ... बर्‍याच दिवसापासून काहीतरी लिहीण्याचा कीडा डोक्यात वळवळत होता. पण ते म्हणतात ना नकटी च्या लग्नाला सतराशे विघ्न  ! तसाच काहीतरी प्रकार चालला होता.  मध्ये बर्याच वर्षापूर्वी एक इंग्लिश मध्ये ब्लॉग  लिहिण्याचा प्रयत्न केला होता , पण मला जाणवले कि मराठी मध्ये आपण जास्त परिणामकारक लिहू शकु. असो… 

प्रयोजन असे कि बर्याच चांगल्या वाईट आठवणी, घटना, लक्षात राहणारे प्रसंग , कुठेतरी लिहून ठेवावे, असे मला खूप प्रकर्षाने वाटते. पूर्वी बरेच लोक डायरी लिहयाचे. तसंच . काही वर्षापुर्वी , माझे वडील गेले तेव्हा घरातून बरेच जुने सामान बाहेर काढले. खजिना सापडला आठवणींचा ! खास करून मी पुण्याला शिकायला असताना माझा झालेला पत्रव्यवहार. मित्रांना , आईला ,वडिलांना, बहिणीला लिहिलेली पत्रं.  एवढी पारायण केली त्यांची कि काय सांगू . आणि तेव्हा वाटले कि अजून जास्त का नाही लिहिली मी पत्रं तेव्हा . कारण, काही आठवणी मनात राहतात आणि थोड्या दिवसांनी अर्काइव ( मराठी शब्द नाही माहित archive साठी  ) होऊन जातात. पत्रं , ब्लॉग च्या स्वरूपात त्या नेहमीसाठी जतन केल्या जातात . अधून मधून त्यांचा आस्वाद घेत येतो . ताण तणावानी  भरलेल्या दिवसाच्या शेवटी एखादे असे पत्र, आठवण किंवा ब्लॉग पोस्ट मूड बदलून टाकते . दुसर्या दिवशी च्या ताण तणावाला सामोर जायची एनर्जी देते. म्हणून हा अट्टाहास… 

जुन्या मित्रांना फोन केला, कधी भेटलो कि पहिली १५ मिनिट फक्त आणि फक्त जुन्या आठवणी काढून हसण्यातच जातात . बरयाच  वेळी  मला जाणवते कि काही गोष्टीवर आपण एखाद्या मित्रासोबत खूप हसलेलो असतो , पण थोड्या फार वर्षांनी काहीजण ते सर्व विसरून जातात. आठवण करून दिली तर बळे बळेच "हो हो आठवले " वगैरे म्हणतात  :). पण काही झाले तर त्या प्रसंगावर हसतात मात्र भरपूर. 

काल V . G. ला फोन केला . बहुतेक ६-७ वर्षांनी आम्ही बोललो असू . आम्ही आमचे करीअर एकाच कंपनी मध्ये सुरु केलेले . ऑफीस म्हणजे एक छोटेखानी बंगला होता . इन मीन १५ लोकं असतिल. भारी कंपनी होती एकदम, १० मिनिट उशीर झाला तरी लेट मार्क लागायचा ( स्पेशल लाल शाईच्या पेन ने!). तर VG ला कधी उशीर झाला तर कंपनीत चोर पावलांनी यायचा आणि हळूच सीट वर बसायचा . आणि मग मी मुद्दामहून जोरात ओरडयचो "गुड मोर्निंग VG , काय आज उशीर झाला वाटते !". आणि सगळ  ऑफिस  जोर जोरात हसायला लागायचं  . VG चा चेहरा बघण्यासारखा असायचा . कधी लवकर जायचे असले किंवा थोड्या वेळासाठी बाहेर जाऊन यायचे असले कि पार्किंग मधून स्कूटर काढायचा पण सुरु न करता कंपनी च्या गेट बाहेर ढकलत न्यायाचा ! का तर ऑफीस मध्ये कुणाला ( बॉस ) ला कळू नये म्हणुन . गाडी बाहेर सेफ distance ला आल्यावर किक  मारून निघायचा . 

दत्ताभाई ( अजून एक सहकारी) च्या चष्म्याची एक काच निघून पडलीय हे त्यांना दिवसभर नाही कळले . चार वाजता रुमालानी चष्मा साफ करताना रुमाल डायरेक्ट डोळ्यात गेला आणि मग त्यांना भान आले कि च्यायला म्हणूनच सकाळ पासून स्क्रीन अस्पष्ट दिसतेय!!!  या आठवणि काढून बरच हसलो आम्ही . अजून हि बऱ्याच होत्या पण इथे लिहिण्यासारख्या नाहीयेत :)

आठवणींचे सोनेरी कण,  काळाच्या तुरटी ने कुठेतरी मनाच्या डोहात कुठेतरी खोल जाउन स्थिरावले गेलेत. पाणी ढवळून काढायचा विचार आहे !!! ( कादर खान वगैरे टाइप चा डायलॉग तयार झाला हा तर. असो … )

जाता जाता विशेष आभार "V" चे . नकटी च्या लग्नातलं एक मोठे विघ्न - "मराठीत कसे टाइप करायचे?" दूर केल्याबद्दल (Quillpadची ओळख करून दिल्याबद्दल ) 

तुम्हा सर्वांसाठी अपार आनंदाची प्रार्थना !!! भेटूच लवकर … 
  
marathiblogs