Saturday, September 27, 2014

एकवीस वर्षांपूर्वी...

२९ सप्टेंबर १९९३ 

-----------------------------------------१----------------------------------

"गोदावरी जगताप !", नर्सने नाव पुकारताच एकदम भानावर आली ती. अगदी हायसं वाटलं तिला. वाट बघून बघून कंटाळा आला होता. सकाळी नऊ वाजल्यापासनं वाट बघत होती ती. २ तासांनी आत्ता कुठे नम्बर आला होता तिचा. देशपांडे बाईंकडे नेहमी अशीच पेशंटची रीघ असायची.  आत घाबरत घाबरतच गेली , देशपांडेबाई मान वर न करताच म्हणाल्या
"बस गं , गोदावरी!"
"म्याडम, जाउद्या मी उभीच बरी हाय. काय रिझल्ट आला ओ त्या टेष्टचा?"
"पेढे दे गोदे ! पेढे ! पोटुशी आहेस तू ! मुल होणार आहे तुला !"
आनंद गगनात मावेना गोदावरीचा ते ऐकून. गप्पकन पाय पकडले तिने देशपांडे बाईंचे.
"देवादुतावानी बातमी सांगितलीत म्याडम! पाय्हजेल तेव्हढे पेढे देते बघा !"
"अगं , पाय सोड आधी. आणि , असं एकदम हालचाली करणं बंद कर आता. नीट काळजी घे स्वतःची"
दवाखान्यातून बाहेर पडताना जणू अस्मानात तरंगत होती गोदावरी.  बारा वर्ष ! जवळपास एक तप झालं म्हणजे! एवढ्या दिवसांनी पाळणा हलणार होता तिच्या घरात. सगळी आशा सोडून दिली होती गजाननरावांनी आणि तिने. डॉक्टर झाले , वैद्य झाले , देवं झाली, नवस झाले. पण काही फायदा नाही. 'देवा, लई वाट बघायला लावलीस रं, पण पावलास रं बाबा शेवटी !' मनात म्हणाली ती.
गजाननराव तर तालुक्याच्या गावी गेले होते. कधी एकदा त्यांना भेटून हि बातमी सांगावीशी वाटत होती. पण उद्यापर्यंत वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. औषधं घरी ठेवताना एकदम घड्याळाकडं लक्ष गेलं तिचं, 'अगं बया, साडे अकरा झाले, पाहुणे येणारच असतील. लाडू बांधायला बोलावलंय सोनावणे बाइंनी, घाई करायला पाह्यजे.'  असा विचार करत लागाबगा ती सोनावणे बाईंच्या घराकडे पळाली.

गावातल्या बसस्टेंड ला अगदी लागून तो वाडा होता. मोजून सहा घरं होती वाड्यात. डावीकडून सुरु केलं तर जगतापांचं पहिलं घर. गजाननराव जगताप आणि गोदावरी जगताप , दोघंच रहायची तिथे. बारा वर्षं झाली लग्नाला, मुल बाळ नाही अजून , म्हणून परेशान असायची. पण यापुढे नाही.

-------------------------------------२---------------------------------------

दुसरं घर सोनावणे बाईंचं .  नवरा मास्तर होता, बाजूच्या गावात. दिवसभर पोरांना संस्काराचे धडे शिकवून रात्री जाम पिउन यायचा. पाच मुलं. सगळ्यात मोठी संतोषी, बावीस वर्षाची झाली होती. तिचं अजून लग्न जमत नाही म्हणून अस्वस्थ वातावरण होतं घरात. दिसायला अगदी नक्षत्रासारखी, पण कुंडलीतला मंगळ आडवा येत होता. सगळ्यात छोटा , शेंडेफळ म्हणजे शंभू, सहा वर्षाचा. फार म्हणजे फारच जीव या जोडप्याचा शंभूवर. चार मुलीनंतर झालेला एकुलता एक पोरगा म्हणून.
 'माझ्या संतोषीनं नशीब काढलं!', सोनावणे बाई विचार करत होत्या.  'पोराचं किराणा दुकान हाय म्हनं, ते पण अगदी गावात. दीड-दोनशेचा तर कमीत कमी धंदा होतोय रोज म्हनं.  सासूचा तरास नाही, घरात फक्त सासरा आन नवरा. कामाचा ताण भी नाय पडणार संतोषीवर. काय बी असू, तशी कामाला वाघ हाय माझी पोर. आज जर पसंद केली पावण्यानी तिला , तर ११ नारळाचं तोरण बांधीन रे नीलकंठेश्वरा !' सोनावणे बाई मनाशी म्हणाल्या. 
"वैषे, बघ गं संतोषीचं आवरून झालं कि न्हाय ते?" त्या म्हणाल्या.

गेला अर्धा तास स्वतःकडे न्याहाळून बघत होती संतोषी.  'काय कमी आहे माझ्यात , म्हणून एवढी वाट बघायला लावतोय रे देवा ? वर्गातली एक तरी पोरगी एवढी चांगली दिसते का सांग बरं. मग मलाच का कुणी पसंद करत नाही मग ? ह्या वेळी पसंती येवू दे तिकडून.  खरं सांगते, मायनं सांगीताल्यावानी तिचा शालुच नेसते लग्नामध्ये. नको नवीन साडीचा हट्ट मला. जाउदे, चला अण्णांच्या पाया पडून घेते'  म्हणून ती वडिलांच्या खोलीकडे निघाली.

'देवा, लई चुकतंय रे माझं, पण काय करू हि दारू सुधारु देत नाही. ' सोनावणे गुरुजी विचार करत होते. 'काल रात्री म्हणे मी शम्भूच्या कानफटात वाजवली! आठवत पण नाही मला. हात का नाही तुटले माझे ते करण्याआधी ? आजकाल काही ताळतंत्रचं नाही राहिला स्वतःवर. शंभू व्हावा म्हणून काय देव देव आणि नवस नाही केले , आणि त्याच्यावरच हात उचलला आपण? रुसून बसलंय पोर बिचारं कालपासनं. आज सकाळी जाउन त्याच्या आवडीचे काळे बूट आणले , पण ढुंकूनही नाही बघितले त्यानी त्याकडे.  उद्यापासून दारू सोडायची.  बास झालं आता. '  तेवढ्यात संतोषी आशीर्वाद घ्यायला खोलीत आली.
"शंभू , जा रे , जरा राणीताई ला बोलावून आन. म्हणावं, ती तोहफा मधल्या जयाप्रदा सारखी वेणी घालायाचीय संतोषीताईला!" संतोषीने शंभू ला फर्मान सोडलं. 'लहान आहे , म्हणून सगळेजण मलाच पळवतात.' शंभू विचार करत होता. 'आबांनी काल का मारलं तेच कळत न्हाई! चुकून आपला बॉल त्यांच्या वरणाच्या वाटीत पडला, म्हणून काय एवढं जोरात हाणायचं ? अजूनपण कानानी नीट ऐकू येईना गेलंय. बाकी, ते काळे बूट लय भारी आणलेत आबांनी.  पण लय राग आलाय त्यांचा, म्हणून बघितलं बी नाही तिकडे . पण हळूच त्यांची नजर चुकवून घालून बघणार आहे एकदा. जमलं तर उद्या शाळेतबी घालून जातो. संज्याची लय जळणार हाय माझे बूट बघून, एवढं मात्र नक्की' विचार करत करत राणीच्या घरी पोचला तो.

---------------------------------३-----------------------------------------

ते तिसरं घर होतं,कांबळे काकांचं. काका आणि त्यांची एकुलती एक मुलगी राणी दोघंच राहायची तिथे.  राणीची आई दोन वर्षापूर्वीच कॅन्सरने वारली होती. फार जीव बापलेकीचा एकमेकांवर. पण वयाप्रमाणे , राणी गेल्या दोन महिन्यांपासून बाजूच्या भोसलेंच्या बंडूच्या प्रेमात पडली होती. खूप आवडायचा तिला तो. पण लहान गावात प्रेम प्रकरण वगैरे जरा अवघडच असतं.  लगेच लोकांना कळतं, चर्चा होते.  'काल तर मीनाच्या आईनी बघितलं त्या गोठ्यामागं , आपल्याला नि बंडूला! चिठ्ठ्या देऊनच बोलावं लागतं तसं बी आम्हाला.  उघडं बोलायची सोय नाही. आणि वर ह्या मीनाच्या आईला सकाळी सकाळी शेण लागतं गोवऱ्या थापायला.  जाउदे, शेवटचा दिवस आजचा, उद्या सगळ्यांची तन्तरुन जाइल मी आन बंडू पळून गेल्यावर. आमचं लगीन होत आसंल तुळजापुरात आणि हिथं बसली असतील सगळी तर्क वितर्क करत. एक अण्णांचंच तेव्हड वाईट वाटतंय. काय वाटेल त्यांना मी पळून गेलेय असं कळाल्यावर ? जावूदे, पुढच्या आठवड्यात येणारच हाय परत  महाबळेश्वरहून. समजूत काढली तर ऐकतील, राग पळून जाइल लगेच.  ते हनिमून कि कशाला महाबळेश्वरला घेऊन जाणाराय म्हनं बंडू.  जितेंद्र हाय माझा तो.  एका साईडनं अगदी त्या मवाली मधल्या जितेंद्र सारखा दिसतो.  मज्जा येणार हाय त्याच्यासोबत.  आई भवानी , नीट पार पडू दे गं सगळं! खणा नारळानं वटी भरीन तुझी!'
'राणी ताई , संतोषी ताई बोलावायलीय तुला , ती कसली तरी वेणी घालाय्चीय म्हनं तिला. "
शंभूचा आवाज येताच राणी तयार व्हायला लागली. 'संते , तुझ्यासारखं छान लगीन थोडीच नशिबात असतंय बाई सगळ्यांच्या !' असं म्हणून आरशात पाहून गंध लावायला लागली. 'जाउदे,  तुझ्या मागनं माझा नंबर आधी लागतोय बघ. चट मंगनी न पट शादी ! माझ्या जितूला ला लई आवडते मी असा शिरीदेवीसारखा गंध लावते तवा. ' ती आरशात पाहून विचार करत होती.

--------------------------------------४--------------------------------------

चौथं घर भोसल्यांचं .  जेवढा शांत भोसले काका, तेवढीच कजाग भोसले काकू.  बंड्या एकुलता एक पोरगा त्यांचा. 
"श्यान्नव कुळी हाओत आपण! लाज नाय वाटत म्हाराच्या पोरीसोबत लगीन लावून द्या मनायला ?" भोसले काकू तळमळीने बंड्याला बोलत होत्या. बंड्याला एकदम जितेंद्र वगैरे झाल्यासारखे वाटत होते.
"जात पात मानत न्हाई मी. सच्चा इश्क किया है राणी के साथ. तुला काय कळणार म्हातारे.  परवानगी न्हाय मागत , सांगतोय तुला. परवानगी दिलीस तर हिथं वाड्यात मंडप लागंल न्हाईतर तुळजापुरात, सांगून ठेवतोय !. ठरीव आता काय करायचं"

भोसले काका आजीबात लक्ष न देता शिवाजी महाराजांच्या फोटो खाली बसून प्लेट मधला शिरा संपवत होते. भोसले काकांचा हिरो होता बंड्या. आयुष्यभर काकुंना जे बोलू शकले नाही ते बंड्या बोलायचा. अजिबात घाबरायचा नाही. काकांची बंड्याच्या प्रत्येक गोष्टीला मूक संमती असायची.  राणी त्यांना मनापासून आवडायची. बंड्याला राणीपेक्षा चांगली मुलगी नाही मिळणार हे त्यांना अगदी पटले होते.  सकाळीच जाउन तुळजापूरची दोन रिजर्वेशन चांगली दोन तास लायनीत थांबून काढून आणली होती त्यांनी बसस्टेंडवरून . आज रात्री काकू झोपल्या, कि बंड्याच्या हातात ते तिकिट ठेवणार होते ते. "आयुष्यभर हिने वैताग दिला मला फक्त. मनाचं काहीच नाही करू शकलो मी. हि घे तिकीट, आणि जा निघून. राणीसारखी पोरगी नको घालवू हाताची. जात पात महत्वाची नाही , तर मनं , स्वभाव महत्वाचा असतो", असं सांगून बंड्याला घरातनं रवाना करणार होते.
महाराजांच्या फोटो समोर हात जोडून काका म्हणाले " शक्ती द्या महाराज. यश द्या माझ्या बंड्याला. "
"बंड्या , चल रे, मंडळाचा गणपती निघालाय विसर्जनाला." बाहेरून मित्रांची हाक येताच बंड्या शर्टाच्या गुंड्या लावत बाहेर पडला. आज एकच मागणं होतं बप्पांकडे त्याचं , 'राणीशी संसार थाटायला मदत कर रे बाबा मोरया!'
रागारागानी भोसले काकू पण पोतदार बाईंकडे निघाल्या. त्यांनीच तर सांगितलं होतं बंड्या आणि राणी बद्दल सगळं . 
----------------------------------------५------------------------------------

"आहेत का मीनाच्या आई घरात?" भोसले काकूंचा आवाज ऐकून पोतदार बाईंनी दार उघडले.

 पाचव्या घरात राहायचे पोतदार कुटुंब. पोतदार गुरुजी तालुक्याच्या गावी शिक्षक, एकदम अबोल स्वभाव. चार मुली अन दोन मुलं. सगळ्यात मोठी मुलगी तिचं नाव मीना. म्हणून पोतदार बाईंना सगळ्या वाड्यात "मीनाची आई" म्हणूनच ओळखलं जायचं. नवऱ्यावर फार जीव त्यांचा.  गेल्या वर्षी नवऱ्याचं डायबेटीसचं निदान झाल्यापासून, एकही  गोष्ट गोड नव्हती लागत पोतदार बाईंना.  कारण म्हणजे पोतदार गुरुजींना गोड पदार्थ खूप आवडायचे.  बाई त्यांना रोज काही न काही गोड करून द्यायच्या. पेढे , बासुंदी , शेवयाची खीर अगदी काहीच नसेल तर कमीत कमी सुधारस तरी असायचाच.  गेले एक वर्ष झालं घरात काही गोड धोड बनलं नव्हतं. आज अगदी एवढी अनंत चतुर्दशी असून साधे मोदक सुद्धा नव्हते केले. खूप जीव तुटायचा पोतदार बाईंचा. वाटायचं, नवऱ्याला काय काय गोड धोड बनवून खाऊ घालावं! पण हाय रे डायबेटीस. 
पण कालच गुरुजींच्या पगार वाढीची गोड बातमी मिळाली होती. महिना चक्क २०० रुपये वाढले होते.आणि गेल्या एका वर्षाची थकबाकी म्हणीन २४०० रुपये पण मिळणार होते. आनंद गगनात मावत नव्हता त्यांचा. म्हणून पोतदार बाईंनी सरळ सांगून टाकले. 
"हे बघा , मी उद्या तुमच्या आवडीचे गुलाबजाम करायचं ठरवलंय. आज किती दिवसांनी अशी छान बातमी ऐकायला मिळालीय. आज रात्री तयारी करते मी. उद्या शाळेतून आलात कि गरम गरम गुलाबजाम खायला घालते. जीव आसुसला असेल न हो तुमचा काही तरी गोड खायला? मी मेलीने मात्र काल चक्क २ जिलेबी खाल्ल्या हळदी कुंकाला गेले होते जगतापांकडे तर!" असं म्हणून डोळ्याला पदर लावला त्यांनी.
पोतदार गुरुजी मात्र जाम खुश होते. उद्याचे गुलाबजामचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. गेल्या एक वर्षाचा गोडधोडाचा उपवास सुटणार होता उद्या. मनातल्या मनात गणपती बाप्पाला नमस्कार केला त्यांनी. 
"अगं , त्या बाजूच्या पिंकी द्यायला विसरू नको बरं का गुलाब जाम . तिलाही फार आवडतात." ते म्हणाले.

-------------------------------------६------------------------------------

सहावं आणि शेवटचं घर घोडकेंच. घोडके काका लोहाराचं काम करायचे. बैलाची नाल , बैलगाडीच्या चाकाची आरी वगैरे असल्या गोष्टींसाठी सगळं गाव त्यांच्याकडे यायचं. पण बायकोच्या आजारपणात सगळी कमाई जायची. बायको अंथरुणाला खिळून, दम्याने त्रस्त.  एकुलती एक पोरगी पिंकी , तिची मात्र खूप हेळसांड व्हायची. वेळेवर खायला नाही मिळायचं, पैशांची चणचण तिला अगदी लहान वयातच कळाली होती. अकाली वयातच प्रौढत्व आलं होतं तिला. तशी , फारच समजूतदार मुलगी होती.  
तिच्या शाळेची सहल जाणार होती पुढच्या आठवड्यात सोलापूरला. उद्यापर्यंत शाळेत पैसे जमा करायचे होते. पस्तीस रुपये ! तिला तर अप्पांचा चेहरा बघूनच कळले कि नाही जमणार हे. तरीही अप्पा म्हणाले , " बघतो, मी काही जमतेय का". तिला माहिती होतं कि नाही जमणार.  फक्त गोड हसून ती म्हणाली
" नाही अप्पा,माझाही खूप अभ्यास राहिलाय, मलाच जायचे नाही सहलीला. तुम्ही नका विचार करू त्याचा. " 

सकाळपासनं हातोडीचे घाव ऐरणीवर नाही तर स्वतःच्या काळजावर बसल्यासारखे वाटत होते घोडके काकांना. ' पिंकीचं लय वाईट वाटतंय. तिचं वय काय, करावं काय लागतंय तिला. बाराव्या वर्षी तीन लोकांचा सगळा स्वयंपाक करते. आजारी आईला काय हवं नको ते बघते. एवढं करून शाळेत पयला नंबर दर वर्षी. कदी नाही ते पोरीनं कायतरी मागितलं आणि आपल्याला नाही जमत. थु हाय आपल्या जिंदगीवर! ते काय नाही , काही करून पिंकी ला सहलीला पाठवायचं. आजच भोसले साहेबांना विनवणी करून एक पन्नास रुपये उधार घेतो. पण पिंकीला सहलीला पाठवणारच!"
तो विचार करून घोडके काकांना बरे वाटले. 
"पिंके , जा ग सहलीला , उद्या सकाळी शाळेत जायच्या आधी देतो पैशे तुझ्याकड"
अप्पांचे बोल ऐकून पिंकीच्या मनात आनंदाचे कारंजे उडाले. मन थुइथुइ नाचायला लागलं. कधी एकदा मैत्रिणींना ही गोष्ट सांगतेय असं झालं. देव्हारातल्या साईबाबा च्या मूर्तीला हात जोडून नमस्कार केला आणि कणिक तिम्बायाला घेतली तिनं.  

---------------------------------------------------------------------------

३० सप्टेंबर १९९३ 

गाडीला करकचून ब्रेक लागला , आणि मला जाग आली. डोळे उघडून पाहतो तो तर वाहनांची लांबच लांब लाईन लागलेली. पोलिस, चेकिंग केल्याशिवाय एकही गाडी पुढे सोडत नव्हते.
"पर्मिशन हाय का ? नसंल तर ट्रक वळवायचा हिथनंच म्हागं!" हवालदार म्हणाला. 
उत्तरासाठी ड्रायव्हरने माझ्याकडे बोट दाखविले.  खिशातला कागद काढून हवालदाराकडे दिला मी. 
"कलेक्टरची परमिशन आहे.  जाउद्या लवकर प्लीज"
कागद न्याहाळून बघत हवालदार म्हणाला.  
"कुटले , किल्लारीचे का तुमी? लय वंगाळ झालं बगा. होत्याचं नवतं केलं या भुकंपानं!"
"हो, किल्लारीचे आम्ही"
"घरचे सगळे बरे तर हायत नव्हं ? कुणालाबी इचारा , २-४ मानसं तर गेलेलीच हायत घरातली"
"नाही, देवाच्या कृपेने सगळे बरे आहेत, आज सकाळीच माझे आई वडील लातूरला पोचले. पण घाई घाईत घराला कुलूप सुद्धा लावायचं राहिलं. महत्वाची कागदपत्रं , आणि थोडं सोनं नाणं तसेच आहे कपाटात. राहिलं असेल आत्तापर्यंत , तर शोधून घेऊन जावे म्हणून चाललोय किल्लारीला. "
"असं व्हय , चला जावा बिगीबिगी", असं म्हणून हवालदाराने आमची सुटका केली.       
सकाळचा प्रसंग काही केल्या डोळ्यासमोरून जात नव्हता माझ्या. सकाळी चारच्या सुमारास भूकंपाने घर हादरले तेव्हापासून जागाच होतो. लातूरला एवढा धक्का बसला तर किल्लारीला काय झाले असेल म्हणून माझी बहिण तेव्हापासून रडतच होती. टेन्शन तर मला पण जाम आले होते. आई वडील किल्लारीलाच असायचे. काय झाले असेल त्यांचे, हा विचार पोटात गोळा आणत होता. शेवटी सात वाजता एका सायकल रिक्षामधनं दोघेही घरी आले तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला. अंगावरच्या कपड्यावर तसेच आले होते ते. काही सामान सोबत न घेता , जीव मुठीत घेऊन, पहिले वाहन मिळेल ते घेऊन लातूरला आले होते. आम्हाला पाहताच, ताईला जवळ घेऊन खूप रडले वडील. त्यांना माझ्या जीवनात पहिल्यांदाच रडताना पाहत होतो मी. भूकंपाचे त्यांनी सांगितलेलं वर्णन ऐकून अंगावर काटा आला आमच्या. थोड्या वेळानी , माझे काका आणि मी किल्लारीला जायचं ठरलं. सगळं सामान , स्पेशलि कागदपत्रं आणि, सोनं-नाणंतरी परत घेऊन येवू असा विचार होता.
गावात पोचल्यावर बघवत नव्हतं काहीच. आक्रोश, ती झालेली पडझड, मदतकार्याचा गोंधळ खरंच काही बघवत नव्हतं.  गाव ओळखूच येत नव्हतं मला. घरातलं समान गोळा करून झालं . ट्रक मध्ये चढवलं. सुदैवानं आमचं घर सिमेंटचं असल्यामुळे माझे आई वडील सुखरूप राहिले होते. अगदी गेल्याच वर्षी जुन्या वाड्यातून नवीन घरी शिफ्ट झाले होते.  परत निघताना विचार केला, जरा जुन्या वाड्यात तर जाऊन येवू. आपले जुने शेजारी वगैरे , त्यांचे काय हाल आहेत विचारून येवु. ड्रायवरला थोडा वेळ थांबायला सांगून काका व मी वाड्याकडे निघालो. दगड मातीच्या चा खचातून कसाबसा रस्ता काढत तिथे पोचलो.

वाडाच नव्हता तिथे! सगळा जमीनदोस्त झाला होता. फक्त दगड मातीचा डोंगर राहिला होता. बाजूला १०-१२ प्रेतं पांढऱ्या कपड्याखाली झाकून ठेवली होती.  जगताप काका डोक्याला हात लावून बसले होते.
"एक माणूस आहे हो आमच्या घरचा अजून मातीखाली, माझी बायको. काढा हो तिला!"  मदतकार्या साठी आलेल्या जवानांना विनंती करत होते. बिचाऱ्या जगताप काकांना माहितीच नव्हतं की , एक नाही तर दोन जीव अडकलेत मातीखाली. आज जगताप काकू त्याचीच गोड बातमी सांगणार होत्या.
सोनावणेच्या घरी फक्त सोनावणे काका वाचले होते. ते पण डोक्याला हात लावून सुन्न बसले होते. "शंभू शंभू" एवढंच पुटपुटत होते. एवढा मोठा धक्का! दारू सुटणार नाही त्यांची आता आयुष्यभर.  कसं पचवायचं हे सगळं ? कांबळे , भोसले दोन्ही कुटुंब गायब होती ,  जात काय न पात , शेवटी एकाच मातीत मिसळली होती दोन्ही कुटुंब ! आणि त्यांचं न जोडलं गेलेलं नातंही. पोतदारांच्या घरी फक्त पोतदार काका गेले होते, गोड खायची इच्छा अपुरी ठेवूनच.  पोतदार काकू भोवळ येउन पडल्या होत्या. मुलं आक्रोश करत होती.  घोडकेंच्या घरी, काका एकटेच बचावले होते . आजिबात रडत नव्हते ते. पाणी आटलं होतं डोळ्यातलं त्यांच्या बहुतेक. राहून राहून खिशातली पन्नासची नोट चाचपत होते , तेवढाच एक त्यांच्या जिवंत असण्याचा पुरावा होता.

बाजूला, सगळ्यांच्या संसारातल्या सापडतील त्या गोष्टींचा ढीग रचून ठेवला होता. त्यात जगताप काकूंनी नुकतेच विणायला घेतलेलं स्वेटर होतं.  संतोषीचा शालू होता. मातीचा थर चढून कसनुसा दिसत होता अगदी. शंभूचे काळे बूट मातीने पांढरे पडले होते. बंडूने अगदी प्रेमानी घरी लावलेल्या "हिम्मतवाला" च्या पोस्टरला काहीच झालं नव्हतं. जितेंद्र आणि श्रीदेवी अगदी प्रेमानी एकमेकांच्या डोळ्यात बघत होते.  राणीचा मेक अपच्या सामानाचा डब्बा विखरून पडला होता. पोतदार काकूंनी गुलाबजामसाठी आणलेला खवा एका कागदात पडून होता. पिंकीने उत्साहाने भरायला सुरु केलेली सहलीची बैग फाटून चिंध्या झाल्या होती. 

मन बधीर झालं.  दुःखाची परिसीमा वगैरे म्हणतात ते यापेक्षा वेगळ काही नसावं. देवाने आणि दैवाने केलेली क्रूर थट्टा होती ही. अंत्यदर्शन, वगैरे भानगडीत न पडता सरळ लातूरला निघालो. त्यात विश्वास नाही माझा. माणसांचे निष्प्राण चेहरे बघून अंत्यदर्शन घेण्याचा कसला हा शिष्टाचार? मला नाही पटत. आयुष्यभर मग तोच चेहरा समोर येईल ना  त्या माणसाची आठवण झाल्यावर ? कशाला ते अंत्यदर्शन? त्यापेक्षा ते हसरे खेळते सजीव चेहरेच लक्षात ठेवायला आवडतं मला. लोकं नाव ठेवतात , म्हणतात कमकुवत आहे मी किंवा  काहीजण म्हणतात की , अत्यंत दगडी ह्रदयाचा आहे मी इत्यादी इत्यादी. जे पण असेल, पण मी नाही घेत आणि नाही घेणार कधी ते अंत्यदर्शन ! पण त्या स्वप्नांचे काय ? त्यांचे अंत्यदर्शन मी चुकवू शकलो नव्हतो. त्यांची ती राखरांगोळी कशी विसरू शकणार होतो मी ?

हळूहळू , दहा/वीस हजार मानसं गेली भूकंपात अश्या बातम्या यायला सुरु झाल्या. एक गोष्ट सांगायचे विसरले बातमीदार , माणसांपेक्षाही जास्त स्वप्नं मेली होती त्या दिवशी….




No comments:

Post a Comment

marathiblogs