Saturday, September 27, 2014

एकवीस वर्षांपूर्वी...

२९ सप्टेंबर १९९३ 

-----------------------------------------१----------------------------------

"गोदावरी जगताप !", नर्सने नाव पुकारताच एकदम भानावर आली ती. अगदी हायसं वाटलं तिला. वाट बघून बघून कंटाळा आला होता. सकाळी नऊ वाजल्यापासनं वाट बघत होती ती. २ तासांनी आत्ता कुठे नम्बर आला होता तिचा. देशपांडे बाईंकडे नेहमी अशीच पेशंटची रीघ असायची.  आत घाबरत घाबरतच गेली , देशपांडेबाई मान वर न करताच म्हणाल्या
"बस गं , गोदावरी!"
"म्याडम, जाउद्या मी उभीच बरी हाय. काय रिझल्ट आला ओ त्या टेष्टचा?"
"पेढे दे गोदे ! पेढे ! पोटुशी आहेस तू ! मुल होणार आहे तुला !"
आनंद गगनात मावेना गोदावरीचा ते ऐकून. गप्पकन पाय पकडले तिने देशपांडे बाईंचे.
"देवादुतावानी बातमी सांगितलीत म्याडम! पाय्हजेल तेव्हढे पेढे देते बघा !"
"अगं , पाय सोड आधी. आणि , असं एकदम हालचाली करणं बंद कर आता. नीट काळजी घे स्वतःची"
दवाखान्यातून बाहेर पडताना जणू अस्मानात तरंगत होती गोदावरी.  बारा वर्ष ! जवळपास एक तप झालं म्हणजे! एवढ्या दिवसांनी पाळणा हलणार होता तिच्या घरात. सगळी आशा सोडून दिली होती गजाननरावांनी आणि तिने. डॉक्टर झाले , वैद्य झाले , देवं झाली, नवस झाले. पण काही फायदा नाही. 'देवा, लई वाट बघायला लावलीस रं, पण पावलास रं बाबा शेवटी !' मनात म्हणाली ती.
गजाननराव तर तालुक्याच्या गावी गेले होते. कधी एकदा त्यांना भेटून हि बातमी सांगावीशी वाटत होती. पण उद्यापर्यंत वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. औषधं घरी ठेवताना एकदम घड्याळाकडं लक्ष गेलं तिचं, 'अगं बया, साडे अकरा झाले, पाहुणे येणारच असतील. लाडू बांधायला बोलावलंय सोनावणे बाइंनी, घाई करायला पाह्यजे.'  असा विचार करत लागाबगा ती सोनावणे बाईंच्या घराकडे पळाली.

गावातल्या बसस्टेंड ला अगदी लागून तो वाडा होता. मोजून सहा घरं होती वाड्यात. डावीकडून सुरु केलं तर जगतापांचं पहिलं घर. गजाननराव जगताप आणि गोदावरी जगताप , दोघंच रहायची तिथे. बारा वर्षं झाली लग्नाला, मुल बाळ नाही अजून , म्हणून परेशान असायची. पण यापुढे नाही.

-------------------------------------२---------------------------------------

दुसरं घर सोनावणे बाईंचं .  नवरा मास्तर होता, बाजूच्या गावात. दिवसभर पोरांना संस्काराचे धडे शिकवून रात्री जाम पिउन यायचा. पाच मुलं. सगळ्यात मोठी संतोषी, बावीस वर्षाची झाली होती. तिचं अजून लग्न जमत नाही म्हणून अस्वस्थ वातावरण होतं घरात. दिसायला अगदी नक्षत्रासारखी, पण कुंडलीतला मंगळ आडवा येत होता. सगळ्यात छोटा , शेंडेफळ म्हणजे शंभू, सहा वर्षाचा. फार म्हणजे फारच जीव या जोडप्याचा शंभूवर. चार मुलीनंतर झालेला एकुलता एक पोरगा म्हणून.
 'माझ्या संतोषीनं नशीब काढलं!', सोनावणे बाई विचार करत होत्या.  'पोराचं किराणा दुकान हाय म्हनं, ते पण अगदी गावात. दीड-दोनशेचा तर कमीत कमी धंदा होतोय रोज म्हनं.  सासूचा तरास नाही, घरात फक्त सासरा आन नवरा. कामाचा ताण भी नाय पडणार संतोषीवर. काय बी असू, तशी कामाला वाघ हाय माझी पोर. आज जर पसंद केली पावण्यानी तिला , तर ११ नारळाचं तोरण बांधीन रे नीलकंठेश्वरा !' सोनावणे बाई मनाशी म्हणाल्या. 
"वैषे, बघ गं संतोषीचं आवरून झालं कि न्हाय ते?" त्या म्हणाल्या.

गेला अर्धा तास स्वतःकडे न्याहाळून बघत होती संतोषी.  'काय कमी आहे माझ्यात , म्हणून एवढी वाट बघायला लावतोय रे देवा ? वर्गातली एक तरी पोरगी एवढी चांगली दिसते का सांग बरं. मग मलाच का कुणी पसंद करत नाही मग ? ह्या वेळी पसंती येवू दे तिकडून.  खरं सांगते, मायनं सांगीताल्यावानी तिचा शालुच नेसते लग्नामध्ये. नको नवीन साडीचा हट्ट मला. जाउदे, चला अण्णांच्या पाया पडून घेते'  म्हणून ती वडिलांच्या खोलीकडे निघाली.

'देवा, लई चुकतंय रे माझं, पण काय करू हि दारू सुधारु देत नाही. ' सोनावणे गुरुजी विचार करत होते. 'काल रात्री म्हणे मी शम्भूच्या कानफटात वाजवली! आठवत पण नाही मला. हात का नाही तुटले माझे ते करण्याआधी ? आजकाल काही ताळतंत्रचं नाही राहिला स्वतःवर. शंभू व्हावा म्हणून काय देव देव आणि नवस नाही केले , आणि त्याच्यावरच हात उचलला आपण? रुसून बसलंय पोर बिचारं कालपासनं. आज सकाळी जाउन त्याच्या आवडीचे काळे बूट आणले , पण ढुंकूनही नाही बघितले त्यानी त्याकडे.  उद्यापासून दारू सोडायची.  बास झालं आता. '  तेवढ्यात संतोषी आशीर्वाद घ्यायला खोलीत आली.
"शंभू , जा रे , जरा राणीताई ला बोलावून आन. म्हणावं, ती तोहफा मधल्या जयाप्रदा सारखी वेणी घालायाचीय संतोषीताईला!" संतोषीने शंभू ला फर्मान सोडलं. 'लहान आहे , म्हणून सगळेजण मलाच पळवतात.' शंभू विचार करत होता. 'आबांनी काल का मारलं तेच कळत न्हाई! चुकून आपला बॉल त्यांच्या वरणाच्या वाटीत पडला, म्हणून काय एवढं जोरात हाणायचं ? अजूनपण कानानी नीट ऐकू येईना गेलंय. बाकी, ते काळे बूट लय भारी आणलेत आबांनी.  पण लय राग आलाय त्यांचा, म्हणून बघितलं बी नाही तिकडे . पण हळूच त्यांची नजर चुकवून घालून बघणार आहे एकदा. जमलं तर उद्या शाळेतबी घालून जातो. संज्याची लय जळणार हाय माझे बूट बघून, एवढं मात्र नक्की' विचार करत करत राणीच्या घरी पोचला तो.

---------------------------------३-----------------------------------------

ते तिसरं घर होतं,कांबळे काकांचं. काका आणि त्यांची एकुलती एक मुलगी राणी दोघंच राहायची तिथे.  राणीची आई दोन वर्षापूर्वीच कॅन्सरने वारली होती. फार जीव बापलेकीचा एकमेकांवर. पण वयाप्रमाणे , राणी गेल्या दोन महिन्यांपासून बाजूच्या भोसलेंच्या बंडूच्या प्रेमात पडली होती. खूप आवडायचा तिला तो. पण लहान गावात प्रेम प्रकरण वगैरे जरा अवघडच असतं.  लगेच लोकांना कळतं, चर्चा होते.  'काल तर मीनाच्या आईनी बघितलं त्या गोठ्यामागं , आपल्याला नि बंडूला! चिठ्ठ्या देऊनच बोलावं लागतं तसं बी आम्हाला.  उघडं बोलायची सोय नाही. आणि वर ह्या मीनाच्या आईला सकाळी सकाळी शेण लागतं गोवऱ्या थापायला.  जाउदे, शेवटचा दिवस आजचा, उद्या सगळ्यांची तन्तरुन जाइल मी आन बंडू पळून गेल्यावर. आमचं लगीन होत आसंल तुळजापुरात आणि हिथं बसली असतील सगळी तर्क वितर्क करत. एक अण्णांचंच तेव्हड वाईट वाटतंय. काय वाटेल त्यांना मी पळून गेलेय असं कळाल्यावर ? जावूदे, पुढच्या आठवड्यात येणारच हाय परत  महाबळेश्वरहून. समजूत काढली तर ऐकतील, राग पळून जाइल लगेच.  ते हनिमून कि कशाला महाबळेश्वरला घेऊन जाणाराय म्हनं बंडू.  जितेंद्र हाय माझा तो.  एका साईडनं अगदी त्या मवाली मधल्या जितेंद्र सारखा दिसतो.  मज्जा येणार हाय त्याच्यासोबत.  आई भवानी , नीट पार पडू दे गं सगळं! खणा नारळानं वटी भरीन तुझी!'
'राणी ताई , संतोषी ताई बोलावायलीय तुला , ती कसली तरी वेणी घालाय्चीय म्हनं तिला. "
शंभूचा आवाज येताच राणी तयार व्हायला लागली. 'संते , तुझ्यासारखं छान लगीन थोडीच नशिबात असतंय बाई सगळ्यांच्या !' असं म्हणून आरशात पाहून गंध लावायला लागली. 'जाउदे,  तुझ्या मागनं माझा नंबर आधी लागतोय बघ. चट मंगनी न पट शादी ! माझ्या जितूला ला लई आवडते मी असा शिरीदेवीसारखा गंध लावते तवा. ' ती आरशात पाहून विचार करत होती.

--------------------------------------४--------------------------------------

चौथं घर भोसल्यांचं .  जेवढा शांत भोसले काका, तेवढीच कजाग भोसले काकू.  बंड्या एकुलता एक पोरगा त्यांचा. 
"श्यान्नव कुळी हाओत आपण! लाज नाय वाटत म्हाराच्या पोरीसोबत लगीन लावून द्या मनायला ?" भोसले काकू तळमळीने बंड्याला बोलत होत्या. बंड्याला एकदम जितेंद्र वगैरे झाल्यासारखे वाटत होते.
"जात पात मानत न्हाई मी. सच्चा इश्क किया है राणी के साथ. तुला काय कळणार म्हातारे.  परवानगी न्हाय मागत , सांगतोय तुला. परवानगी दिलीस तर हिथं वाड्यात मंडप लागंल न्हाईतर तुळजापुरात, सांगून ठेवतोय !. ठरीव आता काय करायचं"

भोसले काका आजीबात लक्ष न देता शिवाजी महाराजांच्या फोटो खाली बसून प्लेट मधला शिरा संपवत होते. भोसले काकांचा हिरो होता बंड्या. आयुष्यभर काकुंना जे बोलू शकले नाही ते बंड्या बोलायचा. अजिबात घाबरायचा नाही. काकांची बंड्याच्या प्रत्येक गोष्टीला मूक संमती असायची.  राणी त्यांना मनापासून आवडायची. बंड्याला राणीपेक्षा चांगली मुलगी नाही मिळणार हे त्यांना अगदी पटले होते.  सकाळीच जाउन तुळजापूरची दोन रिजर्वेशन चांगली दोन तास लायनीत थांबून काढून आणली होती त्यांनी बसस्टेंडवरून . आज रात्री काकू झोपल्या, कि बंड्याच्या हातात ते तिकिट ठेवणार होते ते. "आयुष्यभर हिने वैताग दिला मला फक्त. मनाचं काहीच नाही करू शकलो मी. हि घे तिकीट, आणि जा निघून. राणीसारखी पोरगी नको घालवू हाताची. जात पात महत्वाची नाही , तर मनं , स्वभाव महत्वाचा असतो", असं सांगून बंड्याला घरातनं रवाना करणार होते.
महाराजांच्या फोटो समोर हात जोडून काका म्हणाले " शक्ती द्या महाराज. यश द्या माझ्या बंड्याला. "
"बंड्या , चल रे, मंडळाचा गणपती निघालाय विसर्जनाला." बाहेरून मित्रांची हाक येताच बंड्या शर्टाच्या गुंड्या लावत बाहेर पडला. आज एकच मागणं होतं बप्पांकडे त्याचं , 'राणीशी संसार थाटायला मदत कर रे बाबा मोरया!'
रागारागानी भोसले काकू पण पोतदार बाईंकडे निघाल्या. त्यांनीच तर सांगितलं होतं बंड्या आणि राणी बद्दल सगळं . 
----------------------------------------५------------------------------------

"आहेत का मीनाच्या आई घरात?" भोसले काकूंचा आवाज ऐकून पोतदार बाईंनी दार उघडले.

 पाचव्या घरात राहायचे पोतदार कुटुंब. पोतदार गुरुजी तालुक्याच्या गावी शिक्षक, एकदम अबोल स्वभाव. चार मुली अन दोन मुलं. सगळ्यात मोठी मुलगी तिचं नाव मीना. म्हणून पोतदार बाईंना सगळ्या वाड्यात "मीनाची आई" म्हणूनच ओळखलं जायचं. नवऱ्यावर फार जीव त्यांचा.  गेल्या वर्षी नवऱ्याचं डायबेटीसचं निदान झाल्यापासून, एकही  गोष्ट गोड नव्हती लागत पोतदार बाईंना.  कारण म्हणजे पोतदार गुरुजींना गोड पदार्थ खूप आवडायचे.  बाई त्यांना रोज काही न काही गोड करून द्यायच्या. पेढे , बासुंदी , शेवयाची खीर अगदी काहीच नसेल तर कमीत कमी सुधारस तरी असायचाच.  गेले एक वर्ष झालं घरात काही गोड धोड बनलं नव्हतं. आज अगदी एवढी अनंत चतुर्दशी असून साधे मोदक सुद्धा नव्हते केले. खूप जीव तुटायचा पोतदार बाईंचा. वाटायचं, नवऱ्याला काय काय गोड धोड बनवून खाऊ घालावं! पण हाय रे डायबेटीस. 
पण कालच गुरुजींच्या पगार वाढीची गोड बातमी मिळाली होती. महिना चक्क २०० रुपये वाढले होते.आणि गेल्या एका वर्षाची थकबाकी म्हणीन २४०० रुपये पण मिळणार होते. आनंद गगनात मावत नव्हता त्यांचा. म्हणून पोतदार बाईंनी सरळ सांगून टाकले. 
"हे बघा , मी उद्या तुमच्या आवडीचे गुलाबजाम करायचं ठरवलंय. आज किती दिवसांनी अशी छान बातमी ऐकायला मिळालीय. आज रात्री तयारी करते मी. उद्या शाळेतून आलात कि गरम गरम गुलाबजाम खायला घालते. जीव आसुसला असेल न हो तुमचा काही तरी गोड खायला? मी मेलीने मात्र काल चक्क २ जिलेबी खाल्ल्या हळदी कुंकाला गेले होते जगतापांकडे तर!" असं म्हणून डोळ्याला पदर लावला त्यांनी.
पोतदार गुरुजी मात्र जाम खुश होते. उद्याचे गुलाबजामचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. गेल्या एक वर्षाचा गोडधोडाचा उपवास सुटणार होता उद्या. मनातल्या मनात गणपती बाप्पाला नमस्कार केला त्यांनी. 
"अगं , त्या बाजूच्या पिंकी द्यायला विसरू नको बरं का गुलाब जाम . तिलाही फार आवडतात." ते म्हणाले.

-------------------------------------६------------------------------------

सहावं आणि शेवटचं घर घोडकेंच. घोडके काका लोहाराचं काम करायचे. बैलाची नाल , बैलगाडीच्या चाकाची आरी वगैरे असल्या गोष्टींसाठी सगळं गाव त्यांच्याकडे यायचं. पण बायकोच्या आजारपणात सगळी कमाई जायची. बायको अंथरुणाला खिळून, दम्याने त्रस्त.  एकुलती एक पोरगी पिंकी , तिची मात्र खूप हेळसांड व्हायची. वेळेवर खायला नाही मिळायचं, पैशांची चणचण तिला अगदी लहान वयातच कळाली होती. अकाली वयातच प्रौढत्व आलं होतं तिला. तशी , फारच समजूतदार मुलगी होती.  
तिच्या शाळेची सहल जाणार होती पुढच्या आठवड्यात सोलापूरला. उद्यापर्यंत शाळेत पैसे जमा करायचे होते. पस्तीस रुपये ! तिला तर अप्पांचा चेहरा बघूनच कळले कि नाही जमणार हे. तरीही अप्पा म्हणाले , " बघतो, मी काही जमतेय का". तिला माहिती होतं कि नाही जमणार.  फक्त गोड हसून ती म्हणाली
" नाही अप्पा,माझाही खूप अभ्यास राहिलाय, मलाच जायचे नाही सहलीला. तुम्ही नका विचार करू त्याचा. " 

सकाळपासनं हातोडीचे घाव ऐरणीवर नाही तर स्वतःच्या काळजावर बसल्यासारखे वाटत होते घोडके काकांना. ' पिंकीचं लय वाईट वाटतंय. तिचं वय काय, करावं काय लागतंय तिला. बाराव्या वर्षी तीन लोकांचा सगळा स्वयंपाक करते. आजारी आईला काय हवं नको ते बघते. एवढं करून शाळेत पयला नंबर दर वर्षी. कदी नाही ते पोरीनं कायतरी मागितलं आणि आपल्याला नाही जमत. थु हाय आपल्या जिंदगीवर! ते काय नाही , काही करून पिंकी ला सहलीला पाठवायचं. आजच भोसले साहेबांना विनवणी करून एक पन्नास रुपये उधार घेतो. पण पिंकीला सहलीला पाठवणारच!"
तो विचार करून घोडके काकांना बरे वाटले. 
"पिंके , जा ग सहलीला , उद्या सकाळी शाळेत जायच्या आधी देतो पैशे तुझ्याकड"
अप्पांचे बोल ऐकून पिंकीच्या मनात आनंदाचे कारंजे उडाले. मन थुइथुइ नाचायला लागलं. कधी एकदा मैत्रिणींना ही गोष्ट सांगतेय असं झालं. देव्हारातल्या साईबाबा च्या मूर्तीला हात जोडून नमस्कार केला आणि कणिक तिम्बायाला घेतली तिनं.  

---------------------------------------------------------------------------

३० सप्टेंबर १९९३ 

गाडीला करकचून ब्रेक लागला , आणि मला जाग आली. डोळे उघडून पाहतो तो तर वाहनांची लांबच लांब लाईन लागलेली. पोलिस, चेकिंग केल्याशिवाय एकही गाडी पुढे सोडत नव्हते.
"पर्मिशन हाय का ? नसंल तर ट्रक वळवायचा हिथनंच म्हागं!" हवालदार म्हणाला. 
उत्तरासाठी ड्रायव्हरने माझ्याकडे बोट दाखविले.  खिशातला कागद काढून हवालदाराकडे दिला मी. 
"कलेक्टरची परमिशन आहे.  जाउद्या लवकर प्लीज"
कागद न्याहाळून बघत हवालदार म्हणाला.  
"कुटले , किल्लारीचे का तुमी? लय वंगाळ झालं बगा. होत्याचं नवतं केलं या भुकंपानं!"
"हो, किल्लारीचे आम्ही"
"घरचे सगळे बरे तर हायत नव्हं ? कुणालाबी इचारा , २-४ मानसं तर गेलेलीच हायत घरातली"
"नाही, देवाच्या कृपेने सगळे बरे आहेत, आज सकाळीच माझे आई वडील लातूरला पोचले. पण घाई घाईत घराला कुलूप सुद्धा लावायचं राहिलं. महत्वाची कागदपत्रं , आणि थोडं सोनं नाणं तसेच आहे कपाटात. राहिलं असेल आत्तापर्यंत , तर शोधून घेऊन जावे म्हणून चाललोय किल्लारीला. "
"असं व्हय , चला जावा बिगीबिगी", असं म्हणून हवालदाराने आमची सुटका केली.       
सकाळचा प्रसंग काही केल्या डोळ्यासमोरून जात नव्हता माझ्या. सकाळी चारच्या सुमारास भूकंपाने घर हादरले तेव्हापासून जागाच होतो. लातूरला एवढा धक्का बसला तर किल्लारीला काय झाले असेल म्हणून माझी बहिण तेव्हापासून रडतच होती. टेन्शन तर मला पण जाम आले होते. आई वडील किल्लारीलाच असायचे. काय झाले असेल त्यांचे, हा विचार पोटात गोळा आणत होता. शेवटी सात वाजता एका सायकल रिक्षामधनं दोघेही घरी आले तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला. अंगावरच्या कपड्यावर तसेच आले होते ते. काही सामान सोबत न घेता , जीव मुठीत घेऊन, पहिले वाहन मिळेल ते घेऊन लातूरला आले होते. आम्हाला पाहताच, ताईला जवळ घेऊन खूप रडले वडील. त्यांना माझ्या जीवनात पहिल्यांदाच रडताना पाहत होतो मी. भूकंपाचे त्यांनी सांगितलेलं वर्णन ऐकून अंगावर काटा आला आमच्या. थोड्या वेळानी , माझे काका आणि मी किल्लारीला जायचं ठरलं. सगळं सामान , स्पेशलि कागदपत्रं आणि, सोनं-नाणंतरी परत घेऊन येवू असा विचार होता.
गावात पोचल्यावर बघवत नव्हतं काहीच. आक्रोश, ती झालेली पडझड, मदतकार्याचा गोंधळ खरंच काही बघवत नव्हतं.  गाव ओळखूच येत नव्हतं मला. घरातलं समान गोळा करून झालं . ट्रक मध्ये चढवलं. सुदैवानं आमचं घर सिमेंटचं असल्यामुळे माझे आई वडील सुखरूप राहिले होते. अगदी गेल्याच वर्षी जुन्या वाड्यातून नवीन घरी शिफ्ट झाले होते.  परत निघताना विचार केला, जरा जुन्या वाड्यात तर जाऊन येवू. आपले जुने शेजारी वगैरे , त्यांचे काय हाल आहेत विचारून येवु. ड्रायवरला थोडा वेळ थांबायला सांगून काका व मी वाड्याकडे निघालो. दगड मातीच्या चा खचातून कसाबसा रस्ता काढत तिथे पोचलो.

वाडाच नव्हता तिथे! सगळा जमीनदोस्त झाला होता. फक्त दगड मातीचा डोंगर राहिला होता. बाजूला १०-१२ प्रेतं पांढऱ्या कपड्याखाली झाकून ठेवली होती.  जगताप काका डोक्याला हात लावून बसले होते.
"एक माणूस आहे हो आमच्या घरचा अजून मातीखाली, माझी बायको. काढा हो तिला!"  मदतकार्या साठी आलेल्या जवानांना विनंती करत होते. बिचाऱ्या जगताप काकांना माहितीच नव्हतं की , एक नाही तर दोन जीव अडकलेत मातीखाली. आज जगताप काकू त्याचीच गोड बातमी सांगणार होत्या.
सोनावणेच्या घरी फक्त सोनावणे काका वाचले होते. ते पण डोक्याला हात लावून सुन्न बसले होते. "शंभू शंभू" एवढंच पुटपुटत होते. एवढा मोठा धक्का! दारू सुटणार नाही त्यांची आता आयुष्यभर.  कसं पचवायचं हे सगळं ? कांबळे , भोसले दोन्ही कुटुंब गायब होती ,  जात काय न पात , शेवटी एकाच मातीत मिसळली होती दोन्ही कुटुंब ! आणि त्यांचं न जोडलं गेलेलं नातंही. पोतदारांच्या घरी फक्त पोतदार काका गेले होते, गोड खायची इच्छा अपुरी ठेवूनच.  पोतदार काकू भोवळ येउन पडल्या होत्या. मुलं आक्रोश करत होती.  घोडकेंच्या घरी, काका एकटेच बचावले होते . आजिबात रडत नव्हते ते. पाणी आटलं होतं डोळ्यातलं त्यांच्या बहुतेक. राहून राहून खिशातली पन्नासची नोट चाचपत होते , तेवढाच एक त्यांच्या जिवंत असण्याचा पुरावा होता.

बाजूला, सगळ्यांच्या संसारातल्या सापडतील त्या गोष्टींचा ढीग रचून ठेवला होता. त्यात जगताप काकूंनी नुकतेच विणायला घेतलेलं स्वेटर होतं.  संतोषीचा शालू होता. मातीचा थर चढून कसनुसा दिसत होता अगदी. शंभूचे काळे बूट मातीने पांढरे पडले होते. बंडूने अगदी प्रेमानी घरी लावलेल्या "हिम्मतवाला" च्या पोस्टरला काहीच झालं नव्हतं. जितेंद्र आणि श्रीदेवी अगदी प्रेमानी एकमेकांच्या डोळ्यात बघत होते.  राणीचा मेक अपच्या सामानाचा डब्बा विखरून पडला होता. पोतदार काकूंनी गुलाबजामसाठी आणलेला खवा एका कागदात पडून होता. पिंकीने उत्साहाने भरायला सुरु केलेली सहलीची बैग फाटून चिंध्या झाल्या होती. 

मन बधीर झालं.  दुःखाची परिसीमा वगैरे म्हणतात ते यापेक्षा वेगळ काही नसावं. देवाने आणि दैवाने केलेली क्रूर थट्टा होती ही. अंत्यदर्शन, वगैरे भानगडीत न पडता सरळ लातूरला निघालो. त्यात विश्वास नाही माझा. माणसांचे निष्प्राण चेहरे बघून अंत्यदर्शन घेण्याचा कसला हा शिष्टाचार? मला नाही पटत. आयुष्यभर मग तोच चेहरा समोर येईल ना  त्या माणसाची आठवण झाल्यावर ? कशाला ते अंत्यदर्शन? त्यापेक्षा ते हसरे खेळते सजीव चेहरेच लक्षात ठेवायला आवडतं मला. लोकं नाव ठेवतात , म्हणतात कमकुवत आहे मी किंवा  काहीजण म्हणतात की , अत्यंत दगडी ह्रदयाचा आहे मी इत्यादी इत्यादी. जे पण असेल, पण मी नाही घेत आणि नाही घेणार कधी ते अंत्यदर्शन ! पण त्या स्वप्नांचे काय ? त्यांचे अंत्यदर्शन मी चुकवू शकलो नव्हतो. त्यांची ती राखरांगोळी कशी विसरू शकणार होतो मी ?

हळूहळू , दहा/वीस हजार मानसं गेली भूकंपात अश्या बातम्या यायला सुरु झाल्या. एक गोष्ट सांगायचे विसरले बातमीदार , माणसांपेक्षाही जास्त स्वप्नं मेली होती त्या दिवशी….




Saturday, September 20, 2014

गुंतागुंत - (पार्ट -२)

पार्ट -१ इथे वाचा.

"सत्याएन्शी रुपये साठ पैसे झाले साहेब",  या वाक्याने जाग आली अभयला. रिक्षात झोपी गेला होता तो. स्टेशनहून ससूनपर्यंत रिक्षा पोचली, तेव्हाच झोप लागली बहुतेक आपल्याला. शंभराची नोट रिक्षावाल्याचा हातात देत म्हणाला "राहू द्या काका वरचे चहा पाण्याला", आणि घराकडे वळला. प्रवासानी अंग शिणून गेलं होतं. काश्मीर पासून पुणे, कितीही नाही म्हटलं तरी थकवणारा प्रवास होता. नेत्राला वाटेत डेक्कन वर ड्रोप करून आला होता. संध्याकाळी भेटायचं पण ठरलं होतं त्याचं. घरी जाऊन आता एक मस्त झोप काढणार होता तो .


अकरा वाजता जाग आली. उठल्या उठल्या खालच्या एसटीडी बूथ वर गेला आणि नेत्राला फोन केला. काही विषय नव्हताच बोलायला , आत्ता चार तासांपूर्वीच भेटलेले, तरीही अगदी अर्धा तास गप्पा मारल्या. राहिलेल्या कॉईनसचं काय करावे हा विचार करतानाच अभयला वाटले कि चला अबोलीला फोन करूया. तिलाही हि गोड बातमी सांगितली पाहिजे. त्याची प्रत्येक गोष्ट आधी अबोलीला माहित असायची. तिचा नम्बर फिरवला, तिकडून मंजुळ आवाज आला 
"अबोली हिअर"  
"अगं , अभय बोलतोय"
काही क्षण पिन ड्रौप सायलेन्स. 
"बोल रे , कशी झाली काश्मीर ट्रीप ?"
"तुला कसं माहिती ट्रीप बद्दल?"
"अरे, मंदार ने जायच्या दिवशी फोन केला होत. त्यानेच सांगितलं तू पण येतोयस सोबत"
एकदम सूर पालटला तिचा. 
"आणि आपलं फोन नाही करायचं ठरलं होतं अभय? का अवघड करून ठेवतोयस सगळं ?"
"अगं , ऐकून घे. तुला खूप खूप महत्वाची गोष्ट सांगायची आहे. एक काम कर, आज ऑफिस नंतर शिवसागरला भेटूया. पुढे काहीच विचारू नकोस. बाय"
एवढे बोलून अभयने फोन ठेवला. आज जवळपास दीड -दोन महिन्यांनी बोलले होते ते. 

आज ऑफिस ला उशिराच जाणार होता तो. असं करू , अबोलीला "शिवसागर" मध्ये भेटू साडे सहाच्या सुमारास. एखाद्या तासांनी , आठ वाजता नेत्रा सोबत जवळपासच डिनर घेऊ. कामात मन लागत नव्हतं आज. अबोलीला कधी एकदा नेत्राची आणि त्याची बातमी सांगतोय असा झालं होतं. कुठलीही गोष्ट तिच्यासोबत शेअर केल्याशिवाय चैन नाही पडायची अभयला. ठरलेल्या वेळेआधीच, जाऊन पोचला शिवसागर वर, सहा पस्तीसला अबोली आली. दिवसभराच्या कामाच्या थकव्यानी असेल बहुतेक पण एकदम थकल्यासारखी दिसत होती. अभयला पाहून जाम खुश झाली. 
"काय गं , विरहात वेडी झाली का माझ्या?" मिश्किल स्वरात अभय म्हणाला. 
"नाही रे , तू गेल्यापासून एवढे चौइस मिळालेत कि , कुणाला निवडावे या विवंचनेत आहे." हसत हसत ती मिळाली. 
एका क्षणात रुसवे, फुगवे पळून गेले. असेच होते दोघंही . कितीही दिवसांनी भेटले तरी अवघडलेपणा आजीबात नसायचा. नातंच तसं होतं त्यांचं. काश्मीर ट्रीप च्या गप्पा सुरु झाल्या. तोपर्यंत , गरमागरम  वडा सांबारच्या डिश आल्या टेबलवर. 
"बोला , काय गोष्ट सांगायची आहे? अतिरेकी वगैरे झालास का तिकडे जाऊन?"
"अतिरेकी तर तू आहेस , कामाचा अतिरेक करतेस"
"गप्प रे, सांग आता जास्त उत्सुकता ताणू नकोस. ए पण ऑन अ सिरिअस नोट, तू खूप वेगळाच दिसायला लागला आहेस. असं काहीतरी समाधान, आत्मविश्वास, आनंद झळकतोय तुझ्या चेहऱ्यावर"
"Thanks, अगं गोष्ट अशी आहे , कि मी प्रेमात पडलोय"
"काय, खरंच ? कोणाच्या ? आय होप एखाद्या मुलीच्या !" डोळे मिचकावत म्हणाली ती. 
"हो , नेत्रा !"
"काय?" काही क्षण काहीच बोलली नाही ती. 
"हिरा आहे रे हिरा ती पोरगी. कसली छान चोइस आहे तुझी. मी खूप खुश आहे , फायनली यु मेड अ राईट डिसिजन एंड चोइस. "
तो भरभरून बोलायला लागला त्याच्या आणि नेत्राबद्दल. काय सांगू आणि काय नको असं झालं होतं. ते कसे भेटले, त्याचं आजारपण , तिने पकडलेला त्याचा हात सगळं काही नॉन स्टोप सांगत सुटला. अबोली नुसतं कौतुकाने ऐकत होती. घड्याळात पहिले अभयने तर पावणे आठ झालेले. 
"अगं , किती बोलतोय मी एकटाच. बहुतेक आता निघावे लागेल, नेत्रा येईल आठ वाजता सुभद्रा वर."
"ओके , लगेच संपवते कॉफी " ती म्हणाली
"काय गं अबोली , पण तू काय ठरवले आहेस पुढचे?"
कडक उन्हं पडलेली असावीत , ढगांचा मागमूसही नसताना अचानक धो धो पाऊस पडावा तशी अचानकच ती रडायला लागली. गांगरून गेला तो. 
"अगं काय झालं?"
ती काहीच बोलायला तयार नव्हती. नुसती रडत होती. काही सुचेनासं झालं अभयला. 
 "सॉरी रे , मी खूप वाईट आहे बहुतेक. पण तू सांगितलंस हे सगळं , आणि खुश होण्याच्या ऐवजी खूप वाईट वाटतंय मला. खूप राग येतोय नेत्राचा अन तुझा. खूप एकटे एकटे वाटायला लागलंय. विसरणार तर नाहीस ना रे मला?  तुझ्याशिवाय गेले दोन महिने कसे गेले माझे मलाच माहिती. सॉरी रे ! मी काय बोलतेय आणि काय करतेय हे? बहुतेक ही माझी जेलसी आहे. प्रत्येक मुलीच्या जीवनात एक असा क्षण येतो , कि एखाद्याला ती सर्वस्व बहाल करते. भरभरून प्रेम देते, मी ते तुझ्यावर केलं होतं. पण बहुतेक आपल्या नशिबी सोबत राहणं नाहीये. आणि मीच कारणीभूत आहे त्याला . चल, बेस्ट लक नेत्राला आणि तुला !" 
असं म्हणत मागच्या वेळेसारखीच कॉफी अर्धी टाकून निघून गेली. सुन्नं होवून बसून राहिला अभय बराच वेळ तिथे. काहीच सुचेनासं झालं त्याला. काय गुंतागुंत होऊन बसली हि सगळी. च्यायला आपल्या जीवनात कुठली गोष्ट सरळ म्हणून होत नाही. शापित आहे जीवन सगळं. त्याच विचारात घाईघाईत सुभद्रा वर जाऊन पोचला. नेत्रा आधीच हजर होती. एकदम छान सजून आली होती. सोबत गुलाबाचं एक सुंदर फुल पण आणलं होतं त्याच्यासाठी. 
"का रे , किती उशीर हा? लग्नानंतर हे चालू नाही देणार!"
कशाने काय माहिती पण त्याचा मूड मगाच्या गोष्टीमुळे अगदी ऑफ झाला होत. उगीच लटके हसू चेहऱ्यावर आणून हसला तो नेत्राकडे पाहून. "सॉरी " एवढंच म्हणाला. 
"अरे , कशी दिसतेय मी? बघ तुझ्या आवडीच्या रंगाचा पिंक ड्रेस घातलाय"
अभयच लक्षच नव्हतं. 
"अगं , हो ना कसली छान दिसतेयस. वॉवं !"
"हे बघ अभय, मला सरळ दिसतेय कि काहीतरी बिनसलंय तुझं आज. तसं असेल तर डिनरचा प्लान क्यान्सल करू आपण "
"नाही गं , पुण्यात गाडी चालवणं म्हणजे डोकं भंजाळून जातं. सॉरी. चल, जाम भूकेजलोय . "
अभयने पूर्ण प्रयत्न घेतले मूड परत आणायचे . बऱ्याच अंशी त्याला त्यात यशही मिळाले. नेत्रा एकदम खुशीत होती. "पुढच्या महिन्यात मी चाललेय सुरतला, काकांशी बोलीन तेव्हा. तू पण बोलून घे घरी तुझ्या. "
"हो चालेल" म्हणून अभयनी तिला तिच्या घरी सोडलं.   
घरी पोचल्यावर त्याला झोपच यायला तयार नाही. अबोली सोबतची ती भेट राहून राहून आठवायला लागली. अबोली आपल्यावर अजूनपण खूप प्रेम करते. वेड्यासारखं अगदी. तिला फक्त समजत नाहीये कि काय महत्वाचे आहे तिच्यासाठी जीवनात. आपल्याला कोण आवडते खरंच? अबोली कि नेत्रा? आपण चूक करतोय का नेत्राला वचन देऊन. कदाचित अबोली ला वाईट वाटावे म्हणून तर आपण नाही न नेत्राला प्रपोज केले? कि खरंच प्रेम आहे आपले नेत्रावर? कि फक्त एक कोम्प्रमाइज केलंय आपण तिला लग्नाच वचन देऊन? आपल्याला नेत्राच्या प्रेमाबद्दल एवढ्या शंका का येत आहेत ? अबोलीच आहे का आपलं खरं प्रेम ? तिला एवढे वाईट वाटतंय त्याचं आपल्याला का एवढं वाईट वाटतंय? काहीच समजेना झालं त्याला. जाम टेन्शन आले. रात्रभर जागाच होता अभय. 

त्या दिवशीपासून , अबोलीने फोन घेणंच बंद केले त्याचे. पण त्या दिवशी तिनं ,तसं बोलून इक्वेशन बदलून टाकले होते सगळे. नेत्राला हळू हळू इग्नोर करायला लागला अभय. भेटीगाठी टाळू लागला. नेत्राने बरेच खोदून खोदून विचारले पण अभयने काही सांगितले नाही. एक दिवशी अचानकच त्याचा घरी येउन थडकली नेत्रा. 
"काय रे अभय , काय झालेय? फोन वर नीट बोलत नाहीस, दिवस रात्र ऑफिस मध्ये बिझी असतोस. आधीसारखं हसून बोलत नाहीस?"
"नाही गं तसं काही नाहीये. जरा काम जास्त आहे एवढेच"
"बरं , ऐक उद्या मी सुरत ला चाललेय. काकांशी बोलून झाल्यावर, ते तुला फोन करतीलच"
गप्प बसला अभय. शेवटी धीर एकवटून म्हणाला 
"नेत्रा , तुला काहीतरी सांगायचं आहे. नीट ऐक. आणि प्लीज रडू नकोस"
घाबराघुबरा चेहरा झाला नेत्राचा. कशीबशी आवंढा गिळून म्हणाली 
"बोल"
"हे बघ नेत्रा, मी आपल्या दोघांबद्दल बराच विचार केला. आणि काही कारणास्तव मला असं वाटतेय कि खूप घाई होतेय लग्नाची वगैरे. बहुतेक मला अजून विचार करायला वेळ पाहिजे. भावनेच्या भरात मी लग्नाला हो म्हणून गेलो , पण मला वाटतेय कि आय एम नॉट रेडी यट"
चक्रावून गेली नेत्रा . धीर सुटला तिचा. 
"अरे काय बोलतोयस तू हे अभय? तुला कळतंय का काही ? भातुकलीचा खेळ आहे का हा? क्षणात हो आणि क्षणात नाही ? तुला दुसरं कुणी आवडायला लागलंय काय?"
"ते महत्वाचं नाहीये नेत्रा. पण मला वाटते कि तू तुझ्या घरच्यांच्या मर्जीप्रमाणे लग्न करून टाकावे. तू जास्त खुश राहशील. मी नाही लग्न करू शकणार एवढ्या लवकर. आणि मला विचार करायला पण वेळ पाहिजे. माझं खरंच चुकलं . जमलं तर माफ कर मला . "
पोटात तीळ तीळ तुटत होतं अभयच्या तसं बोलताना. पण पर्याय नव्हता. उगीच भावनेच्या भरात काही निर्णय घेऊन फायदा नव्हता. ओक्साबोक्शी रडायला लागली नेत्रा. खूप वाईट वाटले होते तिला. 
"नेत्रा , ऐक अग… "
"बास अभय , आता एक शब्दही नकोस बोलु. काहीच अर्थ नाही त्याचा." अभयला अर्धवट तोडत नेत्रा म्हणाली. आणि निघून गेली जड पावलांनी. 
खूप वाईट वाटत होतं अभयला. काय तो बाहुला बाहुलीचा खेळ . खूप चुकलं आपलं. अबोली सोबतच्या ब्रेक-अप ने एकटेपण आलं होतं . त्याच नाजूक क्षणी नेत्रा जीवनात आली , तिने थोडी काळजी घेतली आणि आपण त्याला प्रेम समजून बसलो. बिचारीच्या नाजूक मनाचं वाट्टोळ करून टाकलं आपण . ह्याला क्षमा नाही. 
तेव्हापासून नेत्राने त्याचे फोन घेणंही बंद केलं. अजिबात तोडून टाकलं अगदी. 
पंधरा दिवसांनी मंदारचा फोन आला. 
"अभ्या , माफ कर यार , नेत्रा वरून उगीच चिडवले तुला मी. पण खरच मला वाटलं कि तुमचं काहीतरी चाललंय "
"ओके , बोल कशी काय आठवण आली ?"
"अरे, नेत्राला सोडायला नाही आलास काल? गेली न सगळं सामान बांधून सुरतला ?"
"काय सांगतोयस, अचानक एकदम  ?"
"तुला नाही बोलली ती?"
"नाही रे "
"म्हणे , तिकडे जाउनच जॉब हुडकणार आहे ती. आणि सुरत म्हणजे फैमिली सोबत पण राहायला मिळेल."
फोन ठेवल्यावर खूप ओझे आले त्याच्या मनावर. अपराधी वाटायला लागले. उदास झाला एकदम तो. काहीच समजेना काय करावे. आपल्या हातून असं काही घडेल असा विचार पण नव्हता केला त्याने कधी. 
अबोलीही फोन उचलत नव्हती. सरळ तिच्या ऑफिस मध्ये गेला अभय त्यादिवशी . 
"काय चाललंय अबोली , का उलटं पालटा करून टाकलायस मला? फोन नाही उचलत. बोलत नाहीस. परत फोन करीत नाहीस. इमेल्स इग्नोर करतेस?"
"अभय , वेडा आहेस का ? नेत्राशी लग्न करतोयस न तू ? माझ्यापासून आता दूर झालं पाहिजे तुला. मी योग्य तेच करतेय"
"प्रेम करतेस कि नाही माझ्यावर? एवढंच सांग"
दोन सेकंदांचा पौज घेऊन अबोली म्हणाली 
"नाही करत ! तू स्पेशल आहेस. एकदम चांगला मित्र आहेस, आणि कदाचित कधी मी तुझ्यावर प्रेम केलं असेल पण. बट नॉट एनी मोअर. त्या दिवशी शिवसागर मध्ये भावनेच्या भरात बहकले मी. नाजूक क्षणी पाय घसरला माझा.  असो…  नेत्रा काय म्हणतेय? नीट काळजी घे तिची. "
तो नुसता तिच्याकडे पाहत उभा राहिला. काय बोलतेय ही ?
"आणि प्लीज आता या पुढून मला बोलायचा , भेटायचा प्रयत्न करू नकोस. एका चांगल्या नोटवर संपू दे हे सगळं"
डोक्यात मुंग्या आल्या होत्या त्याच्या. जाम रडायला येत होतं. हातपाय गार पडले होते. काही न बोलता तसाच निघून आला अभय तिथनं. सगळं गमावलं होतं त्याने. सगळं …… 

रात्री झोपेशी झगडावे लागू नये म्हणून भरपूर दारू ढोसून आला घरी. झोप लागली लवकर , पण चित्रविचित्र स्वप्नांनी थैमान घातले होते झोपेत. पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये नेत्रा त्याच्याकडे पळत यायची , तिचा हात तो हातात घेणार तोवर धाड धाड आवाज करत मुंबई सुरत एक्सप्रेस त्या दोघांमधून निघून जायची , ट्रेन गेली तर नेत्राच्या जागी अबोली उभी असायची. मागे पहिले तर अबोली आणि नेत्रा काळे गॉगल्स लावून हुंदके देत दूर जात असायच्या. हात जाम थंड पडलेले असायचे अभयचे. अशा स्वप्नांनी तळमळत होता नुसतं. 
लहानपणी खेळून आला कि जाम भूक लागलेली असायची अभयला.  "आई खायला दे काहीतरी" म्हणला कि आई नेहमीप्रमाणे म्हणायची "टेबलावर ठेवलाय बघ खाऊ . एक ताई साठी आणि दुसरी तुझ्यासाठी आहे वाटी!"  खरं तर त्या दोन्ही वाट्या त्याच्यासाठीच असायच्या.  तो जाऊन लगेच दोन्ही वाट्या मधला खाऊ फस्त करायचा. खूप मजा यायची, नेहमी काहीतरी सरप्राईज असायचे वाटीमध्ये. पेढे, गुलकंद , बोरं , द्राक्षे आणि बरच काही.   

तेवढ्यात आई आली स्वप्नात. म्हणाली "तुझ्यासाठी काहीतरी ठेवलाय बघ वाट्यांमध्ये टेबलावर".  फार उत्सुकतेने अभय गेला टेबलाकडे. पहिल्या वाटीवरचं झाकण काढलं तर रिकामी होती. घाईघाईत दुसरीवरचं पण झाकण काढलं आणि पाहतो तर काय तीही रिकामी. आणि मग मात्र अगदी जवळचं कुणीतरी गेल्यासारखं जीवाच्या आकांतानं ढसाढसा रडू लागला तो …… 
   


Friday, September 19, 2014

गुंतागुंत - (पार्ट -१)

खरंच , काश्मीरला स्वर्ग म्हणतात ते अजिबात खोटं नाहिये. आरामखुर्चीत बसून अभय विचार करत होता. त्या थंडगार हवेत , बर्फानी आच्छादलेल्या पर्वतांकडे बघत , गरमागरम चहाचे घुटके घेताना किती छान वाटत होतं. निसर्गाचं हे सौंदर्य पाहून, काल दिवसभर केलेल्या प्रवासाचा शीण कुठल्याकुठे पळून गेला होता. अभयला तर पहाटेपासून झोपच येत नव्हती. सगळी मित्रकंपनी अजून झोपूनच असेल म्हणून तो एकटाच हॉटेलच्या बाहेर येवून तिथल्या गार्डन कैफ़े मध्ये येवून बसला होता. काल रात्रीच बाकी मित्रांसोबत तो जम्मूला आला होता. तसा त्याचा यायचा मूड नव्हता पण मंदार, पुष्कर, सलील, परी आणि सगळ्यात जास्त नेत्राने खूपच आग्रह केल्यामुळे त्याला यावे लागले. चांगला आठ दिवस मुक्काम होता. भरपूर भटकायचा प्लान होता.

'अबोली असती तर काय मज्जा आली असती , नाही? बर्फ जाम आवडतो तिला' अभयनी विचार केला. हातातली सिगारेट संपून जोरात चटका बसला बोटांना, आणि खडबडून भानावर आला एकदम. बास त्या अबोलीचे विचार. वेड्यासारखा जीव लावून ठेवलाय आपणंच. तिच्या इच्छा, आकांक्षा काही औरच आहेत. शेवटच्या भेटीत तिने सरळ सांगितले. "हे बघ अभय, मला खूप आवडतोस तू, पण माझं करिअर माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. लग्न वगैरे गोष्टींसाठी माझ्याकडे वेळ नाहीये, आणि माझा विश्वास हि नाहीये त्यात. त्यामुळे तू मला विसरून जाणेच उचित. ह्यापुढे भेटायला, बोलायला नको आपण. उगीच त्रास होईल दोघांनाही". असं म्हणून एकदम कोरड्या चेहऱ्यानी उठून गेली तशीच कॉफी अर्धीच सोडून. असं कसं वागायला जमत हिला? आपल्याला कधी असं करताच नाही येत. अभयनी विचार केला. एकदम वेगळी आहे अबोली. क्षणात टिपकागदासारखी असते. आपल्यासाठी, प्रत्येक गोष्ट , प्रेम अगदी समरस होऊन करते. आणि क्षणात प्लास्टिकच्या कागदाप्रमाणे होऊन जाते. कोरडी एकदम. मग भावनांना वगैरे काही थारा नसतो तिच्याकडे. अजब रसायन आहे ही अबोली पण. कदाचित तिच्या ह्या अशा स्वभावामुळेच प्रेमात पडलो आपण तिच्या. ती जाऊन गाडीत बसेपर्यंत पाहत होता तिच्याकडे अभय. जाताना काळा गॉगल लावला होता तिने , ऊन खरच खूप आहे की डोळ्यातलं पाणी  लपवतेय ती? कळले नाही त्याला.

विसरून जायला हवे तिला , गेला एक महिना आपण फक्त आणि फक्त तिचा विचार करतोय. बास आता. जरी कितीही आवडत असली आपल्याला ती , तरी ह्या गोष्टीला काहीच भविष्य नाहीये. अबोलीचं हि बरोबर आहे. तिला तिचं करीअर घडवायचं आहे, आपल्यात गुंतून नाही पडायचंय. भूतकाळातून मनाला फरफटत परत आणलं अभयने. अबोलीचा चाप्टर संपलाय, आता आठ दिवस काश्मीर मध्ये धम्माल करायची. मज्जा करायची. तेवढ्यात, सगळीजण त्याला शोधत आली. गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत त्यांचे हसणे, खिदळणे, गप्पा सुरु झाल्या. आजच्या दिवसाची प्लानिंग सुरु झाली.

ग्रुपमध्ये , नेत्राशी त्याचं सगळ्यात जास्त जमायचं. चांगली मैत्रीण होती ती त्याची. अबोलीनंतर नेत्राच सगळ्यात जास्त जवळची.  अत्यंत चांगला स्वभाव , त्याहीपेक्षा चेहऱ्यावर सतत वावरणारे ते गोड हास्य.  अभयला तिच्याशी बोलताना अगदी कम्फर्टेबल वाटायचं. मनावर अगदी कसलच ओझं नसल्यासारखे वाटायचे. नेत्राही अभयच्या जोक्स्वर जाम फिदा. तिला खूप हसू यायचं अभयशी गप्पा मारताना. पण ती तेवढीच सेन्सिटीव होती. छोट्या छोट्या गोष्टी मनाला फार लावून घ्यायची. आयुष्यात तसं बरंच बरं वाईट पाहिलं होतं तिने. अवेळी हरवलेलं पालकांचं छत्र. जीवापाड प्रेम केलेल्या मोहित ने तोडलेलं ह्र्दय. त्यामुळे थोडं साहजिक होतं सेन्सिटीव असणं. पण कायम हसत रहायची. आणि तिच्या गालावरची खळी म्हणजे दुधात साखर.

जम्मू काश्मीर खरंच खूप देखणं आहे. अभय मंत्रावून गेला होता तिथलं सौंदर्य पाहून.अभयच्याच काय , तर सगळ्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. डोळ्यात जमेल तेवढे सगळे साठवून ठेवत होते सगळेजण. जाम खुश होते हॉटेलवर परतल्यावर, थोड्या गप्पाटप्पा झाल्यावर अभय गेला आपल्या रुममध्ये. दिवसभर फिरून फिरून जाम थकला होता. बेडवर पडलं की लगेच झोप लागली त्याला. सकाळी जाग आली आणि अंग असं हे भट्टीसारखं तापलेलं. घणाचे घाव घातल्यासारखे डोके ठणठणत होते. खूप अशक्तपणा जाणवत होता. बहुतेक थंड हवामान सहन नव्हत झालं अभयला. न उठता तसाच ब्ल्यान्केट घेऊन पडून राहिला. आठ वाजता त्याच्या दारावर थाप पडली, ब्रेकफास्ट साठी बोलवायला आले सगळे त्याची वाट पाहून.  पाहतात तर काय अभय हुडहुडत बेडवर पडलेला. विचारपूस वगैरे केल्यावर सगळ्याचं मत पडलं कि डॉक्टर बोलावू रूमवरच आणि सगळे तोपर्यंत थांबतील त्याच्यासोबतच.
"काही नाही रे , थोडीशी कणकण आहे, एवढंच.  तुम्ही जा पाहू फिरायला तुमच्या प्लानप्रमाणे. मी बरं वाटेपर्यंत हॉटेल मधेच बसून राहीन. डॉक्टर पण बोलावून घेईन. हे बघा तुम्ही तुमचा प्लान चेंज केलात तर खूप वाईट वाटेल मला." अभय म्हणाला.
शेवटी अभयने खूपच विनवणी केल्यावर ते सगळे जायला तयार झाले. जाण्याच्या आधी त्यांनी डॉक्टर वगैरे बोलावून घ्यायला सांगितला हॉटेल मध्ये. आणि मग गेले निघून. थोड्या वेळात डॉक्टर येउन, औषधं वगैरे देऊन, आराम करायला सांगून, निघून गेला. अर्ध्या तासातच बेडवर पडून पडून वैतागून गेला अभय. अबोलीचे विचार लपत छपत हळू हळू त्याच्या मनात यायला लागले. अस्वस्थ होऊन गेला होता . "खरंच अबोली पाहिजे होती इथे आत्ता." असा विचार मनात येतानाच दारावर टकटक झाली. कोण असावे हा विचार करत अभयने दार उघडले. पाहतो, तर नेत्रा उभी बाहेर. 
"काय गं , काय झाले? इथे काय करतेयस तू?, परत का आलीस?"
"तू आजारी आहेस रे , कसला वैतागून जाशील एकटाच इथे बसुन. कोणी ओळखीचे न पाळखीचे.  मला नव्हत पटत तुला एकट्याला सोडून जाणे. म्हणून आले परत मी. चल आता कर आराम. "
"अगं , काहीही काय , तुझी ट्रीप माझ्यासाठी का खराब करतेयस?"
"मी आजारी असते तर तू काय केलं असतंस ?"
अभय गप्प झाला. त्याला स्वताची लाज वाटली. खर तर अबोली असती आपल्यासोबत आणि नेत्रा आजारी पडली असती , तर आपण आलो असतो का असच परत, कदाचित नाही. तरीही तो म्हणाला 
"हो , आलो असतो मी पण परत. "

एकदम बरे वाटले अभयला. कुणीतरी आपली एवढी काळजी करतंय हे फिलिंग फार छान वाटत होते. मनातून जाम खुश झाला तो. त्या दिवशी खूप गप्पा मारल्या त्यांनी. नेत्रा थोड्या थोड्या वेळानी त्याच्या कपाळावर थंड पाण्याचा पट्ट्या ठेवत होती. वेळेवर औषधं देत होती. मधूनच गरमागरम कॉफी बनवून देत होती. त्यात तिचा तो हसरा चेहरा. त्याचं आजारपण संध्याकाळपर्यन्त कुठल्याकुठे पळून गेलं . संध्याकाळी हॉटेलच्या गार्डन एक रपेट पण मारली त्यांनी. आज बऱ्याच दिवसानंतर आनंदी वाटत होतं अभयला. रात्री जेवणं वगैरे झाल्यावर रूमवर गेला आणि विचार करायला  लागला. खरंच नेत्रा किती चांगली मुलगी आहे . कसल्या धम्माल गप्पा मारते. आणि तिच्या गालांवरची ती खळी , कसली छान दिसते हसताना. नेत्राला एवढं जवळून बघण्याचा, एवढ्या गप्पा मारण्याचा कधी योगच नव्हता आला या आधी. अबोली सोबत असली की आजुबाजूचं सगळं जग विसरून जायचा अभय. आज नेत्राचा सहवास सुखावून गेला होता त्याला. अबोलीच्या त्या शेवटच्या भेटीनंतर आलेलं एकाकीपण, त्याने त्याचं मन वैराण वाळवंट झालं होतं. आज कुठेतरी दूरवर पाण्याचा एक झरा दिसत होता. पण मृगजळ तर नव्हे ना ते? विचार करत करत झोपी गेला तो. अगदी लहान बाळासारखी झोप लागली त्याला त्या रात्री .

दुसऱ्या दिवशी सकाळी , सगळ्यांच्या आधी तयार होवून बसला होता अभय. अंगात नवीन चैतन्य आल्यासारखे वाटत होते. का माहित काय , पण नेत्राला भेटण्याची हुरहूर लागली होती. असं का वाटतेय ते मात्र कळेना त्याला. थोड्या वेळात नेत्रा पण आली कैफ़े मध्ये. न्हावून मोकळे सोडलेले ते लांबसडक केस, तजेलदार गुलाबासारखा तो टवटवीत चेहरा,  मोठ्या मोठ्या डोळ्यांवर उठून दिसणारी ती काजळाची लकेर , चेहऱ्यावरचे ते नेहमीचे हसू आणि ती खळी !  मिनिटभर बघतच राहिला तिच्याकडे तो. कालच्या राहिलेल्या गप्पा परत  सुरु झाल्या त्यांच्या.  ब्रेकफास्ट वगैरे आटपून गाडीत बसले ते. जनरली पुष्कर आणि नेत्रा सोबत बसायचे, पण आज घाईघाईत पुष्करला मंद धक्का देऊन गडबडीने अभयनी नेत्राजवळची जागा पटकावली. तिला ते समजलं वाटतं , ती अगदी जोरात हसली. एकदम ओशाळून गेला अभय. अंग चोरून बसला. पण दोन मिनिटात गप्पा मारून कम्फर्टेबल झाला तो.  

आज फिरून झाल्यावर त्यांची गाडी जरा लवकरच हॉटेल कडे वळली. हॉटेल मध्ये आज बार्बेक्यू पार्टी होती. मजा येणार होती. परतताना अभयला एकदम हुडहुडी भरून आली. 
"का रे काय होतंय ? परत बरं वाटत नाहीये का?"
"नाही गं , पण जाम थंडी वाजतेय"
"बघू, ताप आहे का?" असं म्हणून नेत्राने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. 
"नाही, ताप तर नाही वाटत आहे. हजार वेळा सांगून पण ग्लोवज घालत नाहीस तू हातात. थंडी वाजून आली असेल."
असं म्हणून नेत्राने त्याचे हात  हातात घेतले. "बघ, कसले थंड पडलेत हात तुझे!"
नेत्रांनी अभयचे दोन्ही हात घेऊन आपल्या हातात पकडून ठेवले. तिच्या मऊ हातांचा तो उबदार स्पर्श झाला , आणि एकदम ४४० वोल्टचा करंट बसला त्याला. एकदम स्तब्ध झाला तो. 
"दहा मिनिटात बरे वाटेल बघ " नेत्रा म्हणाली. 
हे असं काही अजिबात अपेक्षित नव्हतं अभयला. काही न बोलता दोघेही गप्प बसून राहिली. दहा मिनिटं काय, अर्धा तास झाला तरी त्याचा हात तिच्या हातातच होत. तीही आपलं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवून झोपी गेली होती. असं वाटत होतं ही बस थांबूच नये. अशीच चालत राहावी. अचानक गाडीचे करकचून ब्रेक्स लागले आणि दचकून नेत्रा जागी झाली. त्याचा हात सोडला तिने. 
"बरं वाटतेय का रे आता?"
अभय एकदम म्हणून गेला "हो बरं वाटतेय, पण का सोडलास हात? असू दे ना असाच प्लीज"
नेत्राच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम पालटले ,  "बापरे, काय चाललंय हे? वेड लागलंय कि काय मला?" असं म्हणून तिथून उठून परी शेजारी जाऊन बसली.  एकदम गडबडून गेला अभय. काय बोललो आपण हे. अबोली सोडून कुणीच नाही न आवडत आपल्याला? काय मूर्खपणा करतोय आपण? का एवढा नेत्राचा सहवास आवडतोय?ती बिचारी चांगुलपणाने आपला हात घेऊन बसली , आणि आपण काय हे थर्ड क्लास काहीतरी बोललो. एकदम अपराध्यासारखे वाटायला लागले त्याला.

रात्रीच्या पार्टीमध्ये दोघेही शांत शांत होती. कालचा मोकळेपणा कुठल्याकुठे पळून गेला होता. एकदम विचित्र काहीतरी होऊन बसलं होतं. रात्री झोपायला गेला तेव्हा विचारांनी नुसता तळमळत होता अभय. ह्रदयाची कुठलीतरी नाजूक तार छेडली गेली होती त्याच्या. नेत्राचे विचार , तिच्यासोबत मारलेल्या गप्पा, तिचा तो मोहक चेहरा, तिच्या हातांचा तो उबदार स्पर्श आठवून मनाला गुदगुल्या होत होत्या त्याच्या. सोबत वाईटही वाटत होते, कि आपण नेत्राच्या वागण्याचा गैरसमज करून घेतला . तिला आपली काळजी वाटते , आपली कंपनी आवडते.  पण याचा अर्थ असा नाही कि तिचं प्रेम वगैरे बसलंय आपल्यावर . आणि छे छे आपलं तर कुठे बसलंय प्रेम तिच्यावर? का खोटं बोलतोय आपण स्वतःशी ? असे हजार विचार करता करता झोपून गेला तो. 

दुसऱ्यादिवशी सकाळी नेत्रा ब्रेकफास्ट ला पण आली नाही. परी म्हणाली कि नेत्राला जरा बरं नाहीये म्हणून ती आज येणार नाही. अभय म्हणाला "तसं असेल तर मग मला थांबलं पाहिजे तिच्यासोबत. मी आजारी असताना ती परत आली होती. " मंदार नेहमीच्या खवचट पण गुणगुणायला लागला "दो दिल मिल रहे है , मगर चुपके चुपके" अभय भडकला एकदम . म्हणाला "मंद्या , फालतुगिरी नको करू, सुधार आता."कसंबसं पुष्कर आणि परीने दोघांना समजावून शांत केले.  सगळेजण गेल्यावर तो नेत्रा कडे गेला. तिला फारसं आश्चर्य नाही झालं त्याला पाहून. त्याला पाहून फक्त मंद स्मित केले तिनं.  काही बोलली नाही.
"काय झालंय नेत्रा ?"
"कुठे काय , काही नाही"
"हे बघ, मी जे काय बोललो ते मनापासून बोललो. बौटम लाईन हि आहे कि तू मला आवडायला लागली आहेस. मी अपेक्षा नाही करत कि तुझ्याकडून पण तसाच प्रतिसाद असावा. पण काही न झाल्यासारखे ढोंग करून राहणे मला जमत नाही. आणि तुझ्यासारखी मैत्रीण पण गमवायची नाही आहे. मला माफ करून टाक आणि परत आधीसारखे एकदम छान मित्र बनून राहु. विसरून जा मी बोललेलं."
"तू इथून जावं हेच उत्तम. प्लीज मला एकटीला सोड"
अभय तिथून निघून आला. मन हलकं वाटत होतं त्याला. मनातलं कमीत कमी बोलून दाखवले होते त्याने. टीव्ही बघत बसला तो. दुपारी दारावर टकटक झाली. अपेक्षेप्रमाणे नेत्रा आली होती. येउन बसली , त्याने छानशी कॉफी बनवली दोघांसाठी. शांतपणा असह्य होऊन अभय म्हणाला 
"नेत्रा , प्लीज सोडून दे. विसरून जा मी बोललेलं."
"लग्न करशील माझ्याशी ? मला वाटतं मी पण प्रेमात पडलेय तुझ्या"
अभय साठी हा एकदम बाउन्सर होता. "काय म्हणतेयंस ? लग्न ?"
"हो, माझे  काका माझे लग्न पुढच्या वर्षीपर्यंत लावून देतीलच. तेव्हा मला क्लिअर सांग. मी खरीच आवडते, तर लग्न करशील ?"
"हो , अर्थातच ". अभय बोलून गेला.
जाम खुश झाली. त्याला जवळ घेऊन त्याच्या गालावर हलकेच आपले ओठ टेकवून निघून गेली.
अभय विचार करू लागला. आपण केलं ते बरोबर तरी केलं ना ? एकदम लग्नाचं वचन वगैरे दिलं . अबोली आवडते कि नेत्रा आपल्याला? अबोलीने तर भेटायला, बोलायला पण मनाई केलीय. नेत्रा तिची जागा भरून काढेल का?
त्याच बेभानपणे आपण तिच्यावर खरच प्रेम करतो का? कि नेत्रा आणि आपण दोघेही परिस्थितीशी तडजोड करून अगदीच अनोळखी व्यक्तीसोबत लग्नाला तयार होण्याएवजी , कमीत कमी ओळखीचा, किंवा मित्र तरी जीवनसाथी मिळावा हा प्रयत्न करतोय ? विचारांचं वादळ उठलं डोक्यात. २१-२२ व्या वर्षी एवढी प्रगल्भता नसते विचारात. वेडा झाला विचार करून करून अभय. शेवटी ठरवले कि बास , नेत्राच आपले सर्व काही आहे आता. तिच्यासोबत संसाराची स्वप्न पाहण्यात मग्न होऊन गेला.
पुढचे चार दिवस कसे गेले आजिबात कळले नाही. नेत्रा आणि अभय एकदम सातव्या आस्मानावर होते. एकमेकांना जाणून घेतलं त्यांनी. आवडी निवडी, स्वप्नं. आता परत गेलो कि घरच्यांशी बोलून एखाद्या वर्षात लग्न करून टाकायचे. पण नियतीच्या मनातही तेच होतं का ?……… 

[क्रमशः] (टु बी कंटिन्यूड……. )  

Friday, September 12, 2014

झूठा ही सही !!!

ब्लॉग लिहायला सुरु केल्यापासून एक गोष्ट मला जाणवली कि मी लोकांना खूपच मागे लागून ब्लॉग वाचायला सांगायला लागलो होतो. लोकांची काय प्रतिक्रिया असेल ते जाणून घेतल्याशिवाय चैन पडत नव्हती. मला पण कळत नव्हते की मी असं का करतोय. बराच विचार केला, डोक्याला थोडा ताण देऊन विश्लेषण केलं , आणि अशी एक गोष्ट आठवली जी कदाचित याला कारणीभूत असू शकेल.
                         मी दहावीत होतो तेंव्हाची गोष्ट. आई वडिलांनी पुढच्या शिक्षणाचा विचार करून लातूरला शाळेत घातले होते मला. ती दोघेही किल्लारीलाच नोकरी करत. मी आणि माझी बहिण माझ्या एका मावशीकडे राहत असू. सर्वसामान्य पालकांच्या असतात, अगदी तशाच माझ्या पालकांच्या पण माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. त्यांना वाटायचे कि शहरात शिकतोय मुलगा, सगळ्या चांगल्या गोष्टी,सोयी, शाळा आहेत.  खूप अभ्यास करेल, चांगले मार्क्स पडतील. जेणेकरून पुढच्या जीवनाची घडीही नीट बसेल. मी पण पूर्ण प्रयत्न घेतच होतो, पण ते वयच थोडं पोरकट असतं , फारसं कळत नाही.
                       दोघेही, दर शनिवारी, दुपारी शाळा संपली की बस मध्ये बसून लातूरला यायचे. दोन्ही मुलं दूर असल्यामुळे जीव रमायचा नाही त्यांचा किल्लारीमध्ये. सोमवारी परत जायचे सकाळी. हळू हळू, आम्ही मावशीकडे सेटल झाल्यावर त्यांचं लातूरला येणं कमी झाले. मग महिन्या-दोन महिन्यातून आम्ही तरी किल्लारीला जायचो किंवा ते तरी लातूरला यायचे. अशाच एका रविवारी मी किल्लारीला निघालो. आठवडाभर सुट्टी होती शाळेला कसलीतरी. जाताना बस मध्ये काहीतरी वाचायला घ्यावे म्हणून सोबत एक पुस्तक घेतलं. "अक्षरशिल्पे" नाव त्याचे. कूणीतरी हातवळणे नावाच्या भावंडांनी दहावीच्या मराठी निबंधाच्या तयारीसाठी लिहिलेले पुस्तक होते. बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर निबंध लिहिले होते. पुस्तक वाचून मंत्रमुग्ध झालो. फारच सुंदर भाषेत लिहिलेले होते ते निबंध. मनात म्हटलं "देवा , मला का नाही अशी कला दिलीस? का नाही अशी गोड भाषा येत मला ?" तासाभराच्या प्रवासात सगळं पुस्तक अधाशासारखं वाचून काढलं.
                          घरी पोचलो, तेव्हा आईने नेहमीप्रमाणे सगळे आवडीचे जेवण करून ठेवले होते. पोट भरून जेवण केले आणि झोपी गेलो. झोपेतनं उठलो तेव्हा पप्पा बाहेर गेले होते. आईही म्हणाली की हळदी-कुंकासाठी शेजारच्या पाटील काकूंकडे जाऊन येते. तिला परत यायला एक तासतरी लागणार होता. थोडावेळ टिव्ही बघून झाल्यावर बोअर झाले. एकदम "अक्षरशिल्पे" ची आठवण आली. आणि माहित नाही का , पण मनात एक लबाड विचार आला. आपण असे करू , त्यातला एक पावसाबद्दल अतिशय सुंदर निबंध होता. तो एका कागदावर उतरवून काढू. आणि आई-पप्पा घरी आले की  त्यांना दाखवू आणि सांगू की मीच लिहिलाय. मला खरंच नाही समजत मी तेव्हा तसं का केलं असावं. फुशारकी मारावी म्हणून ? की त्यांना बरे वाटावे की मला शहरात शिकायला ठेवल्याचं चीज झालं म्हणून ? की अजून काही? पण मी केलं तसं . दिवेलागणीच्या वेळी दोघेही एकदाच घरी आले. आल्यावर मी त्यांच्या हाती तो कागद ठेवला आणि म्हणालो "मी लिहिलाय बघा पावसावर निबंध , बघा कसा वाटतो तुम्हाला."  त्यांनी सोबतच वाचायला सुरु केला. जसे जसे ते वाचत होते तसा त्यांच्या चेहरयावरचा आनंद , कौतुक, अभिमान ओसंडून वाहत होतं. मी ते सगळे भाव टिपत होतो, आणि मला पण अगदी छान वाटत होते. निबंध वाचून झाल्यावर, अक्षरशः डोळे भरून आले त्यांचे. म्हणाले "काय हे? किती छान लिहिलयस. अभिमान वाटतो आम्हाला तुझा !". रात्री झोपताना सुद्धा त्यांच्या त्या निबंधावरच गप्पा सुरु होत्या. का माहित नाही, पण त्यांची फसवणूक केल्याचं आजिबात वाईट वाटत नव्हतं मला. कदाचित फारच स्वार्थी आणि आत्मकेंद्रित झालो होतो मी तेव्हा.
                              सोमवारी सकाळी जाग आली तेव्हा दोघेही शाळेत गेलेली. आरामात उठून आवरले आणि मित्रांना भेटायला बाहेर पडलो.  गावात ३-४ तास उंडारून झाल्यावर घरी परतलो. श्रावण सोमवार असल्यामुळे शाळा दुपारी लवकर सुटायची . घरी गेल्यावर आईने सांगितले " अरे तुझे पप्पा तुझा निबंध घेऊन शाळेत गेले होते.  वेळ काढून शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना वाचून दाखवला. अभिमानाने ऊर फुगला होता त्यांचा. सगळ्यांनी खूप कौतुक केले तुझे". माझे वडील फारसे बोलायचे नाहीत. कौतुक वगैरे तर फारच क्वचित. असे नाही कि त्यांना वाटायचे नाही पण बोलून दाखवायचे नाहीत कधी. आईने हे सांगितल्यावर मात्र माझ्या पायाखालची जामीन सरकली. वाटले, काय केले आपण हे. कुठपर्यंत  गेले हे प्रकरण? लाज वाटली पाहिजे आपल्याला असं काही करायला. पण आता चूक कबूल कशी करायची? कुठल्या तोंडानी सांगायचं त्यांना कि नालायक आहे मी . फसवले मी तुम्हाला. काय अवस्था होईल त्यांची हे ऐकून? अवघड जागेचं दुखणं होऊन बसलं हे तर. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. विचार केला, जाउदे आता हा विषय जास्त चघळण्यात अर्थ नाही. गप्प बसलेलेच बरे.
                     थोड्या वेळानी पप्पा पण घरी आले. आज फार खुशीत दिसत होते. बघवेना मला म्हणून परत बाहेर गेलो. मनात कुठेतरी काटा सलत होता आपण केलेल्या चुकीचा.  एक क्रिकेटची मैच खेळून घरी परतलो. दारात येताच छातीत धस्सं  झालं.  खुर्चीत बसून वडील पुस्तक चाळत होते …. "अक्षरशिल्पे " !!! घाबरून गेला जीव. ते चुल्लूभर पाणी कि काय म्हणतात त्यात बुडून जावं असं वाटलं. आई उदास होऊन भाजी निवडत होती. क्षणात माझ्या ध्यानात आला सगळा प्रकार , माझा पराक्रम त्यांना समजला होता.पप्पांनी फक्त एकदा माझ्याकडे पाहिले. थंड आवाजात म्हणाले "फार वाईट वाटले महेश आज मला. एवढी घोर फसवणूक ? काय गरज होती हे सगळं करण्याची. तुझी शैक्षणिक प्रगती , मार्क्स ह्या सगळ्यांपेक्षा तुझी वर्तणूक, विचार, वागणूक चांगली असावी हे महत्वाचे आहे.  एक चांगला माणूस नसशील तर बाकी गोष्टींना शुन्य किंमत आहे आमच्यासाठी. फार दुखावलंस आज, बेटा. " एवढे म्हणून ते शांत बसले. आईने एक चक्कर शब्दही काढला नाही.पप्पांना वाईट वाटल्याचं खूप दुखः झालं होतं तिला.  मला तर माझीच किळस वाटायला लागली होती. काय करून बसलो आपण हे?
                        रात्रभर झोप नाही आली. स्वतःच्या वर्तणुकी बद्दल तिरस्कार वाटायला लागला. पहाटे कशीबशी झोप लागली. सकाळी उठलो तर नेहमीप्रमाणे दोघेही शाळेत गेलेले.  घर खायला उठलं होतं मला. कालचा प्रसंग अस्वस्थ करून सोडत होता. काय करून आई-पप्पांना समजावू , कशी त्यांची माफी मागू हे प्रश्न भंडावून सोडत होते. पाच वाजता घराची कडी वाजली म्हणून दर उघडलं , आई होती. माझ्याकडे न पाहताच म्हणाली "पप्पा शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना घेऊन येत आहेत मागून. थोड्या खुर्च्या वगैरे बाहेर काढ. मी चहा ठेवते तोपर्यंत". मला समजेना कि सगळेजण का येतायत. नाना विचार मनात येवू लागले.  पाच मिनिटांनी सगळेजण घरी पोचले. चहा पाणी झाल्यावर, आलेल्या शिक्षकांनी मला बोलावले. "अरे काय तो निबंध लिही……" ; तेवढ्यात पप्पांनी त्यांचे वाक्य अर्धवट तोडले आणि म्हणाले , "एक मिनिट सर, एक गोष्ट सांगायची आहे त्या निबंधाबद्दल". माझी हवा टाईट!  मनात म्हटलं, लागला निकाल आपला आता.  एवढ्या सगळ्यांसमोर पाणउतारा होणार. अंगावर हजार झुरळे पळावी तसं काहीतरी फिलिंग यायला लागला. एकीकडे पप्पांचा राग पण यायला लागला कि एवढ्याश्या चुकीची एवढी मोठी शिक्षा काय.  एवढे कठोर होण्याची काय गरज आहे.
                     पप्पा पुढे म्हणाले "अहो माझं चुकलंच. महेशला त्याच्या  मित्रांनी एक खूप छान पुस्तक दिलंय वाचायला , त्याला आवडलं म्हणून त्याने एका कागदावर एक निबंध कॉपी करून घेतला . तो झोपला होता सकाळी तेव्हा मी सहज पहिला आणि मला वाटले कि त्यानेच लिहिलाय तो, आणि मी त्याच्याशी खातरजमा न करता उगाच शाळेत घेऊन आलो आणि  तुम्हाला दाखवला. "
"अर्रे  हो का , जाऊद्या , आपला महेश पण कमी नाही, त्याहीपेक्षा चांगले लिहील तो" असं काहीतरी म्हणत बाकीच्या शिक्षकांनी पण वातावरण हलके फुलके केले.  सगळेजण गेल्यावर मी पाय पकडले पप्पांचे , म्हटलं "माझे खरच चुकले. खूप मुर्ख आहे मी. " पप्पा नेहमीच्या अबोल स्वभावाप्रमाणे एवढेच बोलले "जाउदे, फार मनाला लावून घेवू नकोस. पण चूक कबुल करणे महत्वाचे.".
               पप्पांचा मोठेपणा कळला त्या दिवशी मला.  सगळ्या शिक्षकांसमोर चूक कबूल केली.  मुलाला वाईट वाटू नये , म्हणून चूक स्वतःवर घेतली. आणि, त्या गोष्टीचा उगाच बाऊ न बनवता माफ पण करून टाकले मला. एक गोष्ट कायमची शिकलो त्या दिवशी , फसवायचे नाही कुणाला. आणि अजाणतेपणे तसे झालेच, तर चूक कबूल करायला मागे पुढे नाही पाहायचे.
             कदाचित, म्हणूनच आज मी जेव्हा माझा ब्लॉग लिहितो , तेव्हा कुठेतरी मला वाटत असेल की आज मी हे खरंच मनाने  लिहितोय आणि लोकांनी वाचावे आणि त्यांना खरेच आवडावे मी लिहिलेलं. कदाचित तेव्हा केलेली चूक निस्तरण्याचा निष्फळ, व्यर्थ प्रयत्न करतोय मी.  तरीही , आई आणि पप्पा आज जिथेपण असाल तुम्ही , जमलं तर वाचा एकदा मी लिहिलेलं … या वेळी मनानी लिहिलंय सगळं ….

Tuesday, September 2, 2014

Happy new year!!!


पहाटेच्या त्या शांत वातावरणात , फारशी वाहतूक , वर्दळ नसलेल्या , पावसानी न्हावून निघालेल्या चकाकत्या रस्त्यावरून त्याची मोटारसायकल भन्नाट वेगात धावत होती . "मुंबई एकदम वेगळी दिसते न पहाटेच्या वेळी . फार कमी वेळी मुंबई ला दिवसातल्या ह्या वेळेस बघायचा योग येतो. दिवसभराच्या दगदगीनंतर कशी शांत, समाधानी दिसते. " तो विचार करत होता . मोबाईल ची रिंग वाजायला लागली , संतोष चा असावा फोन . आजीबात उशीर चालत नाही त्याला कुठेच . फोन न उचलता तशीच गाडी दामटत तो रेल्वे स्टेशन मध्ये घुसला . घाई घाईत, दिवसभराच्या पार्किंगचे पन्नास रुपये पार्किंग वाल्याच्या हातात कोंबत तो प्लाटफॉर्म कडे पळत सुटला . ग्रुप मधले सगळे मेम्बर्स आधीच पोचले होते.त्यांनी शिव्या द्यायला सुरु करण्याआधीच माफी मागत तो त्यांना सामील झाला . गप्पा गोष्टी, विनोद यांना उधाण आले होते. बऱ्याच दिवसांनी ग्रुप एकत्र जमला होता . प्रसंगच तसा होता . अक्षराचे लग्न होते आज पुण्याला . अक्षरा ग्रुप मधलीच एक . सगळ्यात पहिले लग्न होते ग्रुप मधल्या कुणाचे तरी . फ्रांस मध्ये काम करणारा एक देखणा मुलगा निवडला होता तिने . भारी एक्साईटमेंट होती प्रत्येकाला . 
                         "हाय गाईज , वोटस अप ?" असा एक मंजुळ निनाद किणानला. "ती", उभी होती मागे. परवाच परदेशातून परत आली होती वाटतं . ती पण येणार होती अक्षर च्या लग्नाला त्यांच्यासोबत .  ग्रुप मधल्या सगळ्यांच्या  तोंडातून आनंदाचे चित्कार उमटले . सगळ्यांनी तिच्याभोवती गलका केला . "कशी आहेस, सो गुड टू सी यु , काय म्हणतेय स्वित्झर्लंड ?" धाड धाड प्रश्नांच्या फैरी झडल्या तिच्यावर . त्यांच्या गप्पा रंगल्या असताना तो मात्र थोडं मागेच थांबला . नुसतं निरीक्षण करत होता तिचे . लालचुटुक रंगाचा तो ड्रेस , त्यावर खुलणारी ती चंदेरी किनाऱ्याची ओढणी . चेहऱ्याशी चाळा करणारे तिचे कुरळे केस . हल्कासा मेकअप . मंद दरवळणारे तिचे इम्पोर्टेड परफ्युम . "बदललीस गं अगदी तू . कसली छान दिसायला लागलीस . " कुणीतरी म्हणाले तिला . "खरंय "
तो मनाशी विचार करू लागला - "आधीपासूनच हि अशी जीवघेणी सुंदर , आणि त्यात परदेशातलं हवामान मानवलंय  हिला  खरं . अजूनही जास्त आकर्षक दिसतेय ही ".  मित्रांशी बोलता बोलता तिची नजर त्याच्या नजरेला भिडली , उधारीचं हसू चेहऱ्यावर आणत तिने त्याला "हाय!" केलं . त्यानेही चेहऱ्यावरची रेष हि हलु न देता मान हलवली. 
                           तेवढ्यात ट्रेन आली . "चला लवकर , नाहीतर अक्षराच्या मुलाच्या बारशाला पोचू अजून उशीर झाला तर!" असे पांचट विनोद वगैरे करत सगळेजण गाडीत चढले . ट्रेनमध्ये मुद्दामहूनच तो जेणेकरून ती दिसणार नाही अशा एका सीट वर बसला. गप्पाटप्पांना ओघ आला होता . तो मात्र आज अलिप्त होता . अजिबात मजा येत नव्हती. त्याचे ठेवणीतले sarcastic विनोद आज आटून गेले होते . सिगारेटचे झुरके घेत ट्रेन च्या दाराशी बराच वेळ बसून राहिला. तिच्यासोबत बसून तिच्याकडे दुर्लक्ष करणे त्याला जमणार नव्हते . एकदम ऑक्वर्ड  झाले असते. म्हणून उगीच झोपायचा वगैरे बहाणा करत थोडा दूरच बसून राहिला .   
          एकदाच पुणे आलं . स्टेशन जवळचं मंगल कार्यालय होतं . वेळेवर पोचले सगळे . अक्षता पाच मिनिटात पडणार होत्या . बाकी अक्षरा अगदी अप्सरेसारखी दिसत होती नवरीच्या पोशाखात . थोडं स्थिरस्थावर झाल्यावर ते सगळे स्टेज वर अक्षरा आणि तिच्या नवऱ्याला शुभेच्छा द्यायला गेले. अक्षराने थोड्या वेळानी एकदम त्याचा आणि तिचा हात पकडला आणि लटक्या रागाने म्हणाली  "आता अजून किती दिवस वाट बघणार आहात ? करिअर होतच असते. आता वाजवून टाका बार तुमचा पण . मला खूप मिरवायचं आहे तुमच्या लग्नात ". बहुतेक, गेल्या एक वर्षात काय काय घडलं त्याची कल्पना नसावी अक्षराला . तो आणि ती , दोघेही क्षणभर स्तब्ध झाली . कुणीतरी बोलावतंय असा बहाणा करून हात सोडवत तो तिथून निघून गेल. तिनेही तेच केलं असावं .  
                जेवणं वगैरे आटपल्यावर , सगळा ग्रुप अक्षरासाठी काहीतरी भेटवस्तू खरेदी करायला बाहेर पडला. खरेदी वगैरेसारख्या गोष्टींमध्ये त्याला फारसा इन्टरेस्ट नसल्यामुळे त्याने टाळले व तिथेच बसून राहिला. एका खुर्चीवर शांतपणे डोळे मिटून पडून राहिला. तेवढ्यात खांद्यावर एक थाप पडली . ओळखीचा स्पर्श जाणवला म्हणून मागे वळून पाहिले त्याने. "का रे , अगदीच बोलायचं नाही असं ठरवलंय कि काय ? एवढी अनोळखी झाले का मी ?" ती म्हणाली .  क्षणभर सुन्न झाला तो . खोटं हसून म्हणाला, "नाही गं , तसं आजिबात नाही . जरा डोकं दुखतंय म्हणून शांत आहे".  "मी ओळखते तुला चांगलं . प्लीज खोटं बोलू नकोस" ती म्हणाली . "बरेच दिवस झाले ना बोलून , कशी आहेस तू".  "अगदी मजेत आहे रे मी. ".  "बाकी एकदम वेगळी दिसायला लागलीय हं तू ".  "सुंदर म्हणायचय का तुला?" असं म्हणून ती नेहमीप्रमाणं जीवघेणं हसली. "बाकी तुझी नौकरी कशी सुरु आहे. काम कसे आहे ?" अशा बघता बघता गप्पा सुरु झाल्या . ५ मिनिटात सगळा अवघडलेपणा गळून पडला . खूप गप्पा मारल्या त्यांनी . किती बोलू नि किती नाही असं झालं होतं दोघांनाही.  एक तो अप्रिय प्रसंग (ब्रेकअप) चा सोडला तर बाकी सगळ्या गोष्टीवर गप्पा झाल्या . मन हलकं झाल्यासारखं वाटले त्याला . खंगून वाळणाऱ्या झाडाला नवी पालवी फुटावी तसं वाटू लागलं अचानक . तेवढ्यात तिच्या बाबांचा फोन आला . फोन झाल्यावर ती म्हणाली "बाबांची कार सर्विसिंग ला दिलीय आज , म्हणतायत कि, रात्री बस नि जाऊ स्टेशन वरून घरी ".  तो म्हणाला "कशाला, मी सोडीन तुला घरी . सांग त्यांना तसदी घेऊ नका म्हणून ". "ओके " ती म्हणाली . 
               परतीच्या प्रवासात दोघं सोबत बसली . बऱ्याच अजून गप्पा मारल्या. परत सगळे आधीसारखे वाटत होते त्याला. त्याच अवघड क्षणात कमजोर पडला तो. म्हणाला "आपण पूर्वीसारखं नाही होवू शकणार ? सगळं विसरून". डोळ्यात पाणी तरळले तिच्या एकदम . "नाही रे , सॉरी . पण I have moved on . तू खूप स्पेशल आहेस माझ्यासाठी . पण तुझ्या शेवटच्या फोन वर आपली जी भांडणं झाली त्यात खूप काही बोलून गेलो रे आपण एकमेकांना . खूप खोलवर जखमा झाल्या आहेत मनाला . मला नाही सहन होणार आता परत काही तसे झाले तर . मी माझ्या जीवनात खुश आहे आणि तू तुझ्या . काही तक्रारी नाहीयेत जीवनाकडून आता".  बरोबर होतं तिचं . पण क्षणात ह्रदयाला भगदाड पडले त्याच्या . मन पिळवटून निघाले . खूप राग आला स्वतःचा . का आपण विचारले तिला . का स्वतः च्या स्वाभिमानाशी विश्वासघात केला?  विषादाने तो तिला म्हणाला " हाहा , तू काय सिरियस झालीस काय, अगं मी मजा करत होतो . मी पण प्रेम वगैरे गोष्टींपासून चार हात लांबच राहायचं ठरवलंय". ती काहीच बोलली नाही . मात्र , त्या क्षणापासून सगळे अवघडल्यासारखे होवून बसले.  संभाषण तिथेच खुंटले . 
            मुंबईला पोचायला रात्रीचे १० वाजले . पावसाची रिप रिप सुरूच होती. सगळ्या ग्रुप चे निरोप घेऊन झाल्यावर त्याने पार्किंग मधून गाडी काढली आणि तिला म्हणाला  "बस ".  तिच्या घराकडे प्रवास सुरु झाला मोटार सायकल वर.  किती वेळा हा सीन आधी रिपीट झाला होता .  कॉलेज संपलं कि रोज तिला घरी सोडायचा तो.  आज मात्र सगळं वेगळं होतं . रात्रीचं शांत वातावरण . दोघंही अबोल होती . सकाळचा अवघडलेपणा पुन्हा डोकं काढून वर आला होता . नेहमीप्रमाणे ती त्याला बिलगून बसली नव्हती , तिचे केस त्याच्या मानेला गुदगुल्या करत नव्हते , तो मोठमोठ्यांनी जोक्स सांगत नव्हता आणि ती खदखदून हसत नव्हती . पावसांत भिजून चिंब झाले होते दोघेहि. 
              शेवटी एकदाचे तिचे घर आले. खाली उतरून ती म्हणाली "Thanks . निघते आता मी . बघ जमलं तर अधून मधून फोन करत जा ". तो उगाच हो म्हणाला .  एक बॉक्स काढून तिने त्याच्या हातात ठेवला . "हे तुझ्यासाठी, माझ्या आवडीचे कफलिंक्स. " त्याने काही न बोलता ते आपल्या पांढऱ्या शुभ्र कुर्त्याच्या खिशात ठेवले. ती पाठमोरी झाली आणि चालायला लागली .  ती दिसेनाशी होईपर्यंत तो तिथेच थांबून राहिला . गाडीला कीक मारून परत निघाला . पावसाने चांगलाच जोर पकडला होता आता . जाता जाता रस्त्यात एक बार उघडा दिसला . दारू न पिण्याचा निर्धार विसरून तो बार मध्ये जावून बसला . व्हिस्की चे दोन नीट पेग रिचवले . आणि बाहेर टपरी वर येवून सिगरेटचा कश मारायला लागला . तिच्या आठवणी राहून न राहून लाटांसारख्या त्याच्या मनाच्या किनाऱ्यावर धडकत होत्या . मधमाशांचे मोहोळ उठावे तशा त्याला डसत होत्या . फार एकटे वाटायला लागले त्याला एकदम . टपरीवरच्या रेडियो वर किशोर गुणगुणायला लागला . " हम बेवफा हर्गीझ न थे , पर हम वफा कर न सके… ". आता मात्र त्याला बांध अनावर झाला . घळाघळा अश्रू वाहायला लागले. पानवाल्याच्या "अरे क्या हुवा साहब . . . सब ठीक तो है ?" कडे दुर्लक्ष करून गाडीवर सवार होऊन निघाला . बास , आता तिला विसरूनच जायचे असा निर्धार केला स्वतःशी .  गाडी मुद्दामहूनच कॉलेज जवळून घेतली .  त्या कट्ट्याजवळ येउन थांबला . इथेच तासंतास बसून पावसाची रिमझिम उपभोगली होती दोघांनी कधी काळी.  कफलिंक्स काढून ठेवले कट्ट्यावर आणि सुसाट घरी निघाला . 
     घरी पोचून रेडियो ऑन केला .  आणि कच्चं भिजलेला कुर्ता काढला . पांढरा शुभ्र कुर्ता त्याचा मागून पूर्ण लालभडक झाला होता . तिचा तो लालचुटुक ड्रेस पावसात भिजून त्याच्या कुर्त्यावर आपली छाप सोडून गेला होता. तगमगत उठला तो . भरभरा बकेट मध्ये पाणी काढले , न मोजताच ४-५ चमचे सर्फ टाकलं आणि जीवाच्या आकांतानं डाग धुवून काढायाचा प्रयत्न करू लागला . पण रंग पक्का बेरकी , जायलाच तयार नाही .  अस्वस्थ झाला तो , आता घासून घासून , कुर्ता फाटायचाच बाकी राहिला होता . रंग काही निघायला तयार नव्हता . अगदी तिच्या आठवणीसारखाच… शेवटी कंटाळून, दमून , भागून मुळकुटं करून झोपून गेला बिचारा . रेडियो तसाच सुरु होता .  लता आपल्या जादुई आवाजात गातच होती….  

           "तेरे बीना जिंदगी से कोई ,शिक्वा , तो नहीं, शिक्वा नहीं, शिक्वा नहीं, शिक्वा नहीं . 
             तेरे बीना जिंदगी भी लेकिन , जिंदगी, तो नही, जिंदगी नही ,  जिंदगी नही, जिंदगी नही"
   
marathiblogs